सोमवार, २० डिसेंबर, २०१०

माझी शाळा

माझं बालपण व सर्व शिक्षण जालना या छोट्या शहरात झालं. आमचं जालना; अत्यंत लहान, शांत व साधं. माझे वडील बँकेत नोकरी करायचे. त्यांची नोकरी बदलीची होती व दर तीन ते चार वर्षांनी फिरती सुरू व्हायची आणि आम्हा भावंडांचे शिक्षण चांगले व्हावे म्हणून आम्ही जालन्यातच राहायचो आणि आम्हाला शहरातील सर्वात चांगल्या शाळेत दाखला देण्यात आला; "श्री सरस्वती भवन प्रशाला, जालना".

१९९१ मध्ये ५ वीला मी या शाळेत दाखल झालो, माझी मोठी बहीण आणि भाऊ अगोदरच या शाळेत होते. ही शाळा फक्त मराठी माध्यमातून होती. मुलांचा आणि मुलींचा विभाग ही वेगवेगळा होता. शाळेची इमारत मोठी,  प्रशस्त व ती शहराच्या मध्यभागी आहे. माझ्या घरापासून अंदाजे १ किमी वर ही शाळा होती, आम्ही चालतच शाळेत जायचो.

मला आजही आठवतो शाळेचा पहिला दिवस...

सकाळी ७ वाजता शाळा होती, मी जेव्हा शाळेत गेलो तेव्हा मला ५ [ब] या वर्गात बसवले मात्र हजेरीत माझं नाव आलं नाही तेव्हा मी जरा चिंतित झालो. थोड्याच वेळात "खडके बाई" आल्या आणि म्हणाल्या,

"तू चुकीच्या वर्गात बसला आहेस"

मग त्याच मला माझ्या वर्गात घेऊन गेल्या... ५ [अ] हा माझा खरा वर्ग. माझं  NCERT  असल्याने मला या वर्गात बसायचे होते. इथे माझं नाव हजेरी मध्ये ही आलं. मी खुप खुश होतो कारण माझा क्रमांक होता २.

या वर्गात आल्यावर खरी गम्मत सुरु झाली कारण वर्गात सगळी मुलं आपल्या उंची नुसार बसली होती आणि मी खुपच बुटका असल्याने मला पहिल्याच बाकावर बसायला जागा मिळाली. इथेच मिळाले मला पहिले वर्गमित्र "आशिष टापर" आणि "मंगेश लोखंडे". आम्ही तिघे वर्गातील सर्वात कमी उंचीचे विद्यार्थी होतो. पहिला दिवस अतिशय सामान्य गेला. आम्हा तिघांची एकमेकांशी ओळख झाली आणि काही शिक्षकांनी त्यांची ओळख करून दिली. मराठी विषय शिकविणाऱ्या तोट्टावार बाई आमच्या क्लास टीचर होत्या, त्याच हजेरी ही घ्यायच्या. या बाई खुप सुरेख मराठी शिकवायच्या मात्र खुप म्हणजे खुपच कडक शिस्तीच्या होत्या. वर्गात बोलणे, कुजबुजने वगैरे त्यांना बिलकुल खपायचे नाही.

दोन-तीन दिवसांनी एक नवीन विद्यार्थी आमच्या वर्गात आला. तो साधारण माझ्याच उंचीचा असल्याने त्याला माझ्या बाजूलाच बसायला जागा देण्यात आली तो होता "अमित महाजन." संपुर्ण दिवसभर आम्ही एकमेकांशी काहीच बोललो नाही, मात्र जेव्हा शाळा सुटली मी त्याला विचारले "तु कुठे राहतोस?" तो शहरात नवीन असल्याने त्याला पत्ता तंतोतंत माहीत नव्हता पण त्याने जे काही सांगितले त्यावरून आम्ही एकाच भागात राहतो हे माझ्या लक्षात आलं. आम्ही चालत चालत घरी निघालो, जसे जसे घर जवळ येत होत तसे तसे कळाले की आम्ही एकाच कॉलनी मध्ये राहतो. आश्चर्य म्हणजे आम्ही अगदी शेजारी शेजारी राहायचो होतो. एका दिवसापूर्वी ते इथे राहायला आले होते.

आम्हा दोघांची पक्की मैत्री जमली... :)

माझं ५ वी १० वी शिक्षण याच शाळेत झालं या पाच वर्षात मी सर्व काही केले, जसे अभ्यास (ठीक ठाक), खेळ, मस्ती आणि मैत्री

आज ही ब-याचश्या अशा गोष्टी आहे ज्या मला स्पष्ट आठवतात जसे आर. डी. देशपांडे सर :) यांना शाळेतील सगळे मुलं जाम घाबरायची. कारण त्यांची शिस्त अत्यंत कडक होती. कायम हातात एक रूळ घेऊनच ते फिरायचे, वर्गात टाचणी पडली तरी त्या आवाजाने कानाला त्रास होईल इतकी शांतता असायची.

हे सर इतिहास आणि भूगोल फार म्हणजे फारच अप्रतिम शिकवायचे. भूगोलाच्या तासात फळ्यावर संपुर्ण हिंदुस्थानचा नकाशा (१९४७ पूर्वीचा) काढायचे, सह्याद्री, हिमालय, गंगा नदी काढून दाखवायचे तर इतिहासाच्या तासात सांगितलेली अफझलखानाच्या वधाची गोष्ट मला आज ही आठवते. मी पाचवीला असतांना त्यांचे शाळेतले ते शेवटचं वर्ष होतं कारण त्याच वर्षी ते निवृत्त झाले.

इतर शिक्षक ही होते जसे खडके बाई, त्या विज्ञान खुपच सोप्पं करुन शिकवायच्या तर सोनटक्के सर सुंदर अशी चित्र काढायचे. गणिताचे शेळके सर खुपच साधे आणि सरळ होते, त्यांना कोणीच घाबरायचे नाही तर उलट त्यांची चेष्टा करायचे. ते बीजगणित छान शिकवायचे, मुलांचे लाड ही खुप करायचे, लिफ्ट मागितली तर स्व:ताच्या लुनावर घरी सोडायचे. तर शारिरीक शिक्षणाचे पठाडे सर दररोज प्रार्थना म्हणून घ्यायचे आणि अत्यंत कडक शिस्तीत वागवायचे. इंग्रजी विषयाची खूप धास्ती होती पण पोहेकर सर आणि व्ह. जी. कुलकर्णी सर इतके सहज शिकवायचे की पुस्तक उघडायचीही गरज पडायची नाही  lesson  असो वा  poem  लगेचच समजायची.

सर्व शिक्षकांनी अगदी मनापासून आम्हाला शिकवलं. या पाच वर्षात अंगाला एक शिस्त लावली, चांगल्या सवयी लावल्या. शैक्षणिक नव्हे तर योग्य असे वैयक्तिक मार्गदर्शनही केले. त्यावेळी सर्व शिक्षक मनापासून शिकवायचे. त्यांच्या शिकविण्याला व्यावसायिक झालर नव्हती. त्यांनी लावलेल्या शिस्तीचा आजही दैनंदिन जीवनात उपयोगाला येते. 

"आई-वडीलांप्रमाणे गुरू ही आपल्या आयुष्यात महत्वाची भुमिका बजावतो. त्या पाच वर्षात मी एक मातीचा गोळा होतो हा गोळा योग्य हाती लागल्याने आज त्या गोळ्यांला एक सुरेख आकार आला आहे."

१९९६ मध्ये माझे १० वी पुर्ण झाले आणि आता शाळा सुटून १४ वर्ष झाले असले तरी ह्या आठवणी सुटत नाही. मला आता जालना सोडुनही जवळपास १० वर्ष होत आली आहेत पण आजही वाटतं की जुन्या वर्ग मित्रांना घेऊन जावं आपल्या शाळेत...

शोधावा आपला वर्ग, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी ला सजवावा तो. दिवाळीत किल्ला बांधावा. मैदानातल्या झाडाखाली बसून डब्बा खाऊ आणि गेट बाहेरचा बर्फ गोळा घेऊ.

पण आयुष्य चालतच राहतं ते कोणासाठी ही थांबत नाही. आमच्या सगळ्यांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या आहेत. आज कोणी कुठे तर कोणी कुठे???

आज मला काही वर्गमित्र आठवतात त्यातले काही भेटतात तर काही हरवले आहेत. अनिकेत दाबके, राकेश माने आणि रघुवीर कुलकर्णी हे वर्ग मित्र भेटतात, कधी फोनवर तर कधी ऑनलाईन...

आशिष टापर, अमित महाजन, सुधीर देशपांडे, अमित देशपांडे, महेश देशपांडे, नितिन देशपांडे, दिपक बोर्डे, विवेक दसरे, संदीप वाखारकर, अभिजीत शिंदे, सचिन पवार, ललीत कोलते, निखील आगटे.

मित्रांनो कुठे आहात तुम्ही? कसे आहात तुम्ही?

जगावसं वाटतात ना पुन्हा ते क्षण, चला तर मग ताज्या करूयात त्या आठवणी... :)

तुमचा मित्र

नागेश देशपांडे

८ टिप्पण्या:

 1. Nice post ....

  Vhahalkar Sir athawatat ka ?

  Mi pan S.B madhyech hoto...pan Aurangabad la .... 1998 la 10wi zalo...

  Cheers !!!

  उत्तर द्याहटवा
 2. धन्यवाद शार्दुल :)

  माझ्या ब्लॉगवर तुझे स्वागत...

  व्याहाळकर सर ???
  अवघड आहे रे...

  तु जालन्याचा आहेस का ?

  उत्तर द्याहटवा
 3. वा मित्रा!! खुपच सुंदर.....हे वाचून नकळत डोळे पाणावले..

  उत्तर द्याहटवा
 4. मस्तच रे ! आवडला हाही लेख. बादवे जालन्याला कुठे राहायला होतास. माझे मामा असतात तिथे कॅंपात (प्रशांती नगर, देवमुर्ती) मी नेहमी यायचो त्यांच्याकडे. अजुनही येतो. :)

  उत्तर द्याहटवा
 5. धन्यवाद अनिकेत :)

  आज ही आठवते मला आपण शाळेत जायचो, कधी चालत तर कधी सायकलवर...

  किती मज्जा होती ना :)

  उत्तर द्याहटवा
 6. धन्यवाद विशाल

  जालना सोडून आता १० वर्ष होत आली आहेत.
  प्रशांती नगर बरेच लांब आहे.

  तुमच्या मामांचे नाव आणि पत्ता मिळाला तर नक्कीच ओळख निघेल.

  उत्तर द्याहटवा
 7. Khooop chhan lihilay... mla maze shaleche diwas aathvle... :)

  उत्तर द्याहटवा

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...