मंगळवार, १७ जानेवारी, २०१२

पतंग उडाने का मौसम...

मकरसंक्रांत आली की सर्वत्र पतंग बाजी सुरु होते. पतंग उडविणे हा खेळ लहानांपासून मोठ्या पर्यंत सगळेच उत्साहाने खेळतात. मला पाचवीत हिंदीच्या पुस्तकात "पतंग उडाने का मौसम" असा एक धडा होता. खरं सांगु का... या धड्यातील मला एक अक्षर ही आठवत नाही. तरी माझ्या बालपणीच्या काही आठवणी ताज्या झाल्या त्याच तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे.

लहानपणी "पॉकेटमनी" हा प्रकार नव्हता, घरात सगळे लाड व्हायचे मात्र "फालतू लाड" काहीच नाही. जालना शहरात विजयादशमीच्या वेळी पतंग उडविण्याची प्रथा आहे तर औरंगाबाद मध्ये मकर संक्रांतीला. आम्ही दोघं भावंडात मिळून पतंगासाठी ₹ पाच मिळायचे. त्यातूनच आमचा संपूर्ण पतंगबाजीचा सण पुर्ण करावा लागायचा. मला ₹ २ पुरायचे, ₹ १ ची संकल आणि ५०-५० पैश्यांचे २ पतंग.
 

पतंग उडविण्यासाठी लहानपणी लागणारे साहित्य म्हणजे, पतंग, मांजा, संकल, चक्री (नसेल तर डब्बा) आणि मुठभर भात. चक्री असणे म्हणजे एक प्रतिष्ठेची गोष्ट. भात कश्यासाठी तर, पतंग जर फाटला तर चिटकविण्यासाठी. विकतचा मांजा घेणे हे सगळ्यांनाच परवडत नसे, म्हणून मग घरीच मांजा तयार केला जायचा. मला खात्री आहे आम्ही लहानपणी केलेले उद्योगांचा विचारही आजची पिढी करू शकणार नाही.
 

घरी मांजा बनविणे म्हणजे "मांजा सुतणे" हा एक सहकारी तत्त्वावर चालणारा कार्यक्रम होता. त्यासाठी लागणारे साहित्य जमा करणे हेच खुप मोठ्ठं काम होतं, सगळ्यात पहिले "शिरस" (शुद्ध भाषेत सांगायचे तर "कोरफड") शोधणे. एक निकामी बल्ब, कारण बल्बची काच पातळ असते. तो बल्ब फोडून त्या काचेची बारीक पावडर तयार करणे हे एकाचे काम. एक जण पांढरी संकल दोन टोकाला बांधेल. एक जण मगं थोडं पीठ, शिरस (चिकट द्रव), काचेची पावडर आणि हवा असलेला रंग (न मिळाल्यास हळद-कुंकू ही चालायचं) एकत्र करून गोळा बनवायचा. मग त्या संकलवर हा गोळा फिरवायचा आता ही संकल सुकली की झाला मांजा तयार. मग हा मांजा वाटून घ्यायचा अथवा आपण दुस-या मांजा बनविण्यास मदत करायची.

बरं या पतंगाचे ही भरपूर प्रकार आणि तेवढीच कमालीची नावं... फर्रा, कव्वा, चौकडा, एक आख्या, दो आख्या, आधा चांद, पुरा चांद... मला विशेष आवडायचा तो "परी" हा नावाप्रमाणेच दिसायला पण खुप सुंदर तर "गिलोरा" हा माझा लक्की पतंग होता आणि हे दोन प्रकारचे पतंग अत्यंत दुर्मीळ, हे मिळण्यास नशीबच लागायचे.

जसे मांजा बनविणे एक उद्योग आहे तसेच पतंगाला कण्णी लावणे ही एक कला आहे. ती अवगत व्हायला बराच वेळ लागला, अगोदर दादा मला त्यासाठी मदत करायचा. घराला खुपच मोठ्ठी गच्ची होती मात्र आमचे पराक्रम पाहता तिथे जाण्यासाठी वडिलांनी जिना बांधून नव्हता घेतला, म्हणुन आम्ही मग मैदानावर पतंग उडवायला जायचो. मोठ्या मुलांना अथवा मोठे पतंग उडविण्याचे वेगळे मैदान असायचे तेथे लहान मुलांना प्रवेश नसायचा.
 
"शेपूट लावुन पतंग उडविणे हे भ्याडपणाचे लक्षण मानले जायचे."
मांजा चा वापर मुख्यत: "पेच" लावण्याकरिता व्हायचा. दादा पेच लावण्या माहिर होता, मी मात्र या भानगडीत पडायचो नाही. दादा म्हणजे पेच लावणे, ठरवून पतंग कापणे, पतंगात पतंग अडविणे हे प्रकार करण्यात एक्सपर्ट होता.

पतंग कटला, फाटला की मग नविन पतंग मिळणे थोडं अवघडच असायचं कारण पैसे संपलेले असायचे आणि आणखी पैसे मागायची हिंम्मत नसायची. मग काय करायचे तर कटलेले पतंग पकडण्याचा प्रयत्न... हे एक धाडसी काम असते. कटलेला पतंग कुठे पडणार याचा प्रथम अंदाज घेणे, त्या ठिकाणी सर्वांच्या आधी पोहोचणे आणि ’पतंगाला’ काहीही इजा न होता पकडणे. पतंगाला कोणतीही इजा टाळताना स्वत:ला झालेल्या इजांचा विचार केला नाही जायचा. जर १० मुलांमध्ये हा पतंग आपल्याला भेटला तर त्या आनंदाला मोल नसायचा.

मी पतंग पकडण्याच्या नादात संपूर्ण चिखलात पडुनही स्वच्छ घरी येण्याचा कारनामा केलेला आहे.

कटलेला पतंग मी कसा पकडला, कसा धावलो, गण्या, मुन्ना, ह-याला कशी हुल दिली असे किस्से मग चालायचे. लहानपणी एक किस्सा हा दरवेळी सांगितला जायचा, तो म्हणजे "अरे तो सिध्दी दादा आहे ना.. त्याचा पतंग इतका उंच गेला, इतका उंच गेला, इतका उंच गेला की बारीक टिकली एवढा दिसायला लागला. एकदम त्याची "ठिल" तुटली आणि त्याचा पतंग ’अंबड’ ला सापडला." माहिती नाही की या गोष्टीचा लेखक कोण होता पण आमच्या बाल मनात ही अश्या प्रकारे बसली होती की ती कधीच खोटी वाटायची नाही.

आज एक्स-बॉक्स आणि प्ले स्टेशन वर विटी दांडु आणि पतंग हे दोन गेम मिळतात, पण खरं सांगा त्यात ही मजा असणार आहे का???

आज सगळं काही आहे गच्ची, मैदान, बरेलीचा मांजा, चकरी आणि "परी" आणि "गिलोरा" पतंग. गृहपाठ ही नाही आणि घटक चाचणी ही नाही. पण काय करणार वेळ नाही.

सबकुच है यारों, फिर भी लगता है कुच कम
आप ही बोलो कब वापस आयेगा हमारे लाईफ में

"पतंग उडाने का मौसम"

हा लेख आवडला असेल तर फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak


- नागेश देशपांडे

 


मी एक हौशी लेखक
Related Posts Plugin for WordPress, Blogger...