सोमवार, १४ मार्च, २०११

व्यक्ती आठवणीतल्या: अनमोल केळकर उर्फ केळ्या (भाग-3)

केळ्या ब-यापैकी विसराळू होता. आईने दिलेली ताकीद तो विसरायचा मात्र एक गोष्ट अशी होती तो नियमित करायचा ती म्हणजे झोपण्या अगोदर बॅग मधुन "धौती-योग" ची बाटली काढून एक चमचा चुर्ण खायचा. आम्ही सगळे ते पाहायचो पण त्याचा परिणाम दुस-या दिवशी सकाळी पहायला मिळायचा. कारण केळ्यानी जर एक चमचा चुर्ण खाल्ले नाही तर दुस-या दिवशी त्याचा डाटा डाऊनलोड व्हायचा नाही. बरं ह्या डाऊनलोडची स्पीड ही डायल-अप सारखी होती अगदी ३२ केबीपीस....

आम्ही खुप खुप वैतागायचो, दाराबाहेर उभं राहुन मिलिंद शांतपणे गाणं म्हणायचा, "बडी देर हुई नंदलाला, तेरी राह तके ब्रिजबाला..." पण केळ्यासाठी आम्ही सगळं सहन करायला लागलो.

आम्ही केळ्याला त्याच्या सगळ्या सवयी सोबत स्विकारलं कारण त्याचं Knowledge sharing करण्याच्या गुणामुळे. तो भेटण्यापुर्वी मी ब-याच लोकांना भेटलो होतो पण, ज्ञान वाटल्याने वाढते असा विचार करणारे कोणीच भेटलं नव्हतं. समोर बसलेल्या व्यक्तीला एखादी गोष्ट सांगितली तर तो आपलं ज्ञान चोरेल असा विचार करण्या-यापैकी केळ्या नव्हता. इंग्रजी, विज्ञान असो गणित तो शिकविण्यासाठी, समजावून सांगण्यासाठी कायम तयार असायचा. नोकरी साठी लिहिल्या जाणारे कव्हर लेटर त्यानेच मला लिहून दिले. इंटरवुव्ह मध्ये कसे बोलायचे याची त्याने माझ्याकडून भरपूर प्रक्टीस करून घेतली होती.

पण अधून मधुन केळ्याचा दंगा चालूच असायचा. एखाद्याचा पगार असो की वाढदिवस किंवा काहीही कारण असलं की केळ्या उत्तम मधुन जिलेबी घेऊन आलाच समजायचं.

केळ्याची आणि लादेनची खुन्नस होती, कदाचित आजही असेल... या खुन्नसचे कारण म्हणजे ९/११ ला अमेरिकेवर झालेला आतंकवादी हल्ला. केळ्या खुप हुशार होता आणि त्याला अमेरिकेतल्या एका कंपनीत नोकरी मिळाली होती. पण १३ सप्टेंबर ला त्याला फोन आला आणि सगळ्या अपॉइंटमेंट रद्द झाल्याचे कळविण्यात आले. केळ्या खुपच निराश झाला होता. कारण ते विमान वर्ल्ड ट्रेड सेंटर नव्हे तर केळ्याच्या स्वप्नांवर आदळलं होतं.

केळ्या आणि मी खुप छान मित्र झालो होतो. पण त्याच्या मैत्रीचा सहवास थोड्याच काळापुरता मिळाला कारण मला नोकरी मिळालं नशिबाने ठिकाण होतं नाशिक. केळ्या खुप खुश होता कारण मी त्याच्या गावी जाणार होतो, मात्र मी एका चांगल्या मित्रापासून दुर जात होतो. थोड्याच दिवसात केळ्या नरेंद्र मोदींच्या राज्यात गेल्याचं समजलं तसा त्याने मला ईमेल केला होता.

आज दहा वर्ष होत आहे या गोष्टीला... केळ्यासारखा एक मित्र भेटला पण त्याचा सहवास जास्त लाभला नाही. करिअर, नोकरी, पैसा या गोष्टींच्या मागे लागल्याने आम्ही एका चांगल्या मित्रापासुन दुर दुर जात राहिलो. परवा जेव्हा एकाने Knowledge sharing करण्यात टाळाटाळ केली, तेव्हा मला चटकन केळ्याची आठवण झाली. वाटलं त्याला सांगाव हे सगळं की केळ्या कसा होता.

काळाच्या ओघात आज मी खुप दुर आलो आहे मात्र केळ्या कुठे आहे हे काहीच माहिती नाही. जर तुम्हाला केळ्या कुठे भेटला तर त्याला सांगा की त्याचा एक जुना मित्र त्याची "उत्तम" च्या बाहेर त्याची वाट बघतो आहे...

(समाप्त.)

सोमवार, ७ मार्च, २०११

व्यक्ती आठवणीतल्या: अनमोल केळकर उर्फ केळ्या (भाग-2)


"अरे भेटायचं होतं ना तुला? चल ओळख करून देतो" असं म्हणत मिलिंद समोर आला आणि आमची ओळख करुन दिली

"हा नागेश... योगेशचा लहान भाऊ"

मी नुसतंच हॅलो म्हणालो.

माझ्या चेह-यावरील भाव मिलिंदने टिपले होते. मला बाजूला घेऊन त्याने समजावले हे बघ इंग्रजी मध्ये एक म्हण आहे "Curosity kills the cat"  या म्हणीचा अर्थ कळाला का तुला??

हो मी म्हणालो.

त्यानंतर आम्ही सगळे सोबत जेवलो आणि झोपी गेलो. पण मी अनमोलशी काही जास्त बोललो नाही. कारण माझी उत्सुकता संपली होती आणि त्याच बरोबर एका प्रश्नाचे उत्तर ही मिळाले की त्याच्या किट मध्ये एकही कंगवा कसा काय नाही.

सकाळी मला लवकर जाग आली पण ती सवयीप्रमाणे नव्हे तर किचन मध्ये पडलेल्या भांड्यांच्या आवाजाने. उठून बघीतले तर अनमोल चहा बनवत होता. "चल लवकर दात घास, मस्त चहा केला आहे" तो म्हणाला.

मी दात घासून हॉल मध्ये येऊन बसलो त्याने गरमा गरम चहा चा कप माझ्या हातात दिला. "थॅंक्स अनमोल..." मी म्हणालो.
"अबे थॅंक्स कसलं रे, आणि अनमोल काय म्हणतोस, सारा जमाना मुझे "केळ्या" कह कर बुलाता है..."

"केळ्या..." मी म्हणालो

"येस... यु आर राईट" आणि त्याने माझ्याशी शेक हॅंड केलं.

चहा एकदम मस्त झाला होता. अनमोल उर्फ केळ्या माझ्या समोर लुंगी आणि बनियान मध्ये बसला होता. पण राहुन राहुन माझं लक्ष त्याच्या टक्कलाकडे आणि सुटलेल्या पोटाकडे जात होतं. तो लठ्ठ नव्हता पण पोट खुपच सुटलं होतं.

"तुझं वय किती रे केळ्या?" मी घाबरत घाबरत विचारलं

माझा हा प्रश्न ऎकुन त्याने चहाच्या घोटाचा एक फवारा सगळ्या हॉल मध्ये उडवला.

"अरे हळू हळू काय झालं???" मी त्याला विचारलं

"अबे काय विचारतोस राव तु..." असे म्हणत तो जोर जोरात हसू लागला आणि हसत हसतच त्याने त्याची जन्मतारीख सांगितली.

आता माझ्या तोंडातून फवारा उडण्याचा बाकी राहिलं होतं पण तस काही झालं नाही, मी स्वत:ला सांभाळल. हा केळ्या माझ्या पेक्षा फक्त ८ महिन्याने मोठा होता.

हळू हळू केळ्या शी मैत्री वाढू लागली. आणि त्याचे एक एक पैलु समोर येऊ लागले. केळ्या मुळचा नाशिकचा होता. माझा त्याच्याबद्दलच एक अंदाज खरा ठरला तो म्हणजे केळ्या अभ्यासात अत्यंत हुशार होता. कारण त्याने नुसतच B.E. Mech. केलं नव्हतं तर तर तो युनिवर्सीटीमध्ये पहिला आला होता. त्याचे वडील शास्त्रज्ञ होते. आम्ही नोकरीच्या जाहिराती येतात म्हणून लोकल/मराठी पेपर विकत घ्यायचो पण केळ्या आल्यापासून घरात Times of India  येऊ लागला. केळ्या नेहमी हाच पेपर वाचायचा, त्या एक पद्धत पाहून तर आम्ही गारदच झालो. तो सकाळी पेपर आला की पहिले हेडलाईन वाचायचा मग जाहिराती बघायचा आणि मोजून सात ते आठ मिनिटात शब्द कोडं सोडवून टाकायचा. आम्ही थक्क होऊन जायचो कारण मराठी पेपर मधील शब्द कोडं सुटता सुटायचं नाही आमच्या कडून, आणि हा चक्क इंग्रजी कोड सोडवायचा. ही अशी जबरदस्त बुध्दीमत्ता मिळविता मिळविता केळ्या च्या डोक्यावरचे सगळे केस गळाले होते. हेच त्याच्या टक्कलाचे खरं कारण होतं.

ह्या बुद्धिमत्तेचा फायदा त्याला लवकरच झाला आणि एक मोठ्या कंपनी मध्ये त्याला चांगली नोकरी मिळाली. काही दिवसातच आमची चांगली मैत्री जमली. जरी मी माझ्या क्लास आणि केळ्या नोकरीच्या निमित्ताने बिझी राहत असलो तरी संध्याकाळी नक्कीच भेटायचो.

अशाच एका संध्याकाळी मी क्लास संपवून घरी आलो. नेहमी प्रमाणे मिलिंदने दार उघडलं. मी त्याला विचारलं "केळ्या कुठे?"

"अरे केळ्या उत्तम मिठाई भांडार मध्ये गेलाय, त्याचा आज पगार झाला. काहीतरी गोड आणतो म्हणून बाहेर गेला आहे." मिलिंद म्हणाला

थोड्यावेळातच केळ्या एक भला मोठ्ठा डब्बा घेऊन घरी आला. आम्ही जाम खुश होतो कारण आज काहीतरी गोड खायला मिळणार हे माहिती होतं. जसाच त्याने डब्बा उघडला सगळ्यांचे चहेरे पाहण्यासारखे झाले, कारण केळ्या चक्क एक किलो जिलेबी घेऊन आला होता.

"अबे, काय आहे बे हे..." सगळे ओरडले.

"आपल्याला जाम आवडते राव जिलेबी" केळ्या म्हणाला.

केळ्याला सोडून जिलेबी कोणालाच आवडत नव्हती, त्यामुळे आम्ही एक जिलेबी आपली चवीपुरती उचलून बाजुला झालो. आम्हाला वाटले की केळ्या भडकलं, हे सगळ कोण संपवणार वगैरे म्हणल पण तसं काहीच झालं नाही. एक एक करून त्याने एकट्याने सगळी जिलेबी संपवली. आम्हाला लगेचच त्याच्या त्या सुटलेल्या पोटाचे ही कारण समजले.

केळ्याला लवकर झोपायची सवय होती, त्या संध्याकाळी तो लवकर गादीवर आडवा झाला. आम्ही पण झोपण्याची तयारी करत होतो इतक्यात केळ्या धाड करून उठला आणि "सॉरी आई, सॉरी आई" म्हणत स्वत:लाच थोबाडीत मारायला सुरूवात केली. आम्हाला हसू आवरेना.

"अबे केळ्या काय झालं?" आम्हाला हसावं की त्याला सांभाळाव हेच समजेना. पण केळ्या शांतपणे उठला आणि बॅग मधुन तेलाची बाटली काढून तेल डोक्यावर थापु लागला.

"काय झालं केळ्या???" आम्ही हसत हसत विचारलं

"गप्प बसा राव, आई म्हणते तुझं लग्न कसं जमणार, टक्कल पाहिलं का किती पडलंय. म्हणून तिने हे तेल तयार करुन दिले आहे. आणि ताकीद दिली आहे की दररोज झोपताना लावत जा. आपल्याला लग्न करायचय राव..."

(क्रमश:)

बुधवार, २ मार्च, २०११

व्यक्ती आठवणीतल्या: अनमोल केळकर उर्फ केळ्या (भाग-१)


कॉलेज संपल्यावर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोकरी आणि ती मिळता मिळत नाही. चांगल्या नोकरीच्या शोधात मी जालन्याहून औरंगाबादला आलो. मोठा भाऊ अगोदरच तिथे असल्याने रोटी, कपडा आणि मकान हा प्रश्नच नव्हता. त्याने भाडयाने एक फ्लॅट घेतला होता आणि त्याच्या सोबत दोघेजण अगोदरच राहत होते. फ्लॅट मोठा असल्याने गर्दी, अडचण किंवा गैरसोय हा प्रकार काहीच होणार नव्हता.

औरंगाबादला आल्यावर या शहराची माहिती, आजुबाजुचा परिसर, नातेवाईक आणि प्लेसमेंट एजन्सींची माहिती गोळा करण्यात बराच वेळ गेला. शहरात दळणवळणाची बोंब होती (आज ही आहेच) शहर बससेवा म्हणजे एक तास थांबा मगच बस येणार ह्या सुत्राने चालयची. माझं आपलं पेपरात बघ, मित्राला/नातेवाईकाला सांग, प्लेसमेंटच्या चकरा मार असं चालू होतं पण नोकरी काही मिळता मिळत नव्हती. शेवटी दादा म्हणाला "अरे एखादा software  चा कोर्स तरी कर." ही कल्पना हीट होती. मी लगेचच एक इंस्टीटुट मध्ये अ‍ॅडमिशन घेतले. कोर्स सुरु झाला आणि हळू हळू शहर ओळखीचं होऊ लागलं.

दोन एक आठवड्यानंतर एका संध्याकाळी दादाने सगळ्यांना बोलावले. थोडी चर्चा करायची आहे असे त्याने सांगितले. तो म्हणाला "हे बघा आपला फ्लॅट खुप मोठा आहे. भाडं ही खुप आहे. आपण आणखी एक मेंबर सहज वाढवू शकतो. तसे करणे आपल्या फायद्याचे ठरेल."

आमची काहीच हरकत नव्हती. तेव्हा पासून आम्ही वाट पहायला सुरुवात केली की कोण येतं आता रहायला. एक आठवड्यानंतरच दादाने सांगितले की उद्या एक जण येणार आहे, घर नीट आवरून ठेवा, त्याप्रमाणे आम्ही घर आवरुन ठेवलं. दुस-या दिवशी सकाळी नेहमी प्रमाणे आम्ही सगळे घराबाहेर पडलो. दुपार पर्यंत सगळी कामं आटोपून मी आणि विजय घरी पोहचलो तर हॉल मध्ये एक भली मोठी बॅग, तीन जोडी शुज आणि एक शेव्हींग किट पडलं होतं. आम्हाला लगेचच कळालं की नवीन मेंबर आला. त्या बॅगवर त्याचं नाव सुद्धा होतं "अनमोल केळकर" त्याच बरोबर शिक्षण  B.E. (Mech)  आणि शहर नाशिक.

त्याची बॅग दिसत होती पण तो दिसत नव्हतं. कळालं की तो बाहेर फिरायला गेला होता. एकंदरीत त्याचा बस्तरा आणि "अनमोल केळकर" असं अगदी टिपीकल नाव या वरून मी आणि विजय तो कसा दिसत असेल याचा अंदाज बांधायला सुरुवात केली.

माझा अंदाजाने तो ५ फूट च्या जवळपास उंची, सडपातळ, चष्मा, शांत आणि अभ्यासात हूशार असा होता. बरेच अंदाज बांधुन झाले पण वेळ काही जाईना म्हणून आम्ही बाहेर पडायचं ठरवलं. फ्रेश झालो आणि भांग पाडावा म्हणुन आरश्या समोर गेलो तर सगळे कंगवे गायब.

"अरे कंगवा कुठे आहे रे विजय?" त्याला ही माहित नव्हता. तो म्हणाला "अरे त्या अनमोल ने ठेवला असेल..."

मी जरासा वैतागलोच मग सहज विचार केला की ह्या अनमोल च्या बॅग मध्ये नक्कीच कंगवा असेल.

"अरे विजय, त्याच्या शेव्हींग कीट मध्ये बघ जरा त्याचा कंगवा नक्कीच असेल"

"काय आयडिया आहे हो राव" बघतो असे म्हणत विजय ने ती कीट माझ्यासमोर रिकामी केली.

"अबे त्याने तर एकपण कंगवा नाही आणला रे, म्हणजे आपलाच वापरणार दिसतो हा" विजय ओरडला.

जसे जमतील तसेच केस बसवले आणि आम्ही घराबाहेर पडलो. हिंड हिंड हिंडून झाल्यावर रात्री आठ वाजता घरी पोहचलो तर मिलिंद ने दार उघडलं.

मी विचारलं "कुठे आहेत नविन पाहूणे?"

"अरे तो भाजी आणायला गेला आहे दादासोबत" मिलिंद ने सांगितले.

"कसा आहे रे नविन मेंबर" मी विचारले.

"आल्यावर बघशीलच" मिलिंद उत्तरला.

आता मात्र उत्सुकता शिगेला पोहचली होती. मला काहीच सुचत नव्हतं, मला माहित होतं की ही येणारी व्यक्ती काही सुपरस्टार नव्हती पण का कोणास ठाऊक माझी उत्सुकता काही केल्या कमी होत नव्हती.

तितक्यात दार वाजलं. स्विटीच्या उत्साहात मी जाऊन दार उघडलं तर समोर एक माणुस उभा होता. माझ्या पेक्षा ५-६ वर्षाने मोठा, पोट सुटलेलं, अंगात बंडी, लुगी नेसलेला, ३/४ टक्कल पडलेलं आणि हातात भाजी ने भरलेली पिशवी.

"कोण हवं आहे आपल्याला?" मी विचारलं

त्यावर त्याने आत डोकावुन पाहिलं, बाहेरून फ्लॅट नंबर चेक केला आणि म्हणाला. "हाय मी अनमोल... अनमोल केळकर." तो सरळ आत शिरला आणि पलंगावर जाऊन बसला.

अरे बापरे मी तर एकदम चक्रावुनच गेलो. मी विचार केला तसलं काहीच नव्हतं. खरं तर मी विचार केला होता की हा कन्या राशीचा असेल पण हा तर कुंभ राशीचा निघाला.

(क्रमश:)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...