सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१२

गुड बाय...


टींग टींग टींग... प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, मुंबईला जाणारी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर उभी आहे.

अनाउन्समेंट झाली आणि रमेश नेहमी प्रमाणे घाई घाईत स्टेशनात दाखल झाला. खिशातून टिकीट काढुन, त्या कडे बघत बघतच तो डब्याकडे धावु लागला.

रमेश ची एक सवय आहे तो प्रत्येक गोष्ट वेळेवर करतो... पण वेळे आधी नाही. त्यामुळे नुसतीच घाई घाई...

"अरे भाईसाहब ये एसी-१ कहा है" त्याने धावणा-या एका हमालाला प्रश्न केला.

"अरे साहब.. वो कनटीन के सामने तो है, जाओ जल्दी समय कम है" हमाल ओरडला.

डब्बा जवळच होता. चटकन रमेश आत शिरला. आणि...

धाड... असा मोठा आवाज झाला, रमेश ची बॅग एका प्रवाशाच्या बॅगला धडकली.
"सॉरी सॉरी, आय एम एक्सट्रिमली सॉरी... ते काय आहे मला उशीर झाला ना...  " रमेश समोरच्या व्यक्तीला म्हणाला.

"अहो, तुमची चुक नाही मीच ईथे रस्त्यात उभी होते, खरं तर मीच सॉरी" तिनेही माफी मागितली आणि रमेशला रस्ता दिला.

रमेश आत गेला, आता तो सीट शोधायच्या नादात होता. नेहमी प्रमाणेच गाडीत गर्दी होती, प्रवाशी उतरत होते, चढत होते, बॅगा रस्त्यात, माळ्यावर ठेवण्याचा प्रयत्न करत होते. डब्यात दाखल होऊन ही रमेशची घाई काही कमी झाली नव्हती. तो त्याच्या सीट जवळ गेला, नंबर कन्फर्म केला आणि सुस्कारा सोडला. सीट रिकामेच होते, त्याने बॅग टेकवली आणि वॉटर बॅग काढुन ढसा ढसा पाणी प्यायले.

रमेश देशमुख, वय २६, उंच, गोरापान, एका आंतरराष्ट्रीय कंपनीत इंजीनिअर. लहानपणापासून रमेश अत्यंत हुशार, घरची परिस्थिती सुरवातीपासून चांगली होती. आई-वडील दोघेही शिक्षक, मराठवाड्यातल्या एका छोट्या जिल्ह्यात शिक्षण पुर्ण केल्यानंतर आता नोकरीसाठी मुंबईला.

"ओह माय गॉड..." रमेश एकदम ओरडला आणि सीट वर बसला, दुस-याच क्षणाला लगेचच तो उभा राहिला. त्याची नजर त्या गर्दीत काहीतरी शोधत होती. त्याने दारापर्यंत जाऊन ही पाहिले आणि पुन्हा सीटवर येऊन बसला.

"क्या हुआ भाईसाहब" एका प्रवाशाने विचारले.

"कुछ नही..." रमेश नी त्याच्या कडे न बघताच उत्तर दिले.

"तो आप ओह माय गॉड... क्यु चिल्लाये" त्याने परत विचारले.

"अरे बोला ना कुच नही" रमेश थोडासा चिडला.

सगळे प्रवाशी आप-आपल्या जागेकडे निघुन गेले. रेल्वे सुरु झाली पण रमेश अजुनही अस्वस्थच...

"कदाचित भास असेल" तो स्व:ताशीच पुटपुटला.

हळु हळु गाडीने वेग घ्यायला सुरुवात केली. त्याने त्याच्या बॅगा व्यवस्थित लावल्या आणि सीट वर शांतपणे बसला. १०-१५ मिनिट गेली असतील त्याने बॅगमधून ऑफीसच्या कामासाठी लॅपटॉप काढला, मात्र त्यात त्याचे लक्षच लागत नव्हते. कारण त्याच्या डोक्यात वेगळाच काहीतरी विचार सुरुच होता.

"ती ’ऊर्मिला’ तर नव्हती ना... नाही नाही ती इथे कशी शक्य" तो स्व:ताशीच बोलला. त्याने लॅपटॉप बंद केला आणि बॅग मधुन एक जुनी डायरी काढुन तिचे पानं चाळू लागला, मग त्यातल्या एका पानावर तो थांबला, त्यावरच्या ओळी वाचून त्याच्या चेह-यावर स्मित हास्य खुलले.

तु ही अबोल, मी ही अबोल,
बोलया गं काही शब्द सुचत नाही,
खुप आहे मनात, पण बांध फुटत नाही,
डोळेच बोलतील आता सर्व काही, डोळेच ऎकतील आता सर्व काही.

ऊर्मिला परळीकर... अहं,,, "डॉ.ऊर्मिला परळीकर" तो स्व:ताशीच बोलत हसत होता.

त्याला त्यांची पहिली भेट आठवली. तो तेव्हा दहावीत होता आणि ती नववीत, तो अंगणात पुस्तक वाचत बसला होता तेवढ्यात मागून एक हाक आली.

ती: "मॅडम आहेत का?"

रमेश पाठमोरा, पुस्तक वाचण्यात मग्न

तो: नाही... आई बाहेर गेली आहे. काय काम आहे?

ती: बरं आल्यावर आमच्या घरी पाठवशील?

तो: म्हणजे कोणाच्या?

ती(चिडुन): माझ्या कडे बघुन बोलणार का?

तो वळाला

ती: हम्म्म, अस्स... परळीकरांच्या घरी.

काही म्हणायच्या आधीच ऊर्मिला तिथुन निघुन गेली.

त्याने पुन्हा पुस्तकात डोकं घातलं...

ही भेट तशी लहान होती पण दोघांच्या मनात एक क्षण सोडून गेली होती.

ऊर्मिला... रमेशच्याच कॉलनीत नव्याने रहायला आली होती, मात्र शाळा ही एकच! रमेशची आई शिक्षिका होती आणि त्या घरात गणिताची शिकवणी घ्यायच्या. नव्या सत्राच्या शिकवणी साठी ती रमेशच्या घरी दररोज यायची. मात्र दोघांची आज प्रथमच भेट झाली होती.

"आई... तुला परळीकरंच्या घरी बोलावले आहे" त्याने आल्या आल्या निरोप दिला.

"अरे हो त्यांच्या कडे आज पुजा होती ना, ठिक आहे... अरे पण तुला निरोप कोणी दिला?"

"अगं एक मुलगी आली होती"

"अच्छा, अच्छा अरे ती ऊर्मिला"

त्याचे डोळे एकदम चमकले, तो गालातल्या गालात हसला आणि पुन्हा त्याने पुस्तकात डोक घातलं.

त्या दिवसानंतर शिकवणीला आली की, ती रोज त्याला दिसायची. तिच्या सोबत चार-पाच मैत्रिणीही असायच्या. पहिल्या भेटीच्या वेळीच त्याचं बोलणं तिला आवडलं नव्हतं, म्हणून ती त्याला दरवेळी चिडूनच बघायची. हळू हळू सत्र पुढे सरकत होतं. रमेश अभ्यासात खुप हुशार आहे हे सतत कोणाच्या ना कोणाच्या बोलण्यातून तिच्या कानावर पडत होतं.

एक दिवस ती नेहमी पेक्षा थोडी लवकर आणि एकटीच शिकवणी साठी रमेशच्या घरी आली, त्याच्या आईने तिला हॉल मध्ये बसण्यास सांगितले. हॉल मधले चित्र, फोटो बघण्यात ती रमली होती, इतक्यात तिचे लक्ष एका कपाटाकडे गेलं प्रथमच ती ते पाहत होती. ते पाहुन तर ती थक्कच झाली. कपाट ट्रॉफी, सर्टीफिकेट आणि बक्षिसांनी भरलेलं होतं.

ती: मॅडम... हे कपाट, कोणाची आहेत ही सगळी बक्षिसं?
मॅडम: अगं रमेशची... शाळेत आणि स्पर्धा परीक्षेत त्याचा पहिला नंबर आला होता ना, त्यालाच मिळाली आहेत ही सगळी.

खुर्चीत बसताना तो तिला दिसला, आता तिची नजर एका वेगळ्याच रमेशला बघत होती. तर दुसरीकडे तो ही तिला रोज घरी आल्यावर, मैत्रिणींशी बोलतांना बघायचा. तिच्या बोलण्यातला, वागण्यातला साधेपणा त्याला खुप आवडला होता. त्यानंतर रोजच ते दोघं एकमेकांकडे बघायचे मात्र बोलण्याचे धाडस काही होतं नव्हते. त्या घरात आल्यावर, शिकवणी सुरु असतांना देखील तिची नजर त्याला शोधत असायची.

हे निरागस डोळेच आता सर्व काही बोलत होते, दोघेही एका वेगळ्याच जगात असायचे. ती आता मी कशी दिसते याकडे थोडे जास्त लक्ष देत होती तर तो ही स्वप्नात रमु लागला होता.

पावसाळ्यातल्या एका दुपारी ढग दाटून आले होते, भर दुपारीच अंधारुन आलं होतं. तो त्याच्या काही मित्रांसोबत क्लास संपवुन घरी येत होता. मुसळधार पाऊस सुरु होता. रस्त्यात त्याचे लक्ष एका बस स्टॉप कडे गेलं, त्याच्या शेड खाली ऊर्मिला आणि तिची एक मैत्रिण उभ्या होत्या. दोघींकडेही छत्री नव्हती. तो थांबला, त्यांची नजरानजर झाली. तो बस स्टॉप जवळ गेला, ती नखशिखांत भिजली होती. थंडीमुळे ती थरथरत होती. तिच्या गाला पर्यंत कापलेल्या केसांमधून पडणारे पावसाचे थेंब हलकेच त्याच्या नजरेने टिपले होते. तो आणखी जवळ गेला, हात पुढे करून आपली छत्री तिला देऊ केली. सुरुवातीला ती थोडी घाबरली मात्र तिला ती छत्री हवी होती. खरं सांगायच तर त्याची छत्री तिला हवी होती, ती मंद हसली आणि तिने छत्री घेतली.

रमेश मित्राच्या छत्रीत घरी गेला. आणि ती ही...

घरापर्यंत येता येता तो ही बराच भिजला होता. घरात गेल्यावर आईने टॉवेलने त्याचे डोकं पुसायला सुरुवात केली.

"अरे, बाळा... छत्री होती ना तरी कसा काय भिजलास?"
तो: "अगं आई छत्री विसरलो क्लास मध्येच"

"कसा रे वेंधळा..."


ती आता छत्री परत द्यायच्या प्रयत्नात होती पण दोघेही एकटे कधीच नसायचे. दोघांच्या सोबत कोणी ना कोणी असायचं. तरी तिने धाडस करून शिकवणी आधी रमेशला अंगणात ती छत्री परत केली. देतांना ती काहीच न बोलता घरात निघुन गेली... पण छत्रीच्या मुठीला एक पाकीट लावलेले रमेश ला दिसलं. तो लगेचच त्याच्या खोलीत गेला. कोणी बघत नाही याची खात्री करुन ते पाकीट उघडलं, त्यात एक छोटाशी चिठ्ठी होती. ती त्याने उघडली, त्यात Thank you लिहलेले होतं. ते वाचुन त्याचा आनंद गगनात मावेना.

आता त्यांची नजरेला नजर होणं हे नेहमीचं झालं होतं, दरवेळी समोरासमोर आल्यावर दोघेही एकमेकांकडे बघुन मंद हसायचे. पण दोघांतही बोलण्याचे धाडस नव्हतं, ’कोणी बघीतलं तर???’,  ’नको र बाबा’ हाच विचार दोघ करत बसली, हे सगळ तिच्या मैत्रिणींच्या हे लक्षात आलं होतं आणि त्या तिला हळु हळु चिडवायला ही लागल्या होत्या.

तर दुसरीकडे रमेशच्या खांद्यावर आई-वडिलांच्या अपेक्षांचे खुप मोठे ओझे होतं, तो तसा समजुतदार होता. त्याने विचार केला की, आता आपण अभ्यासाकडे लक्ष देऊ आणि परीक्षा संपल्यावर ऊर्मिलाशी मनातले बोलुयात. त्यामुळे त्याने तिला देण्यासाठी जे गुलाबच फूल घेतलं होतं ते न देता तसेच वहीत जपुन ठेवलं. पण नशिबात वेगळंच काहीतरी लिहलेले होतं. सत्र संपलं आणि परीक्षाही. आता रमेशच्या वडिलांनी त्याला पुढच्या शिक्षणासाठी मुंबईला पाठविण्याची तयारी सुरु केली. दहावीत मिळालेल्या उत्तम गुणांच्या जोरावर त्याला मुंबईत चांगल्या कॉलेज मध्ये प्रवेश देखील मिळाला.

दोघांच्या मनात असलेली गोष्ट मनातच राहुन गेली, दोघं अंतराने दुर गेले होते मात्र मनात सतत भेटीचा विचार करत राहायची.

आज सात वर्षांनंतर तो पुन्हा त्या जुन्या आठवणींमध्ये रमला होता. ऊर्मिलाशी मनातलं न बोलु शकल्याची खंत त्याला वाटत होतीच, तर ऊर्मिला नक्की कुठे असते हेही त्याला १००% माहिती नव्हतं. दरम्यानच्या काळात त्याने मुंबईत राहुन इंजिनिअरींग पुर्ण केले तर दुसरी कडे ऊर्मिला पुण्यात आत्या कडे होती, ती डॉक्टर झाली होती.

रेल्वे थांबली...

कुठलसं स्टेशन आलं होतं. गाडी २० मिनिटे थांबणार होती. रमेश खाली उतरला, त्याने चहा घेतला तो एकटा प्रवासाला कंटाळा होता मात्र आज या जुन्या आठवणींनी त्याला प्रवासात वेळ कसा निघुन गेला हे कळलं नाही. सगळ्या घटना आठवता आठवता अर्ध्यापेक्षा जास्त प्रवास झाला होता. आता फक्त तासाभराचा प्रवास राहिला होता. त्याने पाहिलं प्रवासी चढत उतरत होते. सिग्नल पडला गाडी निघतांना तो पुन्हा आता शिरला आणि आपल्या जागेवर बसला.

"एक्सक्युज मी... मी इथे बसु का?" रमेशला कोणी तरी हाक मारत होतं.

त्याने वर पाहिलं आणि तो क्षणभर थबकलाच... हलक्या गुलाबी रंगाची साडी नेसलेली, सुंदर लांब केस असलेली तरूणी त्याला जागा मागत होती. तो संपुर्ण गोंधळला होता कारण ती दुसरी-तिसरी कोणीही नसुन ऊर्मिलाच होती. त्याला समजत नव्हतं काय करु आणि काय नको. शेवटी तिच स्व:ताहुन रिकाम्या सीट वर बसली. त्याने पुन्हा वॉटर बॅग घेऊन ढसा ढसा पाणी प्यायला सुरुवात केली. तो थांबला आणि ती मंद हसली.

"तु अजुन ही असेच पाणी पितोस?" ती ने विचारलं

तो: "अं अं... हो, पण तुला कसं माहिती?"

ती: "क्लास ला येत होते तेव्हा पाहिलं होतं"

ती: "ओळखलंस ना मला??? का विसरलास"

तो: "नाही ग तुला कसं विसरेल"

ती: "म्हणुनच डब्यात शिरतांना धडकला तरी ओळखलं नाहीस मला, लक्ष कुठे होतं?"

तो: "अगं नाही ग, तु साडीत ओळखु नाही आलीस, तर मनात शंका आली होती खरी पण..."

दोघेंही आता एकमेकांकडे बघुन नुसतच हसत होते. पण विषय काही पुढे सरकत नव्हता.

शेवटी तिनेच विचारलं, तु मुंबईत नोकरी करतोस ना?

तो: हो... आणि तु?

ती: मी ठाण्याला असते.

तो: ठाणे, म्हणजे १० मिनिटात स्टेशन येईलच. परत कधी भेटणार?

ऊर्मिलाने शांत पणे उत्तर दिले... "माहिती नाही"

तो: इतके वर्ष का नाही भेटलीस. खुप बोलायचं होतं आणि आज भेटते आहेस ती पण अशी.

ती: रमेश, मला ही खुप बोलायचं होतं रे. पण...

ती थांबली.

गाडी हळुहळु ठाणे स्टेशनात शिरत होती. दोघे एकमेकांना नुसतच बघत होते.

तिने बॅग उचलली आणि ती दाराकडे जाऊ लागली.

रमेश म्हणाला: थांब ना... मला अजुन बोलायचं आहे.

ती: काय?

तो: तु मला खुप आवडायची.

तिचे डोळे पाणावले

ती: हे सांगायला तुला इतका वेळ लागला रमेश, मला ही तु खुप आवडायचा.

ती वळाली आणि  दाराकडे निघुन गेली.

जाता जाता त्याने निरोपासाठी दाखविलेल्या हातातली साखरपुड्याची अंगठी... तिच्या गळ्यातल्या मंगळसुत्राने पाहिली होती.लेखक: नागेश देशपांडे
मी एक हौशी लेखक

हा लेख आवडला असेल तर फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

जाहीर कबुली: प्रथमच कथा लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. वाचकांचे सहकार्य अपेक्षित आहे.
कथेतील पात्र, कथानक, प्रसंग/घटना(काही) काल्पनिक आहेत.
(सर्व फोटो आंतरजालावरून घेतले आहेत.)

१० टिप्पण्या:

 1. चांगला प्रयत्न आहे.
  पण शुद्धलेखनाच्या बऱ्याच चुका आहेत.
  अर्थात कथालेखनात मनातले सगळे काही जसेच तसे उतरवणे अवघड काम आहे पण कथा छान आहे.
  आणि मला ही एकदा कथा लेखन करायची इच्छा आहेच. वेळ मिळाल्यावर लिहितो.

  उत्तर द्याहटवा
 2. धन्यवाद सागर,
  प्रोत्साहनाबद्दल आणि शुद्धलेखनामधील सुधारणा सांगितल्याबद्दल.

  उत्तर द्याहटवा
 3. Good story with excellent narration!
  Just one Question: How did Ramesh know that Urmila is a Doctor...:)

  उत्तर द्याहटवा
 4. मस्त प्रयत्न नागेश.... शेवट असा होणार आहे हे काहीसं अपेक्षित होतं, पण प्रसंगाची मांडणी सुंदर...

  आता अजून कथा येऊ देत :) :)

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. धन्यवाद सुहास...
   तुझी प्रतिक्रिया वाचून आत्मविश्वास वाढला आहे.
   नक्कीच जसे सुचेल तसे लिहील.

   हटवा
 5. नागेश...आवडल
  मी शुद्धलेखनाच्या चुका दाखविनार नाहि..कारण मी सुद्धा लिहितो, तर माहिती आहे की लिहितांना आपन फक्त विचार आणी भावना व्यक्त करत असतो, त्यामुळे ह्या चुका होतातच.
  असो.. कथा उत्तम..पन हे संदर्भ सारखे वाटले..कदाचीत प्रेमकथेतील सर्वांच्या भावना सारख्या असतात...
  पुढिल लेखनास शुभेछ्छा...

  उत्तर द्याहटवा

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...