गुरुवार, १५ जुलै, २०१०

एक दिवस नियमांचा

जर सकाळी उठल्या उठल्या "आजचा हा दिवस तुम्हा सर्वांना मी (देव) व सरकारने बनविलेले सर्व नियम पाळायला लागतील" अशी एखादी आकाशवाणी झाली तर काय गंमत येईल ना. माझा हा दिवस कसा असेल याचे एक चित्र तयार करायचा असा प्रयत्न केला.

मी सकाळीच लवकर उठून अगदी भल्या पहाटे अभ्यंग स्नान वगैरे करुन देवाची पुजा, काकड आरती केली नंतर सर्व मोठ्यांचे आशिर्वाद घेऊनच दिवसाची सुरुवात केली. बायको स्वयंपाक घरात गेली व मी दुध आणायला बाहेर पडलो तर बाहेर वेगळेच चित्र दिसले. आंगण स्वच्छ झाडलेले होते सुरेख रांगोळी काढलेली होती. नुसतेच आमचे आंगण नव्हे तर सर्व शेजार पाजरचे आंगण ही सजले होते. दुकानात गेलो तर दुकानदाराने "ग्राहक देवा समान" या भावाने माझे स्वागत केले.

एक दुधाची पिशवी घेतली तर त्याने मोजून १६ रु. ५० पैसेच घेतले. घरी परत आलो तर जवळपास सर्व स्वयंपाक तयार होता. बायकोने चहा केला व डबा तयार करुन माझी ऑफीसला जायची तयारी पुर्ण केली. चहा घेऊन ऑफीससाठी बाहेर पडलो व बस स्टॉप आलो तर सगळे लोक रांगेत बसची वाट पाहत होते. अगदी वेळेवर बस आली व तीही बरोबर स्टॉपवरच थांबली सगळे मागच्या दाराने आत शिरले व उतरणारे पुढच्या दाराने बाहेर पडले. ड्रायव्हर व कंडक्टर संपुर्ण गणवेशात होते व कंडक्टरने ही अगदी क्षमतेप्रमाणे प्रवासी आत घेतले व बस निघाली, सगळ्या लोकांनी स्व:ताहुन तिकीट काढले व सुट्टे पैशांसाठी हुज्जत घातली नाही. प्रत्येक थांब्यावर कंडक्टरने आवाज दिला, प्रवाश्यांना उरलेले पैसे उतरण्यापुर्वी परत दिले. ड्रायव्हर अगदी मर्यादीत वेगात बस चालवत होता.

मी माझ्या स्टॉपवर उतरलो. रस्त्यावर नेहमीप्रमाणे रहदारी होती मात्र अत्यंत शिस्तीत सुरु होती. वेगाची, लेनची शिस्त पाळत वाहने चालत होती. सिग्नल ही चालु होते, रस्ता ओलांडताना पादचारी झेब्रा-क्रॉसींगचाच वापर करीत होते. सिग्नल मोडणार नाही याची खरबदारी वाहनचालक घेत होते मात्र तरी सिग्नल चुकलेले वाहन चालक वाहतुक पोलीसांच्या एका ईशा-यानेच थांबवत होते व नियमाप्रमाणे दंड भरुन पुढील प्रवासाला सुरुवात करीत होते. पोलीसही वाहनचालकांना रितसर पावती देत होते.

ऑफीसमध्ये सगळे वेळेवर म्हणजे ९.०० हजर होते. पहाटेपासुनचे सर्वांचे अनुभव जवळपास सारखेच होते, थोडासाही वेळ वाया न जाउ देता सगळे कामाला लागले. सगळे १००% क्षमतेने आपले काम करीत होते. दुपारी मध्येच टेलीकॉलरचा फोन आला ती क्रेडीट कार्ड विकत होती. तिने सर्व खरी खरी माहीती दिली व तुम्ही कसे फसले जाऊ शकता याचीही स्पष्ट कल्पना दिली व घ्यायचे असल्यास कुठे संपर्क करायचा हे सांगीतले. संध्याकाळी दिवसभरात झालेल्या कामासंदर्भात मिटींगमध्ये सिनिअर मंडळीनी प्रोजेक्टचे खरेखुरे स्टेटस सांगीतले व त्यावरुन आपण कसे काम करतो याची खरी कल्पना सर्वांना आली. बरोबर ६.०० वाजता ऑफीस संपले व सगळे घरी परत निघाले.

सकाळ प्रमाणेच रस्त्यावर रहदारी होती मात्र अत्यंत शिस्तीने. परतीचा प्रवासही सकाळ प्रमाणेच झाला. घरी पोहचलो तेव्हा तिन्हीसांजेला बायकोने देवासमोर दिवा लावून शुभंकरोती म्हण्टले. वेळेवर जेवायला बसलो व जेवताना टिव्ही बंद होता.
मग झोपण्याची तयारी करीत असतांना दिवसभरात घडलेल्या इतर घटना कानावर पडल्या. त्या अशा

शीतपेय छापील किंमती मध्ये मिळाले.
न्यूज चॅनलवर कोणतीही ब्रेकींग न्यूज नव्हती, फक्त सामान्य बातम्या होत्या.
कुठेही पाण्याची पाईप लाईन फुटली नाही अथवा कोणीही फोडली नाही.
त्यामुळे नळाला पाणी वेळेवर, योग्य दाबाने आले.
विनाकारण विजप्रवाह खंडीत झाला नाही.
व सर्वात महत्वाचे म्हणजे
सर्व भ्रष्टाचारी नेत्यांनी राजीनामे दिले.
कसाब व गुरुला फाशी देण्याचे फर्मान निघाले.

असा होता माझा दिवस...

तुमचा दिवस कसा असेल?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...