सोमवार, ६ डिसेंबर, २०१०

जालना ते जोहान्सबर्ग

१० नोव्हेंबर २०१० कधीही विचार न केलेला दिवस उजाडला तेव्हा मी आकाशात २० हजार फूटावरती होतो. सकाळी ११ (भारतीय वेळेनुसार) मी जोहान्सबर्ग विमानतळावर पोहोचलो. पहिलीच परदेशवारी आणि पहिलाच विमान प्रवास त्यामूळे मी खूप उत्साही होतो, आनंदही गगनात मावत नव्हता. विमानतळावर मला घ्यायला ऑफीसचा ड्रायवर आला होता मी माझी बॅग घेतली आणि माझा या शहराचा अनुभव घ्यायला सुरुवात केली. जोहान्सबर्ग हे अतिशय सुंदर शहर आहे. दक्षीण आफ्रिकेची आर्थिक राजधानी, फिफा विश्वचषकामुळे शहराचा झालेला विकास स्पष्ट दिसून येत होता. स्वच्छ, मोठं मोठे रस्ते, मेट्रो रेल्वे आणि महत्वाच्या कंपन्यांचे कार्यालय दिसून येत होती.

जोहान्सबर्ग मध्ये हाईड पार्क या भागात असलेल्या कंपनीच्या अपार्टमेंट मध्ये माझी राहण्याची व्यवस्था झाली. हा भाग अतिशय शांत तरीही रहदारीचा आहे. या अपार्टमेंट मध्ये जवळपास सगळे माझ्या कंपनीचेच लोक राहतात, त्यापैकी बहुतेक जणांना मी पुण्यात असतांना भेटलो होतो त्यामूळे ही जागा मला नविन अशी वाटली नाही. दुस-याच दिवशी कामाला सुरुवात झाली, राहण्याच्या जागेपासुन ५ किमी वरती माझे ऑफीस आहे. ईथे आल्यावर आणखी मंडळींची भेट झाली जे दुस-या अपार्टमेंट मध्ये राहतात.

शहर फारसे सुरक्षित नसल्याने दररोज ऑफीस ते घर हा प्रवास कारने करावा लागतो कारण दुसरा कोणताही पर्याय नाही. मला कार चालवता येत नसल्याने मी प्रवाशाची भुमीका बजावतो. दररोज हा छोटासा प्रवास करतांना ब-याचश्या गोष्टी जाणवल्या त्याम्हणजे वाहनांचा वेग, रहदारी, वाहन चालविण्याची शिस्त. सगळ्यात जास्त जाणवले ते म्हणजे नविन तंत्रज्ञानाचा वापर जसे सर्व अपार्टमेंटच्या भितींना विजेची कुंपण आहेत, सर्व दरवाजे रिमोटने उघडतात आणि बंद होतात. प्रत्येक सिग्नलवर कॅमेरा व स्पीडगन आहे. नियमांचा भंग झाल्यास घरपोच दंडाची पावती येते त्यामूळे सगळे चालक वाहन चालवितांना नियम काटेकोरपणे पाळतात.

एक दोन आठवड्या आणखी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे गरिबी आणि श्रीमंती यामधील अंतर... ऑफीसला जातांना बरेच सिग्नल आणि चौक लागतात. मोठ्या चौकात सिग्नल असतात तर लहान चौकात फक्त STOP असा बोर्ड असतो. या बोर्ड जवळ आल्यावर सगळ्या वाहनांना थांबणे बंधनकारक आहे. थांबुन आजु बाजुला पाहायचे आणि मगच पुढे जायचे असा नियम आहे. अश्या या चौकात काही स्त्रिया व पुरूष वर्तमानपत्र, टोपी, चष्मे अथवा मोबाईलचे चार्जर विकतांना दिसुन येतात. तर काही चौकात नोकरी हवी आहे, प्लंबीग, माळी काम करून मिळेल असे बोर्ड घेऊन बसलेल पुरूष दिसुन येतात. ऎरवी मोफत मिळणारे वर्तमानपत्र चौकात अथवा सिग्नल वर विकतांना पाहायला मिळालं एका सिग्नल वरतीतर एक स्त्री प्रत्येक वाहनाच्या जवळ जाऊन कॅन, कप्स, रिकामे पाऊच जमा करुन आपली उपजिवीका चालवितांना दिसुन आली.

जालन्यासारख्या छोट्या शहरात बालपण गेल्यानंतर मी भारतातील अनेक शहर पाहिली पण तंत्रज्ञानाचा वापर, रहदारीची शिस्त अशी कुठेच पाहायला मिळालं नाही. पण ईतर काही मुद्दे आहेत ज्यामूळे भारतातील शहरं आवडतात. हळू हळू ह्या शहराची ओळख होत आहे, जसे जसे दिवस पुढे सरकत आहेत तसे तसे इथल्या लोकांची जीवन शैलीही समजत आहे.

माझा हा लांबच्या प्रवासाची ही तर सुरुवात आहे, यामध्ये येणारे काही अनुभव मी आपल्या सोबत माझ्या पुढील काही पोस्टमध्ये वाटेल.

धन्यवाद...

२ टिप्पण्या:

 1. छान, पुढील घटना जाणुन घेण्यास उत्सुक. थोडेफार फोटो टाकलेत तर मज्जा येईल

  अनिकेत
  http://manatale.wordpress.com

  उत्तर द्याहटवा
 2. धन्यवाद अनिकेत, नक्कीच पुढील काही पोस्ट मध्ये फोटो लावतो. काही तांत्रीक अडचणी मुळे थोडा उशीर होण्याची शक्यता आहे.

  पुन्हा भेटू...

  उत्तर द्याहटवा

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...