शनिवार, ३१ मार्च, २०१२

महाशतक सचिनचं आणि माझंही...

का रे किती मार्क मिळतील या वेळी? १०० पैकी १०० का ???


हा प्रश्न आला की आमचा चेहरा पाहण्यासारखा व्हायचा.

अहो आम्ही ५० मार्कात समाधान मानणारे... आणि जर दुसऱ्याला जास्त मिळालेच तर गप्प बसण्याखेरीज काही पर्याय नसायचा, आणि आपल्याला चुकून जास्त मिळालेच तर पैकीच्या पैकी का नाही हा प्रश्न...

ह्या जगात १०० पैकी १०० मिळवणे किती अवघड आहे, मिळवता नाही आले तर लोकं बोलतात आणि एखाद्याने मिळवलेच तरी टोमणे...

असंच काहिसं घडलं सचिनच्या बाबतीत... सर्वां(क्रिकेटप्रेमी)ना खात्री होती सचिन एकच असा समकालीन खेळाडू आहे जो असा काही पराक्रम करु शकतो. १०० आंतरराष्ट्रीय शतक "महाशतक".

१५ नोव्हेंबर १९८९ ला आपली कारकिर्द सुरु केल्यानंतर सचिनने यशाची शिखरं गाठली. भल्याभल्या गोलंदाजांना दिवसा तारे आणि रात्री स्वप्न दाखविली. २२ वर्ष अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेऊन फिरतांना कोणीच हा विचार नाही केला की १०० करोड जनतेची स्वप्न हा एकटा व्यक्ती कसे काय पुर्ण करणार.

माझ्या साठी सचिनचा जन्म क्रिकेट खेळण्यासाठी झाला नसुन फक्त आनंद देण्यासाठी झाला आहे. जनता त्याच्या शतकाने खुश होते... मात्र त्याच्या खेळीने नाही. सचिनने शतक नाही केले याचा अर्थ तो फलंदाजीत अयशस्वी झाला असा का लावला जातो???

त्याच्या २२ वर्षाच्या कारकिर्दीत अनेक खेळाडू त्याच्यासोबत भारतासाठी खेळले, जसे गांगुली, द्रविड, सेहवाग, युवराज आणि धोनी, प्रत्येकाची शैली वेगळी. द्रविडचा बचाव, सेहवागचे आक्रमण, धोनी/गांगुलीचे नेतृत्व, तर युवराजचे अष्टपैलुत्व हे सचिन पेक्षा सरस... तरी देखील सगळ्यांनी त्याला गुरु, आदर्श मानलं असं का??

का ह्या सगळ्यांनी त्याच्या सोबत खेळतांना वेगळाच आत्मविश्वास मिळतो हे वेळोवेळी कबुल केलं.
Image Source: ESPNcricinfo.com

कारण सचिनने आपलं आयुष्य ह्या खेळासाठी समर्पित केलं आहे हे त्यांना कळाल होतं.

९९ वे शतक ते १०० वे शतक व्हायला एक संपूर्ण वर्ष लागलं आणि जनतेला पुन्हा संधी मिळाली मनात येईल तसे बोलण्याची, कुणी टीका केली, तर कुणी कुचेष्टा. असे लोक ज्यांचं काहीच कर्तृत्व नाही, आयुष्यात ज्यांनी काहीच केलं नाही असे लोकं नेपाळ, भुटान, अफगाणिस्तान सोबत टेनीस बॉल स्पर्धा भरविण्याचा घाट घातला होता. असो... नंतर हीच मंडळी १६ मार्च २०१२ ला "आमचा सचिन आमचा सचिन म्हणत मिरवतांना दिसली"

१९८९ मध्ये कारकिर्द सुरुवात केली, पहिले शतक (कसोटी) १९९० मध्ये तर १९९४ मध्ये पहिले एकदिवसीय शतक साजरे केले. सचिनच्या खेळात एक सातत्य राहिले, १९९६ च्या पहिल्याच विश्वचषकात खेळतांना सर्वाधिक धावा जमा केल्या. १९९८ मध्ये सर्वाधिक १२ आंतरराष्ट्रीय शतक ठोकली. त्याच वर्षी खेळलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेल्या सलग शतकी खेळी कोण विसरु शकत??

फायनल ला पोहोचण्यासाठी केलेल्या खेळी नंतर दुसऱ्या दिवशीचा दै. सामना अजुन ही मला आठवतो. क्रीडा पानावरील लेखात लेखकाने म्हंटले होते की "फायनल मध्ये सचिन अशीच खेळी करणार आहे असे जर मला देवाने सांगितले तर मी मुंबई ते शारजाह हे अंतर पोहून जायला तयार आहे."

१९९८ ची ऑस्ट्रेलिया मालिका
१९९९ ची पाकिस्तान वि. चैन्नई कसोटी
२००३ चा विश्वचषक
२००८ मधील इग्लंड विरुद्ध ची कसोटी
ह्या प्रमुख खेळी केल्या नंतर २०१० मध्ये एकदिवसीय सामन्यात पहिले द्विशतक ठोकण्याचा पराक्रम ही सचिन ने केला.

त्याच्या १०० व्या शतका वेळी चेष्टा करतांना लोक हे विसरले होते ही या पूर्वीची ९९ शतकं त्याने तुल्यबळ संघाविरुद्ध केली होती. १०० पैकी २० (सर्वाधिक) ही सर्वात बलाढ्य ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहेत हे कदाचित ह्या मंडळींना माहितीचं नसावं... "सचिनच्या शतकाची यादी"

Image Source: ESPNCricinfo.com

सचिन चे चाहते जगात सर्वत्र आहेत, प्रत्येक देशात त्याचा मोठा फॅन फॉलोईंग आहे. ऑस्ट्रेलियातील एका जोडप्याने चक्क त्यांच्या मुलाचे नाव सचिन ठेवलं आहे सचिन पार्कर...  तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं... अहो मी चॅलेंज देतो हिंम्मत असेल तर ठेवा मग तुमच्या मुलाचे नाव रिकी किंवा मायकेल.

सचिन चे महाशतक म्हणजे एक आनंद सोहळाच आहे माझ्या सारख्या चाहत्यासाठी, आता आम्हा चाहत्यांची इच्छा आहे की सचिन मन मर्जी ने खेळावं, आणि स्वत:ला वाटेल तेव्हाच निवृत्ती घ्यावी. आणखी एकच ओळ "धन्यवाद सचिन... आम्हाला हा आनंद दिल्याबद्दल."

हे झालं सचिनच्या महाशतकाविषयी... आता माझ्या महाशतका विषयी. कदाचित सचिनला माहिती होतं की एक चाहता असा आहे जो त्याची १०० वी ब्लॉग पोस्ट लिहिण्याच्या तयारीत आहे. हो मित्रांनो योगायोग म्हणजे ही माझी १०० वी प्रसिद्ध केलेली पोस्ट आहे.

झालं की नाही महाशतक सचिनच आणि माझंही :-)


नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

आवडला ना लेख मग फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

बुधवार, २८ मार्च, २०१२

चार वर्षाचा "मी एक हौशी लेखक"

२९ मार्च २००८ रोजी लिहिण्याची हौस म्हणुन सुरु झालेला हा "मी एक हौशी लेखक" ब्लॉग बघता बघता ४ वर्षाचा झाला. विचारही केला नव्हता की, मनात येईल ते लिहिलेलं लोकं वाचतील आणि आवडलं म्हणुन सांगतील. 

चार वर्षाचा हा प्रवास फारच छान होता. या चार वर्षात मी क्रिकेट, प्रवास, वैयक्तिक अनुभव आणि माझं बालपण अशा अनेक विषयांवर लिखाण केलं. वाचकांनी त्यांची पसंती दिली तसेच प्रतिक्रिया सुद्धा नोंदविल्या.

या काळात महेंद्र काका, कांचन ताई, हेरंब, दिपक, सुझे, विशाल कुलकर्णी, निनाद सारखे मित्रही मिळाले तसेच समीर कुलकर्णीच्या "काय सांगु राव" या मराठी ब्लॉगला मराठी ब्लॉग विश्वात आणले. दुसरीकडे ब्लॉग अधिका-अधिक वाचकापर्यंत पोहोचविण्यात मदत केली ती मराठी ब्लॉग विश्व या साईटने तर क्रिकेट वरील लिखाण दै. प्रहार ने छापून आनंद द्विगुणित केला.

हा प्रवास असाच पुढे राहावा हीच अपेक्षा आहे, अजुन बरंच काही लिहायचं आहे. जे काही लिहिलं त्यावर वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रिया, प्रेम या साठी त्यांचे शतशः आभार...


नागेश देशपांडे
मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak
Related Posts Plugin for WordPress, Blogger...