मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०१०

माझी उडी

गेल्याच आठवड्यात आधी अपर्णा मग हेरंब चा आणि नंतर सुहास चा इमोसनल अत्याचार  वाचला.खुप खुप मज्जा आली वाचतांना. खरं सांगतो हे वाचून मला कॉलेज मधील दिवस आठवले. मी ही कॉलेज मध्ये असतांना माझ्या दादाला असंच एक हिंदी गाणं मराठीमध्ये म्हणून खुप खुप छळायचो. तो तर मला मारायला धावायचा आणि मला अजून उत्साह यायचा.

धन्यवाद अपर्णा, हेरंब आणि सुहास माझ्या जुन्या आठवणी ताज्या केल्याबद्दल...


आज मी या अत्याचारामध्ये भर घालायचे ठरवले आहे, आणि मध्येच उडी घेत आहे यासाठी क्षमा असावी. पण मी ही संधी सोडणार नाही, प्रयत्न पहिलाच आहे, त्यामुळे सगळे समजून घेतील ही अपेक्षा करतो.****************************************
माझ्यासारखं तु ही कधी प्रेम करुन बघ ना...
प्रेमाची माझ्याकडे प्रिये विचारणा करून बघ ना
किती मज्जा आहे कशी नशा आहे
प्रेम करुन बघ ना...
प्रेम मनातलं स्वप्न आहे, प्रेम तुझ्याशी करायचं
प्रेमाच्या या रंगाने स्व:तालाच रंगवायचं
आजपर्यंत जे सांगायचं ते तुला सागांयचं
मनात तुझ्या लपव आता मनात तुझ्या राहायचं
मनाने सांगीतले आहे मनाने ऎकले आहे
मनाने सांगीतले आहे मनाने ऎकले आहे
प्रेम करुन बघ ना...
************************************
धन्यवाद. येथेच थांबतो.

रविवार, २२ ऑगस्ट, २०१०

मराठी ब्लॉग

मी गेले बरेच दिवस नियमीतपणे ब्लॉग लिहित आहे, वाचकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. यापैकी बरेचसे वाचक माझे मित्रच आहेत. त्यातले काही मित्र मला फोन करतात आणि पोस्ट बद्दल आपले मत देतात. पण बहुतेक करुन एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे "मराठीतच ब्लॉग का?" तर या प्रश्नाचे उत्तर मी पोस्ट द्वारे देत आहे.

१) मला असे वाटते की, एखादी व्यक्ती आपल्या भावना ह्या तिच्या मातृभाषेतच उत्तमरीत्या व्यक्त करु शकते.
२) इंग्रजी वाचायची बोंब तर लिहिणार काय घंटा !!!
३) मराठी भाषेबद्दल प्रेम आणि आदर
४) लोकांना पोटदुखी ने मारण्यासाठी
    कारण आपल्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रात एकवेळ मराठी बोलल नाही तरी चालत मात्र मराठी विषयी प्रेम आहे म्हटलं की लोकांच्या पोटात दुखतं

आता माझे असे काही मित्र आहे की ज्यांना ब्लॉग कसा लिहितात हे माहित नाही अशा या मित्रांसाठी मी खालील माहिती पुरवत आहे.

* साईट कोणती वापरावी?
यासाठी दोन पर्याय आहेत.
www.blogger.com आणि www.wordpress.com

Blogger या साईट वापरण्यासाठी फक्त Gmail खाते असायला हवे. लॉगीन करा आणि आपला ब्लॉग सुरु करणे अगदी सोप्पं आहे. तुम्हाला येथे yournam.blogspot.com असा पत्ता मिळेल.
तर wordpress या साईटवर तुम्हाला खाते उघडावे लागेल आणि येथे yourname.wordpress.com या दोन्हीही साईटवर ऑनलाईन मराठी टायपींग ची सुविधा आहे.

* टायपींग कसे करायचे?
जर तुम्हाला इंटरनेट चालु नसतांना मराठी टायपींग करायचे असेल आणि नंतर ते ब्लॉग वर पोस्ट करायचे असेल तर बरह हे सॉफ्टवेअर येथून डाऊनलोड करा. आपले पोस्ट टाईप करा आणि नंतर लॉगिन करुन आपल्या पेस्ट करा म्हणजे झालं काम.

अधीक माहितीसाठी खालील काही ब्लॉगला भेट द्या.शनिवार, २१ ऑगस्ट, २०१०

तारांबळ

सध्या माझी जाम तारांबळ उडाली आहे, कारण मला मनासारखे ब्लॉग टेम्पलेट मिळत नाहीये. गेले काही दिवस मी आंतरजाल शोध शोध शोधूनही एकही मनासारखे टेम्पलेट मिळाले नाही.

तीन-चार साईट पालथ्या घातल्या पण काही उपयोग झाला नाही, गंमत अशी झाली की, बरेच टेम्पलेट डाऊनलोड केले त्यामध्ये काही त्रुटी होत्या. जसे काही विजेट सपोर्ट नव्हते तर काही मध्ये मजकुर एकावर एक येत होता. एकाततर चक्क प्रतिक्रियाच दिसत नव्हत्या.

त्यानंतर मग काही आवडते ब्लॉग समोर ठेवूनही पाहीले तसे टेम्पलेट शोधले पण काही उपयोग झाला नाही कारण तशी टेम्पलेट आता उपलब्ध नाहीत.

एक वेळ विचार केला की आपला ब्लॉग सरळ वर्ड प्रेस वर शिफ्ट करावा पण ब्लॉगरची साथ सोडावीशी नाही वाटत म्हणून तात्पुरता ब्लॉगरचा एक डिफॉल्ट टेम्पलेटच सेट केला.

पण मी यावरही समाधानी नाही आता मी शोधत आहे एक UI Designer जो मला मदत करेल एक छान टेम्पलेट डिझाईन करण्यात.

बघु भेटत का कोणी मदतीला...

बुधवार, १८ ऑगस्ट, २०१०

माझ्याबद्दल


नमस्कार मंडळी,

मी नागेश देशपांडे, मी "मी एक हौशी लेखक" जालना या छोट्या शहरात शिक्षण पुर्ण झाल्यानंतर माझी भटकंती चालू झाली.

भटकंती...

स्वप्न पुर्ण करण्यासाठी. हे स्वप्न फार मोठं नव्हतं मात्र छोटी छोटी अशी खुप स्वप्न आहेत. चार सामान्य माणसांना पडतात अशीच...

त्यातलच एक स्वप्न म्हणजे लेखक व्हायचं... त्याची पहिली पायरी आहे माझा हा ब्लॉग.

लिहण्याची आवड कधी आणि कशी निर्माण झाली काहीच आठवत नाही. कधी कधी थोडा वेळ मिळतो व त्यातला थोडा वेळ काढून मी लिहितो. मला अलंकारिक लिहिता येत नाही, पण जे जमेल, जे सुचेल ते मी लिहितो. मुख्य करुन ताज्या घडामोडी, क्रिकेट, बालपणीच्या आठवणी, प्रवासातील किस्से आणि आयुष्यातील कडू गोड अनुभव.


"आयुष्य खूप सुंदर आहे, मी अजून सुंदर बनविणार." हा माझ्या लाईफचा फंडा. 

मी सॉफ्टवेअर मधील किडे पकडायचे काम करतो. आणखी एक काम करतो ते म्हणजे, डेव्हलपर लोकांना चाव चाव चावणे.

छंद: लिहिणे, भटकणे आणि फोटो काढणे... आणखी एक तो म्हणजे "सायकलने ऑफीसला जाणे." 

मला आवडते हसायला आणि हसवायला, फिरणे, सोशल नेटवर्किंग. प्रवास करणे, असे ठिकाण शोधायचे की जिथे कमी लोक जातात, निसर्गाच्या सानिध्यात जायचे, खुप फोटो काढायचे. ब्लॉग लिहणे.तरी तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.


नागेश देशपांडे

 मी एक हौशी लेखक

शनिवार, १४ ऑगस्ट, २०१०

आठवणी १५ ऑगस्टच्या


भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

यावर्षी १५ ऑगस्ट रविवारी आहे, शनिवारी ही सुट्टी असल्याने घरीच आराम करायचा असे ठरले. सहज बायको म्हणाली, का हो तुम्ही शाळेत असतांना १५ ऑगस्टला काय काय करायचे? ब-याच वेळ चर्चा केल्यानंतर तिने तिचे विचार सांगायला सुरुवात केली.

आज काल आपण १५ ऑगस्ट कोणत्या वारी आहे हे पाहुन घेतले जाते व त्या नुसार जोडून सुट्टी घेतली जाते व प्रवासाचे बेत आखतो. १५ ऑगस्ट = एक दिवसाची सुट्टी हे आपलं समीकरण. आणि ही सुट्टी मजेत कशी घालवता येईल यासाठी आधीचे काही दिवस आपण घालवतो. शाळेत जाणारी आजची मुलंही एक दिवसाची सुट्टी मिळणार यातच खुश असतात.

मात्र १९९० म्हणजे आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा १५ ऑगस्ट ची तयारी अगदी २५ जुलै लाच चालु व्हायची. शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी व त्याच्या सरावासाठी हे दिवस राखीव असायचे. या आठवड्यात सर्व स्व:ताची सगळी कामं स्व:ताच करायचो. जसे गणवेश धुणे, इस्त्री करणे, बुट पॉलीश करणे, बुटाच्या लेस बदलणे आणि सॉक्स देखील स्व:ताच धुवायचो.

आदल्या दिवशी शाळेत गणवेशाला सुट्टी असायची त्यामुळे वर्ग सजवणे हे काम उरकून घ्यायचो. एरवी आई ने घर आवरायला सांगीतले की कंटाळा यायचा मात्र येथे असे काहीच नसायचे. अगदी १, २ किंवा ५ रुपये जमतील तितके प्रत्येकी जमवून एक झेंडा, पताका, रंगीत रांगोळी, रंगीत खडू विकत आणायचो. वर्गाच्या दारासमोर छान रांगोळी काढायचो, दारावर, भिंतीवर, छताला पताका लावायचो. वर्गात लावलेल्या महापुरुषांच्या फोटोला नवीन हार आणायचो आणि फळ्यावर "१५ ऑगस्ट चिरायु होवो" असे लिहायचो.

दुस-या दिवशी म्हणजे १५ ऑगस्टला सकाळी सकाळी लवकर (आईच्या हाकेच्या अगोदर) उठायचो. लवकर लवकर आवरून शाळेत जायचो, उत्साह खुप असायचा पण आज हा उत्साह पाठीवर दप्तराचे आणि डोक्यात अभ्यास चे ओझे नसल्याने द्विगुणित व्हायचा.

मग शाळेच्या मैदानावर प्रमुख पाहुणे झेंडा फडकवायचे आणि शिस्तबद्ध राष्ट्रगीत म्हणून झाल्यावर सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. शेवटी प्रत्येकाला २ पारले जी बिस्कीट दिले जायचे. एरवी घरी अख्खा पुडा मिळाला तरी कधी कधी आनंद व्हायचा नाही मात्र ही दोन बिस्कीट म्हणजे आमच्यासाठी आनंद सोहळा ठरायची. विशेष म्हणजे त्याकाळात शाळेकडून १५ ऑगस्टला हजर राहण्यासाठी कोणतीही सक्ती नव्हती पण आम्ही स्वयंस्फूर्तीने हजर राहायचो. रस्त्यावर २५ पैशात मिळणारे झेंडा घेऊन आम्ही भिरभिर पळायचो. खुप खुप अभिमान वाटायचा.

मात्र आज म्हणजे २०१० मध्ये हे पहायला मिळत नाही. काही लहान मुलं पाहिली आणि त्यांना या दिवसाचे महत्त्व पालक, शिक्षक व शाळा प्रशासन समजवून देण्यात कमी पडत आहे असे वाटायला लागले. पुस्तकातला इतिहास हा केवळ एक धडा किंवा अभ्यासक्रमाचा भाग म्हणूनच शिकविला जात आहे हे जाणवलं. हुतात्म्यांचे बलिदानाची या एकाच दिवशी आठवले जाते, देशभक्तीपर गाणी (कधी कधी रिमिक्स ही), देशभक्तीपर सिनेमे दाखविले जातात बस्स...

खरंच का यामुळे या एका दिवसाचे महत्त्व आपल्या भावी पिढीला कळणार आहे का?
हा उत्साह असाच टिकुन राहील?

आपलं सर्वांचे म्हणजे पालक, शिक्षक व समाजाचे हे कर्तव्य आहे त्यांनी आपल्या सगळ्या महापुरुषांचे बलीदान किती मोठे आहे हे भावी पिढीला पटवून द्यायचे काम करायला पाहीजे. जेणेकरून आपण भविष्यातही असाच उत्साह पुर्ण स्वातंत्र्यदिन साजरा करु.

शनिवार, ७ ऑगस्ट, २०१०

एक नंबर

काल ऑफीसमध्ये तुषारशी जाम वाद झाला. ऑस्ट्रेलियाच जगात १ नंबर टीम आहे कारण त्यांचा खेळ त्या दर्जाचाच आहे आणि भारत १ नंबर आहे हा निव्वळ योगायोग आहे, हे तुषार चे मत.

बरेचदा आपण हे सहज मान्य करतो कारण आपल्याला सवय झाली आहे ती फक्त ऑस्ट्रेलिया कसोटी मध्ये उत्तुंग कामगिरी करतांना पाहायची. एक काळ होता जेव्हा ऑस्ट्रेलियाने मार्क टेलर, स्टीव्ह वॉ यांच्या नेतृत्वात खुप म्हणजे खुपच चांगली कामगिरी केली. टेलरने वेस्ट इंडिज मध्ये जाऊन कसोटी मालिका जिंकली व आपला दबदबा निर्माण करायला सुरुवात केली, तर वॉने त्याहून पुढे जाऊन अ‍ॅशेस आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये निर्भेळ यश मिळवले. रिकी पॉटींगने खुप चांगली कामगिरी केली मात्र अ‍ॅशेस दोनदा हरणारा शतकातला पहिला कर्णधार ठरला, तसेच त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशी मालिका गमावून बसला, आणि येथूनच त्यांची क्रमवारीत घसरण व्हायला सुरुवात झाली.

भारताने कसोटी मध्ये आपले अस्तित्व दाखवायला सुरुवात केली ती म्हणजे शेवटच्या ऑस्ट्रेलिया दौ-यात. पहिली कसोटी गमावल्यानंतर सिडनी कसोटी मध्ये सरस कामगिरी करूनही पंचांच्या खराब कामगिरीमुळे गमावली, तर पर्थ कसोटी मध्ये दणदणीत विजय मिळवून या मैदानावर कसोटी जिंकणारा पहिला आशियाई संघ ठरला, आणि मालिका १-१ ने बरोबरीत सुटली. नंतर एकाहून एक सरस कामगिरी करत भारताने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान गाठले.

आज भारतीय संघाने पुन्हा सिद्ध केले की आपण नंबर आहोत तो निव्वळ योगायोग नाही. अतिशय सामान्य गोलंदाजी आक्रमण असूनही श्रीलंकेविरुद्ध मालिका १-१ बरोबरी सोडवली. पहिली कसोटी मुरलीधरनच्या कामगिरीमुळे हरल्यानंतर दुस-या आणि तिर-या कसोटी मध्ये अप्रतिम कामगिरी केली. फलंदाजांनी खुप चांगली कामगिरी केली. सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि नवोदित सुरेश रैना ने खुप चांगली कामगिरी केली.

तुषार च्या म्हणण्यानुसार भारतीय संघ हा उपहारापर्यंत पराभवाच्या छायेत असेल आणि चहापानापर्यंत सामना गमावेल. मात्र झाले अगदी विरुद्ध...

आजच्या विजयाच्या टीम इंडिया ला शुभेच्छा आणि धोनी ला संघ अव्वल स्थानी राखण्यासाठी अभिनंदन

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०१०

मुंगी चावली पायाशी

गेल्या रविवारी मस्त आराम करावा म्हंटलं तर बायकोने कामाचा डोंगर उभा केला. आता माझ्यावर फॉलोऑनची नामुष्की येणार असे वाटत असतांना कधीही टीम ईंडियाच्या मदतीला न धावून येणारा पाऊस माझ्या मदतीला धावून आला. सकाळ पासूनच पाऊस आपले काम करीत होता आणि मी कॅमेरा घेऊन मस्तपैकी फोटो काढण्यात रमलो होतो.दुपारी टिव्हीवर मस्त सिनेमा (वेक अप सिड) पाहुन झाल्यावर थोडीशी झोप घेतली, आणि रणवीर कपूर प्रमाणे मी ही (नशिबाने) स्व:ताच्या पायाचा एक फोटो काढला. पण संध्याकाळ होता होता पाऊस कमी झाला आणि बायकोने कामाची एक टेकडी समोर उभी केली.

आता ही कामं पुर्ण केल्याशिवाय पर्यायच उरला नव्हता, म्हणुन एक दोन कामं करण्यासाठी मी घराबाहेर पडलो. अंधार पडला होता, एक दुकानात उभा होतो आणि तेवढयात डाव्या पायाला एक मुंगी चावली. कबुतराची शिकार करणा-या शिका-याला काय चावली असेल इतक्या कडाडून मुंगी मला चावली. कामं संपवून तसाच मी घरी आलो आणि "मुंगीच चावली ना !" या विश्वासाने दुर्लक्ष केलं. त्याचा परिणाम असा झाला.

एका तासातच पायाची ही परीस्थिती झाली होती.

आता त्या मुंगीनं चाव्यातुन सोडलेल्या विषामुळे पोटरी, मांडी काय पण मान ही अकडली. रात्र झाली होती दवाखाने बंद झाले होते. मग काही घरगुती उपचार केले आणि झोपलो.

सकाळी लवकर उठुन दवाखाना शोधाला तर कळालं सगळे दवाखाने १० वाजता उघडतात. अजब शहर आहे बुवा अहो चक्क साड्यांची दुकानं उघडी होती पण दवाखाना एकही नाही. शेवटी १० वाजेपर्यंत वाट पहावी लागली आणि एक दवाखाना सापडला. डॉक्टर ही चक्रावून गेले माझा पाय पाहुन, व्यवस्थित तपासणी करुन झाल्यावर भली मोठी औषधाची यादी दिली. आता पायाची परीस्थिती तर खुपच वाईट झाली होती. सुज, वेदना खुप वाढली होती.

औषधं सुरु केल्यानंतर २ दिवसांनी पाय पुन्हा नेहमी सारखा झाला. सर्व औषधांचा खर्च सुमारे २५० रुपये झाला आणि एक हाफ डे पडला तो वेगळाच.

एक मुंगी चावली तर ही परिस्थिती आहे साप चावला असता तर काय झाले असते...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...