शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०१०

नवीन वर्षाच्या शुभेच्छा...

संपले हे वर्ष उरल्या फक्त आठवणी
नवीन वर्षाची स्वप्न आहे मनी,

विरले आता काळे ढग
समोर आहे मोकळे आकाश

अंधारलेल्या दिशा ही नाही
दिसतो आहे नवा प्रकाश,

करायची आहे संकटांवर मात
शोधायची आहे प्रगतीची वाट

आहेत नवे स्वप्न आणि नव्या इच्छा
माझ्या सर्व मित्रांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा...

सोमवार, २० डिसेंबर, २०१०

माझी शाळा

माझं बालपण व सर्व शिक्षण जालना या छोट्या शहरात झालं. आमचं जालना; अत्यंत लहान, शांत व साधं. माझे वडील बँकेत नोकरी करायचे. त्यांची नोकरी बदलीची होती व दर तीन ते चार वर्षांनी फिरती सुरू व्हायची आणि आम्हा भावंडांचे शिक्षण चांगले व्हावे म्हणून आम्ही जालन्यातच राहायचो आणि आम्हाला शहरातील सर्वात चांगल्या शाळेत दाखला देण्यात आला; "श्री सरस्वती भवन प्रशाला, जालना".

१९९१ मध्ये ५ वीला मी या शाळेत दाखल झालो, माझी मोठी बहीण आणि भाऊ अगोदरच या शाळेत होते. ही शाळा फक्त मराठी माध्यमातून होती. मुलांचा आणि मुलींचा विभाग ही वेगवेगळा होता. शाळेची इमारत मोठी,  प्रशस्त व ती शहराच्या मध्यभागी आहे. माझ्या घरापासून अंदाजे १ किमी वर ही शाळा होती, आम्ही चालतच शाळेत जायचो.

मला आजही आठवतो शाळेचा पहिला दिवस...

सकाळी ७ वाजता शाळा होती, मी जेव्हा शाळेत गेलो तेव्हा मला ५ [ब] या वर्गात बसवले मात्र हजेरीत माझं नाव आलं नाही तेव्हा मी जरा चिंतित झालो. थोड्याच वेळात "खडके बाई" आल्या आणि म्हणाल्या,

"तू चुकीच्या वर्गात बसला आहेस"

मग त्याच मला माझ्या वर्गात घेऊन गेल्या... ५ [अ] हा माझा खरा वर्ग. माझं  NCERT  असल्याने मला या वर्गात बसायचे होते. इथे माझं नाव हजेरी मध्ये ही आलं. मी खुप खुश होतो कारण माझा क्रमांक होता २.

या वर्गात आल्यावर खरी गम्मत सुरु झाली कारण वर्गात सगळी मुलं आपल्या उंची नुसार बसली होती आणि मी खुपच बुटका असल्याने मला पहिल्याच बाकावर बसायला जागा मिळाली. इथेच मिळाले मला पहिले वर्गमित्र "आशिष टापर" आणि "मंगेश लोखंडे". आम्ही तिघे वर्गातील सर्वात कमी उंचीचे विद्यार्थी होतो. पहिला दिवस अतिशय सामान्य गेला. आम्हा तिघांची एकमेकांशी ओळख झाली आणि काही शिक्षकांनी त्यांची ओळख करून दिली. मराठी विषय शिकविणाऱ्या तोट्टावार बाई आमच्या क्लास टीचर होत्या, त्याच हजेरी ही घ्यायच्या. या बाई खुप सुरेख मराठी शिकवायच्या मात्र खुप म्हणजे खुपच कडक शिस्तीच्या होत्या. वर्गात बोलणे, कुजबुजने वगैरे त्यांना बिलकुल खपायचे नाही.

दोन-तीन दिवसांनी एक नवीन विद्यार्थी आमच्या वर्गात आला. तो साधारण माझ्याच उंचीचा असल्याने त्याला माझ्या बाजूलाच बसायला जागा देण्यात आली तो होता "अमित महाजन." संपुर्ण दिवसभर आम्ही एकमेकांशी काहीच बोललो नाही, मात्र जेव्हा शाळा सुटली मी त्याला विचारले "तु कुठे राहतोस?" तो शहरात नवीन असल्याने त्याला पत्ता तंतोतंत माहीत नव्हता पण त्याने जे काही सांगितले त्यावरून आम्ही एकाच भागात राहतो हे माझ्या लक्षात आलं. आम्ही चालत चालत घरी निघालो, जसे जसे घर जवळ येत होत तसे तसे कळाले की आम्ही एकाच कॉलनी मध्ये राहतो. आश्चर्य म्हणजे आम्ही अगदी शेजारी शेजारी राहायचो होतो. एका दिवसापूर्वी ते इथे राहायला आले होते.

आम्हा दोघांची पक्की मैत्री जमली... :)

माझं ५ वी १० वी शिक्षण याच शाळेत झालं या पाच वर्षात मी सर्व काही केले, जसे अभ्यास (ठीक ठाक), खेळ, मस्ती आणि मैत्री

आज ही ब-याचश्या अशा गोष्टी आहे ज्या मला स्पष्ट आठवतात जसे आर. डी. देशपांडे सर :) यांना शाळेतील सगळे मुलं जाम घाबरायची. कारण त्यांची शिस्त अत्यंत कडक होती. कायम हातात एक रूळ घेऊनच ते फिरायचे, वर्गात टाचणी पडली तरी त्या आवाजाने कानाला त्रास होईल इतकी शांतता असायची.

हे सर इतिहास आणि भूगोल फार म्हणजे फारच अप्रतिम शिकवायचे. भूगोलाच्या तासात फळ्यावर संपुर्ण हिंदुस्थानचा नकाशा (१९४७ पूर्वीचा) काढायचे, सह्याद्री, हिमालय, गंगा नदी काढून दाखवायचे तर इतिहासाच्या तासात सांगितलेली अफझलखानाच्या वधाची गोष्ट मला आज ही आठवते. मी पाचवीला असतांना त्यांचे शाळेतले ते शेवटचं वर्ष होतं कारण त्याच वर्षी ते निवृत्त झाले.

इतर शिक्षक ही होते जसे खडके बाई, त्या विज्ञान खुपच सोप्पं करुन शिकवायच्या तर सोनटक्के सर सुंदर अशी चित्र काढायचे. गणिताचे शेळके सर खुपच साधे आणि सरळ होते, त्यांना कोणीच घाबरायचे नाही तर उलट त्यांची चेष्टा करायचे. ते बीजगणित छान शिकवायचे, मुलांचे लाड ही खुप करायचे, लिफ्ट मागितली तर स्व:ताच्या लुनावर घरी सोडायचे. तर शारिरीक शिक्षणाचे पठाडे सर दररोज प्रार्थना म्हणून घ्यायचे आणि अत्यंत कडक शिस्तीत वागवायचे. इंग्रजी विषयाची खूप धास्ती होती पण पोहेकर सर आणि व्ह. जी. कुलकर्णी सर इतके सहज शिकवायचे की पुस्तक उघडायचीही गरज पडायची नाही  lesson  असो वा  poem  लगेचच समजायची.

सर्व शिक्षकांनी अगदी मनापासून आम्हाला शिकवलं. या पाच वर्षात अंगाला एक शिस्त लावली, चांगल्या सवयी लावल्या. शैक्षणिक नव्हे तर योग्य असे वैयक्तिक मार्गदर्शनही केले. त्यावेळी सर्व शिक्षक मनापासून शिकवायचे. त्यांच्या शिकविण्याला व्यावसायिक झालर नव्हती. त्यांनी लावलेल्या शिस्तीचा आजही दैनंदिन जीवनात उपयोगाला येते. 

"आई-वडीलांप्रमाणे गुरू ही आपल्या आयुष्यात महत्वाची भुमिका बजावतो. त्या पाच वर्षात मी एक मातीचा गोळा होतो हा गोळा योग्य हाती लागल्याने आज त्या गोळ्यांला एक सुरेख आकार आला आहे."

१९९६ मध्ये माझे १० वी पुर्ण झाले आणि आता शाळा सुटून १४ वर्ष झाले असले तरी ह्या आठवणी सुटत नाही. मला आता जालना सोडुनही जवळपास १० वर्ष होत आली आहेत पण आजही वाटतं की जुन्या वर्ग मित्रांना घेऊन जावं आपल्या शाळेत...

शोधावा आपला वर्ग, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी ला सजवावा तो. दिवाळीत किल्ला बांधावा. मैदानातल्या झाडाखाली बसून डब्बा खाऊ आणि गेट बाहेरचा बर्फ गोळा घेऊ.

पण आयुष्य चालतच राहतं ते कोणासाठी ही थांबत नाही. आमच्या सगळ्यांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या आहेत. आज कोणी कुठे तर कोणी कुठे???

आज मला काही वर्गमित्र आठवतात त्यातले काही भेटतात तर काही हरवले आहेत. अनिकेत दाबके, राकेश माने आणि रघुवीर कुलकर्णी हे वर्ग मित्र भेटतात, कधी फोनवर तर कधी ऑनलाईन...

आशिष टापर, अमित महाजन, सुधीर देशपांडे, अमित देशपांडे, महेश देशपांडे, नितिन देशपांडे, दिपक बोर्डे, विवेक दसरे, संदीप वाखारकर, अभिजीत शिंदे, सचिन पवार, ललीत कोलते, निखील आगटे.

मित्रांनो कुठे आहात तुम्ही? कसे आहात तुम्ही?

जगावसं वाटतात ना पुन्हा ते क्षण, चला तर मग ताज्या करूयात त्या आठवणी... :)

तुमचा मित्र

नागेश देशपांडे

सोमवार, १३ डिसेंबर, २०१०

केल्याने होत आहे रे...

शनिवारी सकाळी उठवल्यावर करण्यासारखं काहीच नव्हतं, खूप कंटाळा आला होता. मोठा प्रश्न समोर होता की, आज काय करायचं?


तसा एक Status मी Facebook वरही पोस्ट केला...

"Nothing is happening here, waiting for something to happen"

काही वेळातच मित्र आशिष Reply आला "केल्याने होत आहे रे !!"

लगेचच सकाळची कामं उरकून आम्ही (मी, दिनेश आणि समीर) मेलरोज मंदीर (Melrose Temple) येथे जायचे ठरवले. मेलरोज एक हिंदु मंदीर आहे, येथे स्थायीक झालेल्या भारतीय लोकांनी बांधले आहे. हा भाग अत्यंत शांत व निर्जन आहे. आमच्या अपार्टमेंट पासून अंदाजे १० किमीवर हे मंदीर आहे. रस्ता अत्यंत सुंदर मात्र अरूंद आहे, रस्त्याच्या दोन्ही बाजूस खुप हिरवळ पाहायला मिळाली.

(c) Nagesh Deshpande
इतर सामान्य रस्त्याप्रमाणे या ही रस्त्यावर शिस्तबद्ध वाहतूक सुरू होती. त्यातच एका सिग्नलवर एक युवक काही पेंटीग्स विकतांना दिसला. अत्यंत सुरेख असे पाणी भरणा-या दोन स्त्रियांचे हे चित्र आम्हाला खुप आवडलं.

(c) Nagesh Deshpande
 मी प्रथमच या भागात जात होतो, समीर आणि दिनेश यापुर्वीही गेले होते मात्र रस्ता न चुकावा या हेतूने GPS चा वापर करायचं ठरलं आणि त्याने दगा दिला. चुकीचा रस्त्यावर घेऊन गेला, शेवटी समीरनेच रस्ता शोधला आणि या मंदीरात येऊन पोहचलो. हे मंदीर बाहेरून अत्यंत साध आहे.


(c) Nagesh Deshpande

मात्र ईथे आम्हाला जवळपास सगळेच देव भेटले...देवदर्शन घेऊन आम्ही परत अपार्टमेंटमध्ये आलो तेव्हा दुपार झाली होती. खूप ढग दाटून आले होते, अत्यंत मुसळधार पाऊस येणार हे नक्की होतं म्हणून घरातच बसायचं ठरलं. अंदाजाप्रमाणे काही वेळातच मुसळधार पाऊस सुरू झाला.


या पावसामूळे हवेत गारवा आला खरा पण हा गारवा मिलींद ईंगळेच्या गारव्याशी किंचीत ही मिळता जूळता नव्हता, हा गारवा म्हणजे गारठा... :)

थोड्यावेळातच हा गारठा असह्य झाला त्यामुळे घरातून बाहेर पडायचं ठरलं पाऊस विजेच्या कडकडासह, अत्यंत मुसळधार सुरू होता आम्ही तसेच बाहेर पडलो कार मध्ये बसून गाठलं सर्वांचे आवडीचे ठिकाण Monte Casino. हे अत्यंत लोकप्रिय असे ठिकाण आहे ईथे जवळपास सगळ्याच चैनी करता येतात. ईथे सगळ्या वयोगटाची मंडळी पडीक असतात. सर्वांसाठी ईथे काही ना काही आहे. त्यातच ख्रिसमस जवळ आल्यामूळे आणखीच धूम होती.
नावाप्रमाणे येथे एक जुगारखाना आहे, दक्षीण आफ्रिकामध्ये जुगाराला सरकारी मान्यता असल्याने पैसा येथे पाण्याप्रमाणे (किंवा त्याहून अधीक) वाहतांना दिसत होता. ईथे खान्यापिण्याची ही खूप मौज आहे, त्याच प्रमाणे शॉपींग मॉल, लहान मुलांचे खेळ असे अनेक मनोरंजनाचे साधन ईथे आहेत. पण मुख्य आमचा ईथे येण्याचा उद्देश होता एखादा सिनेमा बघण्याचा. प्रथम आम्ही एखादा हिंदी सिनेमा पाहावा असा विचार केला आणि तिकीट काऊंटर जवळ गेलो मात्र सिनेमांची नावं वाचून अंगावर काटाच आला, नको म्हंटल आणि त्याएवजी ब्रुस विलीस चा RED हा इंग्रजी action comedy सिनेमा पाहायचं ठरलं.


Image from Internet
 हा सिनेमा CIA मधून निवृत्त झालेल्या मात्र तितकेच कर्तव्यदक्ष किंवा धोकादायक अशा काही अधीका-यांच्या बद्दल आहे. काही रजनीकांत दृश्य ही या सिनेमामध्ये आहेत. तुम्ही देखील हा सिनेमा पाहायला हरकत नाही.

बाहेर पडणारा पाऊस व त्यामूळे जाणवणारा गारठा आतमध्ये थोडाही जाणवला नव्हता. रात्रीचे ११ वाजता सिनेमा संपला तरीही ईथे गर्दी काही कमी झाली नव्हती, घरी परत येतांना रस्ते मात्र निर्जन पडले होते. रस्त्यांवर तुरळक वाहतूक होती.


 अशारितीने आम्ही सुरुवातीला अगदी "Nothing happening" वाटणारा दिवसाचा शेवट अत्यंत "Happening :)" केला...

शुक्रवार, १० डिसेंबर, २०१०

तमन्ना-ए-व्हिसा

आज अचानक ऑफीसमध्ये व्हिसा संपत आलेल्या लोकांना एक न्यूज मिळाली.


"संध्याकाळपर्यंत भारतासाठी रवाना व्हायचे आहे..."

मात्र दुपार पर्यंत हे स्वप्न भंग झाले, आनंदावर विरजण पडलं आणि १० मिनिटात ही कविता जन्माला आली...तमन्ना-ए-व्हिसा (कवी: समीर)जिंदगी ने एक रूमानी एहसास करा दिया,

अपने घर जाने का सपना दिखा दिया.

जाने की हर घडी मानो नजदीक आ रही थी,

तब एक जालिम उस हसीन सपने को तोड गया.अब बैठे हैं मूह को लटकाके यारा,

सपने के टूंटे कांच जोडते बार बार.

घरवालों की याद का टुकडा उठाया है अब,

आँसू की एक बूंद टपकने के लिये तैयार.अब जगह से उठने की इच्छा नही,

ना है काम करने का कोई इरादा.

इष्क छूटने पर ये हालत हुआ करती थी पहले,

आज असर भी वही है, जब टूटा है ये वादा.तसव्वर कहो या सपना कहो,

उसके टूटने की आवाज तो होती नही

नाम है दो, पर असर वही एक,

बस उस दर्द का कोइ दूजा नाम नही.घर जाना है हमे, चीखते रहे यारा

ना सुनी किसीने अर्ज़ हमारी, बस रोते रहे यारा.

बैठते हैं आज अपनों की मेहेफ़िल मे

नशे से भर देते हैं दिल, भरा है अभी जिसमे गम सारा.

बुधवार, ८ डिसेंबर, २०१०

सँडविच आणि मैत्री

स्वयंपाक मला जमत नाही आणि स्वयंपाक करणे किती अवघड आहे हे मला जोहान्सबर्गला आल्यावर कळालं. गेल्या रविवारी मी बनविलेल्या सँडविचमुळे मला १२ वर्षापुर्वीचा एक किस्सा आठवला. दोन्ही वेळी मला एक चांगला मित्र मिळाला त्यामूळे हे दोन्ही दिवस मी आयुष्यात कधीही विसरणार नाही.


सौजन्य: आंतरजाल
 अंदाजे १२ वर्षापुर्वी जेव्हा मी कॉलेजध्ये होतो त्याच वेळी माझा मित्र वैभव नांदेडला एम.बी.बी.एस करत होता. तो सकाळी सकाळी जेव्हा त्याच्या घरी पोहचला तेव्हा त्याच्या घरचे सगळे बाहेरगावी गेले होते. शेजारून चावी घेऊन त्याने घर उघडलं आणि मला आणि निलेशला फोन केला. जेव्हा आम्ही त्याच्या घरी पोहचलो तेव्हा सगळ्यांना खुप भुक लागली होती. घरात शोधाशोध केल्यावर एक ब्रेडचा पुडा, बटाटे या शिवाय काहीच सापडले नाही. मग मी ते बटाटे उकडले, ते मॅश करून त्यामध्ये काळमीठ, जिरेपूड मिक्स केले. हे सगळे मिश्रण ब्रेडमध्ये भरलं आणि गरम करुन सगळ्यांनी मिळून खाल्ले. वैभव आणि निलेशच्या चेह-यावरचा आनंद मला आजही आठवतो.

आज आमच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या आहेत. वैभव आता डॉ. वैभव झाला आहे तर निलेश ही कॉम्पुटर प्रोफेशनल झाला आहे. तो दिवस आजही आम्हाला आठवतो, फोन वर किंवा ऑनलाईन भेटलो तर नक्की यावर चर्चा करतो.

गेल्या रविवारीही असच काहीसं घडलं आम्ही (मी आणि समीर) फ्लॅटमध्ये आराम करत होतो, दुपारी भुक लागली म्हणून सँडविच करायचे ठरवलं. मी दोन अंडी उकडले. ती मॅश करून त्यामध्ये बारिक चिरलेला कांदा, शेंगदाणा कुट, थोडे तिखट घातले. हे मिश्रण ब्रेड मध्ये भरले आणि दोघांनी मिळून खाल्ले. समीर खुप खुश झाला.

दोन्ही ही वेळी मित्रांच्या चहे-यावर दिसलेला आनंद मी विसरू शकणार नाही, अशा छोट्या छोट्या क्षणांना मनात जपून ठेवत आमचा प्रवास सुरू आहे, जेव्हा आमच्यापैकी कोणीही सँडविच खातो तेव्हा या क्षणांनाही आठवतो...

सोमवार, ६ डिसेंबर, २०१०

जालना ते जोहान्सबर्ग

१० नोव्हेंबर २०१० कधीही विचार न केलेला दिवस उजाडला तेव्हा मी आकाशात २० हजार फूटावरती होतो. सकाळी ११ (भारतीय वेळेनुसार) मी जोहान्सबर्ग विमानतळावर पोहोचलो. पहिलीच परदेशवारी आणि पहिलाच विमान प्रवास त्यामूळे मी खूप उत्साही होतो, आनंदही गगनात मावत नव्हता. विमानतळावर मला घ्यायला ऑफीसचा ड्रायवर आला होता मी माझी बॅग घेतली आणि माझा या शहराचा अनुभव घ्यायला सुरुवात केली. जोहान्सबर्ग हे अतिशय सुंदर शहर आहे. दक्षीण आफ्रिकेची आर्थिक राजधानी, फिफा विश्वचषकामुळे शहराचा झालेला विकास स्पष्ट दिसून येत होता. स्वच्छ, मोठं मोठे रस्ते, मेट्रो रेल्वे आणि महत्वाच्या कंपन्यांचे कार्यालय दिसून येत होती.

जोहान्सबर्ग मध्ये हाईड पार्क या भागात असलेल्या कंपनीच्या अपार्टमेंट मध्ये माझी राहण्याची व्यवस्था झाली. हा भाग अतिशय शांत तरीही रहदारीचा आहे. या अपार्टमेंट मध्ये जवळपास सगळे माझ्या कंपनीचेच लोक राहतात, त्यापैकी बहुतेक जणांना मी पुण्यात असतांना भेटलो होतो त्यामूळे ही जागा मला नविन अशी वाटली नाही. दुस-याच दिवशी कामाला सुरुवात झाली, राहण्याच्या जागेपासुन ५ किमी वरती माझे ऑफीस आहे. ईथे आल्यावर आणखी मंडळींची भेट झाली जे दुस-या अपार्टमेंट मध्ये राहतात.

शहर फारसे सुरक्षित नसल्याने दररोज ऑफीस ते घर हा प्रवास कारने करावा लागतो कारण दुसरा कोणताही पर्याय नाही. मला कार चालवता येत नसल्याने मी प्रवाशाची भुमीका बजावतो. दररोज हा छोटासा प्रवास करतांना ब-याचश्या गोष्टी जाणवल्या त्याम्हणजे वाहनांचा वेग, रहदारी, वाहन चालविण्याची शिस्त. सगळ्यात जास्त जाणवले ते म्हणजे नविन तंत्रज्ञानाचा वापर जसे सर्व अपार्टमेंटच्या भितींना विजेची कुंपण आहेत, सर्व दरवाजे रिमोटने उघडतात आणि बंद होतात. प्रत्येक सिग्नलवर कॅमेरा व स्पीडगन आहे. नियमांचा भंग झाल्यास घरपोच दंडाची पावती येते त्यामूळे सगळे चालक वाहन चालवितांना नियम काटेकोरपणे पाळतात.

एक दोन आठवड्या आणखी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे गरिबी आणि श्रीमंती यामधील अंतर... ऑफीसला जातांना बरेच सिग्नल आणि चौक लागतात. मोठ्या चौकात सिग्नल असतात तर लहान चौकात फक्त STOP असा बोर्ड असतो. या बोर्ड जवळ आल्यावर सगळ्या वाहनांना थांबणे बंधनकारक आहे. थांबुन आजु बाजुला पाहायचे आणि मगच पुढे जायचे असा नियम आहे. अश्या या चौकात काही स्त्रिया व पुरूष वर्तमानपत्र, टोपी, चष्मे अथवा मोबाईलचे चार्जर विकतांना दिसुन येतात. तर काही चौकात नोकरी हवी आहे, प्लंबीग, माळी काम करून मिळेल असे बोर्ड घेऊन बसलेल पुरूष दिसुन येतात. ऎरवी मोफत मिळणारे वर्तमानपत्र चौकात अथवा सिग्नल वर विकतांना पाहायला मिळालं एका सिग्नल वरतीतर एक स्त्री प्रत्येक वाहनाच्या जवळ जाऊन कॅन, कप्स, रिकामे पाऊच जमा करुन आपली उपजिवीका चालवितांना दिसुन आली.

जालन्यासारख्या छोट्या शहरात बालपण गेल्यानंतर मी भारतातील अनेक शहर पाहिली पण तंत्रज्ञानाचा वापर, रहदारीची शिस्त अशी कुठेच पाहायला मिळालं नाही. पण ईतर काही मुद्दे आहेत ज्यामूळे भारतातील शहरं आवडतात. हळू हळू ह्या शहराची ओळख होत आहे, जसे जसे दिवस पुढे सरकत आहेत तसे तसे इथल्या लोकांची जीवन शैलीही समजत आहे.

माझा हा लांबच्या प्रवासाची ही तर सुरुवात आहे, यामध्ये येणारे काही अनुभव मी आपल्या सोबत माझ्या पुढील काही पोस्टमध्ये वाटेल.

धन्यवाद...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...