शनिवार, ३१ डिसेंबर, २०११

फ्लॅशबॅक २०११...

एखादी गोष्ट संपणार म्हणून आपण सुरुवात करायला थांबतो का?

नाही ना...

प्रत्येक येणाऱ्या वर्षाचेच असेच असते. प्रत्येक येणाऱ्या वर्षाचे स्वागत आपण मोठ्या उत्साहात करतो. नवे नवे संकल्प बनतात आणि हे संकल्प पुर्ण करण्याचे (अ)यशस्वी प्रयत्न करतो. :)

आज ३१ डिसेंबर ला दुपारी सहज फ्लॅशबॅक मध्ये गेलो आणि २०११ च्या काही आठवणी ताज्या झाल्या...

१ जानेवारी २०११ हा दिवस तर माझ्यासाठी स्वप्नवत होता. पहिली परदेशवारी, शहर जोहान्सबर्ग. नवे शहर, नवे मित्र आणि नविन वर्ष.

धमाल वर्ष असणार हे ठाऊकच होतं. कारण डर्बन ट्रिपचा हँगओव्हर अजुन उतरला नव्हता त्यामुळे न्यु इयर सेलिब्रेशन असं काहीच नव्हतं कारण डर्बन ट्रिपमुळे खिसा हलका झाला होता पण एक रोझ वाईन तो बनती है यारो...

नविन वर्ष सुरु झालं आणि मी एक नविन लुक घेतला.

जैसा देस वैसा भेस...  

जानेवारी मध्ये टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरु होता. १५ जानेवारीला पाहिलेला सामना स्टेडियम मध्ये पाहिलेला पहिलाच सामना
पहिल्या वॉंडरर्स भेटीत भारताचा विजयाचा आनंद तर दुसऱ्या भेटीत "पॉल अ‍ॅडम्स"ची भेट.

हळू हळू मी या शहरात या देशात रुळत होतो. ऑफीस मध्ये काम ही सुरु होते त्याच बरोबर वर्ल्डकप फीवर ही... भारताने वर्ल्डकप जिंकला हा आनंद द्विगुणित केला तो दै. प्रहार ने "मी एक हौशी लेखक" च्या दोन लेखांची दखल या मध्ये घेण्यात आली.

भटकंती ही खूप झाली या वर्षी सगळ्यात जास्त धमाल ती ड्रकन्सबर्ग ची सफरीत. दक्षिण आफ्रिकेतला सर्वात उंच पर्वतरांग आणि जगातला दुसऱ्या क्रमांकाचा उंच धबधबा. 


या वर्षात दोन नविन गॅझेट्स माझ्या गठडीत जमा झाले.

१) कॅनन एसएक्स ३० आयएस कॅमेरा


२) एचपी लॅपटॉप
मे महिन्यात भारतात परत आलो तेव्हा मला ओळखण जरासं कठीण होतं कारण पोटाचा व्यास खुपच वाढला होता आणि वजन १० किलो नी. आता पुढचं आव्हान हे दोन्ही कमी करण्याचं, पण माझा निर्धार पक्का होता. आज पर्यंत एक ही दिवस न चुकता दररोज १० किमी सायकल ने प्रवास (घर-ऑफीस-घर) केला. आता वजन आणि पोट दोन्ही नियंत्रित आहे. :)

विजयादशमी च्या शुभ मुहूर्तावर "मी एक हौशी लेखक" स्व:ताच्या (http://www.haushilekhak.com/) संकेतस्थळावर विराजमान झाला.

जश्या काही आनंदाच्या घटना या वर्षात घडल्या तश्याच काही वाईट घटना ही... सर्वात दुख: झाले ते पं. भीमसेन जोशी आणि जगजीत सिंग च्या निधनाने.संपूर्ण बालपण "मिले सुर मेरा तुम्हारा" ऎकलं तर कॉलेज मध्ये असतांना "वो कागज की कश्ती वो बारीश का पानी" ऐकण्यात जायचा.पण आयुष्य चालतच राहतं आणि आता २०१२ सुरु होत आहे.


माझ्या सर्व मित्र, नातेवाईक, वाचक आणि शुभचिंतकांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

रविवार, २५ डिसेंबर, २०११

थंडर डाऊन अंडर: बॉक्सिंग डे कसोटी

२६ डिसेंबर, ख्रिसमस नंतर चा दुसरा दिवस हा "बॉक्सिंग डे" म्हणून साजरा केला जातो. हा दिवस या नावाने कधी पासून आणि का साजरा केला जातो याची कुठेच नोंद नाही. तरी देखील जगातले प्रमुख देश जसे नेदरलॅंड, कॅनडा, न्यूझीलंड आणि आयर्लंड सहित अनेक राष्ट्रकुल देशात हा दिवस खरेदीचा दिवस म्हणून ओळखला जातो.


मात्र ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशातले लोक या दिवसाची वेगळ्याच एका गोष्टीसाठी वाट बघत असतात. ती गोष्ट म्हणजे "बॉक्सिंग डे" कसोटी सामना. याच दिवशी दोन्ही देशात आलेल्या पाहुण्या संघाविरोधात कसोटी सामना आयोजित केला जातो. ऑस्ट्रेलियात ही परंपरा १९५० मध्ये सुरु झाली. पहिला कसोटी सामना इंग्लंड विरुद्ध खेळला गेला. मात्र पुर्वी "बॉक्सिंग डे" लाच हा सामना सुरु होत असे असं नाही, काही वर्षानंतर सामना बरोबर २६ डिसेंबर ला आणि मेलबर्न च्या MCG याच मैदानावरच खेळला जावु लागला.
मेलबर्न शहर ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया या राज्याची राजधानी आहे, हे राज्य देशाच्या दक्षिण-पूर्व भागात असून ऑस्ट्रेलियाचे सर्वात लहान राज्य आहे. हा देश दक्षिण गोलार्धात असल्याने या शहराचे वातावरण अत्यंत अनियमित आहे. वातावरण सतत बदलत असते.


दरवर्षीची ही परंपरा या वर्षीही चालू राहणार आहे. २६ डिसेंबर २०११ रोजी ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन संघादरम्यान कसोटी सामना रंगणार आहे. इथल्या प्रेक्षकांना या सामन्याचे खुप आकर्षण असते आणि त्याच बरोबर सुट्टी असल्याने ते भरपूर संख्येने हजेरी लावतात. त्यामुळे १८५४ मध्ये उभारलेल्या या मैदानाची प्रेक्षक क्षमता १,००,००० एवढी करण्यात आली आहे.


एखादा कसोटी सामना बघण्यासाठी सर्वाधिक प्रेक्षक येण्याचा विक्रम याच मैदानावर झाला आहे. १९६१ मध्ये ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडीज दरम्यान झालेल्या कसोटी सामन्याला ९०,८०० लोकांनी हजेरी लावली होती, तसेच प्रेक्षकांच्या पदरी कधीही निराशा पडत नाही.
या मैदानावर आता पर्यंत १०४ सामने खेळले गेले आहेत.
संघाची सर्वोच्च धावसंख्या: ६०४ ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड
खेळाडू ची सर्वोच्च खेळी: बॉब कॉउपर ३०७ ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड
एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी: सर्फराज नवाझ ९/८६ पाकिस्तान वि. ऑस्ट्रेलिया
कसोटीत सर्वोत्तम गोलंदाजी: विलफ्रेड रोड्स १५/१२४ इग्लंड वि. ऑस्ट्रेलिया
Credit: ALLSPORT HULTON/ARCHIVE/ALLSPORT
सर्वोच्च भागीदारी: ३४६ (सहाव्या गड्या साठी) सर डॉन ब्रॅडमन आणि जॅक फ. ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड


भारताची या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या ४४५ असुन विरेंद्र सेहवाग ने २००३ काढलेल्या १९५ धावा ही भारतीय फलंदाजाची सर्वोच्च खेळी आहे.
Credit: REUTERS/Punit Paranjpe (INDIA)


५२ धावात ६ बळी ही भागवत चंद्रशेखरची सर्वोत्तम गोलंदाजी आहे.


या सामन्याची खुपच उत्सुकता आहे, कारण मागच्या दौरात झालेला वाद आणि या सिरिजला मिळालेले "अग्निपथ" ह्या नावामुळे दौरा उत्कंठावर्धक होणार हे नक्की. आता बघायचे आहे की सचिन चे महाशतक लागते का पॉटींग ची बॅट तळपते. उमेश यादवचे चेंडू आग ओकतात का युवा पॅटींगसन चे.


गंमत आहे ना २६ डिसेंबर हा दिवस गाजवतात क्रिकेटर मात्र नाव "बॉक्सींग डे"


हा लेख आवडला असेल तर फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak


- नागेश देशपांडे


मी एक हौशी लेखक
Related Posts Plugin for WordPress, Blogger...