शनिवार, ३१ डिसेंबर, २०११

फ्लॅशबॅक २०११...

एखादी गोष्ट संपणार म्हणून आपण सुरुवात करायला थांबतो का?

नाही ना...

प्रत्येक येणाऱ्या वर्षाचेच असेच असते. प्रत्येक येणाऱ्या वर्षाचे स्वागत आपण मोठ्या उत्साहात करतो. नवे नवे संकल्प बनतात आणि हे संकल्प पुर्ण करण्याचे (अ)यशस्वी प्रयत्न करतो. :)

आज ३१ डिसेंबर ला दुपारी सहज फ्लॅशबॅक मध्ये गेलो आणि २०११ च्या काही आठवणी ताज्या झाल्या...

१ जानेवारी २०११ हा दिवस तर माझ्यासाठी स्वप्नवत होता. पहिली परदेशवारी, शहर जोहान्सबर्ग. नवे शहर, नवे मित्र आणि नविन वर्ष.

धमाल वर्ष असणार हे ठाऊकच होतं. कारण डर्बन ट्रिपचा हँगओव्हर अजुन उतरला नव्हता त्यामुळे न्यु इयर सेलिब्रेशन असं काहीच नव्हतं कारण डर्बन ट्रिपमुळे खिसा हलका झाला होता पण एक रोझ वाईन तो बनती है यारो...

नविन वर्ष सुरु झालं आणि मी एक नविन लुक घेतला.

जैसा देस वैसा भेस...  

जानेवारी मध्ये टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरु होता. १५ जानेवारीला पाहिलेला सामना स्टेडियम मध्ये पाहिलेला पहिलाच सामना
पहिल्या वॉंडरर्स भेटीत भारताचा विजयाचा आनंद तर दुसऱ्या भेटीत "पॉल अ‍ॅडम्स"ची भेट.

हळू हळू मी या शहरात या देशात रुळत होतो. ऑफीस मध्ये काम ही सुरु होते त्याच बरोबर वर्ल्डकप फीवर ही... भारताने वर्ल्डकप जिंकला हा आनंद द्विगुणित केला तो दै. प्रहार ने "मी एक हौशी लेखक" च्या दोन लेखांची दखल या मध्ये घेण्यात आली.

भटकंती ही खूप झाली या वर्षी सगळ्यात जास्त धमाल ती ड्रकन्सबर्ग ची सफरीत. दक्षिण आफ्रिकेतला सर्वात उंच पर्वतरांग आणि जगातला दुसऱ्या क्रमांकाचा उंच धबधबा. 


या वर्षात दोन नविन गॅझेट्स माझ्या गठडीत जमा झाले.

१) कॅनन एसएक्स ३० आयएस कॅमेरा


२) एचपी लॅपटॉप
मे महिन्यात भारतात परत आलो तेव्हा मला ओळखण जरासं कठीण होतं कारण पोटाचा व्यास खुपच वाढला होता आणि वजन १० किलो नी. आता पुढचं आव्हान हे दोन्ही कमी करण्याचं, पण माझा निर्धार पक्का होता. आज पर्यंत एक ही दिवस न चुकता दररोज १० किमी सायकल ने प्रवास (घर-ऑफीस-घर) केला. आता वजन आणि पोट दोन्ही नियंत्रित आहे. :)

विजयादशमी च्या शुभ मुहूर्तावर "मी एक हौशी लेखक" स्व:ताच्या (http://www.haushilekhak.com/) संकेतस्थळावर विराजमान झाला.

जश्या काही आनंदाच्या घटना या वर्षात घडल्या तश्याच काही वाईट घटना ही... सर्वात दुख: झाले ते पं. भीमसेन जोशी आणि जगजीत सिंग च्या निधनाने.संपूर्ण बालपण "मिले सुर मेरा तुम्हारा" ऎकलं तर कॉलेज मध्ये असतांना "वो कागज की कश्ती वो बारीश का पानी" ऐकण्यात जायचा.पण आयुष्य चालतच राहतं आणि आता २०१२ सुरु होत आहे.


माझ्या सर्व मित्र, नातेवाईक, वाचक आणि शुभचिंतकांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

रविवार, २५ डिसेंबर, २०११

थंडर डाऊन अंडर: बॉक्सिंग डे कसोटी

२६ डिसेंबर, ख्रिसमस नंतर चा दुसरा दिवस हा "बॉक्सिंग डे" म्हणून साजरा केला जातो. हा दिवस या नावाने कधी पासून आणि का साजरा केला जातो याची कुठेच नोंद नाही. तरी देखील जगातले प्रमुख देश जसे नेदरलॅंड, कॅनडा, न्यूझीलंड आणि आयर्लंड सहित अनेक राष्ट्रकुल देशात हा दिवस खरेदीचा दिवस म्हणून ओळखला जातो.


मात्र ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशातले लोक या दिवसाची वेगळ्याच एका गोष्टीसाठी वाट बघत असतात. ती गोष्ट म्हणजे "बॉक्सिंग डे" कसोटी सामना. याच दिवशी दोन्ही देशात आलेल्या पाहुण्या संघाविरोधात कसोटी सामना आयोजित केला जातो. ऑस्ट्रेलियात ही परंपरा १९५० मध्ये सुरु झाली. पहिला कसोटी सामना इंग्लंड विरुद्ध खेळला गेला. मात्र पुर्वी "बॉक्सिंग डे" लाच हा सामना सुरु होत असे असं नाही, काही वर्षानंतर सामना बरोबर २६ डिसेंबर ला आणि मेलबर्न च्या MCG याच मैदानावरच खेळला जावु लागला.
मेलबर्न शहर ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया या राज्याची राजधानी आहे, हे राज्य देशाच्या दक्षिण-पूर्व भागात असून ऑस्ट्रेलियाचे सर्वात लहान राज्य आहे. हा देश दक्षिण गोलार्धात असल्याने या शहराचे वातावरण अत्यंत अनियमित आहे. वातावरण सतत बदलत असते.


दरवर्षीची ही परंपरा या वर्षीही चालू राहणार आहे. २६ डिसेंबर २०११ रोजी ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन संघादरम्यान कसोटी सामना रंगणार आहे. इथल्या प्रेक्षकांना या सामन्याचे खुप आकर्षण असते आणि त्याच बरोबर सुट्टी असल्याने ते भरपूर संख्येने हजेरी लावतात. त्यामुळे १८५४ मध्ये उभारलेल्या या मैदानाची प्रेक्षक क्षमता १,००,००० एवढी करण्यात आली आहे.


एखादा कसोटी सामना बघण्यासाठी सर्वाधिक प्रेक्षक येण्याचा विक्रम याच मैदानावर झाला आहे. १९६१ मध्ये ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडीज दरम्यान झालेल्या कसोटी सामन्याला ९०,८०० लोकांनी हजेरी लावली होती, तसेच प्रेक्षकांच्या पदरी कधीही निराशा पडत नाही.
या मैदानावर आता पर्यंत १०४ सामने खेळले गेले आहेत.
संघाची सर्वोच्च धावसंख्या: ६०४ ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड
खेळाडू ची सर्वोच्च खेळी: बॉब कॉउपर ३०७ ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड
एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी: सर्फराज नवाझ ९/८६ पाकिस्तान वि. ऑस्ट्रेलिया
कसोटीत सर्वोत्तम गोलंदाजी: विलफ्रेड रोड्स १५/१२४ इग्लंड वि. ऑस्ट्रेलिया
Credit: ALLSPORT HULTON/ARCHIVE/ALLSPORT
सर्वोच्च भागीदारी: ३४६ (सहाव्या गड्या साठी) सर डॉन ब्रॅडमन आणि जॅक फ. ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड


भारताची या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या ४४५ असुन विरेंद्र सेहवाग ने २००३ काढलेल्या १९५ धावा ही भारतीय फलंदाजाची सर्वोच्च खेळी आहे.
Credit: REUTERS/Punit Paranjpe (INDIA)


५२ धावात ६ बळी ही भागवत चंद्रशेखरची सर्वोत्तम गोलंदाजी आहे.


या सामन्याची खुपच उत्सुकता आहे, कारण मागच्या दौरात झालेला वाद आणि या सिरिजला मिळालेले "अग्निपथ" ह्या नावामुळे दौरा उत्कंठावर्धक होणार हे नक्की. आता बघायचे आहे की सचिन चे महाशतक लागते का पॉटींग ची बॅट तळपते. उमेश यादवचे चेंडू आग ओकतात का युवा पॅटींगसन चे.


गंमत आहे ना २६ डिसेंबर हा दिवस गाजवतात क्रिकेटर मात्र नाव "बॉक्सींग डे"


हा लेख आवडला असेल तर फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak


- नागेश देशपांडे


मी एक हौशी लेखक

रविवार, ६ नोव्हेंबर, २०११

गरीब देशातील महागाई!!!

चौकातल्या हॉलमधे गडबड आहे, काहीतरी कार्यक्रम दिसतोय. विद्युत माळांची रोषणाई, दारात भली मोठी रांगोळी, फटाक्यांचे आवाज, डोळे दिपून टाकतील अशी आतिषबाजी, दारात पाहुण्यांच्या स्वागताला उभी पुरूष मंडळी, पाहुण्यांनी भरलेल्या गाड्या (इंडीका, सफारी, होंडा सिटी, टवेरा इत्यादी इत्यादी...) एका मागे एक येत होत्या आणि हॉलच्या दारात भला मोठ्ठा डीजे आणि डीजेच्या तालावर नाचणारी काही ताजगी में टुन्न मंडळी!!!.

उभे असलेल्या पुरुष मंडळीतील एकजण गाड्या पार्किंगची जागा दाखवत होता तर दुसऱ्याचा मोबाईल वरचा संवाद कानी पडला, "दादा कुठं हायेस रे... अरं गड्या इथ गर्दी वाढून -हायली ना... लवकर ई"

चला आणखी एकजण बोहल्यावर चढला असा साहजिक विचार मनात येईल तुमच्या हे वर्णन वाचून...

मला ही तस्सच काहीस वाटलं आणि मी हॉलच्या दिशेनी नीट पाहिलं.

दोन मजले उंच असा एक भला मोठ्ठा फ्लेक्स लावलेला त्यावर "अप्पांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा" असं लिहिलेलं आणि मधोमध अप्पांचा एक चिंता करतो विश्वाची असा क्लोजअप!! त्याचबरोबर इतर पाच पन्नास सोमे गोमे...

आणखी एक संवाद... एक ताजगी में टुन्न!!! युवक "उम्या अप्पा काय दिसून -हायले बे"
उम्या : "हो ना राव, अप्पा हायच हिरो माणूस... पण गड्या तुजा फोटो नाय त्याच्यात"

"अरं उम्या म्या नसलो म्हणून काय झालं आपले दाजी हायेत ना... ते बघ अप्पांच्या बाजूचा चौथा फोटो"

दोघेही जण आज ’दत्त गुरू दिसले’ चेह-यावर असे समाधान घेऊन फिरत होते.

मला हा सगळा प्रकार सहन नाही झाला आणि मी घरी जायला निघालो. रस्त्यात स्वयंघोषित मोठ्ठी मंडळी हॉल कडे जातांना दिसत होती. गळ्यात सोन्याच्या साखळ्या, बोटात अंगठ्या आणि हातात असलेल्या महागड्या मोबाईल वरून पलीकडच्या व्यक्तीला अप्पांच्या कार्यकर्त्यांनी (थोडक्यात आम्ही) कार्यक्रम कसा दणकेबाज केला आहे हे सांगत होती.

सहज एक विचार मनात आला खरंच आपला देश गरीब आहे का? महागाई दिवसेंदिवस वाढत आहे का?
आजचा हा प्रकार पाहून या दोन्ही प्रश्नाचं उत्तर मिळालं...  "नाही"

आपल्याला नेहमीच दोन टोकाच्या परिस्थिती पहायला मिळतात. माझ्या ऑफीसच्या परिसरात बरेच भिकारी फिरत असतात त्यापैकी काही जणांना खरच पोटाची भूक असते. देशात बरेच असे लोकं आहेत ज्यांना एक वेळच जेवण ही मिळत नाही. मान्य आहे की आपल्याकडे काहीही काम नाही केले तरी चालतं असे विचार करत जगणारे पण आहेत. पण खरंच मेहनत करून उपाशी झोपणारे मी पाहिले आहेत.

माझ्या आईच्या उपचारासाठी दवाखान्यात गेल्यावर मला एक अनुभव आला. एक वृद्ध स्त्री तिच्या नव-याला कर्करोग होता. अत्यंत गरीब तिच्या कडे जेवायला ही पैसे नव्हते, तर ती तिच्या पतीचा कसा उपचार करणार. खुप वाईट वाटलं तेव्हा...

आज सामान्य माणूस महागाई ने होरपळून निघाला आहे. जनतेच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजाही पुर्ण करण्यात सुद्धा प्रशासन अपयशी ठरत आहे.


माझ्या कडे पैसा आहे म्हणून मी तो कसा ही खर्च करणार असं म्हणत आज एखादी व्यक्ती फक्त आपली राजकीय पत सांभाळण्यासाठी अशी उधळपट्टी करतो, याला काय अर्थ आहे का???.


- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०११

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

नमस्कार,

सर्व वाचकांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

Image from: www.theholidayspot.com


चला या दिवाळी एक वचन घेऊ, आज मी एका चेह-यावर हसू येईल. एखाद्याला आनंद मिळेल असे काही कार्य करणार. जेथे अंधार आहे त्या ठिकाणी प्रकाशाची एक ज्योत नेणार.


प्रदुषण टाळा.  पर्यावरण सांभाळा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

रविवार, ९ ऑक्टोबर, २०११

वन डे टूर टू कोल्हापूर

पहाटे पहाटे साडेतीन वाजता मोबाईल खणखणला...

८५% झोपेत मी फोन घेतला, "बोला दाबके..."

यावेळी हा एकच मित्र मला फोन करण्याचा विचार करू शकतो. पलीकडून आवाज आला "काय सुरु आहे?"

मी म्हणालो, "सारस बागेत दुर्वा वेचतो आहे"

दाबके: "अरे वा वा चला आजच्या पूजेची चिंता मिटली."

मी: "विनोद पुरे... कसा काय फोन केला?"

दाबके: अरे! कोल्हापूर ला जायचा प्लान आहे, येणार का? साडेपाच ला निघायचं आहे.

मी हो म्हणालो

आता तुम्ही सांगा सकाळी साडेतीन ला तुमच्या मित्राचा फोन आला आणि मित्र मित्र मिळून फिरायला जात आहे हे पत्नीला समजले तर काय परिस्थिती निर्माण होईल. बायको म्हणाली, "ऐकलं मी सगळं, उठ आवर मी चहा टाकते." तिने चहा बनविला, अंघोळीसाठी पाणी तापवले.

आता खरी अडचण समोर होती, ती म्हणजे मी नगर रोडला राहतो आणि माझ्याकडे काही वाहन नाही आणि सगळे माझी वाट वारजे नाक्या जवळ पाहत होते. पण हा प्रॉब्लेम सुद्धा दाबके नी सोडवला. त्याने प्रशांतला घेण्यासाठी मोटारसायकल घेऊन पाठविले. प्रशांत माझी वाट पाहत कॉलनीच्या गेटवर उभा होता. तो १५ मिनिटात ईथे पोहोचला होता, आणि जातांना आम्हाला तितकाच वेळ लागला. त्याचे बाईक चालविण्याचे कौशल्य पाहून "धूम" च्या पुढच्या सिक्वल मध्ये त्याला छोटासा का होईना एक रोल देण्यात यावा याची मी विनंती करणार आहे. असो..

१५ मिनिटात तिथे पोहचल्यावर दाबकेची "ओम्नी व्हॅन" तयारच होती.

अनिकेत दाबके, विवेक, चैतन्य, प्रशांत, सतेज आणि मी. ही ओम्नी खूप जुनी बरका म्हणजे १२-१३ वर्ष नक्कीच, पण अनिकेत आणि माझ्या बालपणीचा ब-याच आठवणी आहेत. बरीच जुनी असून देखील पळते एक नंबर.

आमचा प्रवास सुरु झाला आता लक्ष्य होते महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर... पण शांतपणे तयार होणार ते पोरं कसली... अर्धा तास होतो ना होतो तोच प्रशांत म्हणाला, "ऎ अन्या भुक लागली राव..." जो पर्यंत हॉटेल येत नाही तो पर्यंत प्रशांत काही शांत झाला नाही 

आणि आम्ही पहिला ब्रेक घेतला  N. H. 4  च्या "श्री राम बेस्ट वडा पाव" या हॉटेल वर. मग भजे, वडापाव, मिसळ पाव आणि चहा ची ऑर्डर दिली. ऑर्डर आल्या आल्या सतेज तर तुटून पडला...

वडा पाव आणि बटाटा भजी

मिसळपाव

सतेज

सतेज


हे श्री राम बेस्ट वडा पाव वाले सगळेच विकत असल्याचे लक्षात आलं म्हणजे नाश्ता च्या व्यतिरिक्त, चिक्की, चॉकलेट, च्युईंगम, शीत पेय, म्युझिक सिडी आणि हे सुद्धा...


गप्पा, टिंगळ टवाळी करत आमचा प्रवास सुरू होता, मी कॅमेरा बाहेर काढलाच होता आणि सुंदर असा हायवे आणि सातारा आजूबाजू चा परिसर मोहून टाकत होता.

अनिकेत खरचं खूप अप्रतिम ड्रायविंग करतो. रस्त्यावर भरपूर खड्डे होते मात्र त्याचा काहीच त्रास नाही झाला तो त्याच्या एक नंबर ड्रायविंग मुळे. भरपेट नाश्ता झालेला होता आणि स्मुथ ड्रायव्हिंग मुळे सगळेच पहुडले होते.
सतेज, चैतन्य आणि प्रशांत

विवेक
११.३० च्या जवळपास आम्ही कोल्हापूर ला पोहोचलो. महालक्ष्मी मंदिरात अत्यंत छान असे देवी दर्शन झाले (फोटो काढण्यास परवानगी नसल्याने ईथे एकही फोटो नाही :( ) आता आम्हाला गाठायचं होतं "नरसोबाची वाडी" पण पोरं पुन्हा भुक भुक ओरडू लागली. मग आम्ही गाठलं "मॅक डी" ईथे परत पोटभर खाऊन आमचा प्रवास सुरु झाला.


वाडी ला पोहचलो आणि गाडी पार्क केली, बाहेर पाहिलं तर समोरच्या निलगिरीच्या झाडावर एक गरुड जणू काही इथला पहारेकरी आहे अश्या आविर्भावात बसलेल होतं.


 इथे ही गर्दी कमी होती, छान दर्शन झालं. माझी फोटोग्राफी चालूच होती.
मी जसे फोटोग्राफीत मग्न होतो तसेच पोरं खाण्यात...

सुकी भेळ


खाणं इतकं झालं होतं विवेकला ईनो घ्यावे लागलं, आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. सांगली मार्गे आम्ही पुण्याकडे यायला सुरुवात केली आणि या टपरीवर शेवटचा चहा घेतला.आता अंधार पडायला सुरूवात झाली होती आणि पाऊस पडत होता. छान थंडगार हवा सुटली होती. पण पुन्हा  N. H. 4  वर चा प्रवास त्यामुळे प्रवास एक नंबर झाला. एक दिवसाची छोटी सहल, बालमित्र आणि जुन्या आठवणी, गप्पा, टवाळी, वाद आणि चेष्टा मस्करी. भरपूर फोटोग्राफी आणि खादाडी.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०११

देवा... तु असं का केलं???

पहाटे तीन वाजता एका आवाजामुळे जाग आली, किती वाजले हे बघण्यासाठी उश्या खालचा मोबाईल घेतला तर स्क्रीनवर एक मेसेज दिसला... R.I.P. Steve Jobs... क्षणभर विश्वास नाही बसला. वाटलं कोणीतरी मस्करी करत असेल म्हणून पुन्हा झोपी गेलो.

सकाळी उठून पुन्हा मोबाईल पाहिला, न्यूज चॅनल पाहिले तेव्हा पुर्ण बातमी समजली. एक महान उद्योजक, संगणक अभियंता स्टीव्ह जॉब्सचे "कर्क" रोगाने निधन झाले.मी आज पर्यंत अ‍ॅपल या कंपनीचे एकही उत्पादन वापरले नाही, मात्र ज्या पद्धतीने जगात या कंपनी उत्पादने वापरली जातात आणि ते वापरण्याचे सल्ले मित्र, नातेवाईक देतात त्या अर्थी नक्कीच ही अती उच्च दर्जाच्या असणार हे मला माहिती आहे.

मला ही बातमी वाचून मला खूप दु:ख झालं... कारण स्टीव्ह जॉब्स च्या मृत्युचे कारण होते "कर्करोग"

विज्ञानाने खूप प्रगती केली त्याच्याच आधारे स्टीव्ह जॉब्सने जागतिक दर्जाच्या उत्पादने आपल्या पर्यंत पोहोचवली, मात्र कर्करोगाची लढाई तो हरला.

मला दोन प्रश्न विचारायचे आहेत.

पहिला देवाला: का देवा का कर्करोग निर्माण केला?

आणि
दुसरा शास्त्रज्ञांना: तुम्ही काहीच करू शकत नाही का?

मी गेले काही वर्ष बघत आहे अनेक प्रसिद्ध, यशस्वी, श्रीमंत व्यक्ती या रोगाने मरण पावली आहेत. असे का व्हावे. या रोगावर काहीच औषध नाही का? विकीपेडीयाच्या Recent Deaths हे सदर पाहिले असता जाणवलं की दर महिन्याला सुमारे ३५ ते ४० प्रसिद्ध व्यक्ती या रोगामुळे मरण पावतात. यात सामान्य माणसांचा कुठेही उल्लेख नसतो. एका अभ्यासातून समोर आले आहे ही जगातील एकूण मृत्यु पैकी १३% चे कारण हे कर्करोग आहे.

माझा एक आवडता खेळाडू "मालकम मार्शल", एक आवडती नटी "रसिका जोशी", एक आवडता पंच "डेव्हीड शेफर्ड" आणि एक दिवस अगोदर इंग्लंडचा माजी जलद गोलंदाज "ग्रहम डिली" यांना कर्क रोगच आपल्यापासून दुर घेऊन गेला.
लहानपणी दूरदर्शन वर बरेच सिनेमे मी पाहिले त्यात एका पात्राला कर्करोग झाला आहे असे दाखविले जायचे, त्यात ते पात्र शेवट पर्यंत जगायचे अथवा मरण  पावत. लहान असल्याने काहीच समजायचे नाही की कर्करोग म्हणजे काय?

मी कॉलेज मध्ये होतो तेव्हा माझ्या आजीला कर्क रोगाचे निदान झाले आणि त्यानंतर तीन महिन्यातच तिचं निधन झालं. त्या व्यक्तीला होणा-या वेदना आणि उपचारावर येणारा खर्च पाहून आजार झालेली व्यक्ती जगण्याची इच्छाच सोडून देते. आजीला जाऊन ५-६ वर्ष ही झाले नाही आणि माझ्या आईला हाच आजार आमच्या पासून दुर घेउन गेला. तेव्हा समजलं की हा आजार किती महाभयंकर आहे...

"माझी देवाला एक विंनती आहे जसे तु चोच असणा-याला दाणा देतो तसाच या कर्करोगावर उपचार दे..."

हौशी लेखनाचे नवे पर्व

नमस्कार, 

सर्व वाचकांना, मित्र-मैत्रिणींना व हितचिंतकांना "विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!"

आज विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर "मी एक हौशी लेखक" हा ब्लॉग स्व:त च्या संकेतस्थळावर विराजमान झाला आहे.

सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की तुम्ही "मी एक हौशी लेखक" आता  http://www.haushilekhak.com वर वाचू शकता.

आज पर्यंत दिलेल्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद...

नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक
http://www.haushilekhak.com/

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०११

सायकल

"चांदी की सायकल, सोने की सीट. आओ चले डार्लिंग, चले डबलसीट..."

म्हणतात ना "जहा ना पोहचे रवी, वहा पोहचे कवी"

तुम्हीच सांगा कोणालाही मोटारसायकल पासून विमानापर्यंत सोन्याचे करण्याचे विचार नाही मात्र सायकल सोन्याची बनवली.

आज सायकल चालवतांना सहज एक विचार मनात आला आणि मला बालपणीच्या आठवणीत घेऊन गेला.

लहानपणी आमच्या घरी एक सायकल होती पण ती बरीच मोठी होती. ही 'भ्रातोपार्जीत' सायकल कालांतराने माझ्यापर्यंत आली. सायकल चालविण्यासाठी मला फार कष्ट करावे नाही. घरातली 'भ्रातोपार्जीत' सायकल मोठी असल्याने दादा भाड्याची लहान सायकल घेऊन आला आणि मला शिकवणी दिली आणि पहिल्याच प्रयत्नात मी यशस्वी झालो. माझ्या लहानपणी जालन्यात छोटी सायकल १ रुपया तासाने मिळायची. घराच्या आजूबाजूला मैदानही खुप होती.
जेव्हा सायकल व्यवस्थित जमू लागली की, मी आठवड्यातून एकदा सायकल भाड्याने घेऊन यायचो. त्यासाठी लागणारा १ रुपया मिळण्यासाठी आईच्या मागे लागायचो. बऱ्याचदा तो मिळायचा पण जर कधी मिळाला नाही तर वर एक उपाय शोधला होता. मग मी आईला ५० पैसे मागायचे आणि एका मित्राला तयार करायचो आणि तो ही ५० पैसे घेऊन यायचा. अशा रितीने एक तास दोघे मिळून सायकल खेळायचो.

सायकल खेळण्याच्या आनंदाबरोबरच एक नको असलेली गोष्ट पदरात पडली ती म्हणजे "अपघात". सायकलवरून पडणे, झाडाला धडक... अहो एकदा चक्क रिक्षा लाच धडकलो. मग काय कधी कोपरा, कधी गुडघा तर कधी हातापायाची बोटं फोडून घ्यायचो.

एक अपघात मला अजूनही आठवतो, मी पाचवीत होतो. मी आणि माझा मित्र "अमित" सायकलवर डबलसीट क्रिकेट खेळायला जात होतो. मी सायकलच्या मधल्या रॉड बसलेलो तर मागच्या कॅरीअर ला क्रिकेट कीट आणि सायकलचं वजन आम्हा दोघांच्या एकुण वजनापेक्षा अधीक. त्यात आमचा परोपकार सगळ्या टीम मेंबर्सना बोलवण्याचे काम करत करत मैदानाकडे जात होतो. हे मैदान घरापासून बरच लांब होतं.

मोठ्ठा रस्ता आणि त्यावर एक मोठ्ठा खड्डा...

सायकलचं समोरच चाक त्यात फसले आता ही आमच्या वजनापेक्षा ही जड सायकल आम्हाला काही सांभाळता नाही आली आणि आमच्या सायकलला एक सायकल येऊन धडकली आम्ही सगळे खाली पडलो. उठून उभं राहिलो तेव्हा लक्षात शर्ट पाठीवर संपूर्ण फाटला होता, पण क्रिकेटची मॅच महत्त्वाची होती म्हणून तसेच खेळायला गेलो. मॅच संपल्यावर मित्राच्या आईने मला पाहिले आणि पाठीवरच रक्त दाखवले. घरी येता येता पाठीची आग आग होत होती. घाबरत घाबरत च घरी आलो, आईने विचारले काय झालं??? मग मी फाटलेला शर्ट दाखविला. पाठ इतकी सोलल्या गेली होती की आईला दुसरे काहीच सुचलं नाही आणि तिने सरळ औषध लावायला सुरुवात केली.

आणि घरी आल्यावर आई सोलून काढेल ही भिती नाहीशी झाली....

असे बरेच किस्से आहेत.

आज जेव्हा नियमीतपणे सायकलने ऑफीसला जातो तेव्हा जाणवलं की १५-२० वर्षापूर्वीचे माझं बाल मन किती उधाण होतं. बेफिकीर होऊन सगळ्या गोष्टी करायचो. वाट्टेल तशी सायकल चालविणे. कधी डबलसीट, कधी ट्रिपल सीट तर कधी कॅरीअर वर. तेव्हा आठवड्यातून एकदा तरी सायकल पंक्चर व्हायची आणि आता गेल्या एक वर्षात एकदाही पंक्चर नाही झाली. तेव्हाचं ते चंचल मन हा विचार नाही करायचं की सायकल कुठे, कशी आणि किती वेगाने चालवायची.

"तेव्हा जग फारच लहान वाटायचं इतकं की सायकलवरून सहज फिरून येता येईल एवढं..."

रविवार, १८ सप्टेंबर, २०११

राजा तुपाशी, जनता उपाशी


मॅडम ऑफीस मध्ये आल्या आल्या.

मोहन: मॅडम आज एक बॉम्बस्फोट झाला.

मॅडम: हे बघा, सारख्या सारख्या त्याच तक्रारी घेऊन का येता माझ्याकडे?

मोहन: नाही, मॅडम युवराजला जरा रिक्षाने तिथे जायला सांगा ना. ते कसं लोकं त्यांना जवळून ओळखतात ना म्हणून हा विषय काढला.

मॅडम: हे बघा युवराजचे जेवण व्हायचं आहे अजुन, त्यांना त्रास देऊ नका. विनाकारण माझ्या लेकराला उपोषण...

मोहन: उपोषण... मॅडम अण्णा आणि मोदी ही उपोषण करत आहेत.

मॅडम: आता कसं मुद्द्याचं बोललात तुम्ही... एक काम करा विजय आणि अनिषला पाठवा. ते हाताळतील हा विषय.

मोहन (घाबरत): आणि मॅडम "महागाई"चं काय?

मॅडम: अहो पुन्हा तेच... सांगितलं ना युवराज उपाशी आहेत याच मुळे. एक काम करा मी घरी जाऊन येते तो पर्यंत "ऑफीस" सांभाळा.

मॅडम घरी पोहोचतात...

युवराज: मम्मी, जेवायला वाढ.

मम्मी: अरे हातपाय तर धू.

युवराज: काय केलं आहे आज???

मम्मी दोन चिठ्ठ्या असलेली एक डिश युवराज समोर ठेवते.

युवराज:  काय आहे हे मम्मी?

मम्मी नुसतेच हसते...

युवराज (चिडून): पण आहे काय यात???

मम्मी: उघडून बघ...

शेवटी कोणताच पर्याय नाही हे पाहून युवराज एक चिठ्ठी उघडतो.

त्यात लिहिलेलं असतं, "सिलेंडर महाग होणार, पेट्रोल महाग होणार, पर्यायाने भाजी, दुध ही महाग होणार. खर्च कमी करायला हवेत, म्हणून आज स्वयंपाक नाही."

युवराज चिठ्ठी वाचण्यात मग्न मम्मी परत ऑफीसला जायला निघते.

तितक्यात युवराज ओरडतो, "याला काय अर्थ आहे? म्हणजे आज काहीच नाही."

मम्मी शांत पणे दुसरी चिठ्ठी उघडायला सांगते. युवराज चिठ्ठी उघडतो.

त्यात एक आश्वासन असतं, "उद्या मी श्रीखंड पुरी करणार आहे."

मम्मी: बाळा, जनतेला जे आपण दिले तेच आहे यात. जनता गेल्या ६० वर्षापासून हेच खात आहे. एक दिवस तु ही खाऊन बघं.

युवराज एकदम खुश होतो. चहे-यावरचा आनंद पाहुन मम्मी युवराजची पापी घेते आणि पुन्हा ऑफीसला निघते.

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०११

जंबो उड्डाण

९ ऑगस्ट १९९० म्हणजे ठीक २१ वर्षापूर्वी अनिल "जंबो" कुंबळे कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पण केले. मग या फिरकीच्या जादूगाराने कधीच मागे वळून पाहिले नाही.

१७ ऑक्टोबर १९७० ला बंगलुरु येथे अनिल कुंबळेचा जन्म झाला. वयाच्या १३ व्या वर्षी त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. एक जलद गोलंदाज व्हायच्या उद्देशाने त्याने खेळायला सुरुवात केली मात्र फिरकीपटू म्हणून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला. रणजीत छाप सोडल्यानंतर त्याने २५ एप्रिल १९९० ला एकदिवसीय सामन्यात श्रीलंका विरुद्ध पदार्पण केले आणि त्याच वर्षी कसोटी मधे.

image: wikipedia
"अनिल कुबंळे अत्यंत वेगळ्या पद्धतीचा फिरकी गोलंदाज होता. चेंडूला अत्यंत कमी वळण मात्र अचूक टप्पा आणि दिशा यामुळे खो-याने बळी मिळवले." पहिल्या ५० कसोटी बळी त्याने फक्त १० कसोटी मध्ये घेतल्या, भारतीय तसेच जगातील क्रिकेटप्रेमींना खरा कुबंळे माहिती झाला तो १९९२-९३ इंग्लंड मालिके नंतर, या मालिकेत त्याने २१ बळी घेतले आणि इंग्रजांना पळता भुई थोडी केली. त्याच्या या कामगिरीमुळे भारत विरुद्ध इंग्लंडचा प्रथम ३-० असा व्हाईट वॉश झाला. पहिले ५० बळी त्याने फक्त १० कसोटी मध्ये पुर्ण केले.

पण त्याच्या कारकिर्दीला खरी भरारी मिळाली ती १९९३ साली झालेल्या "हिरो कप" मध्ये, या स्पर्धेच्या फायनल मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध १२ धावा देत ६ बळी घेत भारताला विजय मिळवून दिला. त्यावेळी विंडीज संघ खुप बलाढ्य होता, पण दर्जेदार फिरकी समोर नांगी टाकतो हे पुन्हा सिद्ध केले. कोणत्याही भारतीय गोलंदाजीचा ही सर्वोत्तम गोलंदाजी होती आणि आज ही हा विक्रम कोणी मोडू शकलेलं नाही. एकदिवसीय सामन्यामध्ये त्याने त्याचा दबदबा कायम राखला आणि १९९६ च्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवले.


१९९९ मध्ये अनिल कुंबळे आपली कामगिरी अशी काही उंचावली की त्याला काहीच तोड नाही. नवी दिल्ली येथे झालेल्या कसोटी मध्ये पाकिस्तान विरुद्ध दुस-या डावात ७४ धावात १० बळी घेतले. जिम लेकर नंतर अशी कामगिरी करणारा अनिल कुंबळे हा एकमेव गोलंदाज आहे.
सौजन्य: युट्युब.कॉम


पण मी खरा कुंबळेचा चाहता झालो ते २००३ च्या ऑस्ट्रेलिया दौ-यानंतर... कारण १९९८ च्या ऑस्ट्रेलिया दौ-यात कुंबळे सपशेल अपयशी ठरला होता. पण ते अपयश पुसून टाकत त्याने २००३ च्या दौ-यात सर्वाधिक बळी घेतले. १९९८ केलेल्या चुकांमधून शिकत त्याने आपल्या गोलंदाजीत सुधारणा केली. पण खचून न जाता त्याने गोलंदाजी आणखी धारदार करत "गुगली" चा समावेश आपल्या गोलंदाजीत केला.

२००० नंतर दुखापतीनी कुंबळेची पाठ काही सोडली नाही. कसोटीत एकुण ६१९ तर एकदिवसीय सामन्यात ३३७ बळी त्याने घेतले. २००७ मध्ये एकदिवसीय सामन्यांमधुन तर २००८ मध्ये कसोटी क्रिकेट मधुन निवृत्ती घेतली.

कुंबळेचे काही विक्रम:

१) भारतातर्फे सर्वाधिक कसोटी बळी ६१९
२) एकदिवसीय सामन्यात भारतातर्फे सर्वोत्तम कामगिरी १२ धावात ६ बळी
३) कसोटी डावात भारतातर्फे सर्वोत्तम कामगिरी ७४ धावात १० बळी
४) कसोटीत ६०० बळी घेणारा तिसरा फिरकी पटू
५) कसोटीत ५०० हुन अधीक बळी घेणारा एकमेव भारतीय गोलंदाज
६) कसोटी मध्ये सर्वाधिक ३५ कॉट अँड बोल्ड
७) भारतातर्फे सर्वाधिक वेळा (३५) एका डावात ५ बळी घेतले. (जगात ४ था)
८) कसोटीमधे शतक आणि ६०० बळी घेणारा एकमेव खेळाडु  


१ ला : अ‍ॅलन लँब (इग्लंड)
१०० वा: मार्टीन क्रो (न्युझीलंड)
२०० वा: पोमी बांगवा (झिंबाब्वे)
३०० वा : मॅथ्यु होगार्ड (इग्लंड)
४०० वा: सायमन कॅटीच (ऑस्ट्रेलिया)
५०० वा: स्टीव हार्मीसन(इग्लंड)
६०० वा: अंड्र्यु सायमंड्स (ऑस्ट्रेलिया)
६१९ वा: मिशेल जॉनसन (ऑस्ट्रेलिया)

सोमवार, २५ जुलै, २०११

फुसका हरभजन

५६ षटकं ४ निर्धाव २१८ धावा १ बळी...

लॉर्ड्स कसोटी मध्ये हे समीकरण आहे, नुकत्याच ४०० बळी पुर्ण करणाऱ्या तसेच भारताच्या सर्वात अनुभवी गोलंदाज हरभजन सिंग चे.

मी हरभजन सिंगचा खुप मोठा टीकाकार आहे. स्पष्ट सांगायचे तर मला तो मला एक साधारण दर्ज्याचा फिरकी गोलंदाज वाटतो.


१९९८ मध्ये करियरला सुरुवातीला संशयास्पद अ‍ॅक्शन मुळे तो संघा बाहेर गेला. ब-याच अडचणीतून बाहेर येते जखमी अनिल कुंबळेच्या जागी ऑस्ट्रेलिया विरुध्द संघात आला. २००० साली झालेल्या या मालिकेत तो हिरो ठरला त्याने एकूण ३२ बळी घेतले आणि स्टीव्ह वॉच्या बलाढ्य संघाला पराभुत करण्यात भारताला यश आलं.

त्या मालिकेत केलेली त्याने गोलंदाजी आणि लॉर्ड्स कसोटी मध्ये केलेली गोलंदाजी या मध्ये मला काहीच बदल जाणवला नाही. हरभजन एक अत्यंत मर्यादित गोलंदाज आहे, त्याची गोलंदाजी मध्ये काहीच विविधता मला दिसत नाही. एकच प्रकारचा टप्पा, गती आणि वळण. ही कसोटी जेव्हा सुरु झाली तेव्हा संघात सर्वात अनुभवी फिरकी गोलंदाज आहे, सगळ्यात जास्त बळी घेतलेल्या, त्यात इंग्लंडचे फलंदाज फिरकी समोर कमकुवत. अशा जमेच्या बाजु असतांनाही त्याचे प्रदर्शन हे असे.

हरभजन फक्त आणि फक्त ऑफ स्पिन टाकतो, ज्या वेळी त्याला जास्त बाऊन्स मिळतो त्यावेळी त्याला विकेट मिळते.

हरभजन त्याच्या जास्तीत जास्त कसोटी अनिल कुंबळे सोबत खेळला, तो नेहमीच म्हणतो की मला त्याचा फायदा झाला मात्र तो दिसून येत नाही. कारण अनिल कुंबळे ची एक विशेषता होती ती म्हणजे तो त्याच्या चुकांतून तो शिकायचा आणि पुन्हा ती चुक होणार नाही याची काळजी घ्यायचा मात्र असे हरभजन करतांना दिसत नाही. पहिल्या ऑस्ट्रेलिया मालिकेत केलेली कामगिरीच्या जवळपास ही कामगिरी त्याला परत नाही करता आली.

१९९८ च्या जवळपास ऑफस्पिनर "दुसरा" टाकण्याचा शोध सकलेन मुश्ताक ने लावला, त्याच बरोबर त्याने तो उत्कृष्ट कसा टाकायचा हेही जगाला दाखवले. हरभजन, मुरलीधरन ने ही कला शिकली. पण सकलेन, मुरलीधरन जेव्हा दुसरा टाकायचे तेव्हा फलंदाजाला ते ड्राईव्ह करायला भाग पाडायचे. त्या मुळे ऑफस्पिनर समजुन फलंदाज चुकायचे आणि बाद व्हायचे. पण जेव्हा हरभजन सिंग दुसरा टाकतो तो खुपच आखूड टप्प्याने टाकतो त्या मुळे फलंदाजाला बराच वेळ मिळतो आणि मागे जाऊन तो आराम कट किंवा पुलचा फटका मारू शकतो. काळ बदलला आणि मेंडीस, आर. अश्विन सारखे स्पिनर आले आणि कॅरम बॉल चा उगम झाला, हरभजन ला हे सुद्धा जमत नाही.

हरभजनची एक मर्यादा जी सर्व देशाच्या फलंदाजांना माहिती आहे ती म्हणजे  पहिल्या काही षटकात हरभजनला विकेट मिळाली तर तो चांगली गोलंदाजी करतो पण तसे नाही झाले तर तो फलंदाजाला हवी तशी गोलंदाजी करतो. त्याचा मारा स्वेर्य होतो आणि रन काढणे अत्यंत सोपे होते. दुसरे एक म्हणजे त्याच्यावर हल्ला केला की ही हरभजन दिशाहीन गोलंदाजी करतो.

२००९ च्या टी-२० वर्ल्डकप मध्ये भारत अपयशी ठरला होता, इग्लंड विरुद्ध सामना भारताने ३ धावाने गमावला आणि खापर फलंदाजी वर फूटले. पण कमी पडलेल्या धावा सर्वांना दिसत होत्या मात्र हरभजन ने दिलेल्या १० वाईड कोण्याच्याच लक्षात नाही. हरभजनचा फास्ट बॉल हा लेग स्पंम्प च्या बाहेर जातो. इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर हे त्याला कळाले पाहिजे आणि हा बॉल टाकणे टाळल पाहिजे, मात्र आज ही तो ही चुक करतो.

माझ्या मते आता वेळ आली आहे, हरभजन ला जुन्या कामगिरी पेक्षा सद्य कामगिरीच्या जोरावर संघात ठेवावे. नवीन स्पिनरला संधी द्यावी. 

शनिवार, १६ जुलै, २०११

लॉर्ड्स: क्रिकेटची पंढरी

भारताचा या वेळेचा इंग्लंड दौरा फार विशेष आहे. कारण २१ जुलै पासून सुरु होणारा कसोटी सामना इतिहासातला २००० कसोटी सामना आहे. हा सामना ऎतिहासिक अशा लॉर्ड्स या मैदानावर खेळला जाणार आहे.

Lord's The Home of Cricket  आपण या मैदानाला क्रिकेटची पंढरी म्हणतो. का आहे या मैदानाला एवढं?

Image: http://topz10s.com/
इंग्लंड मधील लंडन शहरात आहे. १८१४ मध्ये या मैदानाची निर्मीती झाली. थॉमस लॉर्ड्स या व्यक्तीने हे मैदान बनविले आणि त्याच्या नावाने आज हे ओळखले जाते. आज पर्यंत याच मैदानावर ईसीबी कार्यालया आहे तर मेरीलीबोन क्रिकेट क्लबचे हे होम ग्राउंड आहे. तसेच या मैदानावर जगातले सर्वात जूने क्रिकेट संग्रहालय आहे.

१८८४ मध्ये या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेला हा सामना इग्लंड ने जिकंला. तर भारताने पहिला सामना १९३२ खेळला. आता पर्यंत या मैदानावर ११९ कसोटी सामने खेळले गेले आहेत आणि प्रत्येक खेळाडू या मैदानावर कसोटी खेळता यावी हे स्वप्न घेऊन जगत असतो तर या मैदानावर एखादा विक्रम नोंदवता आले तर साक्षात पंढरीत  विठ्ठलाचे दर्शन झाल्याचे समाधान खेळाडूला मिळते.

या मैदानावर पहिले शतक झलकावले ते  इंग्लंडच्या अ‍ॅलन स्टील ने त्या ने १८८४ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध १४८ धावा केल्या होत्या. तर पहिला पाच बळी घेण्याची कामगिरी इंग्लंडच्याच टेड पीट याने मिळवला.

या मैदानाच्या बांधकामात एक मोठी गंम्मत आहे, हे मैदान डोंगर उतारावर आहे, उत्तर दिशेला हे मैदान दक्षिण दिशेपेक्षा ८ फूट उंच आहे. त्यामूळे हे मैदानावर टप्पा अनियमित राहतो. तर खेळाडुंना क्षेत्ररक्षाणात अडचणी येतात.

तरी या मैदानावर बरेच खेळाडु आपली छाप सोडून गेले आहेत.

या मैदानावर सर्वाधीक धावा करण्याचा मान इंग्लंडचा माजी कर्णधार ग्रहम गुच च्या नावावर आहे त्याने ३९ डावात २०१५ धावा केल्या, तर एका डावात सर्वाधीक धावा करण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे त्यानए १९९० मध्ये भारत विरुद्ध ३३३ धावा केल्या होत्या. हे मैदान ग्रहम गुच साठी फारच भाग्यवान होते कारण या मैदानावर सर्वाधीक शतक ठोकण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे त्याने या मैदानवर एकून ६ शतकं ठोकली आहेत. या मैदानावर शतक ठोकण्याचे जवळपास सगळे विक्रम इंग्रज खेळाडुंच्या नावावर आहे. पण असा विक्रम दिलिप वेंगसरकरच्या नावावर आहे जो सर डॉन ब्रॅडमन लाही नाही करता आला. वेंगसरकर या मैदानावर सर्वाधीक शतक ठोकणारा विदेशी खेळाडू आहे. त्याने या मैदानावर एकूण ३ शतक ठोकली आहे. तर सौरव गांगुली ने याच मैदानावर पदार्पणात शतक ठोकण्याची कामगिरी केली आहे.


इंग्लीश वातावरण स्विंग गोलंदाजांचे नंदनवन मानले जाते आणि लॉर्ड्स त्याच्या विशेष उतारामुळे गोलंदाजांना मदत मिळते आणि याच उपयोग उत्तमरित्या करून घेतला तो इयान बोथम ने. कारकिर्दीत त्याने या मैदानावर २६ डावात ६९ बळी घेतले. या मैदानावर एका डावात सर्वाधीक बळी घेण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. त्याने १९७६ मध्ये पाकिस्तान विरुद्ध ३४ धावात ८ बळी घेत या मैदानावरील आज पर्यंतची सगळ्यात चांगली कामगिरी नोंदवली गेली आहे.

हा सामना मी पाहिला नाही मात्र मला आजही आठवते जेव्हा १९९७ मध्ये ग्लेन मॅकग्राथने ३८ धावात ८ बळी घेत इंग्लंडचा ८८ धावात खुर्दा उडवला होता. तर एका सामन्यात १३७ धावात १६ बळी घेण्याची कामगिरी ऑस्ट्रेलियाच्याच बॉब मॅसीच्या नावावर आहे.

७२९ वर ६ ही या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या आहे. १९३० साली ऑस्ट्रेलियाने ही धावसंख्या उभारली होती. त्यात २५४ इतका वाटा होता सर डॉन ब्रॅडमन यांचा. तर धावाचा निच्चांक भारताच्या नावावर आहे, १९७४ साली सर्वबाद ४२ धावा.

भारताची या मैदानावर कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. आज पर्यंतच्या खेळल्या गेलेल्या १५ कसोटीत फक्त एकात विजय मिळविता आला आहे तर १० मध्ये पराभव.

आता याच मैदानावर २००० वा कसोटी सामना खेळविला जाणार आहे. या मैदानच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

गुरुवार, १४ जुलै, २०११

आता बस्स पुरे...


हमें घर चलाना पडता है साहब...

A Wednesday मधील नसरुद्दीन शाहचा हा डायलॉग...

२६/११ मुंबई हल्ल्याच्या जखमा भरल्याही नव्हत्या आणि १३ जुलै ला परत आतंकवादी हल्ला मुंबईवर झाला.
१७ मृत्युमुखी आणि शेकडो जखमी...


यावर आपणच निवडुन दिलेल्या नेत्यांची मते,

राहुल गांधी म्हणतो: हे हल्ले कोणीही थांबवू शकत नाही, मुंबई ची परिस्थीती इराण सारखी आहे.
दिग्विजय: भारताची परिस्थिती पाकिस्तानपेक्षा बरी आहे.

काय करावं सांगा तुम्ही...

सरकारला माझी विनंती आहे काहीच करू नका. म्हणजे तपास, अटक, खटला काय गरज आहे ह्या सगळ्यांची...

कारण पोलीस जीवाचे रान करून तपास करणार. संशयीत गुन्हेगार पकडले जाणार. मग मानवाधिकार कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे राहणार. उज्ज्वल निकम आपले कौशल्य पणाला लावुन गुन्हा सिद्ध करतील, या नंतर सरकार काय करणार त्यांना सांभाळुन ठेवणार. जनतेला अजुन एक कसाब किंवा अफझल गुरुची गरज नाही.

जनता खरचं खुप वैतागली आहे. जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल.

बुधवार, २५ मे, २०११

आठवणींचा मुखवास

परवा ऑफीसमध्ये आल्यावर थोड्याच वेळात ई-मेल आली. Chocolate @ my Desk  जो कोणीही दक्षिण आफ्रिकेतून परततो तो अशी ई-मेल नक्की करतो. काही मिनिटातच सगळे जण त्याच्या डेस्कवर जमा झालेले दिसले. त्याने आणलेल्या चॉकलेट वर सगळ्यांनी ताव मारला आणि आपल्या कामाला लागले.

दुपारी लंच नंतर आम्ही ७-८ जण शतपावली करण्यासाठी बाहेर पडलो. त्याच दरम्यान पुन्हा त्या चॉकलेट चा विषय निघाला कारण ते चॉकलेट खुपच छान होते. आमच्या पैकी ही काही जणांचा यापूर्वी दक्षिण आफ्रिका दौरा झाला होता. तेवढ्यात समीरने आमच्यापैकी एकाने आणलेल्या च्युईंगम चा विषय काढला. समीरच्या मते ते इतके चिवट होते की, "ज्याने कोणीही ते खाल्ले त्याची चिता विजली तर हाड नाही सापडणार पण ते च्युईंगम जशाचा तसे सापडेल", सगळे जण पोट धरून हसू लागले. इथेच चर्चेला सुरूवात झाली.

मग सगळे जण लहानपणी मिळणा-या "खाऊ" बद्दल बोलु लागले, एक जण म्हणाला लहानपणी एक सुपारी मिळायची ती मी का खायचो तर त्याच्या पाकीटावरील चित्र एका बाजूने पाहिले तर पुरुषाचा चेहरा आणि दुसरी कडून पाहिल तर स्त्रीचा चेहरा दिसायचा.

इतक्यात एकजण म्हणाला, "अरे तु ती "पेप्सी" खायचा का रे ?" तेव्हा ही रंगीत "पेप्सी" आठ आण्याला मिळायची. साधी, दुधाची आणि रंगीत "पेप्सी" खाण्यात खुप खुप मजा यायची. "पेप्सी" वरून विषय मटका कुल्फी कडे वळायला जास्त वेळ लागला नाही. मग मटका कुल्फी, मावा कुल्फी अश्या एक एक बालपणीच्या आठवणींची रांग लागली.

तेवढ्या प्रसाद म्हणाला "अरे ते ’बोर कूट’ खायचा का रे तु?"

"बोर कूट ! म्हणजे काय? भातावर टाकून खातात तेच का?" असे प्रश्न फक्त आणि फक्त "जॉन सवाली" (हे टोपण नाव आहे)च विचारू शकतो. जॉनच्या प्रश्नांची quality  आणि quantity  एवढी भयंकर असते की सीबीआय वाले सुध्धा थोडी दयामाया दाखवत असतील पण जॉन सवालीकडे तसं काही नाही. या प्रश्नावर आम्ही खुप हसलो, त्याला दोघां तिघांनी टपल्या ही दिल्या आणि त्याचा कुळाचा जयजयकार केला. मग त्याला बोर कूट म्हणजे काय ते सांगितले. "अरे भातावर टाकून खातात ते मेतकूट" असे मी म्हणालो.

एक जण सांगु लागला की तो लहानपणी बोर कूट कसा पुडी सगट खायचा आणि मग त्यासाठी वडिलांचा मार बसायचा. तेवढ्यात समीर ने त्याचाही एक कारनामा सांगितला की, तो लहानपणी "लाची" खाण्यासाठी काय करायचा तर इमारत बांधकामातील सळई विकायचा.

मला ही आठवतो अजुन शाळेच्या बाहेर विकत मिळणार "मोहन चा बर्फ गोळा" लाल, काळा, हिरवा रंग टाकून तो बर्फ गोळा मिळायचा. मी नेहमी लाल रंगाचा गोळा घ्यायचो. तो खात खात तोंड रंगवून मी घरी आलो की आई मला लाल तोंड्या माकड म्हणायची.

ह्या बालपणी आठवणी मुळे पुन्हा एकदा लहान व्हावे असे वाटत आहे. मोकळ्या मनाने बर्फ गोळा, बोर कूट, पेप्सी, गटागट खावे असं नेहमी वाटत. त्या वेळी मिळणार हा "खाऊ" खुप अमूल्य वाटायचा. ती मजा काही औरच होती.

"खाने बाद कुच मीठा हो जाये" हे आजकाल खुप कानावर पडत आहे. मात्र त्यादिवशी त्याची आम्हाला काहीच गरज पडली नाही कारण या आठवणींचा गोडवा पुरेसा होता.

मंगळवार, १७ मे, २०११

मौजमजा X आंदोलन

हा संपुर्ण आठवडा पेटला आहे. घराबाहेर न पडण्याचे आता दोन सबळ कारणं मिळाली आहेत. एक तर उन्हाळा आणि दुसरं म्हणजे पेट्रोल दरवाढ.

या आठवड्यात झालेल्या ५ रुपयांच्या दरवाढीचे पडसाद संपुर्ण देशात पहायला मिळाले. कुठे मोर्चा, कुठे निदर्शने, तर कुठे निषेध व्यक्त करण्याचे नवनवीन प्रकार, संतापलले विरोधक, न्युज चॅनल वरचे चर्चासत्र.

आता सवाल असा आहे की खरंच ह्याची काही गरज आहे का? मी या दरवाढीचे समर्थन करत नाही मात्र हे सगळं करून काही फरक पडणार आहे का?

कारण मला सर्वत्र दोन विभिन्न चित्र पहायला मिळत आहे.

दैनिक सकाळ मध्ये आज एक बातमी वाचली. "संभाजी महाराज जयंतीनिमित्त चित्तेपिंपळगाव ते टि.व्ही. सेंटरपर्यंत दुचाकी फेरी" ही बातमी आणि या फेरी मध्ये भाग घेतलेल्या सुमारे ५० युवा कार्यकर्त्यांची नावे देण्यात आली आहेत.

खूप प्रश्न उभे राहिले, काय साधलं या दुचाकी फेरीतून??? किती पेट्रोल वाया गेले असेल?
या युवा कार्यकर्त्यांनी हीच फेरी चालत किंवा सायकलवर काढली असती तर प्रतिसाद ही जास्त मिळाला असता आणि प्रसिद्धीही. अशा फे-या काढून एकीकडे पेट्रोल जाळायचे आणि दुसरीकडे सरकारच्या नावाने बोंबा मारायच्या.

औरंगाबादच्या महापौर ने तर कहरच केला ह्या चक्क राजेशाही बग्गीतून कार्यालयात आल्या. अशी बग्गी राजे महाराजे वापरताना किंवा चित्रपटाच पाहायला मिळते. आता हा निषेध म्हणायचा की जनतेची चेष्टा. खरं सांगा तुमच्या आमच्या सारख्याला परवडणार आहे का अशी बग्गी.

दरवेळी पेट्रोल दरवाढ झाल्यानंतर न्यूज चॅनलवाले चर्चासत्र भरवतात. ह्या संवादाचा विसंवाद होतो, कुणी सरकारची बाजु घेतं तर कुणी जनतेची आणि जनता शांतपणे हा सुपर हीट तमाशा पाहत असते.

निषेध, निदर्शने आणि चर्चासत्र सगळे काही दिवसात बंद होतात आणि जनता पुन्हा पंपावरच्या रांगेत उभी दिसते.
http://indiacurrentaffairs.org


जनता फक्त एवढेच करू शकते का?

नाही... आपण बरंच काही करू शकतो.

  • शक्य तितका जास्त सार्वजनिक परिवहनाचा वापर करा.
  • कार्यालयाच्या जवळपास राहत असाल तर सरळ सायकल वापरायला सुरुवात करा.
  • शक्य तितका कमी दुचाकीचा वापर करा.
  • चालत जाणे शक्य असेल तर चालत जा.
  • अधीक मायलेज देण्या-या वाहनांची निवड करावी.
  • इंधनाची बचत करण्याची सवय लावा.
  • दरवाढी साठी सरकारला वेढीस धरण्यापेक्षा सार्वजनीक परिवहनाचा दर्जा सुधारण्याचा हट्ट धरा.
  • कंपन्यांनी कर्मचा-यांना सायकलवर येण्यासाठी प्रोत्साहित करावे, त्यामुळे प्रदुषण कमी होईल, पार्किंगची समस्या येणार नाही.
  • सरकारने सायकल वापरणाऱ्या व्यक्तीला कर सवलत द्यावी.

मला माहिती आहे ह्या हायटेक जगतात या गोष्टी पटायला जरा अवघड आहेत, पण ह्या गोष्टी साध्य करणं आज आपल्या हातात आहे. भविष्यात जेव्हा काहीच पर्याय उरणार नाही तेव्हा ह्याच गोष्टी नाईलाजाने कराव्याच लागतील.

बंद करा आंदोलने, कमी करा मौजमजा. परिस्थितीचा विचार करा वेळ अजुन ही आपल्या हातातून गेलेली नाही.

शुक्रवार, ८ एप्रिल, २०११

मुंबई का पुणे

आजपासून एका नवीन वादाला सुरूवात होणार आहे. मुंबई का पुणे...

हा वाद राजकीय, भाषेचा, शहरातील दळणवळण किंवा गर्दीचा नाही. या वादाला वाचा फोडली आहे ती आयपीएल-४ ने.

वर्ल्डकपचा शानदार शेवट झाला, भारताच्या विजयाचा परमानंद अजुन अनुभवत असतांना लगेचच आयपीएल-४ ची नांदी झाली. गेल्या ३ स्पर्धेत ८ संघ होते आणि या वेळेस १० संघाच्या समावेशाने चुरस वाढली आहे. या वेळी कोची आणि पुणे हे दोन संघ सामील झाले आहेत. या वेळी आयपीएल १० संघ एकमेव बदल नसून ह्या वेळी संघांची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. बरेच मातब्बर खेळाडू आता दुस-या संघात सामील झाले आहेत. त्यामुळे ही स्पर्धा खूपच वेगळी होणार असे वाटत आहे.

पुणे ह्या संघाने अनपेक्षित उडी घेतली. सगळ्यांनी "अहमदाबाद" नवा संघ असणार असा अंदाज बांधला होता, पण पुणे संघाने बाजी मारली. यामुळे महाराष्ट्राचे दोन संघ आयपीएल आले आणि आपले राज्य पहिले असे राज्य बनले की ज्याच्या दोन शहराचे संघ आयपीएलमध्ये आहेत. पण आता चाहते चांगलेच कात्रीत सापडले आहेत. कारण अगोदर मुंबई इंडियन्सचे बरेचसे चाहते पुणे वॉरीअर्स कडे वळाले आहेत.

हे दोनही संघ काही दिग्गज तसेच नविन खेळाडूंनी भरलेला आहेत. मुंबई कडे मास्टर ब्लास्टर "सचिन तेंडूलकर" आहे तर पुणे संघात वर्ल्डकपचा हिरो "युवराज सिंग". दोन ही संघ पुढील प्रमाणे

image: www..iplt20.com
मुंबई इंडियन्स: सचिन तेंडूलकर, हरभजन सिंग, कायरन पोलार्ड, लसिथ मलिंगा, रोहीत शर्मा, मुनाफ पटेल, अंड्र्यु सायमंड्स, डेव्हीड जेकब्स, जेम्स फ्रॅंकलीन, क्लिंट मकाय, मोईसस हेनरीकेस, धवल कुलकर्णी, आदित्य तरे, अली मुर्तझा.

image: www.iplt20.com
पुणे वॉरीअर्स: युवराज सिंग, रॉबीन उथप्पा, आशिष नेहरा, मुरली कार्तिक, ग्रॅहम स्मिथ, टीम पेन, अंजलो मॅथुज, नाथन मकलम, कल्लम फर्गुसन, वेन पार्नेल, मिशेल मार्श, जेरोम टेलर, अल्फांसो थॉमस, जेसी रायडर.

सचिन का युवराज हा प्रश्न चाहत्या समोर पडला आहे. युवराज जबरदस्त फॉर्म मध्ये आहे तर सचिन हा सदाबहार आहे.

मुंबई ची ताकद सचिन, पोलार्ड आणि हरभजन यांच्यासारख्या खेळाडूंमुळे दिसून येते तर धवल कुलकर्णी हा छुपा रुस्तुम ठरू शकतो. सायमंड्स धोकादायक ठरू शकतो तर दुसरी कडे पुणे संघाची ताकद युवराज, स्मिथ, फर्गुसन ह्या खेळाडूंमुळे दिसून येते तर जेसी रायडर छुपा रुस्तुम ठरू शकतो. गोलंदाजीत पुणे संघ (कागदावर) कमकुवत वाटत आहे. मुंबईला ती स्पर्धेत खेळण्याचा अनुभव आहे तर पुण्याचा संघ नवा असला तरी कमी लेखून चालणार नाही.

तरी सुद्धा प्रश्न आहेच कोणतं शहर मुंबई का पुणे...

मी मुंबई इंडियन्स चा चाहता आहे... कारण सचिन, धवल आणि पोलार्ड हे माझे आवडते खेळाडू पण युवराज, उथप्पा आणि फर्गुसन हे सुद्धा धमाकेदार आहेत.

असो आताशी कुठे स्पर्धा सुरु होते आहे जसा जसा खेळाला रंग चढेल संघांची ताकद दिसायला लागेल...

तो पर्यंत आला रे.... मुंबई इंडियन्स :)  

रविवार, ३ एप्रिल, २०११

अश्रू, अपयश आणि परमानंद

अखेर ज्या क्षणाची वाट प्रत्येक भारतीय पाहात होता ती रात्र आली. 
भारताने २८ वर्षानंतर पुन्हा विश्वविजेतेपद मिळवले...

१९९६ च्या स्पर्धेतले विनोद कांबळीचे अश्रू...
image: dailybhaskar

२००३ मधले उपविजेतेपद...
Image: www.currentnewsindia.com

२००७ मधले अपयश...

Image: Internet
 पाहिल्यानंतर आज २ एप्रिल २०११ रोजी मिळालेला परमानंद.

image: www.espncricinfo.com
अभिनंदन टीम इंडिया आता आपण विश्वविजेते आहोत.
आणि लाख लाख धन्यवाद आम्हाला हा परमानंद दिल्याबद्दल.

शनिवार, २ एप्रिल, २०११

मी पाहिलेला सिनेमा : द टर्मिनल

सिनेमा बघणे हा माझा छंद नाही. मी क्वचितच एखादा सिनेमा बघतो. सिनेमा बघण्यापेक्षा मी लिहणे किंवा क्रिकेट बघणे मी जास्त पसंत करतो. पण कधी कधी बदल म्हणून मी सिनेमा बघतो. माझी आवड बऱ्याचदा दुस-यांशी जुळत नाही. प्रथमच मला आवडलेल्या एखाद्या सिनेमाबद्दल मी लिहायचा प्रयत्न करत आहे.

गुरुवारी नेहमी प्रमाणे ऑफीस संपवून घरी आलो. इथे (जोहान्सबर्ग) टी.व्ही. वर बघण्यासारखे काहीच नसते. खुपच कंटाळा आला होता म्हणून चॅनेल बदलत बसलो तर एका ठिकाणी "द टर्मिनल" चालू होता. मला यातील कलाकार, कथानक काहीच माहिती नव्हतं तरी पहात बसावसं वाटला.
Image: wikipedia

याच कथानक असं की नायक "व्हिक्टर नोरवॉस्की" युरोपीय देशातून न्यूयॉर्क ला येतो. विमानतळावर पोहोचल्यावर त्याला कळत की त्याच्या देशात युद्ध सुरू झालं आहे. या पार्श्वभूमीमुळे त्याला न्यूयॉर्क शहरात जाण्याची परवानगी नाकारली जाते, त्याच बरोबर त्याच्या देशात चालु असलेल्या युद्धामुळे त्या परत पाठवता येत नसतं. आता "व्हिक्टर नोरवॉस्की" कोणताच देश नसलेला व्यक्ती बनतो. नाईलाजाने त्याला आता विमानतळावरच राहण्याची वेळ येते. व्हिक्टरला थोडेसे इंग्रजी बोलता येत असते आणि तो जे काही बोलतो ते समजणेही अवघड असते. त्यात त्याला विमानतळ अधिकारी त्याला कोणतेही सहकार्य करत नाही मात्र त्या ठिकाणी कामं करणा-या काही व्यक्ती त्याला मदत करतात.

हळू हळू त्याची ओळख विमानतळावरच्या काही व्यक्तींशी व्हायला लागते. भाषेमुळे अडचण होत असल्याने तो इंग्रजी शिकायला सुरूवात करतो. तिथे काम करणारा एक युवक त्याला जेवणाचे आमिष देऊन त्याचं प्रेम असलेल्या एका युवती पर्यंत आपले विचार पोहोचविण्याचे काम करवून घेतो. त्याच वेळी भावनिक अडचणीत सापडलेली एक हवाई सुंदरी त्याला भेटते, तिच्याशी बोलण्याची व भेटण्याची इच्छा त्याला होत असते पण पैसे नसल्याने तो तिच्या सोबत जेवण्यास नकार देतो. आता तो नोकरी शोधायला लागतो जेणे करून काही पैसे जमा होतील आणि जेवणाचा प्रश्न सुटेल, त्याला एका ठिकाणी काम देखील मिळतं. पैसे जमा झाल्यावर व्हिक्टर तिला जेवणासाठी घेऊन जातो आणि तिला भावनिक गुंत्यातून बाहेर काढतो. त्याच्या साध्या सरळ स्वभावामुळे तो सर्वांचा चाहता होता.


मात्र त्याच बरोबर विमानतळ अधिकारी त्याला या विमानतळावरून बाहेर काढण्याचे बरेच प्रयत्न करतात मात्र ते अपयशी होतात. अखेर ते त्या हवाई सुंदरीची मदत घ्यायची ठरवतात. व्हिक्टर नोरवॉस्की एक आतंकवादी असून तो न्यूयॉर्क मध्ये जाण्यामागे काहीतरी असेच कारण असल्याचं विमानतळ अधिकारी तिला सांगतात. तेव्हाच तिला कळतं व्हिक्टर गेल्या ९ महिन्यापासून विमानतळावरच राहत आहे. तेव्हा तो तिला त्याचं न्यूयॉर्कला जाण्यामागचे खरं कारण सांगतो. व्हिक्टरचे वडील जॅझ संगीताचे चाहते असतात आणि जगातील नामवंत ५७ संगीतकारांची सही घ्यायची त्यांची इच्छा असते. त्यांच्या कडे ५६ जणांची सही असते मात्र अखेरचा संगीतकार न्यूयॉर्क मध्ये असतो आणि त्याची त्याची सही घेऊन त्याच्या वडिलांची इच्छा पुर्ण करायची असते.

खरं कारण समजल्यावर त्याला एका दिवसाचा व्हिसा मिळवून देण्यास ती व्हिक्टरला मदत करते. त्याच बरोबर त्याच्या देशातील युद्ध संपुष्टात येतं आणि तो आपल्या देशात परत जाण्यास पात्र होतो मात्र वडिलांच्या शेवटच्या ईच्छेचे काय? विमानतळ अधिकारी त्या इमोशनली ब्लॅकमेल करतात आणि आपल्या देशात जाण्यास भाग पाडतात. मात्र विमानतळावरील सगळेच त्याला मदत करतात आणि न्यूयॉर्क शहरात जाण्यास भाग पाडतात. अखेरीस तो त्या संगीतकाराची सही मिळवतो आणि वडिलांची इच्छा पुर्ण करतो...

हा सिनेमा मला का आवडण्याचं कारणं म्हणजे व्हिक्टर नोरवॉस्कीच्या भावना... वडिलांची इच्छा पुर्ण करण्यासाठी व्हिक्टरने केलला संघर्ष मनाला खूप स्पर्श करून गेला.

सोमवार, १४ मार्च, २०११

व्यक्ती आठवणीतल्या: अनमोल केळकर उर्फ केळ्या (भाग-3)

केळ्या ब-यापैकी विसराळू होता. आईने दिलेली ताकीद तो विसरायचा मात्र एक गोष्ट अशी होती तो नियमित करायचा ती म्हणजे झोपण्या अगोदर बॅग मधुन "धौती-योग" ची बाटली काढून एक चमचा चुर्ण खायचा. आम्ही सगळे ते पाहायचो पण त्याचा परिणाम दुस-या दिवशी सकाळी पहायला मिळायचा. कारण केळ्यानी जर एक चमचा चुर्ण खाल्ले नाही तर दुस-या दिवशी त्याचा डाटा डाऊनलोड व्हायचा नाही. बरं ह्या डाऊनलोडची स्पीड ही डायल-अप सारखी होती अगदी ३२ केबीपीस....

आम्ही खुप खुप वैतागायचो, दाराबाहेर उभं राहुन मिलिंद शांतपणे गाणं म्हणायचा, "बडी देर हुई नंदलाला, तेरी राह तके ब्रिजबाला..." पण केळ्यासाठी आम्ही सगळं सहन करायला लागलो.

आम्ही केळ्याला त्याच्या सगळ्या सवयी सोबत स्विकारलं कारण त्याचं Knowledge sharing करण्याच्या गुणामुळे. तो भेटण्यापुर्वी मी ब-याच लोकांना भेटलो होतो पण, ज्ञान वाटल्याने वाढते असा विचार करणारे कोणीच भेटलं नव्हतं. समोर बसलेल्या व्यक्तीला एखादी गोष्ट सांगितली तर तो आपलं ज्ञान चोरेल असा विचार करण्या-यापैकी केळ्या नव्हता. इंग्रजी, विज्ञान असो गणित तो शिकविण्यासाठी, समजावून सांगण्यासाठी कायम तयार असायचा. नोकरी साठी लिहिल्या जाणारे कव्हर लेटर त्यानेच मला लिहून दिले. इंटरवुव्ह मध्ये कसे बोलायचे याची त्याने माझ्याकडून भरपूर प्रक्टीस करून घेतली होती.

पण अधून मधुन केळ्याचा दंगा चालूच असायचा. एखाद्याचा पगार असो की वाढदिवस किंवा काहीही कारण असलं की केळ्या उत्तम मधुन जिलेबी घेऊन आलाच समजायचं.

केळ्याची आणि लादेनची खुन्नस होती, कदाचित आजही असेल... या खुन्नसचे कारण म्हणजे ९/११ ला अमेरिकेवर झालेला आतंकवादी हल्ला. केळ्या खुप हुशार होता आणि त्याला अमेरिकेतल्या एका कंपनीत नोकरी मिळाली होती. पण १३ सप्टेंबर ला त्याला फोन आला आणि सगळ्या अपॉइंटमेंट रद्द झाल्याचे कळविण्यात आले. केळ्या खुपच निराश झाला होता. कारण ते विमान वर्ल्ड ट्रेड सेंटर नव्हे तर केळ्याच्या स्वप्नांवर आदळलं होतं.

केळ्या आणि मी खुप छान मित्र झालो होतो. पण त्याच्या मैत्रीचा सहवास थोड्याच काळापुरता मिळाला कारण मला नोकरी मिळालं नशिबाने ठिकाण होतं नाशिक. केळ्या खुप खुश होता कारण मी त्याच्या गावी जाणार होतो, मात्र मी एका चांगल्या मित्रापासून दुर जात होतो. थोड्याच दिवसात केळ्या नरेंद्र मोदींच्या राज्यात गेल्याचं समजलं तसा त्याने मला ईमेल केला होता.

आज दहा वर्ष होत आहे या गोष्टीला... केळ्यासारखा एक मित्र भेटला पण त्याचा सहवास जास्त लाभला नाही. करिअर, नोकरी, पैसा या गोष्टींच्या मागे लागल्याने आम्ही एका चांगल्या मित्रापासुन दुर दुर जात राहिलो. परवा जेव्हा एकाने Knowledge sharing करण्यात टाळाटाळ केली, तेव्हा मला चटकन केळ्याची आठवण झाली. वाटलं त्याला सांगाव हे सगळं की केळ्या कसा होता.

काळाच्या ओघात आज मी खुप दुर आलो आहे मात्र केळ्या कुठे आहे हे काहीच माहिती नाही. जर तुम्हाला केळ्या कुठे भेटला तर त्याला सांगा की त्याचा एक जुना मित्र त्याची "उत्तम" च्या बाहेर त्याची वाट बघतो आहे...

(समाप्त.)

सोमवार, ७ मार्च, २०११

व्यक्ती आठवणीतल्या: अनमोल केळकर उर्फ केळ्या (भाग-2)


"अरे भेटायचं होतं ना तुला? चल ओळख करून देतो" असं म्हणत मिलिंद समोर आला आणि आमची ओळख करुन दिली

"हा नागेश... योगेशचा लहान भाऊ"

मी नुसतंच हॅलो म्हणालो.

माझ्या चेह-यावरील भाव मिलिंदने टिपले होते. मला बाजूला घेऊन त्याने समजावले हे बघ इंग्रजी मध्ये एक म्हण आहे "Curosity kills the cat"  या म्हणीचा अर्थ कळाला का तुला??

हो मी म्हणालो.

त्यानंतर आम्ही सगळे सोबत जेवलो आणि झोपी गेलो. पण मी अनमोलशी काही जास्त बोललो नाही. कारण माझी उत्सुकता संपली होती आणि त्याच बरोबर एका प्रश्नाचे उत्तर ही मिळाले की त्याच्या किट मध्ये एकही कंगवा कसा काय नाही.

सकाळी मला लवकर जाग आली पण ती सवयीप्रमाणे नव्हे तर किचन मध्ये पडलेल्या भांड्यांच्या आवाजाने. उठून बघीतले तर अनमोल चहा बनवत होता. "चल लवकर दात घास, मस्त चहा केला आहे" तो म्हणाला.

मी दात घासून हॉल मध्ये येऊन बसलो त्याने गरमा गरम चहा चा कप माझ्या हातात दिला. "थॅंक्स अनमोल..." मी म्हणालो.
"अबे थॅंक्स कसलं रे, आणि अनमोल काय म्हणतोस, सारा जमाना मुझे "केळ्या" कह कर बुलाता है..."

"केळ्या..." मी म्हणालो

"येस... यु आर राईट" आणि त्याने माझ्याशी शेक हॅंड केलं.

चहा एकदम मस्त झाला होता. अनमोल उर्फ केळ्या माझ्या समोर लुंगी आणि बनियान मध्ये बसला होता. पण राहुन राहुन माझं लक्ष त्याच्या टक्कलाकडे आणि सुटलेल्या पोटाकडे जात होतं. तो लठ्ठ नव्हता पण पोट खुपच सुटलं होतं.

"तुझं वय किती रे केळ्या?" मी घाबरत घाबरत विचारलं

माझा हा प्रश्न ऎकुन त्याने चहाच्या घोटाचा एक फवारा सगळ्या हॉल मध्ये उडवला.

"अरे हळू हळू काय झालं???" मी त्याला विचारलं

"अबे काय विचारतोस राव तु..." असे म्हणत तो जोर जोरात हसू लागला आणि हसत हसतच त्याने त्याची जन्मतारीख सांगितली.

आता माझ्या तोंडातून फवारा उडण्याचा बाकी राहिलं होतं पण तस काही झालं नाही, मी स्वत:ला सांभाळल. हा केळ्या माझ्या पेक्षा फक्त ८ महिन्याने मोठा होता.

हळू हळू केळ्या शी मैत्री वाढू लागली. आणि त्याचे एक एक पैलु समोर येऊ लागले. केळ्या मुळचा नाशिकचा होता. माझा त्याच्याबद्दलच एक अंदाज खरा ठरला तो म्हणजे केळ्या अभ्यासात अत्यंत हुशार होता. कारण त्याने नुसतच B.E. Mech. केलं नव्हतं तर तर तो युनिवर्सीटीमध्ये पहिला आला होता. त्याचे वडील शास्त्रज्ञ होते. आम्ही नोकरीच्या जाहिराती येतात म्हणून लोकल/मराठी पेपर विकत घ्यायचो पण केळ्या आल्यापासून घरात Times of India  येऊ लागला. केळ्या नेहमी हाच पेपर वाचायचा, त्या एक पद्धत पाहून तर आम्ही गारदच झालो. तो सकाळी पेपर आला की पहिले हेडलाईन वाचायचा मग जाहिराती बघायचा आणि मोजून सात ते आठ मिनिटात शब्द कोडं सोडवून टाकायचा. आम्ही थक्क होऊन जायचो कारण मराठी पेपर मधील शब्द कोडं सुटता सुटायचं नाही आमच्या कडून, आणि हा चक्क इंग्रजी कोड सोडवायचा. ही अशी जबरदस्त बुध्दीमत्ता मिळविता मिळविता केळ्या च्या डोक्यावरचे सगळे केस गळाले होते. हेच त्याच्या टक्कलाचे खरं कारण होतं.

ह्या बुद्धिमत्तेचा फायदा त्याला लवकरच झाला आणि एक मोठ्या कंपनी मध्ये त्याला चांगली नोकरी मिळाली. काही दिवसातच आमची चांगली मैत्री जमली. जरी मी माझ्या क्लास आणि केळ्या नोकरीच्या निमित्ताने बिझी राहत असलो तरी संध्याकाळी नक्कीच भेटायचो.

अशाच एका संध्याकाळी मी क्लास संपवून घरी आलो. नेहमी प्रमाणे मिलिंदने दार उघडलं. मी त्याला विचारलं "केळ्या कुठे?"

"अरे केळ्या उत्तम मिठाई भांडार मध्ये गेलाय, त्याचा आज पगार झाला. काहीतरी गोड आणतो म्हणून बाहेर गेला आहे." मिलिंद म्हणाला

थोड्यावेळातच केळ्या एक भला मोठ्ठा डब्बा घेऊन घरी आला. आम्ही जाम खुश होतो कारण आज काहीतरी गोड खायला मिळणार हे माहिती होतं. जसाच त्याने डब्बा उघडला सगळ्यांचे चहेरे पाहण्यासारखे झाले, कारण केळ्या चक्क एक किलो जिलेबी घेऊन आला होता.

"अबे, काय आहे बे हे..." सगळे ओरडले.

"आपल्याला जाम आवडते राव जिलेबी" केळ्या म्हणाला.

केळ्याला सोडून जिलेबी कोणालाच आवडत नव्हती, त्यामुळे आम्ही एक जिलेबी आपली चवीपुरती उचलून बाजुला झालो. आम्हाला वाटले की केळ्या भडकलं, हे सगळ कोण संपवणार वगैरे म्हणल पण तसं काहीच झालं नाही. एक एक करून त्याने एकट्याने सगळी जिलेबी संपवली. आम्हाला लगेचच त्याच्या त्या सुटलेल्या पोटाचे ही कारण समजले.

केळ्याला लवकर झोपायची सवय होती, त्या संध्याकाळी तो लवकर गादीवर आडवा झाला. आम्ही पण झोपण्याची तयारी करत होतो इतक्यात केळ्या धाड करून उठला आणि "सॉरी आई, सॉरी आई" म्हणत स्वत:लाच थोबाडीत मारायला सुरूवात केली. आम्हाला हसू आवरेना.

"अबे केळ्या काय झालं?" आम्हाला हसावं की त्याला सांभाळाव हेच समजेना. पण केळ्या शांतपणे उठला आणि बॅग मधुन तेलाची बाटली काढून तेल डोक्यावर थापु लागला.

"काय झालं केळ्या???" आम्ही हसत हसत विचारलं

"गप्प बसा राव, आई म्हणते तुझं लग्न कसं जमणार, टक्कल पाहिलं का किती पडलंय. म्हणून तिने हे तेल तयार करुन दिले आहे. आणि ताकीद दिली आहे की दररोज झोपताना लावत जा. आपल्याला लग्न करायचय राव..."

(क्रमश:)

बुधवार, २ मार्च, २०११

व्यक्ती आठवणीतल्या: अनमोल केळकर उर्फ केळ्या (भाग-१)


कॉलेज संपल्यावर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोकरी आणि ती मिळता मिळत नाही. चांगल्या नोकरीच्या शोधात मी जालन्याहून औरंगाबादला आलो. मोठा भाऊ अगोदरच तिथे असल्याने रोटी, कपडा आणि मकान हा प्रश्नच नव्हता. त्याने भाडयाने एक फ्लॅट घेतला होता आणि त्याच्या सोबत दोघेजण अगोदरच राहत होते. फ्लॅट मोठा असल्याने गर्दी, अडचण किंवा गैरसोय हा प्रकार काहीच होणार नव्हता.

औरंगाबादला आल्यावर या शहराची माहिती, आजुबाजुचा परिसर, नातेवाईक आणि प्लेसमेंट एजन्सींची माहिती गोळा करण्यात बराच वेळ गेला. शहरात दळणवळणाची बोंब होती (आज ही आहेच) शहर बससेवा म्हणजे एक तास थांबा मगच बस येणार ह्या सुत्राने चालयची. माझं आपलं पेपरात बघ, मित्राला/नातेवाईकाला सांग, प्लेसमेंटच्या चकरा मार असं चालू होतं पण नोकरी काही मिळता मिळत नव्हती. शेवटी दादा म्हणाला "अरे एखादा software  चा कोर्स तरी कर." ही कल्पना हीट होती. मी लगेचच एक इंस्टीटुट मध्ये अ‍ॅडमिशन घेतले. कोर्स सुरु झाला आणि हळू हळू शहर ओळखीचं होऊ लागलं.

दोन एक आठवड्यानंतर एका संध्याकाळी दादाने सगळ्यांना बोलावले. थोडी चर्चा करायची आहे असे त्याने सांगितले. तो म्हणाला "हे बघा आपला फ्लॅट खुप मोठा आहे. भाडं ही खुप आहे. आपण आणखी एक मेंबर सहज वाढवू शकतो. तसे करणे आपल्या फायद्याचे ठरेल."

आमची काहीच हरकत नव्हती. तेव्हा पासून आम्ही वाट पहायला सुरुवात केली की कोण येतं आता रहायला. एक आठवड्यानंतरच दादाने सांगितले की उद्या एक जण येणार आहे, घर नीट आवरून ठेवा, त्याप्रमाणे आम्ही घर आवरुन ठेवलं. दुस-या दिवशी सकाळी नेहमी प्रमाणे आम्ही सगळे घराबाहेर पडलो. दुपार पर्यंत सगळी कामं आटोपून मी आणि विजय घरी पोहचलो तर हॉल मध्ये एक भली मोठी बॅग, तीन जोडी शुज आणि एक शेव्हींग किट पडलं होतं. आम्हाला लगेचच कळालं की नवीन मेंबर आला. त्या बॅगवर त्याचं नाव सुद्धा होतं "अनमोल केळकर" त्याच बरोबर शिक्षण  B.E. (Mech)  आणि शहर नाशिक.

त्याची बॅग दिसत होती पण तो दिसत नव्हतं. कळालं की तो बाहेर फिरायला गेला होता. एकंदरीत त्याचा बस्तरा आणि "अनमोल केळकर" असं अगदी टिपीकल नाव या वरून मी आणि विजय तो कसा दिसत असेल याचा अंदाज बांधायला सुरुवात केली.

माझा अंदाजाने तो ५ फूट च्या जवळपास उंची, सडपातळ, चष्मा, शांत आणि अभ्यासात हूशार असा होता. बरेच अंदाज बांधुन झाले पण वेळ काही जाईना म्हणून आम्ही बाहेर पडायचं ठरवलं. फ्रेश झालो आणि भांग पाडावा म्हणुन आरश्या समोर गेलो तर सगळे कंगवे गायब.

"अरे कंगवा कुठे आहे रे विजय?" त्याला ही माहित नव्हता. तो म्हणाला "अरे त्या अनमोल ने ठेवला असेल..."

मी जरासा वैतागलोच मग सहज विचार केला की ह्या अनमोल च्या बॅग मध्ये नक्कीच कंगवा असेल.

"अरे विजय, त्याच्या शेव्हींग कीट मध्ये बघ जरा त्याचा कंगवा नक्कीच असेल"

"काय आयडिया आहे हो राव" बघतो असे म्हणत विजय ने ती कीट माझ्यासमोर रिकामी केली.

"अबे त्याने तर एकपण कंगवा नाही आणला रे, म्हणजे आपलाच वापरणार दिसतो हा" विजय ओरडला.

जसे जमतील तसेच केस बसवले आणि आम्ही घराबाहेर पडलो. हिंड हिंड हिंडून झाल्यावर रात्री आठ वाजता घरी पोहचलो तर मिलिंद ने दार उघडलं.

मी विचारलं "कुठे आहेत नविन पाहूणे?"

"अरे तो भाजी आणायला गेला आहे दादासोबत" मिलिंद ने सांगितले.

"कसा आहे रे नविन मेंबर" मी विचारले.

"आल्यावर बघशीलच" मिलिंद उत्तरला.

आता मात्र उत्सुकता शिगेला पोहचली होती. मला काहीच सुचत नव्हतं, मला माहित होतं की ही येणारी व्यक्ती काही सुपरस्टार नव्हती पण का कोणास ठाऊक माझी उत्सुकता काही केल्या कमी होत नव्हती.

तितक्यात दार वाजलं. स्विटीच्या उत्साहात मी जाऊन दार उघडलं तर समोर एक माणुस उभा होता. माझ्या पेक्षा ५-६ वर्षाने मोठा, पोट सुटलेलं, अंगात बंडी, लुगी नेसलेला, ३/४ टक्कल पडलेलं आणि हातात भाजी ने भरलेली पिशवी.

"कोण हवं आहे आपल्याला?" मी विचारलं

त्यावर त्याने आत डोकावुन पाहिलं, बाहेरून फ्लॅट नंबर चेक केला आणि म्हणाला. "हाय मी अनमोल... अनमोल केळकर." तो सरळ आत शिरला आणि पलंगावर जाऊन बसला.

अरे बापरे मी तर एकदम चक्रावुनच गेलो. मी विचार केला तसलं काहीच नव्हतं. खरं तर मी विचार केला होता की हा कन्या राशीचा असेल पण हा तर कुंभ राशीचा निघाला.

(क्रमश:)

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०११

वळतं पण कळत नाही

वळण कोणतेही असो ते किचकट असते. जीवनात आलेले वळण आयुष्य बदलून टाकते, रस्त्यावरील वळण धोक्याचे ही ठरू शकते. पण हेच वळण क्रिकेटच्या मैदानावर असेल तर...

वेडा-पिसा होऊन धावणारा चेतन शर्मा मला आजही (पुसटसा) आठवतो. त्याचे तसे धावण्याचे कारण समजायला मला आणखी पाच वर्ष लागली. १९८७ च्या वर्ल्डकप मध्ये घेतलेली हॅटट्रिकच्या मागचे रहस्य हेच वळण होते... काय स्विंग झाले होते तीन ही चेंडू...

क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ समजला जातो मात्र वर्ल्डकपचा इतिहास चाळला तर जाणवले की "वळण" न समजल्याने ब-याच संघांची दाणादाण उडलेली दिसून आली.

१९९२ मध्ये ह्याच वळण्याचा उपयोग दोन व्यक्तींनी केला आणि ही स्पर्धा गाजविली. दिपक पटेल आणि वासिम अक्रम फरक एवढाच की पटेल चे वळण जमिनीवर तर अक्रमचे हवेत. १९९२ मध्ये पहिल्या १५ ओव्हर मध्ये फिरकी हे आश्चर्यचकित करणारे धाडस केले न्यूझीलंडने, दिपक पटेलच्या ऑफस्पिन समोर धावा काढणे अवघड होऊन गेलं सगळ्या संघांना. पण खरा जलवा केला अक्रम ने उत्कृष्ट स्विंग बोलींग करत त्याने इंग्लंडची दाणादाण उडवली. त्याच्या याच कामगिरी मुळे पाकिस्तान वर्ल्डकप जिंकण्यात यशस्वी झालं.

१९९६ चा वर्ल्डकप फक्त आणि फक्त फलंदाजीच आठवला जाईल मात्र या वर्ल्डकपचा सर्वात आनंदाचा आणि दु:खाचा क्षण या वळणा मुळेच आला. मुंबईमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या लढतीत जमिनीवर चेंडू वळविणा-या शेन वार्न ला धु धु धुतला मात्र हवेत वळविणा-या डेमीयन फ्लेमींग पुढे भारतीय फलंदाजी ढेपाळली. तर सेमी-फायनल मध्ये शेन वार्न ने त्याची जादु दाखवत वेस्ट इंडिज गुडघे टेकायला लावले. दुसरी कडे दुस-या सेमी फायनल मध्ये भारताने वळणा-या चेंडू नांगी टाकली आणि मॅच श्रीलंकेला बहाल करावी लागली.

१९९९ मध्ये ह्या वळणाने तर शिखर गाठले...

इंग्लंडच्या वातावरणात चेंडू खुप स्विंग होत होते. त्यामुळे जेफ अ‍ॅलॉट, ग्लेन मॅकग्राथ ने भर भरून विकेट घेतल्या मात्र एक क्षण असा की ज्याने संपूर्ण वर्ल्डकपला एक वेगळेच वळण आलं त्याला कारणीभूत होता एक जादूगार, शेन वार्ने...
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या या लढतीत त्याने चार बळी मिळवले पण नंतर खरी कमाल केली फायनल मध्ये पाकिस्तान सारख्या संघाला अक्ष्ररशः: गुडघे टेकायला लावले आणि पुन्हा चार बळी मिळवून मॅन ऑफ द मॅच झाला.

२००३ मध्ये चेंडु जमिनीवर जरी वळण नसले तरी हवेत बरेच वळण होतं, आशिष नेहरा, ग्लेन मॅकग्राथ, शेन बॉंड आणि सगळ्यात जास्त फायदा घेतला तो म्हणजे चामिंडा वास यास.

आता उत्सुकता आहे ती उद्यापासून सुरु होणाऱ्या सोहळ्याची...

हरभजन सिंग, पियुष चावला, मुरलीधरन, अजंथा मेंडीस आणि ग्रहम स्वान हे जमिनीवर चेंडू वळविण्यासाठी तयार आहेत तर ब्रेट ली, उमर गुल आणि डेल स्टेन हवेत वळविण्यासाठी आहेत.

बघु याचं वळण कळत की नाही...

शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०११

तुम्ही काय फोडू शकता...

जर मी तुम्हाला विचारले की, तुम्ही काय फोडू शकता? तर तुमचे उत्तर काय असेल...

फुगा, काच फार फार तर एखादा कप (दया दरवाजा फोडु शकतो, एखादा वीटही फोडु शकत असेल), ह्या आपल्या सारख्याच्या आवाक्यातील वस्तु.

आता सांगा हा कप "वर्ल्डकप" असेल तर :)

मग हाच प्रश्न मी विचारला वीरेंद्र सेहवाग, कायरन पोलार्ड आणि युसुफ पठाण ला...

तिघं ही म्हणाले "फोडणे" म्हणजे काय?

उत्तरासाठी त्यांना इतिहासात घेऊन जावं लागलं.

त्यांची भेट घालुन दिली...

नाव: सनथ जयसुर्या
देश: श्रीलंका
सौजन्य: आंतरजाल

श्रीलंका जेव्हा या वर्ल्डकप मध्ये उतरली तेव्हा त्यांच्या हुकुमाचा एक्का होता "सनथ जयसुर्या". जणु काही हा वर्ल्डकप त्याच्यासाठीच आयोजीत केला होता. अगदी पहिल्या सामन्यापासूनच त्याने त्याचे काम चोख बजावले ते म्हणजे "फोडणे". हा एकच काम करायचा ते म्हणजे गोलंदाजी "फोडणे". एकही देश/गोलंदाज याच्या कचाट्यातून नाही सुटला. सुरूवात भारतापासून झाली दिल्लीच्या मॅच मध्ये त्याने मनोज प्रभाकर ला फोड फोड फोडला. स्विंग विसरून त्याने सरळ स्पिन टाकायला सुरूवात केली. त्यानंतर इग्लंड विरुध्द ४४ चेंडुत ८२ रन करत त्याने अक्षरश: गुडघे टेकायला लावले.

त्याच्या फोडा फोडी चे फळ त्याला "मॅन ऑफ द सिरीज" या स्वरुपात मिळाले.

त्यानंतरच्या वर्ल्डकप मध्ये म्हणजे १९९९ हेच काम केले "लान्स क्लुसनर"

नाव: लान्स क्लुसनर
देश: दक्षिण आफ्रिका
सौजन्य: आंतरजाल
ही स्पर्धा इग्लंड मध्ये आयोजीत करण्यात आली. या स्पर्धेत सगळ्यात मुख्य गोष्ट होती "वातावरण".
स्विंग गोलंदाजी हे वातावरण पोषक होतं, त्यामुळे फलंदाजांचा इथे कस लागणार हे नक्की होतं. त्यामूळे शैलीदार फलंदाजच या स्पर्धेत चांगला खेळ करू शकतील असा अंदाज सगळ्यांचा होता. तस काहीसं घडलही. राहुल द्रविड, मार्क वॉ, स्टीव्ह वॉ ह्या मातबर फलंदाजांनी भरपुर धावा केल्या. मात्र फोडण्याचे काम केले ते फक्त "लान्स क्लुसनर" याने...

सर्व गोलंदाजांना त्याने खरचं फोडुन काढलं, वासिम अक्रम, ग्लेन मॅकग्राथ, जेफ अ‍ॅलॉट यांचे चेंडु स्विंग होणचं बंद झाले. शोएब अख्तर चा वेग हा धिमी लोकल सारखा करून टाकला.

त्याच्या ह्या फोडण्याच्या कार्यक्रमात नशिबाने त्याला दगा दिला. ६ चेंडु ९ धावा... समोर फ्लेमींग सारखा उत्तम स्विंग बोलर..

पहिला चेंडु ४, दुसरा चेंडु ४, तुम्हीच सांगा !  काय अवस्था झाली असेल त्याची एवढं फोडल्यानंतर एखाद्याने "जा... तुम्ही जिंकले मी नाही टाकत पुढचा चेंडु" असं म्हणत मैदान सोडलं असतं.

घात झाला आणि अ‍ॅलन डोनाल्ड धावबाद झाला :(... लान्स क्लुसनर एकटाच लढला

पण त्याच्या ह्या फोडण्याच्या कामगिरी बद्दल त्याला "मॅन ऑफ द सिरीज" पुरस्कार मिळाला.

त्यानंतर २००३ मध्ये हेच काम आपल्या आवडत्या सचिन तेंडुलकर ने केले.

नाव: सचिन तेंडुलकर
देश: भारत
सौजन्य: आंतरजाल

दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजीत करण्यात आलेली स्पर्धा जलद गोलंदाज गाजवतील असे भाकीत होते. इथे असलेल्या पिचवर बाउन्स खूप असल्याने त्याचा फायदा जलद गोलंदाज घेणार हे नक्की होतं तस काही घडलं ही चामिंडा वास, ग्लेन मॅकग्राथ यांनी भरभरून विकेट घेतल्या. शोएब अख्तर ने सगळ्यात जलद चेंडु फेकला.
पण सचिन तेंडुलकर एक उद्देश घेऊन मैदानात उतरला होता "फोडणे"

ऑस्ट्रेलिया, नामिबिया, इग्लंड, झिंबाब्वे च्या बोलर्सला सडेतोड उत्तर देत त्यानी सर्व गोलंदाजी फोडुन काढली. सगळ्यात वाईट परिस्थीती झाली पाकिस्तान ची आज मला २ मार्च २००३ चा वर्तमानपत्राचे पहिलं पान आठवतं "सचिनने केला पाकचा चेंदामेंदा"

वासिम अक्रम, वकार युनुस, शोएब अख्तर, अब्दुर रज्जाक यांना फोडुन काढले, यांचे चेंडु सचिन पुढे स्विंग,   बाउन्स होणेच बंद झाले. ७५ चेंडुत ९८ धावा. ह्या फोडण्याला कुठलीही सीमा नव्हती.

या स्पर्धेत त्याने सर्वाधीक धावा जमावल्या, १९९६ चा स्वत:चाच रेकॉर्ड मोडला. पण ऑस्ट्रेलिया ने चांगला खेळ करत हा वर्ल्डकप जिंकला.

मात्र सचिनच्या ह्या फोडण्याच्या कामगिरी बद्दल त्याला "मॅन ऑफ द सिरीज" पुरस्कार मिळाला.

२००७ चा वर्ल्डकप हा अत्यंत रटाळ होता. अवेळी सुरु होणारे सामने, भारत पहिल्या फेरीत बाद आणि बॉब वुल्मरचा संशयास्पद मृत्यु यामूळे यास्पर्धेतील माझा रस फारच कमी झाला होता.

त्यामुळे आता माझे लक्ष २०११ च्या वर्ल्डकप वर आहे. १४ दिवस शिल्लक राहिले आहेत आणि सेहवाग, पोलार्ड आणि पठाण ला, परत प्रश्न विचारतो तुम्ही काय फोडू शकता ? आणि किती?

एक उत्सुकता आहे आहे आता की कोण घेणार ही जबाबदारी का पुन्हा सचिन तेंडुलकरच...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...