शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१३

डर के आगे जीत है


डर, फोबिया, भीती... हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे. जर मनुष्याला कशाचीच भीती राहिली नाही त्याचे आयुष्य हे आयुष्यच राहणार नाही. जगात ब-याच अशा गोष्टी आहेत ज्यांची मनुष्याला भीती वाटते. ही भीती जन्मजात असते अथवा निर्माण केली गेलेली असते.

मी पण एक सामान्य मनुष्य आहे, मला पण काही गोष्टींची भीती वाटते. नुकतंच कुठेतरी वाचलं "भीती कितीही मोठी असली तरी ती दुर करण्यासाठी थोडीशी हिंम्मत पुरेशी असते" आणखी एक गोष्ट मला समजली आहे ती म्हणजे तुम्हाला भितीदायक असलेल्या गोष्टी बद्दल बिनधास्त चर्चा करा, कदाचित तुम्हाला काही उपाय मिळेल.

मला पुढील काही गोष्टींची खुप भीती वाटते.

१) विजेचा कडकडाट (विकिपीडिया)
२) सरपटणारे प्राणी (विकिपीडिया)
३) उंची (विकिपीडिया)
४) सुई (विकिपीडिया)

मी ठरवलं आहे की या सर्व गोष्टींची भीती घालवायची, पण कसं??

एक उपाय म्हणजे या सर्व भितींना सामोर जायचं...

प्रयत्न क्रमांक १: मला लहानपणी पासुन सुई/इंजेक्शन ची भीती वाटते. १० वर्षाचा असे पर्यंत खुप इंजेक्शनं घेतली, पण पुढे (सुदैवाने) १५ वर्ष इंजेक्शन घ्यायची गरज पडली नाही. पण जेव्हा पुन्हा इंजेक्शन घ्यावे लागलं तेव्हा माझा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

आता ह्या सुई ची भीती कशी घालवायची... भीतीला सामोर जाण्यासाठी सारखं आजारी पडणं हे मूर्खपणाचं लक्षण ठरेल, म्हणुन एक सुरेख विचार डोक्यात आला. "टॅटू करणे"

खुप हिंम्मत एकवटुण मी हा निर्णय घेतला. या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करणारे, भीती दाखवणारे, नकार देणारे आणि हसणारे बरेच होते. पण माझा निर्णय पक्का होता, आणि मी ठरवलं आता माघार नाही. पण प्रश्न होता टॅटू काढावा तरी काय?

उत्तर सोप्पं होतं, मला आवडणाऱ्या एका व्यक्ती चे नाव टॅटु करण्याचा मी निर्णय घेतला, ती आवडती व्यक्ती आहे माझी मुलगी "निधी"

२६ ऑक्टोबर दिवस उजाडला आणि स्टुडिओ मधे गेलो आणि हा टॅटू बनविला.


हा टॅटू काढायला संपुर्ण १ तास लागला. स्टुडिओ मधुन बाहेर पडलो, टॅटू पाहिला आणि झालेला आनंद बोलुन गेला "डर के आगे जीत है"

प्रयत्न क्रमांक २: उंची ची भीती वाटणे हे साहजिकही आहे, मी फार उंचीवर गेलो तर मला भोवळ तर नाही येत पण माझे पाय एकाच जागी अडकून राहतात. जेव्हा मित्र म्हणाले की आपण सुट्टी मधे बन्जी जम्पिंग करायला जाऊ, तेव्हा प्रथम मनात खुप भीती वाटली. एवढ्या उंचीवर नुसतं उभे राहायचं नाही तर तिथुन उडी मारायची म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे, असा विचारही मनाला चाटुन गेला.

पण मला ही भीती घालवायची होती. इथे सकारात्मक विचार करणे खुप महत्त्वाचं होतं. प्रथम ज्या मित्रांनी हा प्रकार केला आहे मी त्यांच्या बद्दल विचार केला पण त्यांच्याशी काहीच बोललो नाही.

"कारण त्याने केले म्हणुन मी करणार" हा निव्वळ मूर्खपणा आहे. पण माझा विचार हा होता की ते करु शकतात तर मी का करु शकणार नाही.

मी मनाचा निर्धार केला, बुकींग केलं आणि ठरवलं की बन्जी जम्प करायची. ठिकाण होतं "ब्लोकरान्स ब्रीज, दक्षिण आफ्रिका"


हे जगातलं सर्वात उंच बन्जी जम्पिंग चे ठिकाण आहे. इथे गेल्यावर बरेच घाबरलेले चेहरे दिसले. मोठ्या हिमती ने इथपर्यंत येउन माघार घेणारे दिसलं. इथे आल्यावर तुमच्याकडे तीन पर्याय असतात. १) बन्जी जम्प करणे २) बडी म्हणुन पुलावर येणे मात्र उडी न मारणे ३) दुर उभे राहुन सगळा प्रकार पाहणे.

पर्याय क्रमांक ३ तर मी कधी खोडून टाकला होता, तर २ मधे काहीच अर्थ नव्हता. आता राहिला पर्याय क्रमांक १ म्हणजे बन्जी जम्प करणे.

ब्लोकरान्स ब्रीज ची उंची आहे २१६ मिटर, आणि या बन्जी जम्पची सर्वात उंच बन्जी म्हणुन नोंद गिनिज बुकात आहे.

या पुलाची एकुण लांबी ४५१ मिटर आहे, बन्जी जम्प पुलाच्या मध्य भागावरून मारावी लागते, आणि तिथे पोहचण्यासाठी हे अंतर चालत जावे लागते. आणि हाच सर्वात भितीदायक प्रकार होता. कारण मला एका जाळीदार रस्त्यावरून हे अंतर कापायचे होते. चालायला सुरुवात केल्यावर मला उंची ची जाणीव झाली आणि माझे पाय हलायचे थांबले. मी ठरवलं आता खाली पहायचं नाही समोर पाहुन चालत राहायचं... हा उपाय उपयोगी पडला आणि हे सगळं अतंर मी सहज चालुन गेलो.

पण इतक्यात सगळं संपलं नव्हतं, अजुन उडी मारायची बाकी होती. इथे पण हाच निर्णय घेतला, खाली पहायचं नाही, दुसर एक महत्त्वाचा निर्णय होता स्व:ता उडी मारणे. कारण तुम्ही थोडा जरी वेळ लावला तर तुम्हाला धक्का दिला जातो आणि प्रकार जास्त भितीदायक आहे.

पाच म्हणायच्या आत मी उडी मारली, उडी मारतांना भीती ने पाय हलेणासे झाले म्हणुन उडी जशी असायला हवी तशी नाही मारल्या गेली... पण महत्त्वाचं हे होतं की मी उडी मारली...


 मला जेव्हा पुन्हा वर ओढण्यात आलं तेव्हा भीती आणि आनंद अशा मिश्र भावना होत्या, पण भीती गेली होती आणि राहिला होता फक्त आनंद... मनात पुन्हा तोचं विचार "डर के आगे जीत है"आता उंची ची भीती थोडी नक्कीच कमी झाली आहे.


४ पैकी दोन भीती कमी करण्यात मला थोडंफार यश आलं आहे. उरलेल्या दोन भीती लवकरचं कमी होतील असे वाटतं आहे.

ह्या दोन्ही भितींना सामोर जाण्यासाठी मला थोडसं धाडस दाखवावं लागलं. धाडस हे विकत मिळत नाही तसंच ते एखादं शीतपेय पिउन, क्रिम लावुन अथवा बनियन घालुन येत नसतं... तुमचं तुम्हालाच ते निर्माण करावं लागत असतं.

तो दोस्तों, डर से मत डरो, डर का सामना करो क्युं की डर के आगे जीत है...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...