रविवार, २८ जुलै, २०१३

आशीर्वाद

आपली व्यक्ती नेहमीच मनापासून आशीर्वाद देते, पण जेव्हा कुणी परकी, रक्ताचं नातं नसलेली व्यक्ती मनापासून आशीर्वाद देते तेव्हा त्याच्या आठवणी आयुष्यभर ताज्या राहतात.

एक फिरतीची नोकरी करणारा तरुण एका अनोळखी शहरात कामानिमित्त जातो, पंचविशीतला हा तरुण घरापासून खुप दुर असतो. बोलका, मनमिळाऊ स्वभाव त्यामुळे ओळखी सहज होतात आणि लक्षात देखील राहतात. सुरवातीला तो त्या शहरात क्वचितच जात असे, पण नंतर वारंवारता वाढते आणि मग आठवड्यातून २-३ दिवस त्याला तिथेच राहावे लागते. मोबाईल फोन गरजेची वस्तु नसुन चैनीचे गोष्ट होती त्या काळची ही घटना.

आता जवळ जवळ तो त्या शहरात राहु लागला होता. कारण क्लायंट च्या व्हिजिट साठी प्रवास खर्च आणि प्रवासातला थकव्या पेक्षा तिथे लॉज वर राहणे सोयीस्कर होते. त्याकाळी मोबाईल फार महागडे होते. कार्यालयीन कामं पोस्ट अथवा कुरीअरने व्हायची. फार महत्त्वाचं असेल तर फोन. दिवसातून एकदा तरी त्याला हेड ऑफीस ला फोन करावा लागत असे, त्यासाठी पर्याय होता STD-PCO.

पहाटे सकाळी लवकर उठायचं, चहा नाश्त्यासाठी बाहेर पडायचं. रोजचा पेपर घेउन पुन्हा रुमवर येऊन क्लायंट कडे जाण्यासाठी तयार व्हायचं. बाहेर पडलं एका STD-PCO वर जाऊन हेड ऑफीसला फोन करायचा आणि पुढे कामाला जायचे. थोड्याच दिवसात त्या STD-PCO वर काम करण्या-या बाईंची आणि त्याची ओळख झाली. कामाचं फोन वर बोलुन झालं की ५ मिनिट का होईना तो त्यांच्याशी बोलतं असे. भाषेतल्या लहेज्यातुन त्यांनी लगेच ओळखलं की, तरूण या शहरातला नाही.

सुरवातीला बोलण्याचा विषय म्हणजे, थोडीफार चौकशी, कुठे काम करता, काय काम करता इथ पर्यंतच होता. पण हळु हळु ही ओळख वाढतं गेली आणि त्याला त्या बाईंबद्दल कळु लागलं, वयाने चाळिशी मधे असलेल्या त्यांना तो आता काकी म्हणु लागला. काकी विधवा होत्या, त्याच्या पतीचे अपघाती निधन झाले होते. कमी शिक्षण, घरातून नसलेला पाठिंबा अशा परिस्थिती मध्ये त्या बाहेर पडल्या. सुरुवातीला मजुरीच कामं केली आणि आता या STD-PCO वर ऑपरेटरच काम करत होत्या. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा. मोठ्या मुलीने प्रेम विवाह केल्याने नातेवाईकांनी सर्व मदत नाकारली. अशा परिस्थिती मधे आयुष्य काढणाऱ्या काकींच्या सर्व आशा त्यांचा मुलगा रोहित वर टिकून होत्या.

रोहित १७ वर्षाचा पो-या... प्रत्येक "टीन-एज" असतो तसाच. पण त्याच्या व्यक्तिमत्त्वाला पण बरेच पैलु होते. परिस्थितीची जाणीव असणे म्हणजे काय असते हे रोहितला पाहुन त्याला समजले. काकी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत STD-PCO सांभाळायच्या. ७ नंतर तेच काम रोहित ११ वाजेपर्यंत करायचा.

आता त्याची आणि काकीची चांगली ओळख झाली होती. काम लवकर संपले अथवा रुम वरती कंटाळा आला तर तो त्यांच्याशी गप्पा मारायला येत असे. काकींना पण त्याची सवय झाली होती. एखाद्या दिवशी उशीर झाला तर त्या खुप काळजीने त्याची चौकशी करायच्या. थोड्याच दिवसात दोघांमध्ये एक अनाम असं नातं निर्माण झालं होत.

७ नंतर काकी घरी गेल्या की तो रोहित शी गप्पा मारयला येत असे. रोहित अत्यंत शांत आणि मेहनती मुलगा होता. त्याच्याशी गप्पा मारतांना त्याला त्याच्या कॉलेज चे दिवस आठवायचे... ज्या मध्ये खुप खुप फरक होता.

रोहित सकाळी लवकर उठून कॉलेज ला जायचा, दिवस कॉलेज मध्ये अभ्यास केला की, ४ ते ७ पिग्मी गोळा करायची आणि ७ ते ११ STD-PCO. रोहितशी पण त्याची चांगली गट्टी जमली. तो रोहितशी नियमीत गप्पा मारायचा. अभ्यास कसा सुरु आहे चौकशी करायचा. ही गट्टी, मैत्री इतकी घट्ट झाली की रोहित त्याला दादा म्हणु लागला. तो ही रोहितला मग खुप जपु लागला कारण त्याचं वय...

ते वयच असं असतं ज्या मधे आपलं मन चंचल असतं, जगाच्या चकाचौंध प्रकाशाकडे आपण ओढले जातो. कधी मार्ग चुकु शकतो... तसा रोहित खुप समजुतदार होता. पण मित्रांसोबत राहुन प्रत्येक "टीन-एज" मुलाला कराव्या वाटणाऱ्या गोष्टी त्याला ही कराव्या वाटतं असे. पण परिस्थिती मुळे रोहित मन मारायचा. रोहित त्याला नेहमी विचारायचा की "दादा, महिन्याला पैसे कमी पडतात, मी आणखी एक नोकरी करु का? कॉलेज एक दोन तास कमी केले तरी मी पास होईल मी" त्यांची कौटुंबिक परिस्थिती माहिती असुनही त्याने स्पष्ट नकार दिला... आणि रोहितनेही तो मान्य केला.

रोहितशी झालेल्या गप्पा तो क्वचितच काकींना सांगत असे पण काकींना सर्व कळत असे. कारण रोहितच्या बोलण्यात त्याचा उल्लेख वारंवार होतं असे.

एक दिवस काकी सकाळी जरा नाराज मुड मधे बसल्या होत्या, तो फोन करायला आला तरी चौकशी नाही केली. त्याला लगेच काहीतरी घडलं आहे याचा अंदाज आला. फोन झाल्यावर कामाला जाण्याऐवजी त्याने खांद्यावरची बॅग खाली ठेवली आणि विचारले,

"काकी, काय झालं?"
त्या शांतच होत्या.

त्याने परत विचारलं, "काकी??"

त्या थोड्या वैतागल्या होत्या, आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली.

"तुम्हाला तर आमची परिस्थिती माहिती आहे, कसं बस धकत आमचं... रोहित आता मोठा होतं आहे. त्याचं पण एक जग आहे, त्याचे मित्र आहेत. मला माहिती आहे की खुप समजुतदार आहे पण कुणी तरी त्याच्या मनात कुत्रा पाळायचं घातलं आहे आणि तो हट्ट धरुन बसला आहे, मी नाही म्हणाले तर दोन दिवस झाले जेवला नाही. बोलत पण नाही माझ्याशी."

काकींना रडु आलं, ते अश्रु रोहितच्या हट्टामुळे नव्हते तर त्यांच्या परिस्थिती मुळे होते. रोहित अल्लड होता. मित्रांमध्ये राहुन अशा गोष्टी सहज मनामधे घर करुन जातात.

तो खाली बसला... त्याला त्याचा भुतकाळ आठवला, तो पण असाच होता. अल्लड... शांत पणे विचार करुन तो म्हणाला "काकी मी रोहितशी बोलतो, तुम्ही काही काळजी करु नका"

हे बोलुन तो कामावर निघुन गेला. दिवसभर त्याच्या डोक्यात तोच विचार संध्याकाळी काय करायचं

संध्याकाळी STD-PCO वर गेला, रोहित आला होता. त्याच्यासाठी हा खुप कठीण प्रसंग होता. त्याने कधीच कुणाची समजुत काढली नव्हती. रोहित लहान होता पण हा विषय दादाला का सांगितला म्हणुन आई वर चिडला असता.

गप्पांना सुरुवात झाली, इतर गप्पा झाल्यावर पेपर मधील कुत्र्याची पिल्लं विकणे आहे ही जाहिरात त्याने रोहित ला दाखवली. रोहित एकदम फुलला, आनंदाने त्याने सांगायला सुरुवात केली. दादा मी पण पाळणार आहे कुत्रा...
 लक्षात आले आता आपण बोलु शकतो. त्याने त्याच्या (आर्थिक) परिस्थितीचा कुठेही उल्लेख न करता बोलायला सुरुवात केली

"रोहित मला सांग, तु आणि आई सकाळीच बाहेर पडता. दिवसभर घरात कुणी नाही. तु रात्री उशीरा घरी जातो. मग कुत्रा सांभाळणार कोण? अरे मित्र आता कुत्रा देतील आणुन पण सांभाळणार आहेत का? तो तुलाच सांभाळावा लागणार."

रोहित ने विचार केला, दोन तीन पर्याय पण सांगितले पण दादा चा मुद्दा त्याला पटला.

दुस-या दिवशी सकाळी काकी STD-PCO मध्ये आल्या. त्याला बघितल्या बघितल्या स्मित हास्य त्यांच्या चेह-यावर खुललं. त्याने विचारायच्या आत काकी म्हणाल्या...

"तुम्ही रोहितला समजावुन सांगितलेलं दिसतंय"

"हो... का? काय झालं?" तो म्हणाला.

काकी म्हणाल्या, "रोज मी घरातुन बाहेर पडतांना रोहित मला नमस्कार करतो, दोन दिवस झाले केला नव्हता. कारण तो नाराज होता, आज ही तो नमस्कार नाही करणार ह्या भावनेने मी बाहेर पडत होते तर त्याने मला थांबवलं आणि वाकुन नमस्कार केला..."

हे ऎकुन त्याला खुप आनंद झाला...

काकी बोलतं राहिल्या... "तुम्हाला सांगते ही बाब खुप शुल्लक होती. पण मी समजुत काढु शकत नव्हते, अहो ’वाईट विचार एखाद्याच्या मनात पेरणे खुप सोपं असतं, पण चांगला विचार पेरून तो रुजवणे खुप कठीण असतं...’ आणि तुम्ही ते केलं. तुम्ही जगात कुठेही जा माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत"

तो समाधानाने तिथुन बाहेर पडला... आता तो एकटा नव्हता, एका आईचा आशीर्वाद त्याच्या सोबत होता.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...