मंगळवार, ४ जानेवारी, २०११

मेरा भारत महान

लहानपणी पासून "मेरा भारत महान, शंभरांतले ९९ बेईमान तरीपण मेरा भारत महान" हेच माहिती होतं. पण खरंच आपला देश किती वेगळा आहे याचा अनुभव मला दक्षिण आफ्रिकेत आला.

दक्षिण आफ्रिकेत आल्या पासून हळूहळू इथल्या गोष्टींची आता सवय होऊ लागली आहे. उदा. माणसं, रस्ते, दळणवळण आणि जगण्याची शैली.

यंदा २५ डिसेंबर नेमका शनिवारी आला, म्हणजे एक सुट्टी बुडाली हे समीकरण आपल्या भारतात... पण इथे तसं नाही एखादी सार्वजनिक सुट्टी शनिवारी वा रविवारी आली तर लगेचच सोमवारी ही सुट्टी दिली जाते, असं भारतात नाही :(
त्यामुळे २५, २६ आणि २७ डिसेंबर ला काय करायचं हा मोठा प्रश्न समोर उभा राहिला. भरपूर काथ्याकूट करून डर्बनला जायचा प्लान आखला. जोहान्सबर्ग ते डर्बन अंतर ६०० किमी; मग १६ मित्र, ४ कार आणि अंदाजे ८ तासाचा प्रवास सुरु झाला २५ ला सकाळी सुरू झाला.
Image: Nagesh Deshpande

सकाळी चारच्या सुमारास आमच्या चारही गाड्या "गणपती बाप्पा मोरया" च्या दणदणीत आरोळ्यात देत अपार्टमेंटच्या बाहेर पडल्या. आमच्या कारमध्ये मी, समीर, दिनेश आणि राजीब असे चौघे; तर समीर आणि दिनेश या दोघांनाच फक्त ड्रायव्हींग येत असल्याने आम्हाला फक्त आराम करायचा होता.

Image: Nagesh Deshpande
हळूहळू आमच्या गाड्या एन-३ या महामार्गाकडे धावू लागल्या, एन-३ अतिशय सुंदर असा एक आठ पदरी महामार्ग... (भारतात असा नाही :( ) जवळ जवळ प्रत्येक वाहनाचा वेग ताशी ८० ते १६० (भारतात शक्य नाही :( ) दुतर्फा सुंदर झाडं, कॅमेरा घेऊन बसलेले पोलीस, कमी वळणांचे सरळ रस्ते. प्रत्येक ७५ ते १०० किमी वर पेट्रोलपंप (भारतात नाही :(  ) हे पंप म्हणजे नुसतेच पंप नसून जणू काही एखादा मॉलच. येथे जेवणाची सोय, प्रसाधन गृह अशा सर्व सुविधा...

आता आमच्या प्रवासाला तीन तास पुर्ण होत आले होते. माझी आणि राजीबची झोपही पुर्ण झाली होती. सगळ्यांना चहाची तल्लफ आल्याने अशाच एका पंपावर आम्ही थांबलो. चहा, नाश्ता झाला आणि निघतांना सहज पाहिले तर समीर च्या कार चे टायर पंक्चर :( तरीही आम्ही निश्चिंत कारण आम्ही एका पंपावरच होतो. तिथलाच एक कर्मचारी पकडला आणि त्याला पंक्चर काढण्यास सांगितले आणि या इथपासून खरी गंमत सुरू झाली.
Image: Nagesh Deshpande

तो कर्मचारी म्हणाला, "इथे पंक्चर काढले जात नाही. त्यासाठी टायर मॅकेनीक लागेल तो पंपावर नसतो."
मग समीर म्हणाला ठीक आहे टायर तरी बदली करून द्या. तो हो म्हणाला.

डिकीतून बदली टायर काढले तर आम्ही पाहतच राहीलो, कारण बदली टायर हे सध्याच्या टायर पेक्षा फारच लहान (त्याला इथे बिस्कीट टायर म्हणतात). आता समीर ला प्रश्न पडला की हे टायर लावून कार कशी चालवायची? त्यामुळे टायर मधील पंक्चर काढल्या शिवाय पर्याय नव्हता. कारण आमचा जवळपास ४०० किमीचा प्रवास अजून बाकी होता आणि या लहान टायर ने तो शक्य नव्हता. तिथेच आम्ही टायर बदली केले (खर्च १० रँड/अंदाजे ६० रुपये)
Image: Nagesh Deshpande

Image: Nagesh Deshpande
याच पंपावर आम्हाला समजले की पुढे ८ किमी वर "विलर्स" हे गाव आहे. या गावात पंक्चर काढून मिळेल मग आमच्या चारही कार या गावाकडे निघाल्या. रस्ता शोधत शोधत, वाट वाकडी करून आम्ही या गावात पोहोचलो तर इथे निराळंच चित्र... या गावात स्मशान शांतता पसरलेली, रस्ते रिकामे, दुकानं बंद म्हटलं आली का पंचाईत पण गावाबाहेर टायर च्या दुकानाच्या पाटी वरील मोबाईल नंबर आमच्या कडे होता. तो आम्ही फिरवला तर पलीकडील व्यक्ती १५ मिनिटात येतो म्हणून म्हणाली. त्याने आम्हाला एका चर्च जवळ थांबायला सांगितले. आता या गावात फक्त आम्ही १६ जणच दिसून येत होतो. गाव अत्यंत लहान मात्र फारच सुंदर होतं, सिग्नल असलेले रस्ते, कौलारू घरं, शाळा, बगीचे आणि गाईचे गोठे दिसून येत होते.
Image: Nagesh Deshpande

चर्चच्या जवळ गेल्यावर काही माणसं दिसली तेव्हा आम्हाला जरा बरं वाटलं, जीवात जीव आला. ती या गावात राहणारी मंडळी होती. त्यातला एक म्हणाला "आज क्रिसमस आहे तुम्हाला कोणीही भेटणार नाही" पुन्हा आमच्या दांड्या गुल पण काही वेळातच फोनवर बोललेला माणूस आमच्या समोर येऊन उभा राहीला. त्याच्याशी चर्चा केल्यावर कळाले की तो तर एक एजंट आहे आणि पंक्चर काढणारा तिसराच आहे. तो म्हणाला "आज क्रिसमस आहे तुम्हाला कोणीही भेटणार नाही. माझ्याकडे आणखी एक गिऱ्हाईक आहे, दोन गिऱ्हाईक म्हंटल्यावर पंक्चर मॅकेनीक लगेच येईल." मग आता आम्ही त्याची देवा सारखी वाट पाहू लागलो. हळूहळू ऊन तापू लागलं होतं

पण १० मिनिटानंतर तो एजंट ओरडला "आला आला मॅकेनीक आला" आणि समोरचं दृश्य पाहून आम्ही चकीतच झालो, अहो तो मॅकेनीक चक्क BMW मध्ये आला होता हो ! आम्ही सगळे जण त्याच्या गाडी भोवती जमा झालो. तो खाली उतरला आणि त्याने टायर कडे पाहिलं आणि म्हणाला, "४८० रँड (अंदाजे ४००० रुपये) लागतील". त्या भर उन्हात आम्ही गारठलोच हो. आमची तोंड पाहून तो सरळ गाडीत जाऊन बसला आणि डागलॉग टाकला "आज क्रिसमस आहे... कोणीही काम करणार नाही."

आम्ही परत मोर्चा एजंट कडे वळवला मग त्याने दुस-याला फोन लावला. तर तोही १० मिनिटात हजर झाला. हे ही साहेब कमी नव्हते, कारण हे Toyoto Camry मध्ये आले होते. त्याने टायर कडे पाहिले मग आमच्याकडे पाहिले. लगेचच त्या एजंटने आमच्याकडचीच एक सिगारेट त्याला दिली.
Image: Nagesh Deshpande

Image: Nagesh Deshpande
त्याने दोन झुरके घेऊन १०० रँड (अंदाजे ६५० रुपये) लागतील असे सांगितले. मग काही मंडळी त्याला पटवायला सुरुवात केली. आणखी एक सिगारेट, एक केळं आणि एक चॉकलेट आणि ७५ रँड (अंदाजे ५०० रुपये) मध्ये काम झालं... अखेर दोन तासाच्या खोळंब्या नंतर पंक्चर निघाले.पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि डोक्यात विचार आला, हे सगळं भारतात घडलं असतं तर...
अशा या समस्या भारतात आल्याच नसत्या कारण

एक म्हणजे प्रत्येक पंपावर पंक्चर काढणारा असतो.

दोन कोणताही सण असला तरी माणसं रोजची काम काही थांबवत नाही.

याच उत्तम उदाहरण म्हणजे मी जेव्हा सायकल घेतली त्या दिवशी ईद होती आणि एक मुस्लीम युवक ती घरपोच देण्यासाठी आला होता. तो म्हणाला "साहेब, एक वाजेपर्यंत काम करणार आणि मगच ईद साजरी करणार तेवढेच पैसेही मिळतील"

दक्षिण आफ्रिका किती मोहक असले तरी भारतासारखी कामावर श्रद्धा असलेली माणसं इथे कमी.

त्यामुळे जेव्हा या गावातून आम्ही बाहेर पडलो तेव्हा आम्ही आरोळी बदलली...

आता आमची आरोळी होती "मेरा भारत महान..." :) :) :)

८ टिप्पण्या:

 1. ह्म्म्म चांगला अनुभव....भारत असो की आफ्रिका कुठे ना कुठे कमी जास्त होणारच :)

  उत्तर द्याहटवा
 2. Blog’s title should be-
  “Gaadi mahaan pan biscuit tire lahaan“

  उत्तर द्याहटवा
 3. Inspiring and Interesting too..
  …….keep on writing abt SA 

  उत्तर द्याहटवा

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...