बुधवार, १५ सप्टेंबर, २०१०

क्रिकेट आणि माझी आवड

परवा विशाल चा ब्लॉग वाचला आणि वाटलं की आपणही क्रिकेटवर लिहावं. नक्की नाही आठवत पण काहीतरी १९९०-९१ मध्ये मला हा खेळ समजू लागला (एकदिवसीय). तेव्हा दूरदर्शन ज्या काही मॅचेस दाखविल्या जायच्या आणि त्याच मोठ्या उत्साहात पाहिलेल्या आजही आठवतात. १९९३-९४ च्या मौसमात मला कसोटी क्रिकेट समजायला लागलं

पहिल्यांदा जेव्हा मी क्रिकेटबद्दल एकले तेव्हा तो जमाना होता तो सुनिल गावस्कर, रवी शास्त्री, अ‍ॅलन बॉर्डर, विव रिचर्डसचा पण त्यांची एकही खेळी काही पाहायला मिळाली नाही, फक्त मोठ्यांच्या बोलण्यात या सर्वांचा उल्लेख ऎकला होता. आजही आठवते जेव्हा माझ्या वडीलांनी मला सांगितले होते की १९८६ मध्ये रवी शास्त्री ने ऑस्ट्रेलिया मध्ये ऑडी कार कशी जिंकली होती ते,  पण १९९०-९१ पर्यंत ही सगळी रिटायरमेंट आली होती किंवा झाली होती. त्यामुळे यापैकी कोणीही माझ्या आवडत्या क्रिकेटपटू मध्ये सामील होऊ शकलं नाही.

माझा पहिला आवडता क्रिकेटपटू होता तो म्हणजे ऑस्ट्रेलियाचा ओपनर "डेव्हिड बुन".
सौजन्य: आंतरजाल

लठ्ठ, बुटका आणि भरगच्च मिश्या असा दिसणारा हा खेळाडू व्यवसायाने खाटीक पण क्रिकेट अप्रतीम खेळायचा. त्याचा मिडविकेट/मिडऑन वरुन मारलेला फटका मला फार आवडायचा. पण त्याची एकही विशिष्ट खेळी आठवत नाही आणि तो काही दिवसात रिटायर झाल्याने तो फक्त काही दिवसच माझ्या या यादीत राहीला.

नंतर माझ्या या यादीत सामील झाला तो सा-या जगाच्या गळ्यातील ताईत "सचिन तेंडुलकर" याच्या बद्दल आता मी काही लिहायचं म्हणजे सुर्यासमोर दिवा घेऊन जाण्यासारखं ठरेल.
सौजन्य: आंतरजाल

आवडती खेळी: सचिन काढलेला प्रत्येक रन हा आवडता आहे पण तरीही सांगायचे म्हंटले तर
१) ९८ विरुद्ध पाकिस्तान २००३ विश्वचषक
२) १०३ विरुद्ध इंग्लंड चेन्नई कसोटी २००८

लहानपणी मी जेव्हा क्रिकेट खेळायचो, तेव्हा मला फलंदाजी करायलाच आवडायची मात्र गोलंदाजी विशेष म्हणजे फिरकीच्या प्रेमात पाडले ते माझ्या पुढच्या आवडत्या क्रिकेटपटुने "शेन वॉर्न"
सौजन्य: आंतरजाल

माझ्यासाठी हा एकटाच असा क्रिकेटपटू आहे ज्याने सिद्ध केले की तो फिरकीचा डॉन आहे. तो जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा तो एखादी जादू किंवा एक सुंदर चित्र काढतो आहे असेच मला वाटायचे. त्याचे वळणारे चेंडु, त्यांची फलंदाजाच्या मेंदूत शिरून चेंडू टाकण्याची कुशलता ही अद्वितीय होती आणि राहणार. हा कधीही वातावरण, खेळपट्टी यावर विसंबून नसायचा आणि प्रत्येक उपखंडात उत्तम कामगिरी केली.

मी शेन वॉर्नचा एवढा प्रचंड चाहता होतो की बरेच काळासाठी शाळेत क्रिकेट खेळतांना अगदी त्याच्यासारखीच गोलंदाजी करायचो.

आवडती खेळी: संपुर्ण कसोटी मालिका विरुद्ध पाकिस्तान २००२-०३ (कोलंबो/शारजाह)

माझे हे फिरकी बद्दलचे प्रेमाने मला आणखी एका खेळाडुकडे आकर्षित केले तो म्हणजे "अनिल कुंबळे"
सौजन्य: आंतरजाल

अतिशय प्रतिभावान, मात्र मला कमी उल्लेखलेला असा हा खेळाडू खूपच मेहनती. चिकाटी, आत्मविश्वास अशा गुणांचा धनी होता. या एक गोष्ट मला आवडायची मैदानात एकच चुक हा कधीही दोनदा नाही करायचा. १९९८-९९ जेव्हा भारतीय टीम ऑस्ट्रेलियामध्ये गेली तेव्हा कुंबळे संपुर्ण अपयशी ठरला मात्र पुढच्याच दौ-या सर्वात जास्त बळी घेऊन परतला. अशा या हि-याने १९९४ मध्ये हिरो कप फायनल मधील १२ धावात ६ बळी हे रेकॉर्ड केले व ते अजुनपर्यंत कोणीही मोडु शकलं नाही.

आवडती खेळी: अर्थातच ७४ धावात १० बळी विरुद्ध पाकिस्तान
सौजन्य: युट्युब.कॉम

१९९७ मध्ये मी कॉलेजला गेलो आणि माझी गोलंदाजीची शैली बदलली मी वेगवान गोलंदाजी करु लागलो आणि माझे प्रेरणा स्थान होते तो म्हणजे माझा आवडता वेगवान गोलंदाज आणि जो आजही आहे तो म्हणजे वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू "कर्टली अंब्रोस".
सौजन्य: आंतरजाल

याची गोलंदाजी म्हणजे ख-या अर्थाने भेदक, धारदार आणि घातक वाटायची. अगदी सहज धावत येऊन जलद गोलंदाजी करणारा हा खेळाडु, फलंदाजाच्या मनात धडकी भरायची. अंब्रोस रिटायर झाला आणि भेदक गोलंदाजीचा अस्त झाला असेच मी म्हणतो कारण त्यानंतर आलेले सर्व वेगवान हे नुसतेच वेगवान आहेत. त्यांना खेळतांना कोणत्याच फलंदाजाला भिती वाटत आहे असे कधीच वाटले नाही. अंब्रोसचा टप्पा हा अचूक असायचा. सगळ्यात जास्त आवडायची ती त्याची अपील करायची स्टाईल आणि विकेट घेतल्यानंतर झालेला आनंद साजरा करण्याची पद्धत.

आवडती खेळी: ८ ओव्हरमध्ये १२ रन देत १ बळी विरुद्ध पाकिस्तान, सेंट विन्सेंट (या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तान २१४ धावाचा पाठलाग करत असतांना रिऑन किंगच्या सोबतीने अंब्रोसने पहिल्या ५ ओव्हर मेडन टाकल्या होत्या.)

फलंदाजांत माझा पुढचा आवडता खेळाडु म्हणजे डावखुरा "मॅथ्यु हेडन" हातात बॅट ऐवजी गदा घेऊन खेळायला उतरला आहे असेच वाटते.
सौजन्य: आंतरजाल
 १९९८ मध्ये भारताविरुद्ध संघात पक्के स्थान करणा-या ह्या खेळाडूने कधीच मागे वळून पाहिले नाही. कसोटी, एकदिवसीय अशा दोन्ही फॉरमॅट मध्ये सातत्याने खेळ करीत हेडन आता रिटायर झाला. माझ्यासाठी हेडन सर्वोत्कृष्ट ऑन ड्राईव्ह मारणारा डावखुरा फलंदाज आहे.

आवडती खेळी: ६८ चेंडुत १०१ विरुद्ध दक्षीण आफ्रिका २००७ विश्वचषक.
या सामन्याच्या दिवशी एक गंमत झाली, मी आणि माझा मोठा भाऊ मुलुंड ला एका मॉल मध्ये शॉपींग साठी गेलो होतो. बरीच शॉपींग झाल्यावर आम्हाला काही कूपन्स मिळाली ज्या मध्ये आजच्या सामन्याचा विजेता संघ आणि मॅन ऑफ द मॅच कोण ठरेल हे सांगायचे होते. दुर्दैवाने आम्ही दोघे हेडनला विसरलो आणि इतर नावं लिहुन दिली. ही मॅच हेडनने एकहाती जिंकून दिली.

मला टी-२०, एकदिवसीय क्रिकेट कितीतरी अधिक पटीने कसोटी क्रिकेट आवडते. ह्या झटपट जमान्यात जरा विचित्र आहे पण सत्य आहे. पाच दिवसानंतर येणारा निकाल हा जास्त चांगला वाटतो. कसोटी हा असा खेळ प्रकार आहे की ज्यामध्ये नावाप्रमाणे कसोटी लागते. त्यामुळे एखाद्या खेळाडूने एखादे रेकॉर्ड कसोटीत केले असेल तर माझे त्याच्याकडे विशेष लक्ष असते.

असाच एक रेकॉर्ड बहाद्दर माझा पुढचा आवडता खेळाडू आहे तो म्हणजे न्यूझीलंडचा "नॅथन अ‍ॅस्टल".
सौजन्य: आंतरजाल

ह्या खेळाडुने मला नेहमीच आकर्षीत केले आहे. त्याचा सहज सुंदर खेळ मला फार आवडायचा. कसोटी प्रमाणे एकदिवसीय सामन्यातही अ‍ॅस्टल तितकाच उपयोगी ठरायचा कारण तो एक उत्तम अष्टपैलू खेळाडू होता. २००१-०२ मध्ये ख्राईसचर्चमध्ये खेळलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत केलेली खेळी आज माझ्या स्मरणात आहे. आणि हिच खेळी माझी अ‍ॅस्टलची आवडती खेळी आहे. ह्या मॅचचा दिवस मला आजही आठवतो.

न्यूझीलंडमधील मॅच भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० ला सुरु होते. आणि त्यादिवशी मला आपोआप जाग आली, एवढ्या सकाळी टि.व्ही. लावला तर वडीलांना खूप राग यायचा मात्र अ‍ॅस्टल असा काही खेळला की त्यांचा राग शांत झाला.

आज जरी हे सगळे खेळाडू (सचिन सोडून) रिटायर झाले असले तरी मला हेच आवडतात.

६ टिप्पण्या:

 1. खूप मेहनत घेतली आहे पोस्टवर...त्यामुळेच एक छान लेख बनला आहे...!!!

  जर तुम्हाला कसोटी आवडत असेल तर तुम्ही द्रविडला कसे विसरला? राहुल द्रविड मला खूप आवडतो...I missed him...:-o

  उत्तर द्याहटवा
 2. नॅथन ऍस्टल फेवरेट आहे, त्याने जे अद्वितीय द्वि शतक लगावले होते इंग्लंड विरुद्ध त्याला तोड नव्हती.. मजा यायची त्याची बॅटिंग बघायला

  उत्तर द्याहटवा
 3. धन्यवाद, संगमनाथ.

  माझ्या ब्लॉग तुमचे स्वागत.
  द्रवीड हा सुद्धा एक उत्तम खेळाडू आहे. त्याच्या जवळपास सगळ्याच खेळी ह्या सहज सुंदर आहेत. मला तो आवडत नाही असे काहीच नाही. ऑस्ट्रेलिया वि. कोलकाता मध्ये केलेले १८० रन एक नंबर.

  उत्तर द्याहटवा
 4. बरोबर आहे गौरव,

  मला आठवते त्या मॅच दिवशी जेव्हा जाग आली तेव्हा नॅथन ऍस्टल ८९ वर खेळत होता, सोबती तळाचा फलंदाज होता, मला वाटलं चला संपली आता मॅच. पण साहेबांनी काय केले हे सा-या जगाने पाहिले.

  उत्तर द्याहटवा
 5. छान लिहीले आहेस रे. अभ्यास दिसतोय पोस्टमधुन. बादवे बुन माझाही अतिशय आवडता खेळाडु. आपण द्रवीडला वॊल म्हणतो..पण बुन खरी अभेद्य भिंत होता. एकदा टिकला की मग त्याला परत पाठवणे कठीण व्हायचे. धन्स!

  उत्तर द्याहटवा

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...