बुधवार, २६ ऑक्टोबर, २०११

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

नमस्कार,

सर्व वाचकांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

Image from: www.theholidayspot.com


चला या दिवाळी एक वचन घेऊ, आज मी एका चेह-यावर हसू येईल. एखाद्याला आनंद मिळेल असे काही कार्य करणार. जेथे अंधार आहे त्या ठिकाणी प्रकाशाची एक ज्योत नेणार.


प्रदुषण टाळा.  पर्यावरण सांभाळा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

रविवार, ९ ऑक्टोबर, २०११

वन डे टूर टू कोल्हापूर

पहाटे पहाटे साडेतीन वाजता मोबाईल खणखणला...

८५% झोपेत मी फोन घेतला, "बोला दाबके..."

यावेळी हा एकच मित्र मला फोन करण्याचा विचार करू शकतो. पलीकडून आवाज आला "काय सुरु आहे?"

मी म्हणालो, "सारस बागेत दुर्वा वेचतो आहे"

दाबके: "अरे वा वा चला आजच्या पूजेची चिंता मिटली."

मी: "विनोद पुरे... कसा काय फोन केला?"

दाबके: अरे! कोल्हापूर ला जायचा प्लान आहे, येणार का? साडेपाच ला निघायचं आहे.

मी हो म्हणालो

आता तुम्ही सांगा सकाळी साडेतीन ला तुमच्या मित्राचा फोन आला आणि मित्र मित्र मिळून फिरायला जात आहे हे पत्नीला समजले तर काय परिस्थिती निर्माण होईल. बायको म्हणाली, "ऐकलं मी सगळं, उठ आवर मी चहा टाकते." तिने चहा बनविला, अंघोळीसाठी पाणी तापवले.

आता खरी अडचण समोर होती, ती म्हणजे मी नगर रोडला राहतो आणि माझ्याकडे काही वाहन नाही आणि सगळे माझी वाट वारजे नाक्या जवळ पाहत होते. पण हा प्रॉब्लेम सुद्धा दाबके नी सोडवला. त्याने प्रशांतला घेण्यासाठी मोटारसायकल घेऊन पाठविले. प्रशांत माझी वाट पाहत कॉलनीच्या गेटवर उभा होता. तो १५ मिनिटात ईथे पोहोचला होता, आणि जातांना आम्हाला तितकाच वेळ लागला. त्याचे बाईक चालविण्याचे कौशल्य पाहून "धूम" च्या पुढच्या सिक्वल मध्ये त्याला छोटासा का होईना एक रोल देण्यात यावा याची मी विनंती करणार आहे. असो..

१५ मिनिटात तिथे पोहचल्यावर दाबकेची "ओम्नी व्हॅन" तयारच होती.

अनिकेत दाबके, विवेक, चैतन्य, प्रशांत, सतेज आणि मी. ही ओम्नी खूप जुनी बरका म्हणजे १२-१३ वर्ष नक्कीच, पण अनिकेत आणि माझ्या बालपणीचा ब-याच आठवणी आहेत. बरीच जुनी असून देखील पळते एक नंबर.

आमचा प्रवास सुरु झाला आता लक्ष्य होते महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर... पण शांतपणे तयार होणार ते पोरं कसली... अर्धा तास होतो ना होतो तोच प्रशांत म्हणाला, "ऎ अन्या भुक लागली राव..." जो पर्यंत हॉटेल येत नाही तो पर्यंत प्रशांत काही शांत झाला नाही 

आणि आम्ही पहिला ब्रेक घेतला  N. H. 4  च्या "श्री राम बेस्ट वडा पाव" या हॉटेल वर. मग भजे, वडापाव, मिसळ पाव आणि चहा ची ऑर्डर दिली. ऑर्डर आल्या आल्या सतेज तर तुटून पडला...

वडा पाव आणि बटाटा भजी

मिसळपाव

सतेज

सतेज


हे श्री राम बेस्ट वडा पाव वाले सगळेच विकत असल्याचे लक्षात आलं म्हणजे नाश्ता च्या व्यतिरिक्त, चिक्की, चॉकलेट, च्युईंगम, शीत पेय, म्युझिक सिडी आणि हे सुद्धा...


गप्पा, टिंगळ टवाळी करत आमचा प्रवास सुरू होता, मी कॅमेरा बाहेर काढलाच होता आणि सुंदर असा हायवे आणि सातारा आजूबाजू चा परिसर मोहून टाकत होता.

अनिकेत खरचं खूप अप्रतिम ड्रायविंग करतो. रस्त्यावर भरपूर खड्डे होते मात्र त्याचा काहीच त्रास नाही झाला तो त्याच्या एक नंबर ड्रायविंग मुळे. भरपेट नाश्ता झालेला होता आणि स्मुथ ड्रायव्हिंग मुळे सगळेच पहुडले होते.
सतेज, चैतन्य आणि प्रशांत

विवेक
११.३० च्या जवळपास आम्ही कोल्हापूर ला पोहोचलो. महालक्ष्मी मंदिरात अत्यंत छान असे देवी दर्शन झाले (फोटो काढण्यास परवानगी नसल्याने ईथे एकही फोटो नाही :( ) आता आम्हाला गाठायचं होतं "नरसोबाची वाडी" पण पोरं पुन्हा भुक भुक ओरडू लागली. मग आम्ही गाठलं "मॅक डी" ईथे परत पोटभर खाऊन आमचा प्रवास सुरु झाला.


वाडी ला पोहचलो आणि गाडी पार्क केली, बाहेर पाहिलं तर समोरच्या निलगिरीच्या झाडावर एक गरुड जणू काही इथला पहारेकरी आहे अश्या आविर्भावात बसलेल होतं.


 इथे ही गर्दी कमी होती, छान दर्शन झालं. माझी फोटोग्राफी चालूच होती.
मी जसे फोटोग्राफीत मग्न होतो तसेच पोरं खाण्यात...

सुकी भेळ


खाणं इतकं झालं होतं विवेकला ईनो घ्यावे लागलं, आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. सांगली मार्गे आम्ही पुण्याकडे यायला सुरुवात केली आणि या टपरीवर शेवटचा चहा घेतला.आता अंधार पडायला सुरूवात झाली होती आणि पाऊस पडत होता. छान थंडगार हवा सुटली होती. पण पुन्हा  N. H. 4  वर चा प्रवास त्यामुळे प्रवास एक नंबर झाला. एक दिवसाची छोटी सहल, बालमित्र आणि जुन्या आठवणी, गप्पा, टवाळी, वाद आणि चेष्टा मस्करी. भरपूर फोटोग्राफी आणि खादाडी.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०११

देवा... तु असं का केलं???

पहाटे तीन वाजता एका आवाजामुळे जाग आली, किती वाजले हे बघण्यासाठी उश्या खालचा मोबाईल घेतला तर स्क्रीनवर एक मेसेज दिसला... R.I.P. Steve Jobs... क्षणभर विश्वास नाही बसला. वाटलं कोणीतरी मस्करी करत असेल म्हणून पुन्हा झोपी गेलो.

सकाळी उठून पुन्हा मोबाईल पाहिला, न्यूज चॅनल पाहिले तेव्हा पुर्ण बातमी समजली. एक महान उद्योजक, संगणक अभियंता स्टीव्ह जॉब्सचे "कर्क" रोगाने निधन झाले.मी आज पर्यंत अ‍ॅपल या कंपनीचे एकही उत्पादन वापरले नाही, मात्र ज्या पद्धतीने जगात या कंपनी उत्पादने वापरली जातात आणि ते वापरण्याचे सल्ले मित्र, नातेवाईक देतात त्या अर्थी नक्कीच ही अती उच्च दर्जाच्या असणार हे मला माहिती आहे.

मला ही बातमी वाचून मला खूप दु:ख झालं... कारण स्टीव्ह जॉब्स च्या मृत्युचे कारण होते "कर्करोग"

विज्ञानाने खूप प्रगती केली त्याच्याच आधारे स्टीव्ह जॉब्सने जागतिक दर्जाच्या उत्पादने आपल्या पर्यंत पोहोचवली, मात्र कर्करोगाची लढाई तो हरला.

मला दोन प्रश्न विचारायचे आहेत.

पहिला देवाला: का देवा का कर्करोग निर्माण केला?

आणि
दुसरा शास्त्रज्ञांना: तुम्ही काहीच करू शकत नाही का?

मी गेले काही वर्ष बघत आहे अनेक प्रसिद्ध, यशस्वी, श्रीमंत व्यक्ती या रोगाने मरण पावली आहेत. असे का व्हावे. या रोगावर काहीच औषध नाही का? विकीपेडीयाच्या Recent Deaths हे सदर पाहिले असता जाणवलं की दर महिन्याला सुमारे ३५ ते ४० प्रसिद्ध व्यक्ती या रोगामुळे मरण पावतात. यात सामान्य माणसांचा कुठेही उल्लेख नसतो. एका अभ्यासातून समोर आले आहे ही जगातील एकूण मृत्यु पैकी १३% चे कारण हे कर्करोग आहे.

माझा एक आवडता खेळाडू "मालकम मार्शल", एक आवडती नटी "रसिका जोशी", एक आवडता पंच "डेव्हीड शेफर्ड" आणि एक दिवस अगोदर इंग्लंडचा माजी जलद गोलंदाज "ग्रहम डिली" यांना कर्क रोगच आपल्यापासून दुर घेऊन गेला.
लहानपणी दूरदर्शन वर बरेच सिनेमे मी पाहिले त्यात एका पात्राला कर्करोग झाला आहे असे दाखविले जायचे, त्यात ते पात्र शेवट पर्यंत जगायचे अथवा मरण  पावत. लहान असल्याने काहीच समजायचे नाही की कर्करोग म्हणजे काय?

मी कॉलेज मध्ये होतो तेव्हा माझ्या आजीला कर्क रोगाचे निदान झाले आणि त्यानंतर तीन महिन्यातच तिचं निधन झालं. त्या व्यक्तीला होणा-या वेदना आणि उपचारावर येणारा खर्च पाहून आजार झालेली व्यक्ती जगण्याची इच्छाच सोडून देते. आजीला जाऊन ५-६ वर्ष ही झाले नाही आणि माझ्या आईला हाच आजार आमच्या पासून दुर घेउन गेला. तेव्हा समजलं की हा आजार किती महाभयंकर आहे...

"माझी देवाला एक विंनती आहे जसे तु चोच असणा-याला दाणा देतो तसाच या कर्करोगावर उपचार दे..."

हौशी लेखनाचे नवे पर्व

नमस्कार, 

सर्व वाचकांना, मित्र-मैत्रिणींना व हितचिंतकांना "विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!"

आज विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर "मी एक हौशी लेखक" हा ब्लॉग स्व:त च्या संकेतस्थळावर विराजमान झाला आहे.

सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की तुम्ही "मी एक हौशी लेखक" आता  http://www.haushilekhak.com वर वाचू शकता.

आज पर्यंत दिलेल्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद...

नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक
http://www.haushilekhak.com/
Related Posts Plugin for WordPress, Blogger...