सोमवार, ७ मार्च, २०११

व्यक्ती आठवणीतल्या: अनमोल केळकर उर्फ केळ्या (भाग-2)


"अरे भेटायचं होतं ना तुला? चल ओळख करून देतो" असं म्हणत मिलिंद समोर आला आणि आमची ओळख करुन दिली

"हा नागेश... योगेशचा लहान भाऊ"

मी नुसतंच हॅलो म्हणालो.

माझ्या चेह-यावरील भाव मिलिंदने टिपले होते. मला बाजूला घेऊन त्याने समजावले हे बघ इंग्रजी मध्ये एक म्हण आहे "Curosity kills the cat"  या म्हणीचा अर्थ कळाला का तुला??

हो मी म्हणालो.

त्यानंतर आम्ही सगळे सोबत जेवलो आणि झोपी गेलो. पण मी अनमोलशी काही जास्त बोललो नाही. कारण माझी उत्सुकता संपली होती आणि त्याच बरोबर एका प्रश्नाचे उत्तर ही मिळाले की त्याच्या किट मध्ये एकही कंगवा कसा काय नाही.

सकाळी मला लवकर जाग आली पण ती सवयीप्रमाणे नव्हे तर किचन मध्ये पडलेल्या भांड्यांच्या आवाजाने. उठून बघीतले तर अनमोल चहा बनवत होता. "चल लवकर दात घास, मस्त चहा केला आहे" तो म्हणाला.

मी दात घासून हॉल मध्ये येऊन बसलो त्याने गरमा गरम चहा चा कप माझ्या हातात दिला. "थॅंक्स अनमोल..." मी म्हणालो.
"अबे थॅंक्स कसलं रे, आणि अनमोल काय म्हणतोस, सारा जमाना मुझे "केळ्या" कह कर बुलाता है..."

"केळ्या..." मी म्हणालो

"येस... यु आर राईट" आणि त्याने माझ्याशी शेक हॅंड केलं.

चहा एकदम मस्त झाला होता. अनमोल उर्फ केळ्या माझ्या समोर लुंगी आणि बनियान मध्ये बसला होता. पण राहुन राहुन माझं लक्ष त्याच्या टक्कलाकडे आणि सुटलेल्या पोटाकडे जात होतं. तो लठ्ठ नव्हता पण पोट खुपच सुटलं होतं.

"तुझं वय किती रे केळ्या?" मी घाबरत घाबरत विचारलं

माझा हा प्रश्न ऎकुन त्याने चहाच्या घोटाचा एक फवारा सगळ्या हॉल मध्ये उडवला.

"अरे हळू हळू काय झालं???" मी त्याला विचारलं

"अबे काय विचारतोस राव तु..." असे म्हणत तो जोर जोरात हसू लागला आणि हसत हसतच त्याने त्याची जन्मतारीख सांगितली.

आता माझ्या तोंडातून फवारा उडण्याचा बाकी राहिलं होतं पण तस काही झालं नाही, मी स्वत:ला सांभाळल. हा केळ्या माझ्या पेक्षा फक्त ८ महिन्याने मोठा होता.

हळू हळू केळ्या शी मैत्री वाढू लागली. आणि त्याचे एक एक पैलु समोर येऊ लागले. केळ्या मुळचा नाशिकचा होता. माझा त्याच्याबद्दलच एक अंदाज खरा ठरला तो म्हणजे केळ्या अभ्यासात अत्यंत हुशार होता. कारण त्याने नुसतच B.E. Mech. केलं नव्हतं तर तर तो युनिवर्सीटीमध्ये पहिला आला होता. त्याचे वडील शास्त्रज्ञ होते. आम्ही नोकरीच्या जाहिराती येतात म्हणून लोकल/मराठी पेपर विकत घ्यायचो पण केळ्या आल्यापासून घरात Times of India  येऊ लागला. केळ्या नेहमी हाच पेपर वाचायचा, त्या एक पद्धत पाहून तर आम्ही गारदच झालो. तो सकाळी पेपर आला की पहिले हेडलाईन वाचायचा मग जाहिराती बघायचा आणि मोजून सात ते आठ मिनिटात शब्द कोडं सोडवून टाकायचा. आम्ही थक्क होऊन जायचो कारण मराठी पेपर मधील शब्द कोडं सुटता सुटायचं नाही आमच्या कडून, आणि हा चक्क इंग्रजी कोड सोडवायचा. ही अशी जबरदस्त बुध्दीमत्ता मिळविता मिळविता केळ्या च्या डोक्यावरचे सगळे केस गळाले होते. हेच त्याच्या टक्कलाचे खरं कारण होतं.

ह्या बुद्धिमत्तेचा फायदा त्याला लवकरच झाला आणि एक मोठ्या कंपनी मध्ये त्याला चांगली नोकरी मिळाली. काही दिवसातच आमची चांगली मैत्री जमली. जरी मी माझ्या क्लास आणि केळ्या नोकरीच्या निमित्ताने बिझी राहत असलो तरी संध्याकाळी नक्कीच भेटायचो.

अशाच एका संध्याकाळी मी क्लास संपवून घरी आलो. नेहमी प्रमाणे मिलिंदने दार उघडलं. मी त्याला विचारलं "केळ्या कुठे?"

"अरे केळ्या उत्तम मिठाई भांडार मध्ये गेलाय, त्याचा आज पगार झाला. काहीतरी गोड आणतो म्हणून बाहेर गेला आहे." मिलिंद म्हणाला

थोड्यावेळातच केळ्या एक भला मोठ्ठा डब्बा घेऊन घरी आला. आम्ही जाम खुश होतो कारण आज काहीतरी गोड खायला मिळणार हे माहिती होतं. जसाच त्याने डब्बा उघडला सगळ्यांचे चहेरे पाहण्यासारखे झाले, कारण केळ्या चक्क एक किलो जिलेबी घेऊन आला होता.

"अबे, काय आहे बे हे..." सगळे ओरडले.

"आपल्याला जाम आवडते राव जिलेबी" केळ्या म्हणाला.

केळ्याला सोडून जिलेबी कोणालाच आवडत नव्हती, त्यामुळे आम्ही एक जिलेबी आपली चवीपुरती उचलून बाजुला झालो. आम्हाला वाटले की केळ्या भडकलं, हे सगळ कोण संपवणार वगैरे म्हणल पण तसं काहीच झालं नाही. एक एक करून त्याने एकट्याने सगळी जिलेबी संपवली. आम्हाला लगेचच त्याच्या त्या सुटलेल्या पोटाचे ही कारण समजले.

केळ्याला लवकर झोपायची सवय होती, त्या संध्याकाळी तो लवकर गादीवर आडवा झाला. आम्ही पण झोपण्याची तयारी करत होतो इतक्यात केळ्या धाड करून उठला आणि "सॉरी आई, सॉरी आई" म्हणत स्वत:लाच थोबाडीत मारायला सुरूवात केली. आम्हाला हसू आवरेना.

"अबे केळ्या काय झालं?" आम्हाला हसावं की त्याला सांभाळाव हेच समजेना. पण केळ्या शांतपणे उठला आणि बॅग मधुन तेलाची बाटली काढून तेल डोक्यावर थापु लागला.

"काय झालं केळ्या???" आम्ही हसत हसत विचारलं

"गप्प बसा राव, आई म्हणते तुझं लग्न कसं जमणार, टक्कल पाहिलं का किती पडलंय. म्हणून तिने हे तेल तयार करुन दिले आहे. आणि ताकीद दिली आहे की दररोज झोपताना लावत जा. आपल्याला लग्न करायचय राव..."

(क्रमश:)

३ टिप्पण्या:

  1. तुझा हा केळ्या भलताच इंटरेस्टिंग वाटायला लागलाय.... लवकर येवू दे पुढचा भाग :)

    उत्तर द्याहटवा
  2. छान लिहीलं आहे...
    पुढील भागाची वाट जास्त दिवस नका पहायला लावू.......

    उत्तर द्याहटवा

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...