मंगळवार, १८ जानेवारी, २०११

एक

एक या क्रमांकाला किती महत्त्व आहे हे मला एक दिवसापूर्वी समजलं. त्याचं झालं असं की जेव्हापासून मी जोहान्सबर्ग आलो आणि भारतामध्ये कोणालाही फोन केला की एकच प्रश्न

"मॅच पाहिली का?"  

मग माझे एकच उत्तर "नाही"

आणि मग विचारू नका काय काय ऐकायला मिळायचं

"बापरे... नाही", "अरे तू एवढा क्रिकेटचा किडा, आणि एक ही मॅच पाहिली नाही..." "अरे बाबा भारताला सपोर्ट करायला तरी जा ना..." असं काही काही ऐकायला मिळालं

निलेश तर समजूत अशी होती की मी ईथे फक्त मॅच बघण्यासाठीच आलो आहे. त्यात तर एक सुटसुटीत दौ-याचा प्लान तयार करुन मला मेल केला. जेव्हा दर्बनला फिरायला गेलो होतो त्यावेळी मिळालेली मॅच बघण्याची एक संधी मी घालवली होती आणि ही एक गोष्ट सलत ही होती पण जेव्हा जोहान्सबर्ग एकदिवसीय सामना आहे हे कळालं म्हटलं आता हि संधी सोडायची नाही हे एक गोष्ट मी ठरवली.

एक आठवड्यापूर्वी हातपाय मारायला सुरूवात केली कारण सगळ्यात महत्त्वाची एकच गोष्ट होती "एक तिकीट" आणि ते काही मिळत नव्हतं. वेबसाईट आणि पोस्ट-नेट (ईथे पोस्ट ऑफीस मध्येही तिकीट मिळतात!!!) तिकीट मिळण्याचे साधन उपलब्ध होती, पण एक ही तिकीट मिळालं नाही. एक ही मित्र सोडला नाही सगळ्यांना फोन झाले आणि पदरी पडलं काय तर फक्त "मूड ऑफ". काही केल्या एक ही तिकीट नाही मिळालं. वाटलं एक संपूर्ण दिवस घरीच बसून राहायला लागणार आणि मॅच पाहायची असेल तर SABC वर (इथलं दूरदर्शन) पाहायला लागणार.

फारच वाईट वाटत होतं कारण वॉंडरर्स स्टेडियम माझ्या घरापासून फक्त चार किमी वर आहे आणि मला काहीच करता येत नव्हतं. १४ जानेवारी पर्यंत म्हणजे एक दिवस अगोदर पर्यंत काहीच घडतं नव्हतं, अहो एक फक्त एक तिकीट पाहिजे होतं हो मला...

अचानक रात्री उज्ज्वलचा फोन आला, "नागेशभाई एक टिकट है । चाहिये क्या? एक तिकीट २४० रँड लगेगा, चलेगा क्या???"

एक मिनीट मला काहीच सुचलं नाही, मी नुसतंच "आ" म्हणालो...

उज्ज्वलने एक ना दोन "अरे, बहोत अच्छा... नागेश ने टिकट ले लिया" असं म्हणत फोन ठेऊन पण दिला.
अहो आनंदात मला दुसरा काहीच शब्द सुचलाच नाही हो...

एकतर मॅचच्या एक दिवस अगोदर तिकीट बुक झालं, एक तास अगोदर तिकीट हातात ही पडलं आता एकच उद्देश वॉंडरर्स गाठणे... 

आम्ही सगळे मिळून एक डझन पब्लीकनी एक च्या जवळपास स्टेडियम गाठलं आता एकच स्वप्न देवाचं दर्शन घ्यायचे. आत पोहोचलो तेव्हा टॉस सुरु होता. भारताने फलंदाजी घेतली आणि आता देव बॅटींगला येणार समजलं. 


शिस्तबद्ध पद्धतीनी राष्ट्रगीत म्हटल्यानंतर सामना सुरु झाला. पहिल्यांदाच इतक्या जवळून सचिन रमेश तेंडुलकर चे दर्शन झाले. आनंद गगनात मावत नव्हता.

एक एक चेंडु ने सामना पुढे जात होता आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रेक्षकांचा उत्साह दुणावत होता. त्यात माझे सीट सगळ्या स्थानिक लोकांनी घेरलेले होते. त्यामुळे प्रत्येक चौकारानंतरच्या माझ्या पाठिंब्याला एखादी तरी कडवी प्रतिक्रिया यायची तर पडलेल्या एक एक विकेट नंतर माझ्या नैराश्य वर त्यांच्या टाळ्यांचा प्रहार एखाद्या घनाप्रमाणे वाटत होता.

भारताची बॅटींग संपली सर्वबाद १९०... आमचे खांदे आता पडले होते. भुक खुप लागली होती म्हणून बाहेर आलो. सगळे भारतीय समर्थकांचा उत्साह कमी झालेला चेह-यावरती स्पष्ट दिसत होता. खाण्याच्या स्टॉलवरती रांगेत उभे असतांना माझ्या ऑफीस मधला एकजण भेटला. आम्ही मराठीत गप्पा मारत आहोत हे पाहून दोन अनोळखी युवक आमच्या जवळ आले आणि हिंदीत म्हणाले "अब क्या होगा, सब मजा किरकिरा कर दिया ये लोगोने..." त्यावर मी त्याला म्हणालो "पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त" ते हसले आणि निघून गेले.

खाण्याच्या स्टॉलवर एवढी गर्दी होती की नुडल्स पार्सल घेऊन परत जागेवर पोहचे पर्यंत एक गडी बाद, हाशीम आमला बॅक टु पॅविलिअन... :)

मी अक्षरश: ते नुडल्य आत लोटले आणि मॅच बघु लागलो. तेवढ्यात हरभजन सिंग बाऊंड्री जवळ आला. 

मी तिरंगा घेऊन पळतच सुटलो, तिथे जाऊन त्याचे फोटो घेतले. आता मी शेवटच्या रांगेतून उठून एक नंबरच्या रांगेत येऊन बसलो होतो. ठरविक वेळानंतर दक्षिण आफ्रिकेची एक एक विकेट पडत होती. आमचा उत्साह वाढत होता, आशिष नेहरा ला पाहून "नेहरा सक्त रहे पेहरा" अशा घोषणा चालू झाल्या होत्या. 

प्रेक्षकांमध्येही आता एक स्पर्धा चालू झाली होती, पडलेल्या प्रत्येक विकेट नंतर आमचा तिरंगा फडाकायचा तर प्रत्येक चौकरानंतर १० दक्षिण आफ्रिकेचे झेंडे दिसायचे.

शेवटी जेव्हा मोर्ने मोर्केलनी मारलेला चौकार माझ्याच दिशेनी आला तेव्हा एक एक भारतीय प्रेक्षक मैदान सोडताना दिसू लागले पण तो एक क्षण अविस्मरणीय होता कारण संपूर्ण मॅच मध्ये एकदाच मी मोठ्या स्क्रीनवर दिसून आलो. त्यानंतरही आम्ही संपूर्ण मॅच बघायची ठरवलं. एक ही चेंडू नाही सोडायचा... आणि त्याचा फायदाच झाला कारण तो चौकार शेवटचा चौकार ठरला. त्यानंतर ४४ चेंडु, ३ धावा आणि २ गडी असे समीकरण असूनही भारतीय संघ एक संघ होऊन खेळला आणि दक्षिण आफ्रिकेने सामना एक धावाने गमावला.

"एक रन ने मिळविलेला एक अविस्मरणीय विजय"

आमच्या आनंदाला काहीच सीमा राहिली नव्हती. आमची अवस्था "हँगओव्हर" या सिनेमातील पात्रांप्रमाणे होती, कारण सकाळी कोणालाच आठवत नव्हतं की विजयानंतर चे पुढचे पाच मिनिट कोणी काय केलं...
फक्त हे आठवत की रवी शास्त्री जेव्हा मॅन ऑफ द मॅच जाहीर करत होता आम्ही दिसेल त्याला मिठी मारत होतो... :)

एक रन फक्त एक रन त्याच्या सोबतीला पहिल्यांदाच (पुन्हा एक) घडलेल्या अनेक घटना. बघा या एक ला किती महत्त्व आहे...

शुक्रवार, १४ जानेवारी, २०११

आटा पिटा

पानिपताच्या युद्धाला आज २५० वर्ष पुर्ण झाली.

याच विषयावरील सुहास झेले यांचा माहिती पुर्ण लेख वाचला.
 त्यांनी या लेखामध्ये उल्लेख केला आहे की आपल्यावर या युद्धाचा एवढा प्रभाव पडला की या मुळे बरेच वाक्प्रचार बोली भाषेत आले.

त्यात मी आणखी एक माहिती जोडू इच्छितो.

आपण बऱ्याचदा एक वाक्प्रचार वापरतो

"जीवाचा आटा-पिटा करणे"

जेव्हा पनिपताचे युद्ध सुरु होते तेव्हा सैनिकांच्या जेवणाचे अत्यंत हाल व्हायचे. रसद कमी पडायची, म्हणून एकमेकांच्या कोठारातून राशन मिळविण्याचे प्रयत्न केला जायचा.

मराठे "पिठ" मिळविण्याची आणि मुघल "आटा" मिळविण्याची एक लढाई सुरु होती. हे पिठ आणि आटा मिळविणे ब-याच जणांच्या जीवावर बेतलं.

त्यामुळे "जीवाचा आटा-पिटा करणे" हा वाक्प्रचार बोली भाषेत रुढ झाला.


(ता.क.: वरील मी पुरवलेली माहिती ही मी एकलेली आहे. माझा इतिहास या विषयाचा अभ्यास खूप नाही. यात काही तफावत असल्यास दुरुस्ती करावी. धन्यवाद.)

शुक्रवार, ७ जानेवारी, २०११

कांगारूंचे पानिपत

थ्री चिअर्स फॉर इंग्लंड हीप हीप हुर्रे, हीप हीप हुर्रे...

इग्लंड-३ वि. ऑस्ट्रेलिया-१ हे पटत नसलं तरी खरं आहे. नोव्हेंबर २०१० मधे जेव्हा इंग्लंड आपला संघ घेऊन ऑस्ट्रेलिया मध्ये आला तेव्हा ब-याच जणांना इंग्लंडच्या विजयाची खात्री नव्हती. पण जबरदस्त खेळ, आत्मविश्वास आणि सुरेख सांघिक कामगिरी वर २४ वर्षानंतर ऑस्ट्रेलिया मध्ये मालिका जिंकली.

ऑस्ट्रेलिया च्या पराभवाची बरीच कारणं आहेत.

त्यापैकी एक म्हणजे "अतिआत्मविश्वास", जेव्हा केव्हा एखादा संघ ऑस्ट्रेलिया मध्ये येतो तेव्हा मिडिया, पुर्व खेळाडू आणि वर्तमान कोच व कर्णधार त्या संघाशी शाब्दिक युद्ध सुरु करतात. या अ‍ॅशेस च्या वेळीही असेच काहीस घडले.

दुसरे प्रमुख कारण ठरले गोलंदाजी, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीमध्ये २० विकेट घेण्याची धमकच नव्हती, त्याहून महत्त्वाचे ठरले दर्जेदार फिरकीपटू ची कमतरता. शेन वॉर्न च्या निवृत्ती नंतर एकही चांगला फिरकी गोलंदाज ऑस्ट्रेलियाला मिळाला नाही. येथील प्रथम श्रेणी लीग जगातील सर्वात चांगली समजली जाते पण एक ही उत्तम फिरकीपटू नाही. स्मिथ, बीअर हे काही भेदक फिरकीपटू नाहीत.

यापेक्षा ही मोठे कारण होते रिकी पॉटींग आणि त्याचे नेतृत्व...
चुकीची संघ निवड, अतिआत्मविश्वास आणि संघाला एकत्र ठेवण्यात आलेलं अपयश हे पराभवाचे कारण आहे.
Image: http://bbc.in/eoVhoP
या पाच ही कसोटी मध्ये (पर्थ शिवाय) इग्लंड ने वर्चस्व गाजवले. कुक, पीटरसन, अ‍ॅंडरसन आणि स्वान यांनी तर कमालीचा खेळ केला त्यांना उत्तम साथ दिली ती बेल, प्रायर आणि ट्रॉट ने.

पण जबरदस्त कामगिरी केली ती कर्णधार स्ट्राउस ने. त्याने एका कर्णधाराची भुमिके बरोबर एका कसलेल्या फलंदाजाची भूमिका बजावली. संघाला एकत्र ठेवले आणि पर्थच्या पराभवानंतर खचून न जाता मालिकेत विजय मिळवला.

चला तर मग इंग्लंडला विजयाच्या शुभेच्छा देऊ आणि त्यांच्या आनंदात शामिल होऊ.

मंगळवार, ४ जानेवारी, २०११

मेरा भारत महान

लहानपणी पासून "मेरा भारत महान, शंभरांतले ९९ बेईमान तरीपण मेरा भारत महान" हेच माहिती होतं. पण खरंच आपला देश किती वेगळा आहे याचा अनुभव मला दक्षिण आफ्रिकेत आला.

दक्षिण आफ्रिकेत आल्या पासून हळूहळू इथल्या गोष्टींची आता सवय होऊ लागली आहे. उदा. माणसं, रस्ते, दळणवळण आणि जगण्याची शैली.

यंदा २५ डिसेंबर नेमका शनिवारी आला, म्हणजे एक सुट्टी बुडाली हे समीकरण आपल्या भारतात... पण इथे तसं नाही एखादी सार्वजनिक सुट्टी शनिवारी वा रविवारी आली तर लगेचच सोमवारी ही सुट्टी दिली जाते, असं भारतात नाही :(
त्यामुळे २५, २६ आणि २७ डिसेंबर ला काय करायचं हा मोठा प्रश्न समोर उभा राहिला. भरपूर काथ्याकूट करून डर्बनला जायचा प्लान आखला. जोहान्सबर्ग ते डर्बन अंतर ६०० किमी; मग १६ मित्र, ४ कार आणि अंदाजे ८ तासाचा प्रवास सुरु झाला २५ ला सकाळी सुरू झाला.
Image: Nagesh Deshpande

सकाळी चारच्या सुमारास आमच्या चारही गाड्या "गणपती बाप्पा मोरया" च्या दणदणीत आरोळ्यात देत अपार्टमेंटच्या बाहेर पडल्या. आमच्या कारमध्ये मी, समीर, दिनेश आणि राजीब असे चौघे; तर समीर आणि दिनेश या दोघांनाच फक्त ड्रायव्हींग येत असल्याने आम्हाला फक्त आराम करायचा होता.

Image: Nagesh Deshpande
हळूहळू आमच्या गाड्या एन-३ या महामार्गाकडे धावू लागल्या, एन-३ अतिशय सुंदर असा एक आठ पदरी महामार्ग... (भारतात असा नाही :( ) जवळ जवळ प्रत्येक वाहनाचा वेग ताशी ८० ते १६० (भारतात शक्य नाही :( ) दुतर्फा सुंदर झाडं, कॅमेरा घेऊन बसलेले पोलीस, कमी वळणांचे सरळ रस्ते. प्रत्येक ७५ ते १०० किमी वर पेट्रोलपंप (भारतात नाही :(  ) हे पंप म्हणजे नुसतेच पंप नसून जणू काही एखादा मॉलच. येथे जेवणाची सोय, प्रसाधन गृह अशा सर्व सुविधा...

आता आमच्या प्रवासाला तीन तास पुर्ण होत आले होते. माझी आणि राजीबची झोपही पुर्ण झाली होती. सगळ्यांना चहाची तल्लफ आल्याने अशाच एका पंपावर आम्ही थांबलो. चहा, नाश्ता झाला आणि निघतांना सहज पाहिले तर समीर च्या कार चे टायर पंक्चर :( तरीही आम्ही निश्चिंत कारण आम्ही एका पंपावरच होतो. तिथलाच एक कर्मचारी पकडला आणि त्याला पंक्चर काढण्यास सांगितले आणि या इथपासून खरी गंमत सुरू झाली.
Image: Nagesh Deshpande

तो कर्मचारी म्हणाला, "इथे पंक्चर काढले जात नाही. त्यासाठी टायर मॅकेनीक लागेल तो पंपावर नसतो."
मग समीर म्हणाला ठीक आहे टायर तरी बदली करून द्या. तो हो म्हणाला.

डिकीतून बदली टायर काढले तर आम्ही पाहतच राहीलो, कारण बदली टायर हे सध्याच्या टायर पेक्षा फारच लहान (त्याला इथे बिस्कीट टायर म्हणतात). आता समीर ला प्रश्न पडला की हे टायर लावून कार कशी चालवायची? त्यामुळे टायर मधील पंक्चर काढल्या शिवाय पर्याय नव्हता. कारण आमचा जवळपास ४०० किमीचा प्रवास अजून बाकी होता आणि या लहान टायर ने तो शक्य नव्हता. तिथेच आम्ही टायर बदली केले (खर्च १० रँड/अंदाजे ६० रुपये)
Image: Nagesh Deshpande

Image: Nagesh Deshpande
याच पंपावर आम्हाला समजले की पुढे ८ किमी वर "विलर्स" हे गाव आहे. या गावात पंक्चर काढून मिळेल मग आमच्या चारही कार या गावाकडे निघाल्या. रस्ता शोधत शोधत, वाट वाकडी करून आम्ही या गावात पोहोचलो तर इथे निराळंच चित्र... या गावात स्मशान शांतता पसरलेली, रस्ते रिकामे, दुकानं बंद म्हटलं आली का पंचाईत पण गावाबाहेर टायर च्या दुकानाच्या पाटी वरील मोबाईल नंबर आमच्या कडे होता. तो आम्ही फिरवला तर पलीकडील व्यक्ती १५ मिनिटात येतो म्हणून म्हणाली. त्याने आम्हाला एका चर्च जवळ थांबायला सांगितले. आता या गावात फक्त आम्ही १६ जणच दिसून येत होतो. गाव अत्यंत लहान मात्र फारच सुंदर होतं, सिग्नल असलेले रस्ते, कौलारू घरं, शाळा, बगीचे आणि गाईचे गोठे दिसून येत होते.
Image: Nagesh Deshpande

चर्चच्या जवळ गेल्यावर काही माणसं दिसली तेव्हा आम्हाला जरा बरं वाटलं, जीवात जीव आला. ती या गावात राहणारी मंडळी होती. त्यातला एक म्हणाला "आज क्रिसमस आहे तुम्हाला कोणीही भेटणार नाही" पुन्हा आमच्या दांड्या गुल पण काही वेळातच फोनवर बोललेला माणूस आमच्या समोर येऊन उभा राहीला. त्याच्याशी चर्चा केल्यावर कळाले की तो तर एक एजंट आहे आणि पंक्चर काढणारा तिसराच आहे. तो म्हणाला "आज क्रिसमस आहे तुम्हाला कोणीही भेटणार नाही. माझ्याकडे आणखी एक गिऱ्हाईक आहे, दोन गिऱ्हाईक म्हंटल्यावर पंक्चर मॅकेनीक लगेच येईल." मग आता आम्ही त्याची देवा सारखी वाट पाहू लागलो. हळूहळू ऊन तापू लागलं होतं

पण १० मिनिटानंतर तो एजंट ओरडला "आला आला मॅकेनीक आला" आणि समोरचं दृश्य पाहून आम्ही चकीतच झालो, अहो तो मॅकेनीक चक्क BMW मध्ये आला होता हो ! आम्ही सगळे जण त्याच्या गाडी भोवती जमा झालो. तो खाली उतरला आणि त्याने टायर कडे पाहिलं आणि म्हणाला, "४८० रँड (अंदाजे ४००० रुपये) लागतील". त्या भर उन्हात आम्ही गारठलोच हो. आमची तोंड पाहून तो सरळ गाडीत जाऊन बसला आणि डागलॉग टाकला "आज क्रिसमस आहे... कोणीही काम करणार नाही."

आम्ही परत मोर्चा एजंट कडे वळवला मग त्याने दुस-याला फोन लावला. तर तोही १० मिनिटात हजर झाला. हे ही साहेब कमी नव्हते, कारण हे Toyoto Camry मध्ये आले होते. त्याने टायर कडे पाहिले मग आमच्याकडे पाहिले. लगेचच त्या एजंटने आमच्याकडचीच एक सिगारेट त्याला दिली.
Image: Nagesh Deshpande

Image: Nagesh Deshpande
त्याने दोन झुरके घेऊन १०० रँड (अंदाजे ६५० रुपये) लागतील असे सांगितले. मग काही मंडळी त्याला पटवायला सुरुवात केली. आणखी एक सिगारेट, एक केळं आणि एक चॉकलेट आणि ७५ रँड (अंदाजे ५०० रुपये) मध्ये काम झालं... अखेर दोन तासाच्या खोळंब्या नंतर पंक्चर निघाले.पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि डोक्यात विचार आला, हे सगळं भारतात घडलं असतं तर...
अशा या समस्या भारतात आल्याच नसत्या कारण

एक म्हणजे प्रत्येक पंपावर पंक्चर काढणारा असतो.

दोन कोणताही सण असला तरी माणसं रोजची काम काही थांबवत नाही.

याच उत्तम उदाहरण म्हणजे मी जेव्हा सायकल घेतली त्या दिवशी ईद होती आणि एक मुस्लीम युवक ती घरपोच देण्यासाठी आला होता. तो म्हणाला "साहेब, एक वाजेपर्यंत काम करणार आणि मगच ईद साजरी करणार तेवढेच पैसेही मिळतील"

दक्षिण आफ्रिका किती मोहक असले तरी भारतासारखी कामावर श्रद्धा असलेली माणसं इथे कमी.

त्यामुळे जेव्हा या गावातून आम्ही बाहेर पडलो तेव्हा आम्ही आरोळी बदलली...

आता आमची आरोळी होती "मेरा भारत महान..." :) :) :)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...