रविवार, ६ नोव्हेंबर, २०११

गरीब देशातील महागाई!!!

चौकातल्या हॉलमधे गडबड आहे, काहीतरी कार्यक्रम दिसतोय. विद्युत माळांची रोषणाई, दारात भली मोठी रांगोळी, फटाक्यांचे आवाज, डोळे दिपून टाकतील अशी आतिषबाजी, दारात पाहुण्यांच्या स्वागताला उभी पुरूष मंडळी, पाहुण्यांनी भरलेल्या गाड्या (इंडीका, सफारी, होंडा सिटी, टवेरा इत्यादी इत्यादी...) एका मागे एक येत होत्या आणि हॉलच्या दारात भला मोठ्ठा डीजे आणि डीजेच्या तालावर नाचणारी काही ताजगी में टुन्न मंडळी!!!.

उभे असलेल्या पुरुष मंडळीतील एकजण गाड्या पार्किंगची जागा दाखवत होता तर दुसऱ्याचा मोबाईल वरचा संवाद कानी पडला, "दादा कुठं हायेस रे... अरं गड्या इथ गर्दी वाढून -हायली ना... लवकर ई"

चला आणखी एकजण बोहल्यावर चढला असा साहजिक विचार मनात येईल तुमच्या हे वर्णन वाचून...

मला ही तस्सच काहीस वाटलं आणि मी हॉलच्या दिशेनी नीट पाहिलं.

दोन मजले उंच असा एक भला मोठ्ठा फ्लेक्स लावलेला त्यावर "अप्पांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा" असं लिहिलेलं आणि मधोमध अप्पांचा एक चिंता करतो विश्वाची असा क्लोजअप!! त्याचबरोबर इतर पाच पन्नास सोमे गोमे...

आणखी एक संवाद... एक ताजगी में टुन्न!!! युवक "उम्या अप्पा काय दिसून -हायले बे"
उम्या : "हो ना राव, अप्पा हायच हिरो माणूस... पण गड्या तुजा फोटो नाय त्याच्यात"

"अरं उम्या म्या नसलो म्हणून काय झालं आपले दाजी हायेत ना... ते बघ अप्पांच्या बाजूचा चौथा फोटो"

दोघेही जण आज ’दत्त गुरू दिसले’ चेह-यावर असे समाधान घेऊन फिरत होते.

मला हा सगळा प्रकार सहन नाही झाला आणि मी घरी जायला निघालो. रस्त्यात स्वयंघोषित मोठ्ठी मंडळी हॉल कडे जातांना दिसत होती. गळ्यात सोन्याच्या साखळ्या, बोटात अंगठ्या आणि हातात असलेल्या महागड्या मोबाईल वरून पलीकडच्या व्यक्तीला अप्पांच्या कार्यकर्त्यांनी (थोडक्यात आम्ही) कार्यक्रम कसा दणकेबाज केला आहे हे सांगत होती.

सहज एक विचार मनात आला खरंच आपला देश गरीब आहे का? महागाई दिवसेंदिवस वाढत आहे का?
आजचा हा प्रकार पाहून या दोन्ही प्रश्नाचं उत्तर मिळालं...  "नाही"

आपल्याला नेहमीच दोन टोकाच्या परिस्थिती पहायला मिळतात. माझ्या ऑफीसच्या परिसरात बरेच भिकारी फिरत असतात त्यापैकी काही जणांना खरच पोटाची भूक असते. देशात बरेच असे लोकं आहेत ज्यांना एक वेळच जेवण ही मिळत नाही. मान्य आहे की आपल्याकडे काहीही काम नाही केले तरी चालतं असे विचार करत जगणारे पण आहेत. पण खरंच मेहनत करून उपाशी झोपणारे मी पाहिले आहेत.

माझ्या आईच्या उपचारासाठी दवाखान्यात गेल्यावर मला एक अनुभव आला. एक वृद्ध स्त्री तिच्या नव-याला कर्करोग होता. अत्यंत गरीब तिच्या कडे जेवायला ही पैसे नव्हते, तर ती तिच्या पतीचा कसा उपचार करणार. खुप वाईट वाटलं तेव्हा...

आज सामान्य माणूस महागाई ने होरपळून निघाला आहे. जनतेच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजाही पुर्ण करण्यात सुद्धा प्रशासन अपयशी ठरत आहे.


माझ्या कडे पैसा आहे म्हणून मी तो कसा ही खर्च करणार असं म्हणत आज एखादी व्यक्ती फक्त आपली राजकीय पत सांभाळण्यासाठी अशी उधळपट्टी करतो, याला काय अर्थ आहे का???.


- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक
Related Posts Plugin for WordPress, Blogger...