रविवार, १९ सप्टेंबर, २०१०

अतिथी देवो भव: ????

माझी आजी रात्री झोपण्याआधी खात्री करून घ्यायची की घरात एखादी तरी पोळी शिल्लक आहे, तसेच माझी आई ही करायची. असे करण्याचा तिचा उद्देश आम्हाला लहानपणी समजत नसे पण थोडे मोठं झाल्यावर तिनेच आम्हाला सांगीतले की एखादी व्यक्ती (पाहुणा) अवेळी आलीच तर त्याचा पाहुणचार करता यावा, घरी येणारा पाहुणा हा आपल्या घरातून जातांना समाधानी होऊन जावा यासारखं दुसरं सुख नाही. कारण अतिथी देवो भव: म्हणजे पाहुणा देवा समान, अशी ही परंपरा असलेला आपला देश खरंच खूप महान आहे.

आता माझा एक प्रश्न आहे की, समजा तुम्ही तुमच्या घरातील (दररोजची) देवपूजा करत असाल किंवा एखादे स्तोत्र म्हणत असाल आणि त्याच वेळी एखादा पाहुणा आला तर तुम्ही काय कराल? कारण हा आलेला पाहुणा देवा सारखाच आहे आणि समोर ही देव आहे.

मला आलेले दोन अनुभव:

१) आमचे एक नातेवाईक आहेत (मुद्दाम जास्त तपशीलात जात नाही) यांच्या घरी १२ महिने १८ काळ किंवा आजच्या भाषेत सांगायचे तर २४X७X३६५ जप चालू असतो अगदी रात्री सगळे झोपले तरी टेप चालू असतो. यांच्या घरी गेलं की गप्पा, विचारपूस अगदी कमी फक्त जप चालू. आपण जास्त वेळ थांबलो की एक जपमाळ आपल्यालाही दिली जाते आणि आपणही जप करत बसायचं. आता असे असेल तर यांच्या घरी कोण जात असेल का याचा विचार करा. कारण लहानपणी आई-बाबा जेव्हा त्यांच्याकडे जायचं ठरवायचे तेव्हा आम्ही घरी एकटेच राहतो तुम्हीच त्यांच्याकडे जा असे म्हणायचो.

२) जेव्हा माझे लग्न ठरले तेव्हा पत्रिका देण्यासाठी मी एका घरी गेलो तेव्हा कुटुंबप्रमुख देवपूजा करत होते. मी पत्रिका त्यांच्या सौभाग्यवतीच्या हातात दिली आणि पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. आता मला त्या कुटुंब प्रमुखाला नमस्कार करायचा होता मात्र मला त्यासाठी अर्धा तास वाट पहायला लागली आणि त्यानंतरही मी दूरूनच नमस्कार केला व मी त्यांचा निरोप घेतला.

आता तुम्ही स्वत:ला दोन्ही परिस्थितीत ठेवून (म्हणजे यजमान आणि अतिथी) सांगा की तुम्ही काय केलं असतं?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...