रविवार, ८ एप्रिल, २०१२

रिसेशन वाईट असतं मित्रा...


ही कथा, खरंतर व्यथा म्हणायला हवं... आहे एका आयटी कामगाराची.

हा कामगार दुसरा तिसरा कुणीही नसुन मीच आहे हे सांगायला नको. सगळं आज कालच्या हिंदी सिनेमा सारखं झालं, म्हणजे कसं आपण प्रवास करुन, दुपारची झोप खराब करुन मल्टिप्लेक्सला जातो. महागडे तिकीट घेतो. महागडे मात्र हलक्या दर्जाचे जंकफूड खातो आणि सिनेमा संपला की आपण इथे का आलो हीच हीच हळहळ करत बसतो. थोडक्यात सुरुवात खराब म्हणजे पुर्ण सिनेमा कसा असेल याची कल्पना येते, पण आपण आशावादी असतो. तस्सच काहीसं झालं माझ या कंपनी मध्ये येतांना.

सकाळची ९ ची वेळी दिलेली जॉईन होण्याची, पहिलाच दिवस उशीर नको म्हणुन ८.४५ ला मी ऑफीस मध्ये दाखल झालो. मी रिसेप्शन वर ताटकळत बसलो होतो. आता कुणी येईल मग कुणी येईल असं म्हणता म्हणता ९.३० नंतर एक एक जण यायला सुरुवात झाली. रिसेप्शनीस्ट ला विचारल्या वर तिने मला एका छोट्या मिटींग रुम मधे बसवलं आणि मी आता एच. आर. ची वाट बघु लागलो.

साधारण १०.३० ला ती ऑफीस मध्ये आली आणि १०.४५ ला त्या मिटींग रुम मध्ये. "गुड मॉर्निंग... आर यु केम फॉर इंटरव्ह्यू??" पहिल्या बॉलला माझी विकेट...

"नो नो मॅम, आय केम टु जॉईन टुडे".

मी जॉइनींग लेटर दाखवलं

"ओह.. ईज ईट."

"किस ने लिया था इंटरव्यु" तिने विचारलं

"मुझे नाम ठीक से याद नही... शायद अमीत ने लिया था"

"ओह ठिक है बैठो यही पर अमीत ११ बजे ऑफीस आता है, वो आने के बाद देखती हु"

"थँक्यु"

आता मी त्या अमीत ची वाट बघत बसलो, तो ११.३० ला आला. मग तो आणि ती एच आर दोघे मिटींग रुम मध्ये आले.

मग दोघांचा एकमेकात गुजरातीत संवाद सुरु झाला. त्याच्या बोलण्यातून हे समजलं की दोघांना माझ्याबद्दल काहीच लक्षात नव्हतं. शेवटी अगदी त्रासीक मुद्रेने अमित मला डेवलपमेंट सेंटर कडे घेऊन गेला. बाय द वे अमीत हा तिथे प्रोजेक्ट मॅनेजर होता मग त्याने तिथल्या काही मंडळी ची (गुजरातीत) ओळख करुन दिली आणि मी जिथे बसणार ती जागा दाखवली. हे सगळ होईस्तव १२.३० झाले होते. आता ऑफीस भरल्यासारखं वाटत होतं. कुणी किबोर्ड बदडत होतं तर कुणी नुसतच बसलेल होतं.

माझी बसायची जागा पाहुन मी जरा गडबडलो, मनातल्या मनात जो-यात ओरडलो "अरे बाबा... मी आय टी कामगार आहे, माझे कौशल्य दाखविण्यासाठी कॉम्प्युटर नावाचे यंत्र लागतं, ते कुठे आहे???"

"हॅलो, मीट मि. जिग्नेश (आणखी एक गुज्जु) हि विल बी युर टीम लिडर हियर"

"हॅलो सर" मी आपलं थोडा आदर दाखविला...

आता तुम्ही सांगा एखाद्या कंपनीत तुमचा पहिलाच दिवस, मॅनेजर तुमची ओळख टीम लिड शी करुन निघुन जातो. टीम लिड तुमच्या कडे बघतो. काय संवाद होणे अपेक्षित आहे तुम्हाला... हेच ना "किती एक्सपिरीयन्स आहे, अगोदर कोणत्या कंपनीत होता वगैरे वगैरे..."

पण असं काहीच झालं नाही.

त्याने बॅग उचलली, मला वाटलं लंचला जात असेल हा... तो माझ्या सीट जवळ आला आणि पहिला आणि शेवटचा अणु बॉम्ब टाकला. हो अणु बॉम्बच होता तो... तो म्हणाला "पागल है क्या तु... ये कंपनी क्यु जॉईन की" मी फ्लॅटच झालो... काय, कसं रिअ‍ॅक्ट करु असं विचार करे पर्यंत जिग्नेश तिथुन निघुन पण गेला. आता त्या क्युबिकल मध्ये फक्त मी एकटाच होतो. एक-दीड तास मी तसाच शुन्यात बसलो होतो.  मी जेवण करुन आलो आणि परत जिग्नेश वाट पाहु लागलो. जेणे करुन तो काही काम देईल. पण जिग्नेश परत यायचं सोडा तो कंपनी सोडून गेल्याचं मला दुसऱ्या दिवशी समजलं.

दुसऱ्या दिवशी अमीत माझ्याकडे आला, पुन्हा इंटरव्ह्यू मध्ये विचारलेले सगळे प्रश्न पुन्हा विचारले (आता याला काय अर्थ आहे...) आणि मला टेस्टिंग टीम कडे घेऊन गेला. तिथे पहिला मराठी संवाद कानावर पडला.

"संदीप, ये तुम्हारे टीम मे जॉईन हो रहा है आज से... ईसे अपनी टेस्टिंग प्रोसेस समझा देना" अमीत हे सांगुन तिथुन निघुन गेला.

मी सगळ्यांशी ओळख करुन घेतली. यांनी अपेक्षित असेच प्रश्न विचारले आणि गप्पा मारल्या. मग मला जरा हायस वाटलं.

तितक्यात अमित आला आणि मला त्याच्या टेबल जवळ घेउन गेला. "देखो ये हमारा प्रोजेक्ट है, तुम्हे इस की पुरी टेस्टिंग करनी है, इस का टेस्ट प्लान मुझे चाहिये. बनाकर दो मुझे..."

"अमित वो तो हो जायेगा पर, अभी तक मुझे पिसी नही मिला है वो मिलने के बाद काम शुरु कर देता हु. तब तक आप मुझे ’बी. आर. एस’ देदो मै पढ लुंगा"

"बी. आर. एस. ??? मतलब"

"बी. आर. एस. Business requirement specification  या रिक्वायरमेंट डॉक्युमेंट"

"ओह.. रिक्वायरमेंट डॉक्युमेंट तो ऎसा बोलो ना, देखो वैसा कुच भी नही है, एक काम करो वो भी तुम ही बना दो" 

"अरे वो तो बीए बनायेगा ना"

"ह्म्म्म ठीक उसे बोलता हु..."

मी तिथुन निघालो तर मागुन आवाज

"अरे लेकीन तब तक टेस्ट प्लान बनाना शुरु करो"

मी मनातल्या मनात कपाळावर हात मारला.

हळु हळु मला इथली कार्यपद्धती, माणसं समजायला लागली. मला ६-७ दिवसानंतर का होईना एक पिसी मिळाला.

त्यातले दोघं... पहिला संदीप, हा टेस्टर होता आणि दुसरा डेव्हलपर परिमल

संदीप हा अगदी पहिल्या दिवसापासूनच एकच डायलॉग मारायचा, जिग्नेशच्या तश्या जाण्याने मला काही दिवस त्याचा तो डायलॉग मला काही दिवस खरा ही वाटला. त्याचा तो जणु काही तकि-या-कलाम च झाला होता. दररोज म्हंटले तरी चालेल, अतिशयोक्ती होऊ नये म्हणुन आपण असे म्हणु की, दर सोमवारी संदीपचा "आज मी पेपर टाकणार" हा डायलॉग ऎकायला मिळायचा.

परिमल मुळचा विदर्भातला, त्यामुळे मातृभाषा हिंदी... कोडींग चांगला करायचा मात्र त्याहुन एक्सपर्ट होता "मस्का" लावण्यात, अमीत किंवा सिनिअर मॅनेजमेंट मधलं कुणी ही आलं याचा तोंडाचा पट्टा सुरु...

एक दिवस तर कहरच झाला, आमचा डेव्हलपमेंट हेड आला त्याची फक्त एवढीच चुक झाली की त्याने कामाचा विषय न काढता जनरल गप्पाने सुरुवात केली आणि तिथे परिमल पेटलाच.

"सर... आप जब युसए में थे कहा रहते थे?, सर... मुझे गोल्फ नही समजता क्या आप मुझे बताएंगे?, सर... आप कितने बजे उठते हो... और लंच. सर... युसए का खाना अच्छा लगता है या इंडिया का???"

आम्ही सगळे, बापरे काय माणुस आहे हा म्हणत नुसत ऎकत होतो. वाटलं त्याला सांगाव की, "टॉयलेटला कधी जाता" हेही विचारुन घे पण आम्ही विषय हसण्यावारी नेला.

पुढील दीड वर्ष मी त्यांना सहन केलं...

का??

कारण रिसेशन वाईट असतं मित्रा...

सांगायला नको पण इथे कोणतीच प्रोसेस नव्हती, कोणतेही डॉक्युमेंट नाही. त्यातलाच एक अनुभव असा...

एक दिवस अमीत एका डेव्हलपरला घेउन माझ्याकडे आला.


"सुनो, इस ने कुच फॉर्म्स बनाये है, तुम शनिवार तक टेस्टिंग खतम करके, मुझे रिपोर्ट दो. और हा सिर्फ युआय नही फंक्शनल टेस्टींग भी करनी है"

मी ठीक आहे म्हणालो आणि त्या डेव्हलपरशी चर्चा करु लागलो.

"किती फॉर्म आहेत रे..."

"अरे... ४२ आहेत"

"काय??? ४२" मी ओरडलोच

"हो रे कसे बसे पुर्ण केले आहेत, पण अजुन खात्रीलायक पुर्ण नाही झाले"

"अबे... मग मी ७ दिवसात कसे टेस्ट करणार"

मी तडक अमीत कडे गेलो. शक्यतो अमित आणि डेव्हलपमेंट हेड शी कोणीच वाद घालायचं नाही पण मला काहीच पर्याय उरला नव्हता.

"अमित वो बोल रहा है ४२ फॉर्म्स है"

"पता है"

"बॉस ये सब ७ दिन मे कैसे पॉसिबल है"

"देखो मुझे कुच पता नही, मुझे रिपोर्ट चाहिए, डेव्हलपमेंट हेड हो देना है"

"देखो अमित, आय एम नॉट अ मशीन, ४२ फॉर्म्स टेस्ट करना पॉसिबल नही मेरे लिये."

या वाक्यावर अमित थोडा गरम झाला.

"करना तो पडेगा, मुझे कुच पता नही, और हा यही जवाब डेव्हलपमेंट हेड को दो, मुझे आगे कुच नही सुनना"

त्याच्या कडे असे बोलण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता कारण त्याला माहिती होतं की हे फॉर्म्स बनवायला त्याला ६ महिने लागले होते.

मी डेस्क वर गेलो, बिल्ड घेतलं आणि आणि ७ दिवस दररोज १२ तास बसुन १९ फॉर्म पूर्णपणे टेस्ट करुन दिले.

का??

कारण रिसेशन वाईट असतं मित्रा...

असंच पुढील दीड वर्ष सुरु राहिलं, १२ तासाच ऑफीस, संदीप ची बडबड आणि परिमलचा मस्का...

मग बिरबलच्या "ये वक्त गुजर जायेगा" या वाक्याप्रमाणे संदीपच्या आधीच मी पेपर टाकला.

काय शिकलो या सगळ्यातुन "रिसेशन वाईट असतं मित्रा..."

(ता. क. :  हा अनुभव बराच जुना आहे, आज आठवला म्हणून लिहिला आहे. यातील पात्रांची नावे बदलेली आहे.)

नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

आवडला ना लेख मग फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak
Related Posts Plugin for WordPress, Blogger...