शुक्रवार, ८ एप्रिल, २०११

मुंबई का पुणे

आजपासून एका नवीन वादाला सुरूवात होणार आहे. मुंबई का पुणे...

हा वाद राजकीय, भाषेचा, शहरातील दळणवळण किंवा गर्दीचा नाही. या वादाला वाचा फोडली आहे ती आयपीएल-४ ने.

वर्ल्डकपचा शानदार शेवट झाला, भारताच्या विजयाचा परमानंद अजुन अनुभवत असतांना लगेचच आयपीएल-४ ची नांदी झाली. गेल्या ३ स्पर्धेत ८ संघ होते आणि या वेळेस १० संघाच्या समावेशाने चुरस वाढली आहे. या वेळी कोची आणि पुणे हे दोन संघ सामील झाले आहेत. या वेळी आयपीएल १० संघ एकमेव बदल नसून ह्या वेळी संघांची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. बरेच मातब्बर खेळाडू आता दुस-या संघात सामील झाले आहेत. त्यामुळे ही स्पर्धा खूपच वेगळी होणार असे वाटत आहे.

पुणे ह्या संघाने अनपेक्षित उडी घेतली. सगळ्यांनी "अहमदाबाद" नवा संघ असणार असा अंदाज बांधला होता, पण पुणे संघाने बाजी मारली. यामुळे महाराष्ट्राचे दोन संघ आयपीएल आले आणि आपले राज्य पहिले असे राज्य बनले की ज्याच्या दोन शहराचे संघ आयपीएलमध्ये आहेत. पण आता चाहते चांगलेच कात्रीत सापडले आहेत. कारण अगोदर मुंबई इंडियन्सचे बरेचसे चाहते पुणे वॉरीअर्स कडे वळाले आहेत.

हे दोनही संघ काही दिग्गज तसेच नविन खेळाडूंनी भरलेला आहेत. मुंबई कडे मास्टर ब्लास्टर "सचिन तेंडूलकर" आहे तर पुणे संघात वर्ल्डकपचा हिरो "युवराज सिंग". दोन ही संघ पुढील प्रमाणे

image: www..iplt20.com
मुंबई इंडियन्स: सचिन तेंडूलकर, हरभजन सिंग, कायरन पोलार्ड, लसिथ मलिंगा, रोहीत शर्मा, मुनाफ पटेल, अंड्र्यु सायमंड्स, डेव्हीड जेकब्स, जेम्स फ्रॅंकलीन, क्लिंट मकाय, मोईसस हेनरीकेस, धवल कुलकर्णी, आदित्य तरे, अली मुर्तझा.

image: www.iplt20.com
पुणे वॉरीअर्स: युवराज सिंग, रॉबीन उथप्पा, आशिष नेहरा, मुरली कार्तिक, ग्रॅहम स्मिथ, टीम पेन, अंजलो मॅथुज, नाथन मकलम, कल्लम फर्गुसन, वेन पार्नेल, मिशेल मार्श, जेरोम टेलर, अल्फांसो थॉमस, जेसी रायडर.

सचिन का युवराज हा प्रश्न चाहत्या समोर पडला आहे. युवराज जबरदस्त फॉर्म मध्ये आहे तर सचिन हा सदाबहार आहे.

मुंबई ची ताकद सचिन, पोलार्ड आणि हरभजन यांच्यासारख्या खेळाडूंमुळे दिसून येते तर धवल कुलकर्णी हा छुपा रुस्तुम ठरू शकतो. सायमंड्स धोकादायक ठरू शकतो तर दुसरी कडे पुणे संघाची ताकद युवराज, स्मिथ, फर्गुसन ह्या खेळाडूंमुळे दिसून येते तर जेसी रायडर छुपा रुस्तुम ठरू शकतो. गोलंदाजीत पुणे संघ (कागदावर) कमकुवत वाटत आहे. मुंबईला ती स्पर्धेत खेळण्याचा अनुभव आहे तर पुण्याचा संघ नवा असला तरी कमी लेखून चालणार नाही.

तरी सुद्धा प्रश्न आहेच कोणतं शहर मुंबई का पुणे...

मी मुंबई इंडियन्स चा चाहता आहे... कारण सचिन, धवल आणि पोलार्ड हे माझे आवडते खेळाडू पण युवराज, उथप्पा आणि फर्गुसन हे सुद्धा धमाकेदार आहेत.

असो आताशी कुठे स्पर्धा सुरु होते आहे जसा जसा खेळाला रंग चढेल संघांची ताकद दिसायला लागेल...

तो पर्यंत आला रे.... मुंबई इंडियन्स :)  

रविवार, ३ एप्रिल, २०११

अश्रू, अपयश आणि परमानंद

अखेर ज्या क्षणाची वाट प्रत्येक भारतीय पाहात होता ती रात्र आली. 
भारताने २८ वर्षानंतर पुन्हा विश्वविजेतेपद मिळवले...

१९९६ च्या स्पर्धेतले विनोद कांबळीचे अश्रू...
image: dailybhaskar

२००३ मधले उपविजेतेपद...
Image: www.currentnewsindia.com

२००७ मधले अपयश...

Image: Internet
 पाहिल्यानंतर आज २ एप्रिल २०११ रोजी मिळालेला परमानंद.

image: www.espncricinfo.com
अभिनंदन टीम इंडिया आता आपण विश्वविजेते आहोत.
आणि लाख लाख धन्यवाद आम्हाला हा परमानंद दिल्याबद्दल.

शनिवार, २ एप्रिल, २०११

मी पाहिलेला सिनेमा : द टर्मिनल

सिनेमा बघणे हा माझा छंद नाही. मी क्वचितच एखादा सिनेमा बघतो. सिनेमा बघण्यापेक्षा मी लिहणे किंवा क्रिकेट बघणे मी जास्त पसंत करतो. पण कधी कधी बदल म्हणून मी सिनेमा बघतो. माझी आवड बऱ्याचदा दुस-यांशी जुळत नाही. प्रथमच मला आवडलेल्या एखाद्या सिनेमाबद्दल मी लिहायचा प्रयत्न करत आहे.

गुरुवारी नेहमी प्रमाणे ऑफीस संपवून घरी आलो. इथे (जोहान्सबर्ग) टी.व्ही. वर बघण्यासारखे काहीच नसते. खुपच कंटाळा आला होता म्हणून चॅनेल बदलत बसलो तर एका ठिकाणी "द टर्मिनल" चालू होता. मला यातील कलाकार, कथानक काहीच माहिती नव्हतं तरी पहात बसावसं वाटला.
Image: wikipedia

याच कथानक असं की नायक "व्हिक्टर नोरवॉस्की" युरोपीय देशातून न्यूयॉर्क ला येतो. विमानतळावर पोहोचल्यावर त्याला कळत की त्याच्या देशात युद्ध सुरू झालं आहे. या पार्श्वभूमीमुळे त्याला न्यूयॉर्क शहरात जाण्याची परवानगी नाकारली जाते, त्याच बरोबर त्याच्या देशात चालु असलेल्या युद्धामुळे त्या परत पाठवता येत नसतं. आता "व्हिक्टर नोरवॉस्की" कोणताच देश नसलेला व्यक्ती बनतो. नाईलाजाने त्याला आता विमानतळावरच राहण्याची वेळ येते. व्हिक्टरला थोडेसे इंग्रजी बोलता येत असते आणि तो जे काही बोलतो ते समजणेही अवघड असते. त्यात त्याला विमानतळ अधिकारी त्याला कोणतेही सहकार्य करत नाही मात्र त्या ठिकाणी कामं करणा-या काही व्यक्ती त्याला मदत करतात.

हळू हळू त्याची ओळख विमानतळावरच्या काही व्यक्तींशी व्हायला लागते. भाषेमुळे अडचण होत असल्याने तो इंग्रजी शिकायला सुरूवात करतो. तिथे काम करणारा एक युवक त्याला जेवणाचे आमिष देऊन त्याचं प्रेम असलेल्या एका युवती पर्यंत आपले विचार पोहोचविण्याचे काम करवून घेतो. त्याच वेळी भावनिक अडचणीत सापडलेली एक हवाई सुंदरी त्याला भेटते, तिच्याशी बोलण्याची व भेटण्याची इच्छा त्याला होत असते पण पैसे नसल्याने तो तिच्या सोबत जेवण्यास नकार देतो. आता तो नोकरी शोधायला लागतो जेणे करून काही पैसे जमा होतील आणि जेवणाचा प्रश्न सुटेल, त्याला एका ठिकाणी काम देखील मिळतं. पैसे जमा झाल्यावर व्हिक्टर तिला जेवणासाठी घेऊन जातो आणि तिला भावनिक गुंत्यातून बाहेर काढतो. त्याच्या साध्या सरळ स्वभावामुळे तो सर्वांचा चाहता होता.


मात्र त्याच बरोबर विमानतळ अधिकारी त्याला या विमानतळावरून बाहेर काढण्याचे बरेच प्रयत्न करतात मात्र ते अपयशी होतात. अखेर ते त्या हवाई सुंदरीची मदत घ्यायची ठरवतात. व्हिक्टर नोरवॉस्की एक आतंकवादी असून तो न्यूयॉर्क मध्ये जाण्यामागे काहीतरी असेच कारण असल्याचं विमानतळ अधिकारी तिला सांगतात. तेव्हाच तिला कळतं व्हिक्टर गेल्या ९ महिन्यापासून विमानतळावरच राहत आहे. तेव्हा तो तिला त्याचं न्यूयॉर्कला जाण्यामागचे खरं कारण सांगतो. व्हिक्टरचे वडील जॅझ संगीताचे चाहते असतात आणि जगातील नामवंत ५७ संगीतकारांची सही घ्यायची त्यांची इच्छा असते. त्यांच्या कडे ५६ जणांची सही असते मात्र अखेरचा संगीतकार न्यूयॉर्क मध्ये असतो आणि त्याची त्याची सही घेऊन त्याच्या वडिलांची इच्छा पुर्ण करायची असते.

खरं कारण समजल्यावर त्याला एका दिवसाचा व्हिसा मिळवून देण्यास ती व्हिक्टरला मदत करते. त्याच बरोबर त्याच्या देशातील युद्ध संपुष्टात येतं आणि तो आपल्या देशात परत जाण्यास पात्र होतो मात्र वडिलांच्या शेवटच्या ईच्छेचे काय? विमानतळ अधिकारी त्या इमोशनली ब्लॅकमेल करतात आणि आपल्या देशात जाण्यास भाग पाडतात. मात्र विमानतळावरील सगळेच त्याला मदत करतात आणि न्यूयॉर्क शहरात जाण्यास भाग पाडतात. अखेरीस तो त्या संगीतकाराची सही मिळवतो आणि वडिलांची इच्छा पुर्ण करतो...

हा सिनेमा मला का आवडण्याचं कारणं म्हणजे व्हिक्टर नोरवॉस्कीच्या भावना... वडिलांची इच्छा पुर्ण करण्यासाठी व्हिक्टरने केलला संघर्ष मनाला खूप स्पर्श करून गेला.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...