रविवार, ४ जुलै, २०१०

बालपणीचा पाऊस

पाऊस ही सर्वांना हवाहवासा वाटतो मात्र तो जास्त झाला की वैताग येतो
त्यामुळे मी आताशी पावसाची तुलना हलवाई तळत असलेल्या जिलबीशी करतो.
जिलबी तळतांना खुप खावीशी वाटते मात्र प्लेट मध्ये आली की, एखाद दुसरीच खाल्ली जाते.

लहानपणी पाऊस आला की मी धावत गच्चीवर जायचो, सर्व पन्हाळे बंद करुन गुपचुप परत घरात यायचो. मग आईची परवानगी घेऊन बाहेर भिजायला जायचो, पावसात खुप खेळायचो, नाचायचो. कोणाची तरी रद्दी वही, जुने वर्तमानपत्र घेऊन नाव बनवायचो ती वाहत्या पाण्यात किंवा नालीत सोडुन त्यांची नावेची स्पर्धा लावायचो. चिखलाचे गोळे करायचो, एरवी खेळतांना रागावणा-या काकुंच्या घरावर फेकायचो आणि पळुन जायचो. खुप खुप मस्ती करायचो..

(Photo taken from Internet and want to say thank you to respective owner)

मग पाऊस थांबला की सर्व मित्रांना घेऊन परत घरी यायचो, आता मोर्चा पुन्हा गच्चीवर जायचा. खुप मोठ्ठी गच्ची होती आमच्या घराची. जमा झालेल्या पाण्यात पुन्हा उड्या मारायचो, नाचायचो, साबणाचा फेस करुन फुगे उडवायचो (त्यामुळे नंतर मारही खायचो) आई खुप चिडली की मग हे पाणी घरातल्या बागेच्या बाजुचे पन्हाळ उघडुन बागेत सोडायचो आणि स्वच्छ अंघोळ करुन घरात यायचो.


क्रिकेट, विटी-दांडु, गोट्या हे एरवी खेळले जाणारे खेळ पावसाळ्यात बंद व्हायचे. फुटबॉल परवडत नसे म्हणुन तोही खेळ कधी खेळलो नाही. नेहमीच भिजायला मिळत असे नाही मग घरात बसुन टिव्ही, पत्ते, कॅरम इ. खेळायचो. पण पाऊस पडुन गेल्यावर जेव्हा सर्वत्र चिखल होत असे तेचा आम्ही एक खेळ खुप आवडीने खेळायचो तो म्हणजे "गज खुपसणे".

या मध्ये आम्ही मिळेल तितके गडी गोळा करायचो. एक अंदाजे ३० ते ४० सेंटीमिटरचा गजाचा तुकडा मिळवायचो मग आळी पाळी तो गज चिखलात खुपसत खुपसत चालत दुर दुर पर्यंत जायचो. ज्याचा गज खुपसल्यानंतर उभा नाही राहिला तो हरला. नंतर दुस-याची पाळी असे करत चालत राहायचो. मग ज्याचा गज सर्वात आधी पडला होता तो शेवटच्या ठिकाणाहुन लंगडी घालत परत यायचा असा हा खेळ असायचा. खुप धमाल असायची कारण चपला, कपडेच काय तर शरीरच पुर्ण चिखलाने माखलेल असायचं मग तसेच परततांना एखाद डबकं दिसलं की त्यामध्ये हात पाय धुवायचे आणि मग घरी परतायचं. घरी आई वाट पहातच असायची, ती रागावायची पण लाडही तितकेच करायची. चहा सोबत खायला गरमागरम कांदा भजी, भाजलेल्या शेंगा द्यायची.

मला आजही सगळं आठवतं...

लहानपणी नेहमी लवकर मोठं व्हावं असे वाटत असे. मी मोठा झालो की असं करेल तसं करेल असंही म्हणायचो. पण मोठं झाल्यावर कळलं की लवकर मोठं होण्याच्या नादात बालपण वाळू सारखं मुठीतून कधी निसटून गेलं हे समजलंच नाही.

आज बाहेर पडणारा पाऊस खिडकीत बसुन पाहिला तेव्हा पाच-सहा मुलं पावसात उत्साहात फुटबॉल खेळतांना दिसली, वाटल पटकन बाहेर जावं त्यांच्यात सामील व्हावं किंवा तसेच गडी गोळा करावे आणि एखादा गजाचा तुकडा घ्यावा व तो चिखलात खुपसत चालत चालत दुर जावं. पण नाही जमलं तसं करायला कारण मनाची कवाडं म्हणावी तशी नाही उघडता आली मला. मोठं असे एक अदृश्य असं कुलुप होतं त्याला...

२ टिप्पण्या:

  1. छान आहे पोस्ट...हा गजाचा खेळ मी लहान असताना मुलगे खेळत असताना पाहिला आहे. आज नियमही कळले....

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद अपर्णा,

    माझ्या ब्लॉगवर आपलं स्वागत.

    उत्तर द्याहटवा

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...