बुधवार, २५ मे, २०११

आठवणींचा मुखवास

परवा ऑफीसमध्ये आल्यावर थोड्याच वेळात ई-मेल आली. Chocolate @ my Desk  जो कोणीही दक्षिण आफ्रिकेतून परततो तो अशी ई-मेल नक्की करतो. काही मिनिटातच सगळे जण त्याच्या डेस्कवर जमा झालेले दिसले. त्याने आणलेल्या चॉकलेट वर सगळ्यांनी ताव मारला आणि आपल्या कामाला लागले.

दुपारी लंच नंतर आम्ही ७-८ जण शतपावली करण्यासाठी बाहेर पडलो. त्याच दरम्यान पुन्हा त्या चॉकलेट चा विषय निघाला कारण ते चॉकलेट खुपच छान होते. आमच्या पैकी ही काही जणांचा यापूर्वी दक्षिण आफ्रिका दौरा झाला होता. तेवढ्यात समीरने आमच्यापैकी एकाने आणलेल्या च्युईंगम चा विषय काढला. समीरच्या मते ते इतके चिवट होते की, "ज्याने कोणीही ते खाल्ले त्याची चिता विजली तर हाड नाही सापडणार पण ते च्युईंगम जशाचा तसे सापडेल", सगळे जण पोट धरून हसू लागले. इथेच चर्चेला सुरूवात झाली.

मग सगळे जण लहानपणी मिळणा-या "खाऊ" बद्दल बोलु लागले, एक जण म्हणाला लहानपणी एक सुपारी मिळायची ती मी का खायचो तर त्याच्या पाकीटावरील चित्र एका बाजूने पाहिले तर पुरुषाचा चेहरा आणि दुसरी कडून पाहिल तर स्त्रीचा चेहरा दिसायचा.

इतक्यात एकजण म्हणाला, "अरे तु ती "पेप्सी" खायचा का रे ?" तेव्हा ही रंगीत "पेप्सी" आठ आण्याला मिळायची. साधी, दुधाची आणि रंगीत "पेप्सी" खाण्यात खुप खुप मजा यायची. "पेप्सी" वरून विषय मटका कुल्फी कडे वळायला जास्त वेळ लागला नाही. मग मटका कुल्फी, मावा कुल्फी अश्या एक एक बालपणीच्या आठवणींची रांग लागली.

तेवढ्या प्रसाद म्हणाला "अरे ते ’बोर कूट’ खायचा का रे तु?"

"बोर कूट ! म्हणजे काय? भातावर टाकून खातात तेच का?" असे प्रश्न फक्त आणि फक्त "जॉन सवाली" (हे टोपण नाव आहे)च विचारू शकतो. जॉनच्या प्रश्नांची quality  आणि quantity  एवढी भयंकर असते की सीबीआय वाले सुध्धा थोडी दयामाया दाखवत असतील पण जॉन सवालीकडे तसं काही नाही. या प्रश्नावर आम्ही खुप हसलो, त्याला दोघां तिघांनी टपल्या ही दिल्या आणि त्याचा कुळाचा जयजयकार केला. मग त्याला बोर कूट म्हणजे काय ते सांगितले. "अरे भातावर टाकून खातात ते मेतकूट" असे मी म्हणालो.

एक जण सांगु लागला की तो लहानपणी बोर कूट कसा पुडी सगट खायचा आणि मग त्यासाठी वडिलांचा मार बसायचा. तेवढ्यात समीर ने त्याचाही एक कारनामा सांगितला की, तो लहानपणी "लाची" खाण्यासाठी काय करायचा तर इमारत बांधकामातील सळई विकायचा.

मला ही आठवतो अजुन शाळेच्या बाहेर विकत मिळणार "मोहन चा बर्फ गोळा" लाल, काळा, हिरवा रंग टाकून तो बर्फ गोळा मिळायचा. मी नेहमी लाल रंगाचा गोळा घ्यायचो. तो खात खात तोंड रंगवून मी घरी आलो की आई मला लाल तोंड्या माकड म्हणायची.

ह्या बालपणी आठवणी मुळे पुन्हा एकदा लहान व्हावे असे वाटत आहे. मोकळ्या मनाने बर्फ गोळा, बोर कूट, पेप्सी, गटागट खावे असं नेहमी वाटत. त्या वेळी मिळणार हा "खाऊ" खुप अमूल्य वाटायचा. ती मजा काही औरच होती.

"खाने बाद कुच मीठा हो जाये" हे आजकाल खुप कानावर पडत आहे. मात्र त्यादिवशी त्याची आम्हाला काहीच गरज पडली नाही कारण या आठवणींचा गोडवा पुरेसा होता.

मंगळवार, १७ मे, २०११

मौजमजा X आंदोलन

हा संपुर्ण आठवडा पेटला आहे. घराबाहेर न पडण्याचे आता दोन सबळ कारणं मिळाली आहेत. एक तर उन्हाळा आणि दुसरं म्हणजे पेट्रोल दरवाढ.

या आठवड्यात झालेल्या ५ रुपयांच्या दरवाढीचे पडसाद संपुर्ण देशात पहायला मिळाले. कुठे मोर्चा, कुठे निदर्शने, तर कुठे निषेध व्यक्त करण्याचे नवनवीन प्रकार, संतापलले विरोधक, न्युज चॅनल वरचे चर्चासत्र.

आता सवाल असा आहे की खरंच ह्याची काही गरज आहे का? मी या दरवाढीचे समर्थन करत नाही मात्र हे सगळं करून काही फरक पडणार आहे का?

कारण मला सर्वत्र दोन विभिन्न चित्र पहायला मिळत आहे.

दैनिक सकाळ मध्ये आज एक बातमी वाचली. "संभाजी महाराज जयंतीनिमित्त चित्तेपिंपळगाव ते टि.व्ही. सेंटरपर्यंत दुचाकी फेरी" ही बातमी आणि या फेरी मध्ये भाग घेतलेल्या सुमारे ५० युवा कार्यकर्त्यांची नावे देण्यात आली आहेत.

खूप प्रश्न उभे राहिले, काय साधलं या दुचाकी फेरीतून??? किती पेट्रोल वाया गेले असेल?
या युवा कार्यकर्त्यांनी हीच फेरी चालत किंवा सायकलवर काढली असती तर प्रतिसाद ही जास्त मिळाला असता आणि प्रसिद्धीही. अशा फे-या काढून एकीकडे पेट्रोल जाळायचे आणि दुसरीकडे सरकारच्या नावाने बोंबा मारायच्या.

औरंगाबादच्या महापौर ने तर कहरच केला ह्या चक्क राजेशाही बग्गीतून कार्यालयात आल्या. अशी बग्गी राजे महाराजे वापरताना किंवा चित्रपटाच पाहायला मिळते. आता हा निषेध म्हणायचा की जनतेची चेष्टा. खरं सांगा तुमच्या आमच्या सारख्याला परवडणार आहे का अशी बग्गी.

दरवेळी पेट्रोल दरवाढ झाल्यानंतर न्यूज चॅनलवाले चर्चासत्र भरवतात. ह्या संवादाचा विसंवाद होतो, कुणी सरकारची बाजु घेतं तर कुणी जनतेची आणि जनता शांतपणे हा सुपर हीट तमाशा पाहत असते.

निषेध, निदर्शने आणि चर्चासत्र सगळे काही दिवसात बंद होतात आणि जनता पुन्हा पंपावरच्या रांगेत उभी दिसते.
http://indiacurrentaffairs.org


जनता फक्त एवढेच करू शकते का?

नाही... आपण बरंच काही करू शकतो.

  • शक्य तितका जास्त सार्वजनिक परिवहनाचा वापर करा.
  • कार्यालयाच्या जवळपास राहत असाल तर सरळ सायकल वापरायला सुरुवात करा.
  • शक्य तितका कमी दुचाकीचा वापर करा.
  • चालत जाणे शक्य असेल तर चालत जा.
  • अधीक मायलेज देण्या-या वाहनांची निवड करावी.
  • इंधनाची बचत करण्याची सवय लावा.
  • दरवाढी साठी सरकारला वेढीस धरण्यापेक्षा सार्वजनीक परिवहनाचा दर्जा सुधारण्याचा हट्ट धरा.
  • कंपन्यांनी कर्मचा-यांना सायकलवर येण्यासाठी प्रोत्साहित करावे, त्यामुळे प्रदुषण कमी होईल, पार्किंगची समस्या येणार नाही.
  • सरकारने सायकल वापरणाऱ्या व्यक्तीला कर सवलत द्यावी.

मला माहिती आहे ह्या हायटेक जगतात या गोष्टी पटायला जरा अवघड आहेत, पण ह्या गोष्टी साध्य करणं आज आपल्या हातात आहे. भविष्यात जेव्हा काहीच पर्याय उरणार नाही तेव्हा ह्याच गोष्टी नाईलाजाने कराव्याच लागतील.

बंद करा आंदोलने, कमी करा मौजमजा. परिस्थितीचा विचार करा वेळ अजुन ही आपल्या हातातून गेलेली नाही.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...