रविवार, १० फेब्रुवारी, २०१३

टेस्टी विकेंडविकेंड अथवा रविवार म्हंटलं की वाटतं मस्त आरामात उठावं, अंघोळ उशिरा, गरमागरम चहा बरोबर पेपर आणि समोर नास्ता... मग उरलेला अख्खा दिवस आळसात घालवावा.

खरं आहे ना मित्रांनो... ५ दिवस काम करुन एक दिवस मस्त मजेत आरामात घालवावा असं कोणाला नको वाटतं. या रविवार सुरुवात अशीच काहीशी झाली. आरामात जाग आली, खिडकीतून पाहिले तर सुर्य टेकडी मागून नुकताच वर आला होता. लगेचच कॅमेरा काढला आणि फोटो घेतले.

Photo: Nagesh Deshpande

Photo: Nagesh Deshpande
 तो पर्यंत बायको स्वयंपाक घरात कामाला लागली होती, चहा तयार होता. तिने चहा आणुन दिला आणि सहज मनात विचार आला. जसं विकेंड अथवा रविवार ला आपल्याला आराम करावा वाटतो तसंच तिला ही वाटत असेलच ना...

लगेच फर्मान सोडला, म्हंटलं आज किचन मधे जायचं नाही. आज मी काहीतरी बनवितो तुझ्यासाठी. सुरुवातीला तिला मी गंमत करत आहे असे वाटले, मग म्हणाली, जे काही करणार आहेस ते कर पण एक ही वस्तु मागायची नाही, भाजी चिरुन दे, मसाला दे हे चालणार नाही. मी म्हणालो "डन"

फ्रिज उघडला आणि भाज्या पाहुन घेतल्या. मला जमेल अशी एक ही भाजी नव्हती. होत्या फक्त भल्या मोठ्या दोन ’शिमला मिरची’ लगेचच युरोपीय देशातली टिव्हीवर पाहिलेली एक डिश आठवली. पण ती डिश नॉनव्हेज होती. म्हंटलं आपण व्हेज डिश बनवु, लागलो कामाला आणि अशी काही डिश बनविली की बायको खुश......

डिश चे नाव "स्टफ-कॅप्सीचिजम"

साहित्य: एक वाटी तांदुळ, १/२ वाटी शेंगदाणे, २ शिमला मिरची, १ टमाटा, १ कांदा आणि थोड चीज

कृती: तांदुळ आणि शेंगदाणे १/२ तास भिजत घाला. शिमला मिरची वरुन अशी कापा जेणे करुन त्यात मिश्रण भरता येईल. २ चमचे तेल गरम करुन त्यात जि-याची फोडणी द्या. त्यात बारीक कापलेला कांदा आणि टमाटा मस्त परतुन घ्या. त्यात एक चमचा बिर्याणी/पुलाव मसाला टाका. आता भिजलेले तांदुळ आणि शेंगदाणे टाका. चवीनुसार मीठ घाला. त्यात तांदुळ बुडतील एवढच पाणी घालुन १५ मिनीट शिजु द्या. आता कापलेल्या शिमला मिरची मध्ये तळाशी थोडे चीज टाका आणि तयार झालेला भात यामध्ये गच्च भरा आणि वरतून पुन्हा थोडं चीज टाका. आता शिमला मिरची ला बाहेरुन थोड बटर लावुन ती १० मिनिट मायक्रोवेव्ह अथवा कुकर मधे शिजवून घ्यावी. माझ्या कडे मायक्रोवेव्ह नसल्याने मी कुकर वापरले.

तर मित्रांनो तयार आहे मस्तपैकी "स्टफ-कॅप्सीचिजम"
Photo: Nagesh Deshpande

Photo: Nagesh Deshpande

गरम गरम "स्टफ-कॅप्सीचिजम" खाऊन बायको खुश तर झालीच पण एक विकेंड/रविवार वेगळ्या पद्धतीने घालवला. छान वाटत एखादा दिवस स्व:ताच्या आनंदापेक्षा दुसर्‍याला आनंद देण्यात घालवला तर आयुष्य खुपच सुंदर वाटु लागत. केवळ ह्या एका बदलामुळे पुर्ण आठवडा मजेत जाणार हे मात्र नक्की...

देशपांडेजी...

शनिवार, २ फेब्रुवारी, २०१३

अल्पविरामजवळपास एक वर्ष हा हौशी लेखक गायब होता. मित्रही चौकशी करत होते.

 "काय लिखाण बंद केलं का?" 

"एखादी पोस्ट नाही ब-याच दिवसात..." 

मी निरुत्तर होतो. काय बोलावे समजत नव्हतं, पण आता सांगावसं वाटते की मी "अल्पविराम" घेतला होता. 

शेवटचा लेख मागील एप्रिल मध्ये लिहिला होता. तेव्हा पासुन आज पर्यंत ब-याच घटना घडल्या, आयुष्य एवढं बिझी झालं की चक्क लिखाण बाजुला राहिलं. विशाल, दिपक, सुझे आणि सागर ची पोस्ट वाचुन वाटायचं आपण पण लिहावं पण वेळच नव्हता... 

या बिझी पणाला सुरुवात झाली एका मोठ्या गोड बातमी नंतर... ती बातमी होती मी "बाप" होण्याची. हो २१ एप्रीलला देवाने आमच्या आयुष्यात एक परी आणली. आम्हा दोघांत हवी असणारी तिसरी व्यक्ती आली. सगळ घर आनंदाने नाहुन गेलं. सर्वात पहिला अभिनंदनाचा फोन विशालचा आला, तर दिपक ने सुंदर असे कार्ड दिले. 


http://www.marathigreetings.net/
आता "निधी" १० महिन्यांची झाली आहे. 

त्याच दरम्यान ऑफीस मध्ये काम ही खुप वाढलं होतं, नवीन येणारे प्रोजेक्ट्स आणि त्याचं टेस्टींग ही जबाबदारी वाढतच चालली होती. काम एवढं वाढलं होतं की १२-१२ तास ऑफीस मध्येच बसुन राहावं लागायचं. पण एक लहानपणची एक शिकवण कायम लक्षात होती की, "कष्ट कधीच वाया जात नसतात". कामाचा ताण नक्कीच होता पण आयुष्यात ताण नसेल तर त्याला आयुष्य म्हणताच येणार नाही.

असो... हा ताण निवळविण्यात काही अनोळखी मंडळींचा खुप मोठा हात होता. ही अनोळखी मंडळी कधी अगदी जवळची मित्रमंडळी होऊन गेली कळालंच नाही. आशिष, आर.के, जोशीबुवा, मसाला-चाय, रश्मी आणि रुतु ट्विटर वर भेटलेल्या ह्या काही व्यक्ती, ज्या थोड्याच काळात अगदी जवळचे मित्र होऊन गेले. बायको माहेरी, ऑफीस मध्ये वाढलेलं काम यामुळे आलेला एकटेपणा या मित्रांनी क्षणात दुर केला. आम्ही भेटलो, आवडी निवडी जाणून घेतल्या. खुप धमाल केली "धन्यवाद मित्रांनो" 

माणसाच्या मुलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा... निवारा हा स्व:ताचा असावा असं प्रत्येकाच स्वप्न असतं. पुण्यात आल्यापासून माझी ही हीच धडपड सुरु होती की, स्व:ताचं घर व्हावं. खुप धडपड केली, एरिया निवडा, बिल्डर बघा, भाव काय?, कर्ज किती मिळेल?, परवडतो का?, पझेशन कधी? असे असंख्य प्रश्नांची उत्तर शोधत अखेर दिवाळीच्या अगोदर १ BHK बुक केला. 


Image source: Internet

नशीब म्हणजे हा फ्लॅट रेडी पझेशन होता. त्यामुळे काही दिवसात स्व:ताच्या घरी राहायला जाण्याचा योग आला. आता हळु हळु आयुष्य पूर्वपदावर येत आहे. कामाचा ताण आता कमी झाला आहे. पण जबाबदारी वाढली आहे. आज ब-याच दिवसांनंतर लिहिल्यानंतर खुप छान वाटतं आहे. आनंद या गोष्टीचा ही आहे की लेखनात पडलेला हा विराम हा अल्पविरामच होता. 
धन्यवाद... 

देशपांडजी...

https://www.facebook.com/haushilekhak
Related Posts Plugin for WordPress, Blogger...