गुरुवार, ३० सप्टेंबर, २०१०

आम्ही मराठी ब्लॉगर्स!

प्रिय वाचक

आम्ही सर्व आहोत मराठी ब्लॉगर्स आपला ब्लॉग लोगो येथे लावण्यासाठी मला तुमचा विजेड कोड ई-मेल करा.

संपर्कBhunga- the social insect!Bedhund!Marathi Mandali!akshare!AnukshreMazi Sahyabhramanti!Ragda Pattiesब्लॉग सोहमचा
Marathi Greetings!

रविवार, २६ सप्टेंबर, २०१०

जीमेल + ट्विटर + फेसबूक

आजकाल आपण सगळेच सोशल नेटवर्किंग वेबसाईट्स वापरतो. मात्र काही ऑफीसमधे मध्ये ट्विटर, फेसबूक आणि ब्लॉगर वापरता येत नाही किंवा आपल्याला ह्या साईटवर जाण्याचा वेळ नसतो. आणि नेमकं तेव्हाच तुम्हाला एखादा छान विचार किंवा एखादी सुंदर कल्पना सुचली तर तुम्ही काय करणार?

सोप्पं आहे... ऑफीसमध्ये राहूनही तुम्ही तुमचे हे विचार किंवा कल्पना तुमच्या सगळ्या मित्रा पर्यंत किंवा वाचकापर्यंत पोहचवू शकता. यासाठी फक्त पाहिजे जीटॉल्क किंवा जीमेल चा अ‍ॅक्सेस...

आजकाल बऱ्याचशा ऑफीसमध्ये जीटॉल्क वापरण्याची मुभा असते. खाली सांगत आहे तशी कृती करा.

प्रथम ही वेबसाईट उघडा.  https://www.tweet.im/


येथे तुम्ही जीटॉल्क आणि  ट्विटर एकमेकांशी जोडू शकता


म्हणजेच या वेबसाइटद्वारे तुम्ही तुमचे विचार IMद्वारे ट्विटर पाठवू शकता.


या साईटवर साईन अप करामग तुम्हाला (yourtwittername@twitter.tweet.in) असा एक पत्ता मिळेल हा पत्ता तुम्ही तुमच्या जीटॉल्क मध्ये सेव्ह करायचा म्हणजे झालं काम...


त्यानंतर तुम्ही जायचं तुमच्या फेसबूक वर आणि उघडायचं हे पेज (http://apps.facebook.com/twitter/) आणि साध्या पद्धतीने आपलं ट्विटर आणि फेसबूक अकाउंट एकमेकांशी जोडायचं.
आता तुमच्या ट्विट फेसबूक वरही दिसायला लागतील.

त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्लॉगवरही तुमच्या ताज्या ट्विट्स दाखवू शकता, म्हणजे एक चक्र पुर्ण झाले.

आता तुमचे मित्र, वाचक तुमच्या सगळ्या साईटवर तुमचे विचार वाचू शकतील. तेही तुम्ही हे विचार एकाच वेळी पोस्ट करत आहात, यासाठी कॉफी पेस्ट सुद्धा करायची गरज नाही.

मग एंजॉय...

रविवार, १९ सप्टेंबर, २०१०

अतिथी देवो भव: ????

माझी आजी रात्री झोपण्याआधी खात्री करून घ्यायची की घरात एखादी तरी पोळी शिल्लक आहे, तसेच माझी आई ही करायची. असे करण्याचा तिचा उद्देश आम्हाला लहानपणी समजत नसे पण थोडे मोठं झाल्यावर तिनेच आम्हाला सांगीतले की एखादी व्यक्ती (पाहुणा) अवेळी आलीच तर त्याचा पाहुणचार करता यावा, घरी येणारा पाहुणा हा आपल्या घरातून जातांना समाधानी होऊन जावा यासारखं दुसरं सुख नाही. कारण अतिथी देवो भव: म्हणजे पाहुणा देवा समान, अशी ही परंपरा असलेला आपला देश खरंच खूप महान आहे.

आता माझा एक प्रश्न आहे की, समजा तुम्ही तुमच्या घरातील (दररोजची) देवपूजा करत असाल किंवा एखादे स्तोत्र म्हणत असाल आणि त्याच वेळी एखादा पाहुणा आला तर तुम्ही काय कराल? कारण हा आलेला पाहुणा देवा सारखाच आहे आणि समोर ही देव आहे.

मला आलेले दोन अनुभव:

१) आमचे एक नातेवाईक आहेत (मुद्दाम जास्त तपशीलात जात नाही) यांच्या घरी १२ महिने १८ काळ किंवा आजच्या भाषेत सांगायचे तर २४X७X३६५ जप चालू असतो अगदी रात्री सगळे झोपले तरी टेप चालू असतो. यांच्या घरी गेलं की गप्पा, विचारपूस अगदी कमी फक्त जप चालू. आपण जास्त वेळ थांबलो की एक जपमाळ आपल्यालाही दिली जाते आणि आपणही जप करत बसायचं. आता असे असेल तर यांच्या घरी कोण जात असेल का याचा विचार करा. कारण लहानपणी आई-बाबा जेव्हा त्यांच्याकडे जायचं ठरवायचे तेव्हा आम्ही घरी एकटेच राहतो तुम्हीच त्यांच्याकडे जा असे म्हणायचो.

२) जेव्हा माझे लग्न ठरले तेव्हा पत्रिका देण्यासाठी मी एका घरी गेलो तेव्हा कुटुंबप्रमुख देवपूजा करत होते. मी पत्रिका त्यांच्या सौभाग्यवतीच्या हातात दिली आणि पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. आता मला त्या कुटुंब प्रमुखाला नमस्कार करायचा होता मात्र मला त्यासाठी अर्धा तास वाट पहायला लागली आणि त्यानंतरही मी दूरूनच नमस्कार केला व मी त्यांचा निरोप घेतला.

आता तुम्ही स्वत:ला दोन्ही परिस्थितीत ठेवून (म्हणजे यजमान आणि अतिथी) सांगा की तुम्ही काय केलं असतं?

शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०१०

ओळख रुपयाची...

१५ जुलै २०१० रोजी भारतीय रुपयाच्या प्रतिक चिन्हास केंद्रीय मंत्री मंडळाने मान्यता दिली.

अतिशय सुंदर अशा ह्या चिन्हाने काही दिवसात प्रसिद्धी मिळाली आणि वर्तमानपत्र, जाहिराती आणि बिझनेस चॅनलवर दिसून येऊ लागले.
मात्र मागच्या आठवड्यात एक ई-मेलद्वारे याच रुपयाच्या चिन्हाचे एक व्यंगचित्र पाहायला मिळाले.

(चित्र सौजन्य: आंतरजाल) 
हे व्यंगचित्र ही बनविण्या-याने अत्यंत उत्तमरीत्या रेखाटले आहे. या मध्ये आपल्या देशात असलेल्या सत्य परिस्थितीचे दर्शन घडविलं आहे. ज्या पद्धतीने श्रीमंत हे खूप श्रीमंत होत आहेत आणि गरीब हे गरीबच राहिले आहेत तर मध्यमवर्गीय अडीअडचणीत त्यांचे जीवन जगत आहेत याच कडू सत्याची जाणीव करुन दिली आहे.

गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत याच्यात किती अंतर आहे याबद्दलचा मला आलेला एक अनुभव.

माझ्या ऑफीस मध्ये काम करणारा सतीश (नाव बदलले) हा मुळचा प. बंगालच्या एका गावातला, तर रवी (नाव बदलले) मुंबईत लहानाचा मोठा झालेला. सतीश कधी कधीच सुट्टी घेऊन त्याच्या घरी जायचा. मात्र जेव्हा तो सुट्टी घ्यायचा ती सलग १५-२० दिवसाची. काही दिवसापूर्वी जेव्हा सतीश सुट्टी घेऊन गावी गेला. तेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला फोन केला आणि त्याची चौकशी केली व येतांना सोबत काय काय घेऊन येतोस अशी विचारणा सुरु केली. त्यावर रवी म्हणाला काही नाहीतरी कमीत कमी "डेअरी मिल्क" तरी आण. सर्वांशी बोलुन झाल्यावर फोन बंद केला.


आमच्या पैकी एकजण रवी ला म्हणाला, " अरे, सतीशचं गाव एकदम लहान आहे. तिथे डेअरी मिल्क नाही मिळणार."


त्यावर रवी एकदम आश्चर्यचकीत झाला आणि म्हणाला, "मला नाही वाटत की भारतातील एकाही गावात डेअरी मिल्क मिळत नसेल."

त्याच्या ह्या अशा बोलण्याचं आम्हाला काहीच आश्चर्य वाटलं नाही कारण त्यात त्याची काहीच चूक नव्हती त्याचं सगळं बालपण, शिक्षण मुंबईतील एका श्रीमंत घरात झालं होतं आणि तो आमच्या एम. डी. चा मित्र होता. केवळ पोस्टग्रजुएशन पुर्ण करण्यासाठी कराव्या लागणा-या प्रोजेक्टसाठी तो ऑफीसमध्ये यायचा.

त्याला हे देखील माहिती नव्हतं की त्याच्या घरापासून फक्त काही किमी वर असणाऱ्या गावात भर पावसाळ्यातही पिण्याचे पाणी उपलब्ध नाही आणि त्यासाठी पाण्याचे हंडे डोक्यावर घेऊन माणसं आणि बायका कितीतरी लांब पायपीट करतांना दिसतात.

हेच सत्य आहे, या रुपयाच्या चिन्हाचे विडंबन करणा-याचे काहीच चुकले नाही. त्याने फक्त काचेवरील धुळ स्वच्छ केली आहे.

बुधवार, १५ सप्टेंबर, २०१०

क्रिकेट आणि माझी आवड

परवा विशाल चा ब्लॉग वाचला आणि वाटलं की आपणही क्रिकेटवर लिहावं. नक्की नाही आठवत पण काहीतरी १९९०-९१ मध्ये मला हा खेळ समजू लागला (एकदिवसीय). तेव्हा दूरदर्शन ज्या काही मॅचेस दाखविल्या जायच्या आणि त्याच मोठ्या उत्साहात पाहिलेल्या आजही आठवतात. १९९३-९४ च्या मौसमात मला कसोटी क्रिकेट समजायला लागलं

पहिल्यांदा जेव्हा मी क्रिकेटबद्दल एकले तेव्हा तो जमाना होता तो सुनिल गावस्कर, रवी शास्त्री, अ‍ॅलन बॉर्डर, विव रिचर्डसचा पण त्यांची एकही खेळी काही पाहायला मिळाली नाही, फक्त मोठ्यांच्या बोलण्यात या सर्वांचा उल्लेख ऎकला होता. आजही आठवते जेव्हा माझ्या वडीलांनी मला सांगितले होते की १९८६ मध्ये रवी शास्त्री ने ऑस्ट्रेलिया मध्ये ऑडी कार कशी जिंकली होती ते,  पण १९९०-९१ पर्यंत ही सगळी रिटायरमेंट आली होती किंवा झाली होती. त्यामुळे यापैकी कोणीही माझ्या आवडत्या क्रिकेटपटू मध्ये सामील होऊ शकलं नाही.

माझा पहिला आवडता क्रिकेटपटू होता तो म्हणजे ऑस्ट्रेलियाचा ओपनर "डेव्हिड बुन".
सौजन्य: आंतरजाल

लठ्ठ, बुटका आणि भरगच्च मिश्या असा दिसणारा हा खेळाडू व्यवसायाने खाटीक पण क्रिकेट अप्रतीम खेळायचा. त्याचा मिडविकेट/मिडऑन वरुन मारलेला फटका मला फार आवडायचा. पण त्याची एकही विशिष्ट खेळी आठवत नाही आणि तो काही दिवसात रिटायर झाल्याने तो फक्त काही दिवसच माझ्या या यादीत राहीला.

नंतर माझ्या या यादीत सामील झाला तो सा-या जगाच्या गळ्यातील ताईत "सचिन तेंडुलकर" याच्या बद्दल आता मी काही लिहायचं म्हणजे सुर्यासमोर दिवा घेऊन जाण्यासारखं ठरेल.
सौजन्य: आंतरजाल

आवडती खेळी: सचिन काढलेला प्रत्येक रन हा आवडता आहे पण तरीही सांगायचे म्हंटले तर
१) ९८ विरुद्ध पाकिस्तान २००३ विश्वचषक
२) १०३ विरुद्ध इंग्लंड चेन्नई कसोटी २००८

लहानपणी मी जेव्हा क्रिकेट खेळायचो, तेव्हा मला फलंदाजी करायलाच आवडायची मात्र गोलंदाजी विशेष म्हणजे फिरकीच्या प्रेमात पाडले ते माझ्या पुढच्या आवडत्या क्रिकेटपटुने "शेन वॉर्न"
सौजन्य: आंतरजाल

माझ्यासाठी हा एकटाच असा क्रिकेटपटू आहे ज्याने सिद्ध केले की तो फिरकीचा डॉन आहे. तो जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा तो एखादी जादू किंवा एक सुंदर चित्र काढतो आहे असेच मला वाटायचे. त्याचे वळणारे चेंडु, त्यांची फलंदाजाच्या मेंदूत शिरून चेंडू टाकण्याची कुशलता ही अद्वितीय होती आणि राहणार. हा कधीही वातावरण, खेळपट्टी यावर विसंबून नसायचा आणि प्रत्येक उपखंडात उत्तम कामगिरी केली.

मी शेन वॉर्नचा एवढा प्रचंड चाहता होतो की बरेच काळासाठी शाळेत क्रिकेट खेळतांना अगदी त्याच्यासारखीच गोलंदाजी करायचो.

आवडती खेळी: संपुर्ण कसोटी मालिका विरुद्ध पाकिस्तान २००२-०३ (कोलंबो/शारजाह)

माझे हे फिरकी बद्दलचे प्रेमाने मला आणखी एका खेळाडुकडे आकर्षित केले तो म्हणजे "अनिल कुंबळे"
सौजन्य: आंतरजाल

अतिशय प्रतिभावान, मात्र मला कमी उल्लेखलेला असा हा खेळाडू खूपच मेहनती. चिकाटी, आत्मविश्वास अशा गुणांचा धनी होता. या एक गोष्ट मला आवडायची मैदानात एकच चुक हा कधीही दोनदा नाही करायचा. १९९८-९९ जेव्हा भारतीय टीम ऑस्ट्रेलियामध्ये गेली तेव्हा कुंबळे संपुर्ण अपयशी ठरला मात्र पुढच्याच दौ-या सर्वात जास्त बळी घेऊन परतला. अशा या हि-याने १९९४ मध्ये हिरो कप फायनल मधील १२ धावात ६ बळी हे रेकॉर्ड केले व ते अजुनपर्यंत कोणीही मोडु शकलं नाही.

आवडती खेळी: अर्थातच ७४ धावात १० बळी विरुद्ध पाकिस्तान
सौजन्य: युट्युब.कॉम

१९९७ मध्ये मी कॉलेजला गेलो आणि माझी गोलंदाजीची शैली बदलली मी वेगवान गोलंदाजी करु लागलो आणि माझे प्रेरणा स्थान होते तो म्हणजे माझा आवडता वेगवान गोलंदाज आणि जो आजही आहे तो म्हणजे वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू "कर्टली अंब्रोस".
सौजन्य: आंतरजाल

याची गोलंदाजी म्हणजे ख-या अर्थाने भेदक, धारदार आणि घातक वाटायची. अगदी सहज धावत येऊन जलद गोलंदाजी करणारा हा खेळाडु, फलंदाजाच्या मनात धडकी भरायची. अंब्रोस रिटायर झाला आणि भेदक गोलंदाजीचा अस्त झाला असेच मी म्हणतो कारण त्यानंतर आलेले सर्व वेगवान हे नुसतेच वेगवान आहेत. त्यांना खेळतांना कोणत्याच फलंदाजाला भिती वाटत आहे असे कधीच वाटले नाही. अंब्रोसचा टप्पा हा अचूक असायचा. सगळ्यात जास्त आवडायची ती त्याची अपील करायची स्टाईल आणि विकेट घेतल्यानंतर झालेला आनंद साजरा करण्याची पद्धत.

आवडती खेळी: ८ ओव्हरमध्ये १२ रन देत १ बळी विरुद्ध पाकिस्तान, सेंट विन्सेंट (या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तान २१४ धावाचा पाठलाग करत असतांना रिऑन किंगच्या सोबतीने अंब्रोसने पहिल्या ५ ओव्हर मेडन टाकल्या होत्या.)

फलंदाजांत माझा पुढचा आवडता खेळाडु म्हणजे डावखुरा "मॅथ्यु हेडन" हातात बॅट ऐवजी गदा घेऊन खेळायला उतरला आहे असेच वाटते.
सौजन्य: आंतरजाल
 १९९८ मध्ये भारताविरुद्ध संघात पक्के स्थान करणा-या ह्या खेळाडूने कधीच मागे वळून पाहिले नाही. कसोटी, एकदिवसीय अशा दोन्ही फॉरमॅट मध्ये सातत्याने खेळ करीत हेडन आता रिटायर झाला. माझ्यासाठी हेडन सर्वोत्कृष्ट ऑन ड्राईव्ह मारणारा डावखुरा फलंदाज आहे.

आवडती खेळी: ६८ चेंडुत १०१ विरुद्ध दक्षीण आफ्रिका २००७ विश्वचषक.
या सामन्याच्या दिवशी एक गंमत झाली, मी आणि माझा मोठा भाऊ मुलुंड ला एका मॉल मध्ये शॉपींग साठी गेलो होतो. बरीच शॉपींग झाल्यावर आम्हाला काही कूपन्स मिळाली ज्या मध्ये आजच्या सामन्याचा विजेता संघ आणि मॅन ऑफ द मॅच कोण ठरेल हे सांगायचे होते. दुर्दैवाने आम्ही दोघे हेडनला विसरलो आणि इतर नावं लिहुन दिली. ही मॅच हेडनने एकहाती जिंकून दिली.

मला टी-२०, एकदिवसीय क्रिकेट कितीतरी अधिक पटीने कसोटी क्रिकेट आवडते. ह्या झटपट जमान्यात जरा विचित्र आहे पण सत्य आहे. पाच दिवसानंतर येणारा निकाल हा जास्त चांगला वाटतो. कसोटी हा असा खेळ प्रकार आहे की ज्यामध्ये नावाप्रमाणे कसोटी लागते. त्यामुळे एखाद्या खेळाडूने एखादे रेकॉर्ड कसोटीत केले असेल तर माझे त्याच्याकडे विशेष लक्ष असते.

असाच एक रेकॉर्ड बहाद्दर माझा पुढचा आवडता खेळाडू आहे तो म्हणजे न्यूझीलंडचा "नॅथन अ‍ॅस्टल".
सौजन्य: आंतरजाल

ह्या खेळाडुने मला नेहमीच आकर्षीत केले आहे. त्याचा सहज सुंदर खेळ मला फार आवडायचा. कसोटी प्रमाणे एकदिवसीय सामन्यातही अ‍ॅस्टल तितकाच उपयोगी ठरायचा कारण तो एक उत्तम अष्टपैलू खेळाडू होता. २००१-०२ मध्ये ख्राईसचर्चमध्ये खेळलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत केलेली खेळी आज माझ्या स्मरणात आहे. आणि हिच खेळी माझी अ‍ॅस्टलची आवडती खेळी आहे. ह्या मॅचचा दिवस मला आजही आठवतो.

न्यूझीलंडमधील मॅच भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० ला सुरु होते. आणि त्यादिवशी मला आपोआप जाग आली, एवढ्या सकाळी टि.व्ही. लावला तर वडीलांना खूप राग यायचा मात्र अ‍ॅस्टल असा काही खेळला की त्यांचा राग शांत झाला.

आज जरी हे सगळे खेळाडू (सचिन सोडून) रिटायर झाले असले तरी मला हेच आवडतात.

शनिवार, ११ सप्टेंबर, २०१०

हॅपी बर्थ डे वरद...

चि. वरद योगेश देशपांडे

यास तिस-या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक:

बेंगलुरु हुन
श्री. योगेश विनोदराव देशपांडे (बाबा)
सौ. वैशाली योगेश देशपांडे (आई)

औरंगाबाद हुन
श्री. मिलिंद प्रभाकर देशपांडे (मामा)
सौ. वर्षा मिलिंद देशपांडे (आत्या)
चि. नचिकेत मिलिंद देशपांडे (दादा)

पुण्याहुन
श्री. नागेश विनोदराव देशपांडे (काका)
सौ. दिपाली नागेश देशपांडे (काकु)

गणपती बाप्पा मोरया!!

काल ईद ची सुट्टी मिळाल्याने संपुर्ण दिवस गणपतीची तयारी करण्यात गेला. पुण्यात नवीन असल्याने कुठे काय चांगले मिळते हे नक्की माहिती नव्हतं म्हणून सरळ मुख्य बाजारपेठेतच जावं असे ठरवलं. मी आणि माझी पत्नी कसबापेठेत गेलो. तिथे अतिशय मनमोहक अशा गणेशमूर्ती पहायला मिळाल्या. पण ह्या गणेशमूर्ती खूपच मोठ्या होत्या आणि घरापर्यंत सुखरुप नेता येतील का नाही याची खात्री नसल्याने येथून न घेता घराजवळच्या एखाद्या दुकानातूनच घेऊ असे ठरले तरी पण भरपूर खरेदी करायची होती.

सजावटीचे बरेच सामान घेतले जसे रांगोळी, लाईटची माळ, कागदाची रिबिन्स आणि पूजेचे साहित्य. अशी सगळी खरेदी आणि त्याहून अधीक विंडो शॉपींग झाल्यानंतर कावरे चे आईसक्रीम खाऊन घरी परत आलो. थोडा आराम केला आणि पुन्हा जवळच्या बाजारात गेलो. आणि मुख्य म्हणजे बाप्पांची मूर्ती बुक करून आलो. तशी मी आणखी ही एक गोष्ट बुक केली पण त्याबद्दल नंतर...

घरी आल्यावर सजावटीचे काम पुर्ण केले.

आज सकाळी जाऊन मी बाप्पांना घरी घेऊन आलो.

बायकोने सुरेख मोदकाचा नैवेद्य केला होता.

पुजा झाली, आरती झाली
 

आणि प्रसाद खाऊन आता जेवणाच्या तयारीला लागलो तर दुसरी बुक केलेली गोष्ट घरी आली.


आज मी खूप खूश आहे कारण आता संपुर्ण दहा दिवस बाप्पा माझ्या घरी राहणार आणि सोमवार पासून मला दररोज सायकलवर ऑफीसमध्ये जाता येईल.

गणपती बाप्पा मोरया!!

मंगळवार, ७ सप्टेंबर, २०१०

पुणेरी पाटी

शहर: पुण्यनगरी

नेहमी सारखाच एक सामान्य दिवस, बसने ऑफीस जात होतो आणि एका ठिकाणी बस थांबली आणि बाहेर लक्ष गेलं आणि हा बोर्ड दिसला.
*
*
*
*
*
*
*
*
*
*

(फोटो: नागेश देशपांडे)

बुधवार, १ सप्टेंबर, २०१०

पैसा पैसा आणि पैसा

आज ऑफीसमध्ये एक छान मेल वाचला. त्याचाच हा मराठीमध्ये अनुवाद आहे.

एक उद्योगपती एक महागडी कार विकत घेतो आणि त्याच कारने दुस-या दिवशी कार्यालयात येतो. तो असे ठरवतो की माझी कार मी सगळ्या कर्मचा-यांना दाखवायची. तो जसाच कारमधून खाली उतरतो एक सुसाट वेगाने जाणारा ट्रक त्याचा कारचा दरवाज्याला धडक मारुन निघून जातो. कारचा दरवाजा संपूर्णपणे निखळून पडतो.

उद्योगपती एकदम आरडा ओरडा करायला लागतो. "अरे देवा माझी कार कालच तर घेतली होती, माझे नुकसान झाले. मी ड्रायवरला सोडणार नाही."

योगायोगाने जवळच पोलीस उभे असतात, ते तिथे येतात आणि त्याला समजावतात पण हा काहीही ऐकायला तयार नसतो.

त्यावर एक अधिकारी म्हणतो, "काय हावरट माणुस आहे, या केवळ पैसाच दिसतो. जीव वाचला हे दिसत नाही. पैसा काय जातांना वरती घेऊन जाणार का?"

यावर उद्योगपती अजूनच भडकतो आणि पोलीसांशी भांडायला लागतो.

दुसरा अधिकारी म्हणतो "अहो कारच झालेले नुकसान तुम्हाला दिसतो पण तुमचा डावा हात तुटून पडलाय त्याच काय?

ते ऐकून उद्योगपती अजुन जोरजोरात ओरडायला सुरुवात करतो.

"माझं रोलेक्सचं घड्याळ..................................."
Related Posts Plugin for WordPress, Blogger...