मंगळवार, १८ जानेवारी, २०११

एक

एक या क्रमांकाला किती महत्त्व आहे हे मला एक दिवसापूर्वी समजलं. त्याचं झालं असं की जेव्हापासून मी जोहान्सबर्ग आलो आणि भारतामध्ये कोणालाही फोन केला की एकच प्रश्न

"मॅच पाहिली का?"  

मग माझे एकच उत्तर "नाही"

आणि मग विचारू नका काय काय ऐकायला मिळायचं

"बापरे... नाही", "अरे तू एवढा क्रिकेटचा किडा, आणि एक ही मॅच पाहिली नाही..." "अरे बाबा भारताला सपोर्ट करायला तरी जा ना..." असं काही काही ऐकायला मिळालं

निलेश तर समजूत अशी होती की मी ईथे फक्त मॅच बघण्यासाठीच आलो आहे. त्यात तर एक सुटसुटीत दौ-याचा प्लान तयार करुन मला मेल केला. जेव्हा दर्बनला फिरायला गेलो होतो त्यावेळी मिळालेली मॅच बघण्याची एक संधी मी घालवली होती आणि ही एक गोष्ट सलत ही होती पण जेव्हा जोहान्सबर्ग एकदिवसीय सामना आहे हे कळालं म्हटलं आता हि संधी सोडायची नाही हे एक गोष्ट मी ठरवली.

एक आठवड्यापूर्वी हातपाय मारायला सुरूवात केली कारण सगळ्यात महत्त्वाची एकच गोष्ट होती "एक तिकीट" आणि ते काही मिळत नव्हतं. वेबसाईट आणि पोस्ट-नेट (ईथे पोस्ट ऑफीस मध्येही तिकीट मिळतात!!!) तिकीट मिळण्याचे साधन उपलब्ध होती, पण एक ही तिकीट मिळालं नाही. एक ही मित्र सोडला नाही सगळ्यांना फोन झाले आणि पदरी पडलं काय तर फक्त "मूड ऑफ". काही केल्या एक ही तिकीट नाही मिळालं. वाटलं एक संपूर्ण दिवस घरीच बसून राहायला लागणार आणि मॅच पाहायची असेल तर SABC वर (इथलं दूरदर्शन) पाहायला लागणार.

फारच वाईट वाटत होतं कारण वॉंडरर्स स्टेडियम माझ्या घरापासून फक्त चार किमी वर आहे आणि मला काहीच करता येत नव्हतं. १४ जानेवारी पर्यंत म्हणजे एक दिवस अगोदर पर्यंत काहीच घडतं नव्हतं, अहो एक फक्त एक तिकीट पाहिजे होतं हो मला...

अचानक रात्री उज्ज्वलचा फोन आला, "नागेशभाई एक टिकट है । चाहिये क्या? एक तिकीट २४० रँड लगेगा, चलेगा क्या???"

एक मिनीट मला काहीच सुचलं नाही, मी नुसतंच "आ" म्हणालो...

उज्ज्वलने एक ना दोन "अरे, बहोत अच्छा... नागेश ने टिकट ले लिया" असं म्हणत फोन ठेऊन पण दिला.
अहो आनंदात मला दुसरा काहीच शब्द सुचलाच नाही हो...

एकतर मॅचच्या एक दिवस अगोदर तिकीट बुक झालं, एक तास अगोदर तिकीट हातात ही पडलं आता एकच उद्देश वॉंडरर्स गाठणे... 

आम्ही सगळे मिळून एक डझन पब्लीकनी एक च्या जवळपास स्टेडियम गाठलं आता एकच स्वप्न देवाचं दर्शन घ्यायचे. आत पोहोचलो तेव्हा टॉस सुरु होता. भारताने फलंदाजी घेतली आणि आता देव बॅटींगला येणार समजलं. 


शिस्तबद्ध पद्धतीनी राष्ट्रगीत म्हटल्यानंतर सामना सुरु झाला. पहिल्यांदाच इतक्या जवळून सचिन रमेश तेंडुलकर चे दर्शन झाले. आनंद गगनात मावत नव्हता.

एक एक चेंडु ने सामना पुढे जात होता आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रेक्षकांचा उत्साह दुणावत होता. त्यात माझे सीट सगळ्या स्थानिक लोकांनी घेरलेले होते. त्यामुळे प्रत्येक चौकारानंतरच्या माझ्या पाठिंब्याला एखादी तरी कडवी प्रतिक्रिया यायची तर पडलेल्या एक एक विकेट नंतर माझ्या नैराश्य वर त्यांच्या टाळ्यांचा प्रहार एखाद्या घनाप्रमाणे वाटत होता.

भारताची बॅटींग संपली सर्वबाद १९०... आमचे खांदे आता पडले होते. भुक खुप लागली होती म्हणून बाहेर आलो. सगळे भारतीय समर्थकांचा उत्साह कमी झालेला चेह-यावरती स्पष्ट दिसत होता. खाण्याच्या स्टॉलवरती रांगेत उभे असतांना माझ्या ऑफीस मधला एकजण भेटला. आम्ही मराठीत गप्पा मारत आहोत हे पाहून दोन अनोळखी युवक आमच्या जवळ आले आणि हिंदीत म्हणाले "अब क्या होगा, सब मजा किरकिरा कर दिया ये लोगोने..." त्यावर मी त्याला म्हणालो "पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त" ते हसले आणि निघून गेले.

खाण्याच्या स्टॉलवर एवढी गर्दी होती की नुडल्स पार्सल घेऊन परत जागेवर पोहचे पर्यंत एक गडी बाद, हाशीम आमला बॅक टु पॅविलिअन... :)

मी अक्षरश: ते नुडल्य आत लोटले आणि मॅच बघु लागलो. तेवढ्यात हरभजन सिंग बाऊंड्री जवळ आला. 

मी तिरंगा घेऊन पळतच सुटलो, तिथे जाऊन त्याचे फोटो घेतले. आता मी शेवटच्या रांगेतून उठून एक नंबरच्या रांगेत येऊन बसलो होतो. ठरविक वेळानंतर दक्षिण आफ्रिकेची एक एक विकेट पडत होती. आमचा उत्साह वाढत होता, आशिष नेहरा ला पाहून "नेहरा सक्त रहे पेहरा" अशा घोषणा चालू झाल्या होत्या. 

प्रेक्षकांमध्येही आता एक स्पर्धा चालू झाली होती, पडलेल्या प्रत्येक विकेट नंतर आमचा तिरंगा फडाकायचा तर प्रत्येक चौकरानंतर १० दक्षिण आफ्रिकेचे झेंडे दिसायचे.

शेवटी जेव्हा मोर्ने मोर्केलनी मारलेला चौकार माझ्याच दिशेनी आला तेव्हा एक एक भारतीय प्रेक्षक मैदान सोडताना दिसू लागले पण तो एक क्षण अविस्मरणीय होता कारण संपूर्ण मॅच मध्ये एकदाच मी मोठ्या स्क्रीनवर दिसून आलो. त्यानंतरही आम्ही संपूर्ण मॅच बघायची ठरवलं. एक ही चेंडू नाही सोडायचा... आणि त्याचा फायदाच झाला कारण तो चौकार शेवटचा चौकार ठरला. त्यानंतर ४४ चेंडु, ३ धावा आणि २ गडी असे समीकरण असूनही भारतीय संघ एक संघ होऊन खेळला आणि दक्षिण आफ्रिकेने सामना एक धावाने गमावला.

"एक रन ने मिळविलेला एक अविस्मरणीय विजय"

आमच्या आनंदाला काहीच सीमा राहिली नव्हती. आमची अवस्था "हँगओव्हर" या सिनेमातील पात्रांप्रमाणे होती, कारण सकाळी कोणालाच आठवत नव्हतं की विजयानंतर चे पुढचे पाच मिनिट कोणी काय केलं...
फक्त हे आठवत की रवी शास्त्री जेव्हा मॅन ऑफ द मॅच जाहीर करत होता आम्ही दिसेल त्याला मिठी मारत होतो... :)

एक रन फक्त एक रन त्याच्या सोबतीला पहिल्यांदाच (पुन्हा एक) घडलेल्या अनेक घटना. बघा या एक ला किती महत्त्व आहे...

१२ टिप्पण्या:

 1. जबरी... तू *एक* भाग्यवान माणूस आहेस बाबा... आम्ही इथे टी व्ही वर बघत होतो. १२८ चेंडुत ५८ धावा आणि आफ्रिकेचे तब्बल ७ गडी शाबूत होते. मग काय गपचुप झोपलो. सकाळी उठून टाइम्समध्ये बारीक लिहलेलं वाचल की भारत एका धावेने विजयी. रात्रीची समीकरण आठवल्यावर आधी वाटलं आपल्या लेडीज टीमची मॅच असेल आणि त्या जिंकल्या असतील तर नाही, चक्क आपले पठ्ठे रातोरात काम फत्ते करून बसले होते.

  बाकी पोस्ट *एक* नंबर...

  उत्तर द्याहटवा
 2. एक नंबर पोस्ट.. एकाचे मह्त्व आहेच..

  उत्तर द्याहटवा
 3. राहुल आणि सिद्धार्थ माझ्या ब्लॉगवर तुमचं स्वागत...

  प्रोत्साहनासाठी खुप खुप धन्यवाद.

  उत्तर द्याहटवा
 4. hey hi...

  can I get ur contact mail id..
  mi pan j'berg la yetey bahutek pudhacha mahina bharat..
  kahi goshtin baddal choukashi karaychi ahe.. :)

  neways nice post..

  उत्तर द्याहटवा
 5. Thanks Jayanti...

  yes sure you can contact me by using below link.

  http://blogmajha.blogspot.com/2010/08/blog-post_18.html

  I can help you.

  Nagesh Deshpande

  उत्तर द्याहटवा

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...