बुधवार, २ मार्च, २०११

व्यक्ती आठवणीतल्या: अनमोल केळकर उर्फ केळ्या (भाग-१)


कॉलेज संपल्यावर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोकरी आणि ती मिळता मिळत नाही. चांगल्या नोकरीच्या शोधात मी जालन्याहून औरंगाबादला आलो. मोठा भाऊ अगोदरच तिथे असल्याने रोटी, कपडा आणि मकान हा प्रश्नच नव्हता. त्याने भाडयाने एक फ्लॅट घेतला होता आणि त्याच्या सोबत दोघेजण अगोदरच राहत होते. फ्लॅट मोठा असल्याने गर्दी, अडचण किंवा गैरसोय हा प्रकार काहीच होणार नव्हता.

औरंगाबादला आल्यावर या शहराची माहिती, आजुबाजुचा परिसर, नातेवाईक आणि प्लेसमेंट एजन्सींची माहिती गोळा करण्यात बराच वेळ गेला. शहरात दळणवळणाची बोंब होती (आज ही आहेच) शहर बससेवा म्हणजे एक तास थांबा मगच बस येणार ह्या सुत्राने चालयची. माझं आपलं पेपरात बघ, मित्राला/नातेवाईकाला सांग, प्लेसमेंटच्या चकरा मार असं चालू होतं पण नोकरी काही मिळता मिळत नव्हती. शेवटी दादा म्हणाला "अरे एखादा software  चा कोर्स तरी कर." ही कल्पना हीट होती. मी लगेचच एक इंस्टीटुट मध्ये अ‍ॅडमिशन घेतले. कोर्स सुरु झाला आणि हळू हळू शहर ओळखीचं होऊ लागलं.

दोन एक आठवड्यानंतर एका संध्याकाळी दादाने सगळ्यांना बोलावले. थोडी चर्चा करायची आहे असे त्याने सांगितले. तो म्हणाला "हे बघा आपला फ्लॅट खुप मोठा आहे. भाडं ही खुप आहे. आपण आणखी एक मेंबर सहज वाढवू शकतो. तसे करणे आपल्या फायद्याचे ठरेल."

आमची काहीच हरकत नव्हती. तेव्हा पासून आम्ही वाट पहायला सुरुवात केली की कोण येतं आता रहायला. एक आठवड्यानंतरच दादाने सांगितले की उद्या एक जण येणार आहे, घर नीट आवरून ठेवा, त्याप्रमाणे आम्ही घर आवरुन ठेवलं. दुस-या दिवशी सकाळी नेहमी प्रमाणे आम्ही सगळे घराबाहेर पडलो. दुपार पर्यंत सगळी कामं आटोपून मी आणि विजय घरी पोहचलो तर हॉल मध्ये एक भली मोठी बॅग, तीन जोडी शुज आणि एक शेव्हींग किट पडलं होतं. आम्हाला लगेचच कळालं की नवीन मेंबर आला. त्या बॅगवर त्याचं नाव सुद्धा होतं "अनमोल केळकर" त्याच बरोबर शिक्षण  B.E. (Mech)  आणि शहर नाशिक.

त्याची बॅग दिसत होती पण तो दिसत नव्हतं. कळालं की तो बाहेर फिरायला गेला होता. एकंदरीत त्याचा बस्तरा आणि "अनमोल केळकर" असं अगदी टिपीकल नाव या वरून मी आणि विजय तो कसा दिसत असेल याचा अंदाज बांधायला सुरुवात केली.

माझा अंदाजाने तो ५ फूट च्या जवळपास उंची, सडपातळ, चष्मा, शांत आणि अभ्यासात हूशार असा होता. बरेच अंदाज बांधुन झाले पण वेळ काही जाईना म्हणून आम्ही बाहेर पडायचं ठरवलं. फ्रेश झालो आणि भांग पाडावा म्हणुन आरश्या समोर गेलो तर सगळे कंगवे गायब.

"अरे कंगवा कुठे आहे रे विजय?" त्याला ही माहित नव्हता. तो म्हणाला "अरे त्या अनमोल ने ठेवला असेल..."

मी जरासा वैतागलोच मग सहज विचार केला की ह्या अनमोल च्या बॅग मध्ये नक्कीच कंगवा असेल.

"अरे विजय, त्याच्या शेव्हींग कीट मध्ये बघ जरा त्याचा कंगवा नक्कीच असेल"

"काय आयडिया आहे हो राव" बघतो असे म्हणत विजय ने ती कीट माझ्यासमोर रिकामी केली.

"अबे त्याने तर एकपण कंगवा नाही आणला रे, म्हणजे आपलाच वापरणार दिसतो हा" विजय ओरडला.

जसे जमतील तसेच केस बसवले आणि आम्ही घराबाहेर पडलो. हिंड हिंड हिंडून झाल्यावर रात्री आठ वाजता घरी पोहचलो तर मिलिंद ने दार उघडलं.

मी विचारलं "कुठे आहेत नविन पाहूणे?"

"अरे तो भाजी आणायला गेला आहे दादासोबत" मिलिंद ने सांगितले.

"कसा आहे रे नविन मेंबर" मी विचारले.

"आल्यावर बघशीलच" मिलिंद उत्तरला.

आता मात्र उत्सुकता शिगेला पोहचली होती. मला काहीच सुचत नव्हतं, मला माहित होतं की ही येणारी व्यक्ती काही सुपरस्टार नव्हती पण का कोणास ठाऊक माझी उत्सुकता काही केल्या कमी होत नव्हती.

तितक्यात दार वाजलं. स्विटीच्या उत्साहात मी जाऊन दार उघडलं तर समोर एक माणुस उभा होता. माझ्या पेक्षा ५-६ वर्षाने मोठा, पोट सुटलेलं, अंगात बंडी, लुगी नेसलेला, ३/४ टक्कल पडलेलं आणि हातात भाजी ने भरलेली पिशवी.

"कोण हवं आहे आपल्याला?" मी विचारलं

त्यावर त्याने आत डोकावुन पाहिलं, बाहेरून फ्लॅट नंबर चेक केला आणि म्हणाला. "हाय मी अनमोल... अनमोल केळकर." तो सरळ आत शिरला आणि पलंगावर जाऊन बसला.

अरे बापरे मी तर एकदम चक्रावुनच गेलो. मी विचार केला तसलं काहीच नव्हतं. खरं तर मी विचार केला होता की हा कन्या राशीचा असेल पण हा तर कुंभ राशीचा निघाला.

(क्रमश:)

४ टिप्पण्या:

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...