शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०१०

ओळख रुपयाची...

१५ जुलै २०१० रोजी भारतीय रुपयाच्या प्रतिक चिन्हास केंद्रीय मंत्री मंडळाने मान्यता दिली.

अतिशय सुंदर अशा ह्या चिन्हाने काही दिवसात प्रसिद्धी मिळाली आणि वर्तमानपत्र, जाहिराती आणि बिझनेस चॅनलवर दिसून येऊ लागले.
मात्र मागच्या आठवड्यात एक ई-मेलद्वारे याच रुपयाच्या चिन्हाचे एक व्यंगचित्र पाहायला मिळाले.

(चित्र सौजन्य: आंतरजाल) 
हे व्यंगचित्र ही बनविण्या-याने अत्यंत उत्तमरीत्या रेखाटले आहे. या मध्ये आपल्या देशात असलेल्या सत्य परिस्थितीचे दर्शन घडविलं आहे. ज्या पद्धतीने श्रीमंत हे खूप श्रीमंत होत आहेत आणि गरीब हे गरीबच राहिले आहेत तर मध्यमवर्गीय अडीअडचणीत त्यांचे जीवन जगत आहेत याच कडू सत्याची जाणीव करुन दिली आहे.

गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत याच्यात किती अंतर आहे याबद्दलचा मला आलेला एक अनुभव.

माझ्या ऑफीस मध्ये काम करणारा सतीश (नाव बदलले) हा मुळचा प. बंगालच्या एका गावातला, तर रवी (नाव बदलले) मुंबईत लहानाचा मोठा झालेला. सतीश कधी कधीच सुट्टी घेऊन त्याच्या घरी जायचा. मात्र जेव्हा तो सुट्टी घ्यायचा ती सलग १५-२० दिवसाची. काही दिवसापूर्वी जेव्हा सतीश सुट्टी घेऊन गावी गेला. तेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला फोन केला आणि त्याची चौकशी केली व येतांना सोबत काय काय घेऊन येतोस अशी विचारणा सुरु केली. त्यावर रवी म्हणाला काही नाहीतरी कमीत कमी "डेअरी मिल्क" तरी आण. सर्वांशी बोलुन झाल्यावर फोन बंद केला.


आमच्या पैकी एकजण रवी ला म्हणाला, " अरे, सतीशचं गाव एकदम लहान आहे. तिथे डेअरी मिल्क नाही मिळणार."


त्यावर रवी एकदम आश्चर्यचकीत झाला आणि म्हणाला, "मला नाही वाटत की भारतातील एकाही गावात डेअरी मिल्क मिळत नसेल."

त्याच्या ह्या अशा बोलण्याचं आम्हाला काहीच आश्चर्य वाटलं नाही कारण त्यात त्याची काहीच चूक नव्हती त्याचं सगळं बालपण, शिक्षण मुंबईतील एका श्रीमंत घरात झालं होतं आणि तो आमच्या एम. डी. चा मित्र होता. केवळ पोस्टग्रजुएशन पुर्ण करण्यासाठी कराव्या लागणा-या प्रोजेक्टसाठी तो ऑफीसमध्ये यायचा.

त्याला हे देखील माहिती नव्हतं की त्याच्या घरापासून फक्त काही किमी वर असणाऱ्या गावात भर पावसाळ्यातही पिण्याचे पाणी उपलब्ध नाही आणि त्यासाठी पाण्याचे हंडे डोक्यावर घेऊन माणसं आणि बायका कितीतरी लांब पायपीट करतांना दिसतात.

हेच सत्य आहे, या रुपयाच्या चिन्हाचे विडंबन करणा-याचे काहीच चुकले नाही. त्याने फक्त काचेवरील धुळ स्वच्छ केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...