शनिवार, १४ ऑगस्ट, २०१०

आठवणी १५ ऑगस्टच्या


भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

यावर्षी १५ ऑगस्ट रविवारी आहे, शनिवारी ही सुट्टी असल्याने घरीच आराम करायचा असे ठरले. सहज बायको म्हणाली, का हो तुम्ही शाळेत असतांना १५ ऑगस्टला काय काय करायचे? ब-याच वेळ चर्चा केल्यानंतर तिने तिचे विचार सांगायला सुरुवात केली.

आज काल आपण १५ ऑगस्ट कोणत्या वारी आहे हे पाहुन घेतले जाते व त्या नुसार जोडून सुट्टी घेतली जाते व प्रवासाचे बेत आखतो. १५ ऑगस्ट = एक दिवसाची सुट्टी हे आपलं समीकरण. आणि ही सुट्टी मजेत कशी घालवता येईल यासाठी आधीचे काही दिवस आपण घालवतो. शाळेत जाणारी आजची मुलंही एक दिवसाची सुट्टी मिळणार यातच खुश असतात.

मात्र १९९० म्हणजे आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा १५ ऑगस्ट ची तयारी अगदी २५ जुलै लाच चालु व्हायची. शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी व त्याच्या सरावासाठी हे दिवस राखीव असायचे. या आठवड्यात सर्व स्व:ताची सगळी कामं स्व:ताच करायचो. जसे गणवेश धुणे, इस्त्री करणे, बुट पॉलीश करणे, बुटाच्या लेस बदलणे आणि सॉक्स देखील स्व:ताच धुवायचो.

आदल्या दिवशी शाळेत गणवेशाला सुट्टी असायची त्यामुळे वर्ग सजवणे हे काम उरकून घ्यायचो. एरवी आई ने घर आवरायला सांगीतले की कंटाळा यायचा मात्र येथे असे काहीच नसायचे. अगदी १, २ किंवा ५ रुपये जमतील तितके प्रत्येकी जमवून एक झेंडा, पताका, रंगीत रांगोळी, रंगीत खडू विकत आणायचो. वर्गाच्या दारासमोर छान रांगोळी काढायचो, दारावर, भिंतीवर, छताला पताका लावायचो. वर्गात लावलेल्या महापुरुषांच्या फोटोला नवीन हार आणायचो आणि फळ्यावर "१५ ऑगस्ट चिरायु होवो" असे लिहायचो.

दुस-या दिवशी म्हणजे १५ ऑगस्टला सकाळी सकाळी लवकर (आईच्या हाकेच्या अगोदर) उठायचो. लवकर लवकर आवरून शाळेत जायचो, उत्साह खुप असायचा पण आज हा उत्साह पाठीवर दप्तराचे आणि डोक्यात अभ्यास चे ओझे नसल्याने द्विगुणित व्हायचा.

मग शाळेच्या मैदानावर प्रमुख पाहुणे झेंडा फडकवायचे आणि शिस्तबद्ध राष्ट्रगीत म्हणून झाल्यावर सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. शेवटी प्रत्येकाला २ पारले जी बिस्कीट दिले जायचे. एरवी घरी अख्खा पुडा मिळाला तरी कधी कधी आनंद व्हायचा नाही मात्र ही दोन बिस्कीट म्हणजे आमच्यासाठी आनंद सोहळा ठरायची. विशेष म्हणजे त्याकाळात शाळेकडून १५ ऑगस्टला हजर राहण्यासाठी कोणतीही सक्ती नव्हती पण आम्ही स्वयंस्फूर्तीने हजर राहायचो. रस्त्यावर २५ पैशात मिळणारे झेंडा घेऊन आम्ही भिरभिर पळायचो. खुप खुप अभिमान वाटायचा.

मात्र आज म्हणजे २०१० मध्ये हे पहायला मिळत नाही. काही लहान मुलं पाहिली आणि त्यांना या दिवसाचे महत्त्व पालक, शिक्षक व शाळा प्रशासन समजवून देण्यात कमी पडत आहे असे वाटायला लागले. पुस्तकातला इतिहास हा केवळ एक धडा किंवा अभ्यासक्रमाचा भाग म्हणूनच शिकविला जात आहे हे जाणवलं. हुतात्म्यांचे बलिदानाची या एकाच दिवशी आठवले जाते, देशभक्तीपर गाणी (कधी कधी रिमिक्स ही), देशभक्तीपर सिनेमे दाखविले जातात बस्स...

खरंच का यामुळे या एका दिवसाचे महत्त्व आपल्या भावी पिढीला कळणार आहे का?
हा उत्साह असाच टिकुन राहील?

आपलं सर्वांचे म्हणजे पालक, शिक्षक व समाजाचे हे कर्तव्य आहे त्यांनी आपल्या सगळ्या महापुरुषांचे बलीदान किती मोठे आहे हे भावी पिढीला पटवून द्यायचे काम करायला पाहीजे. जेणेकरून आपण भविष्यातही असाच उत्साह पुर्ण स्वातंत्र्यदिन साजरा करु.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...