मंगळवार, १८ जून, २०१३

रोबेन आयलंड - अ लॉंग वॉल्क टु फ्रीडम

रोबेन आयलंड - अ लॉंग वॉल्क टु फ्रीडम

एखादी वस्तु सहज मिळाली तर त्या वस्तूचं महत्त्व कमी होतं, मग ती वस्तु आपण वाट्टेल तशी हाताळतो. "स्वातंत्र्य" ही देखील अशीच एक वस्तु आहे. स्वातंत्र्य बद्दल लिहिण्या इतपत माझा अभ्यास नाही. पण आज केपटाऊन शहराजवळच्या रोबेन आयलंडला भेट दिल्यानंतर स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळाला असे म्हणता येऊ शकते पण मी म्हणेल माझा स्वातंत्र्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलला आहे.

ऑफीस कामानिमित्त माझी ही दक्षीण आफ्रिकेला दुसरी भेट आहे. या चकरेला माझा मुक्काम जगातल्या काही सुंदर शहरांपैकी एक अशा केपटाऊन शहरात आहे. इथे येण्यापूर्वी या शहराबद्दल मी खुप काही ऎकलं होतं. जसे की हे शहर किती सुंदर आहे, अटलांटिक महासागर, केप ऑफ गुड होप आणि बरच काही. सुट्टी मिळाली की मग अशाच एखाद्या ठिकाणी भटकंती निघते.

आज सोमवार असूनही सुट्टी मिळाली, निमित्त होतं ’युथ डे’. सगळ्या मित्रांनी मिळून अगोदरच रोबेन आयलंड ला जायचा बेत आखला होता. मी दरम्यानच्या काळात विकीपेडीयावर मिळेल ती माहिती वाचुन घेतली होती. सकाळी ११ ला बोट होती, आम्ही सगळे धक्क्यावर (V & A Waterfront) जमा झालो. ही जागा पण अप्रतिम सुंदर आहे. एखादी व्यक्ती एकटी जरी असेल तरी अख्खा दिवस आरामात घालवु शकेल.
रहाट पाळणा

धक्का

बुकींग अगोदरच केलं होतं, रांगेत बरेच आफ्रिकन, अमेरिकन आणि भारतीय होते. आमची बोट जरा उशीरा निघाली, साधारण ४५ मिनिटात आम्ही रोबेन आयलंड ला पोहोचणार होतो. बोट अतिशय सुंदर, स्वच्छ आणि वातानकुलीत होती. बोटीत लावलेल्या टिव्हीवर या बेटाचा थोडासा इतिहासही दाखविण्यात आला.

बेटावर पोहोचल्यानंतर एक बस या बेटाची सफर करवते.
प्रवेशद्वार
 हे एक ओव्हल आकाराच बेट असुन अंदाजे ५ किमी चा परिसर आहे. बस मध्ये गाईड (अ‍ॅलन ) होता जो बेटावरील सर्व ठिकाणांबद्दल माहिती उत्तमरीत्या देत होता. त्यानी दिलेली माहिती आणि ती ठिकाणं पाहुन मन सुन्न झालं. त्याकाळी सरकार विरुद्ध उठणारा प्रत्येक आवाज दाबला जात असे, म्हणुन सरकार अशा व्यक्तींना या बेटावर आणुन टाकत असे, थोडक्यात सत्तांध-यांनी या बेटाचा वापर ’डंपिंग ग्राऊंड’ म्हणुन केला.

हो ’डंपिंग ग्राऊंड’ कारण हजारोंच्या संख्येने राजकीय कैदी इथे आणले जात आणि त्यांना इथे बंदी बनविण्यात येत असे. इतकच नव्हे तर कुष्ठ रोगी देखील याच बेटावर ठेवण्यात आले होते. त्यातले बरेचसे कुष्ठ रोगी येथेच मरण पावले. या बेटावर बरीचशी स्मशान देखील आहेत, इथेच त्यांना दफन करण्यात येत असे.
स्मशानभूमी
 या बेटाचा विषय निघाला की एकच नाव पुढं येतं, ते म्हणजे ’मंडेला’... पण या बेटावर त्याहून जास्त मरणयातना भोगलेली एक व्यक्ती होती. त्या व्यक्तीच नाव आहे "रॉबर्ट सोबुक्वे".

सोबुक्वे यांना या बेटावर एक राजकीय कैदी म्हणुन ठेवण्यात आलं होतं. अश्वेत लोकांच्या हक्कासाठी लढा देतांना बंड पुकारले म्हणुन त्यांना १९६० मध्ये अटक करण्यात आली. काही काळानंतर त्यांना या बेटावर ठेवण्यात आलं ते पण विशेष कैदेत, त्याच्यावर इतर कैद्यांशी भेटण्यास, बोलण्यास बंदी घालण्यात आली होती. या कैदेत त्यांचा बाकीच्या कैद्यांशी संवाद फक्त दुरुन हाताच्या खुणांनी होत असे. दुर्देव म्हणजे त्यांच्या परिवाराला देखील भेटु दिले जायचे नाही. पत्र जरी लिहिलं तरी ते इंग्रजी मधुनच लिहिल्याची सक्ती होती. परिवाराला लिहिलेलं पत्र देखील प्रशासन वाचुन मगच पुढे पोस्ट करायचं. सोबुक्वे पुढे मग खुप आजारी पडले, तब्येत जास्त खराब झालेली पाहुन त्यांच्या परिवाराला या बेटावर आणण्यात आलं, त्यांना बाजुलाचा राहायला खोली देण्यात आली मात्र भेटण्याची परवानगी आठवड्यातून फक्त एकदाच. हे असं एकट आयुष्य... नाही आयुष्य नाही म्हणता येणार, ह्या मरणयातना सोबुक्वे यांनी या बेटावर १३ वर्ष भोगल्या. तब्येत अत्यंत खालवल्यानंतर त्यांना याबेटावरुन मुख्यभुमीत किंबर्ली येथे हलविण्यात आलं ते देखील त्यांच्या घरात नजरकैद. अखेर त्यांचं आजारपणामुळे १९७८ ला निधन झालं.

याच्या पुढेच एक ठिकाणं आहे Lime Quaary इथे कैद्यांना खडी फोडण्याचं काम दिलं जात असे.
गुंफा- एक विद्यापीठ

सर्व हवामानात हे काम करवुन घेतलं जात असे. कुठलंही सुरक्षा उपकरण जसे, चष्मा, टोपी, मास्क दिले जात नसत त्यामुळे येथील पिवळ्या माती मुळे पुढे कैद्यांना अंधत्व, श्वसनाचे रोग जडले. या पिवळ्या मातीत सुशिक्षित कैदी अशिक्षित कैद्यांना बोटाने गिरवून लिहायला आणि वाचायला शिकवत असे. त्याच मुळे इथले कैदी या जागेला एक विद्यापीठ मानतात.१९९५ मध्ये सुटका झालेले कैदी पुन्हा एकदा इथे परत आले त्यांनी इथल्या दगडांचा एक असा थर बनविला.
दगडांचा थर

टुर गाईड सगळं दाखवत होता सोबतच माहितीही देत होता. मात्र मुख्य जेल मध्ये हेच काम त्याकाळच्या एका कैद्यालाच देण्यात आलं आहे, तसा नियमच आहे. कारण जेल ची सर्व माहिती, कैद्यांची दिनचर्या फक्त एक कैदीच उत्तमरित्या सांगु शकतो. आमचा टुर गाईड आम्हाला बस मधुन जेलच्या दारात सोडुन निघुन गेला.

पराग, अ‍ॅलन आणि मी

आता आम्ही सर्व KOLIKELE या एक कैद भोगलेल्या व्यक्तीशी बोलत होतो. त्याने सर्व जेल परिसर दाखविला.
KOLIKELE- एक भूतपूर्व कैदी

जेलचा एक भाग ’नामिबिया’ म्हणुन ओळखल जातो. कारण इथल्या कैद्यांना दुस-या भागातल्या कैद्यांना भेटण्या, बोलण्याची बंदी होती. या कैद्यांना आठवड्यातून एकदा बाहेर पडुन इतरांशी बोलता याव, फुटबॉल खेळता यावा यासाठी बाकीच्या कैद्यांनी बरीच आंदोलनं, उपोषणं केली. अखेर प्रशासनाने हात टेकले आणि त्यांना ती परवानगी दिली.

याच भागात ठेवण्यात आलेले एक कैदी होते. "नेलसन मंडेला"

मंडेला आणि इतर कैदी इथे राहुन देश कसा चालवायचा या विषयावर चर्चा करायचे. या बेटावर मंडेला यांनी १८ वर्ष शिक्षा भोगली.
मंडेला आणि वॉल्टर सिसिलु

सर्व जेल पाहुन झाल्यावर या बेटावरुन परत जाण्यासाठी पुन्हा बोटीचा प्रवास करायचा होता. त्यासाठी जेलच्या दारापासून धक्क्यापर्यंत चालत जायचं होतं, या मार्गाला "लॉंग वॉल्क टु फ्रीडम" म्हणतात.

मला हे नाव अगदी योग्य वाटलं, कारण आमच्यासाठी धक्क्यापर्यंत चालत जायचा प्रवास फक्त काही मिनिटाचा होता, पण त्या कैद्यांसाठी हाच प्रवास काही तपांचा होता...

देशपांडेजी...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...