शुक्रवार, १६ जुलै, २०१०

सिंहगड

पुण्यात येऊन आता जवळपास तीन महिने झाले. मात्र सगळे दिवस घर शोधणे, शिफ्टिंग, घर लावणे यातच गेले. याकाळात वीकएंडला देखील कामच करावे लागले. पुण्यात आल्यापासून कोठेच फिरायला गेलो नाही ही तक्रार यायच्या आत काहीतरी प्लॅनींग करावे असा विचार केला आणि या रविवारी सकाळीच बायकोला म्हणालो, "चल आवर, आज फिरायला जाउ"

ठिकाण ठरले "सिंहगड" सकाळी ७.०० वाजता घरातून बाहेर पडलो, मनपाची बस मिळाली, कुंभारवाड्यात उतरुन चालत चालत शनिवारवाडा येथे पोहोचलो. पहिल्यांदाच जात असल्याने सर्वकाही विचारुन आणि माहिती घेत घेत प्रवास सुरु होता.

पुण्यात पावसाचे वातावरण नव्हते मात्र सिंहगड पायथा जसा जसा जवळ येत होता ढग दिसायला लागले. वातावरणात गारवा जाणवत होता. सिंहगड पायथ्याला पोहोचलो. वर गडावर चालत जायला किती वेळ लागतो हे माहीत नव्हते म्हणुन टॅक्सीने जायचे ठरविले. वर गडावर पोहचलो तेव्हा सकाळचे ९.३० झाले होते पण सकाळचे सहा साडे सहा झाले आहेत असे वाटत होते.

पाऊस नव्हता तरी वातावरणात खुपच गारवा होता व रात्री झालेल्या पावसामुळे सर्वत्र चिखल झाला होता. वाहनतळावर उतरलो तेव्हा बरीच गर्दी होती बरेचसे लोक अगोदर आपल्या वैयक्तिक वाहनाने पोहचले होते. सायकल, दुचाकी व चारचाकी वाहनांची गर्दी झाली होती.

आता खुप भुक लागली होती मग ताव मारला तो गरमागरम "कांदा भजी व चहा" यावर.

गरमागरम भजी समोर तयार करुन देण्यात आली. इतर अनेक दुकाने होती प्रत्येकाकडे तोंडाला पाणी सुटेल असे एकसे एक पदार्थ होते.हळुहळु निसर्गाचा आस्वाद घेत घेत आम्ही वरती जायला सुरुवात केली. गणेश टाके, दारुची कोठार, घोड्याची पागा, लोकमान्य टिळकांचे घर, विंड पॉईंट, दूरदर्शन मनोरा,  देव टाके, असे सगळे ठिकाणं पाहिली.

पण सर्वात जास्त पाहायची इच्छा असलेले ठिकाण बाकी होते ते म्हणजे "शूरवीर तानाजी मालुसरे" यांचा पुतळा व तानाजी मालुसरे कडा. अंगावर काटा आला तो कडा पाहुन. व जाणीव झाली की तानाजी मालुसरे बद्दल आपण जे काही वाचले, पाहिले ते काहीच नाही ते याहून अधीक खुप खुप शूरवीर होते.
तेथून पुढे निघालो तर दोन लहान मुली एका डबक्यात खेळतांना दिसल्या 


आणि कवी सौमित्रचे हे शब्द आठवले "पाऊस पडून गेल्यावर मन थेंबांचे गारांचे आईस चकवुनी आलेल्या त्या डबक्यातील पोरांचे..." वाटले आपणही त्या डबक्यात उड्या माराव्यात पण खुप भुक लागली होती.

जवळच एका झोपडी मधील हॉटेलात जेवण तयार होते. मी गरमागरम पिठलं भाकरी व बायको ने वांग्याचं भरीत व भाकरी घेतली. सोबतीला मडक्यातील दही होतंच.पोटभर खाल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरु करावा असे ठरवले आणि पावसाला सुरुवात झाली. तेव्हा दुपारचे ३.०० वाजले होते. गर्दी ही खुप झाली होती. ट्राफिक जॅम झाले होते. गाड्यांची सुमारे ४ ते ५ किलोमिटर लांब रांग लागली होती. पायथ्याजवळ पोहोचता पोहोचता ५.०० वाजले होते. तरी दिवस खुप खुप मजेत गेला इतका मजेत की कधीही विसरता येणार नाही असा...

1 टिप्पणी:

  1. पुण्यात स्वागत. ह्यापुढेही अश्याच आनंददायक आपल्या सिंहगडवार्‍या चालु राहोत.

    अनिकेत

    उत्तर द्याहटवा

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...