रविवार, ९ ऑक्टोबर, २०११

वन डे टूर टू कोल्हापूर

पहाटे पहाटे साडेतीन वाजता मोबाईल खणखणला...

८५% झोपेत मी फोन घेतला, "बोला दाबके..."

यावेळी हा एकच मित्र मला फोन करण्याचा विचार करू शकतो. पलीकडून आवाज आला "काय सुरु आहे?"

मी म्हणालो, "सारस बागेत दुर्वा वेचतो आहे"

दाबके: "अरे वा वा चला आजच्या पूजेची चिंता मिटली."

मी: "विनोद पुरे... कसा काय फोन केला?"

दाबके: अरे! कोल्हापूर ला जायचा प्लान आहे, येणार का? साडेपाच ला निघायचं आहे.

मी हो म्हणालो

आता तुम्ही सांगा सकाळी साडेतीन ला तुमच्या मित्राचा फोन आला आणि मित्र मित्र मिळून फिरायला जात आहे हे पत्नीला समजले तर काय परिस्थिती निर्माण होईल. बायको म्हणाली, "ऐकलं मी सगळं, उठ आवर मी चहा टाकते." तिने चहा बनविला, अंघोळीसाठी पाणी तापवले.

आता खरी अडचण समोर होती, ती म्हणजे मी नगर रोडला राहतो आणि माझ्याकडे काही वाहन नाही आणि सगळे माझी वाट वारजे नाक्या जवळ पाहत होते. पण हा प्रॉब्लेम सुद्धा दाबके नी सोडवला. त्याने प्रशांतला घेण्यासाठी मोटारसायकल घेऊन पाठविले. प्रशांत माझी वाट पाहत कॉलनीच्या गेटवर उभा होता. तो १५ मिनिटात ईथे पोहोचला होता, आणि जातांना आम्हाला तितकाच वेळ लागला. त्याचे बाईक चालविण्याचे कौशल्य पाहून "धूम" च्या पुढच्या सिक्वल मध्ये त्याला छोटासा का होईना एक रोल देण्यात यावा याची मी विनंती करणार आहे. असो..

१५ मिनिटात तिथे पोहचल्यावर दाबकेची "ओम्नी व्हॅन" तयारच होती.

अनिकेत दाबके, विवेक, चैतन्य, प्रशांत, सतेज आणि मी. ही ओम्नी खूप जुनी बरका म्हणजे १२-१३ वर्ष नक्कीच, पण अनिकेत आणि माझ्या बालपणीचा ब-याच आठवणी आहेत. बरीच जुनी असून देखील पळते एक नंबर.

आमचा प्रवास सुरु झाला आता लक्ष्य होते महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर... पण शांतपणे तयार होणार ते पोरं कसली... अर्धा तास होतो ना होतो तोच प्रशांत म्हणाला, "ऎ अन्या भुक लागली राव..." जो पर्यंत हॉटेल येत नाही तो पर्यंत प्रशांत काही शांत झाला नाही 

आणि आम्ही पहिला ब्रेक घेतला  N. H. 4  च्या "श्री राम बेस्ट वडा पाव" या हॉटेल वर. मग भजे, वडापाव, मिसळ पाव आणि चहा ची ऑर्डर दिली. ऑर्डर आल्या आल्या सतेज तर तुटून पडला...

वडा पाव आणि बटाटा भजी

मिसळपाव

सतेज

सतेज


हे श्री राम बेस्ट वडा पाव वाले सगळेच विकत असल्याचे लक्षात आलं म्हणजे नाश्ता च्या व्यतिरिक्त, चिक्की, चॉकलेट, च्युईंगम, शीत पेय, म्युझिक सिडी आणि हे सुद्धा...


गप्पा, टिंगळ टवाळी करत आमचा प्रवास सुरू होता, मी कॅमेरा बाहेर काढलाच होता आणि सुंदर असा हायवे आणि सातारा आजूबाजू चा परिसर मोहून टाकत होता.

अनिकेत खरचं खूप अप्रतिम ड्रायविंग करतो. रस्त्यावर भरपूर खड्डे होते मात्र त्याचा काहीच त्रास नाही झाला तो त्याच्या एक नंबर ड्रायविंग मुळे. भरपेट नाश्ता झालेला होता आणि स्मुथ ड्रायव्हिंग मुळे सगळेच पहुडले होते.
सतेज, चैतन्य आणि प्रशांत

विवेक
११.३० च्या जवळपास आम्ही कोल्हापूर ला पोहोचलो. महालक्ष्मी मंदिरात अत्यंत छान असे देवी दर्शन झाले (फोटो काढण्यास परवानगी नसल्याने ईथे एकही फोटो नाही :( ) आता आम्हाला गाठायचं होतं "नरसोबाची वाडी" पण पोरं पुन्हा भुक भुक ओरडू लागली. मग आम्ही गाठलं "मॅक डी" ईथे परत पोटभर खाऊन आमचा प्रवास सुरु झाला.


वाडी ला पोहचलो आणि गाडी पार्क केली, बाहेर पाहिलं तर समोरच्या निलगिरीच्या झाडावर एक गरुड जणू काही इथला पहारेकरी आहे अश्या आविर्भावात बसलेल होतं.


 इथे ही गर्दी कमी होती, छान दर्शन झालं. माझी फोटोग्राफी चालूच होती.
मी जसे फोटोग्राफीत मग्न होतो तसेच पोरं खाण्यात...

सुकी भेळ


खाणं इतकं झालं होतं विवेकला ईनो घ्यावे लागलं, आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. सांगली मार्गे आम्ही पुण्याकडे यायला सुरुवात केली आणि या टपरीवर शेवटचा चहा घेतला.आता अंधार पडायला सुरूवात झाली होती आणि पाऊस पडत होता. छान थंडगार हवा सुटली होती. पण पुन्हा  N. H. 4  वर चा प्रवास त्यामुळे प्रवास एक नंबर झाला. एक दिवसाची छोटी सहल, बालमित्र आणि जुन्या आठवणी, गप्पा, टवाळी, वाद आणि चेष्टा मस्करी. भरपूर फोटोग्राफी आणि खादाडी.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

२ टिप्पण्या:

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...