शनिवार, २४ जुलै, २०१०

निर्व्यसनाचे दुष्परिणाम

थोडेसे विचित्र वाटले ना शिर्षक वाचुन, प्रश्न पडला असेल ना? पडणारच कारण सर्वांना व्यसनाचे दुष्परिणाम माहित आहेतच पण निर्व्यसनाचे दुष्परिणाम

मला जाणवले आहेत ते...

मला स्वत:च्या एका गोष्टीवर खुप अभिमान आहे ती अशी की मला कोणतेही "व्यसन" नाही. २००१ मध्ये मी पदवीधर झालो आणि त्याच वर्षीच नोकरीच्या शोधात घराबाहेर पडलो आणि आज पर्यंत खुप प्रवास केला, खुप शहरं बदलली आणि कंपन्याही. खुप प्रकारचे अनुभव आले, ना ना प्रकारचे लोक भेटले.

नोकरीला लागल्यापासुन काही सवयी लावुन घेतल्या त्या म्हणजे वेळ पाळणे आणि दिलेले काम वेळेत संपवणे. मात्र गेल्या वर्षात असे काही अनुभव आले की मी या निष्कर्षावर पोहोचलो, की निर्व्यसनाचे दुष्परिणाम असतात.

ऑफीसमध्ये वेळेवर येणे, वेळेत काम संपवणे व संपल्यावरच घरी जायचे ही पध्दत आता जुनी झाली असे म्हणायला काहीच हरकत नाही कारण या "कॉर्पोरेट" जगतात इतरही ब-याच गोष्टी महत्वाच्या असतात, ऑफीस व तेथील कामाप्रमाणे स्मोकींग झोन, पब्स, डिस्को थेक हेही तितकेच महत्वाचे असतात हे समजायला लागलं.

बरेच जण ९.३० च्या ऑफीसला ११.०० वाजता येतात, आणि सरळ स्मोकींग झोनला जातात नंतरच मग कामाला लागतात. लंच १.०० घेऊन पुन्हा लगेचच ’तिथे’. जेव्हा ६.३० ला ऑफीस संपल्यावर काही मंडळी घरी जायला निघतात तेव्हाही ही मंडळी ’तिथेच’. असे दिवसातुन हे ३ ते ४ वेळा ’तिथे’ नक्की जातात. त्यामुळे दिवसभरात सरासरी १ तास तरी ही मंडळी ’तिथे’ घालवतात. थोडयावेळाने ही मंडळी लगेचच रात्री "बसायची" जागा ठरवितात व साडे आठ-नऊ ला त्याठिकाणी जातात.

बहुतेक ही मंडळी "बॅचलर" आहेत जी एकटीच रुम घेऊन राहतात. ऑफीसमध्ये उशिरा बसुन काम करण्यापेक्षा आपला वेळ वाढवणे हाच हेतु असणारी मंडळी जास्त. कारण रुमवर जाउन करणार तरी काय? इथे मस्त ए.सी. आहे, इंटरनेट, चहा/कॉफी आहे. झोप आली की जाऊ रुमवर...

इथपर्यंत सर्वकाही ठीक आहे, कोणी काय करावे अथवा करु नये हे ठरवणारे आपण कोण? आपलं आयुष्य कसं जगायच हे आपणच ठरवायच असतं आणि त्यांनी ते ठरवलं आहे. पण त्याचा परिणाम दुस-यावर होतो तेव्हा काय?

माझ्यासारखे कामाशी काम असणारे खुप जण आहेत, पण जेव्हा आम्हा सर्वांचे महिन्याभरातले कामाचे तास कमी भरले तेव्हा जाणवायला लागले "निर्व्यसनाचे दुष्परिणाम"

रात्री उशीरा ऑफीसमधुन बाहेर पडुन ही मंडळी एखादा बार किंवा पब गाठतात, भरपुर ड्रिंक्स घेतल्यावर रात्र उलटल्यानंतर घरी पोहचतात, आणि साहजिकच उठायला उशिर झाल्यामुळे कामावरही उशिरा येतात. दिवसभरात सरासरी एक तासतरी "स्मोकींग झोन" मध्ये घालवल्यानंतर कामातही उशिर होतो, म्हणुन मग उशिरापर्यंत ऑफीसमध्ये बसतात, रात्री उशिरापर्यंत बसल्याने दुस-या दिवशी लागणारे लेटमार्क्स नील होतात व टाईमशीट वर तास जास्त. ऑफीस संपल्यानंतर चालणा-या पार्ट्यांमध्ये प्रमोशन्स ही ठरविली जातात आणि इंक्रीमेंटही...

असे हे चक्र चालुच राहते

माणसाला व्यसन का असते हया विषयी खुप विचार केला, तर त्याचे मुख्य कारणं समोर आलं ते म्हणजे दु:ख आणि ताण आणि ह्या गोष्टींचे निरसन माणुस व्यसनाने करायचा प्रयत्न करतो.

कुठेतरी ऎकले आहे की, "ज्या माणसाला सुखं साजरा करण्यासाठी आणि दु:ख विसरण्यासाठी माणसाशिवाय दुस-या कशाचीही सोबत लागत नाही त्याच्यापेक्षा सुखी या जगात कोणीही नाही"

रविवार, १८ जुलै, २०१०

लग्न समारंभ

नोकरीला लागल्यापासून मी फार थोडे लग्न अटेंड केलेत. नोकरीचे ठिकाण सारखे बदलत असल्याने गेल्या काही वर्षात अनेक नातेवाईकांनी पत्रिका पाठवूनही मला हजेरी लावता आली नाही. जी काही थोडीफार अटेंड केलीत तिथे अगदीच "सो कॉल सोफिस्टिकेटेड पणा" दिसून आला. आलेल्या पाहुण्यांना पंगतीत जेवण दिले तर ते बुफे मागतात आणि एखाद्या ठिकाणी बुफे असेल तर पंगतीत काय मजा असते तुम्हाला काय माहित असेही म्हणतात. अहो हे लोकं इतरत्र भेटले किंवा लग्नात साधी ओळख द्यायला देखील टाळतात म्हणुन मी ही अशा समारंभापासुन दुरच राहतो.

आज जेव्हा एका कामानिमीत्त सासवडला जावं लागलं, छोटासा प्रवास होता दरम्यान बस मधुन एका ठिकाणी लग्नाचा मंडप दिसला. व-हाडी मंडळी पाहुन मला मामाच्या गावाकडच्या लग्नाची आठवण झाली.

लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये आम्ही भावंड मामाच्या गावाला जायचो. खुप छोटंस आणि साध गाव मात्र तरी नाव "खासगावं". एक छोटं १०००-२००० वस्तीच गावं, मातीची घरं, विहीरीवरच पाणी, शेणान सारवलेली आंगणं. जालन्याहुन साधारण तीन तास लागायचे. पहिल्यांदा मी जेव्हा गेलो तेव्हा गावात फक्त एस.टी. यायची ती ही दिवसातुन एकदा व बाजाराच्या दिवशी दोनदा. गावात वीज ही नव्हती, रस्ते नव्हते आणि शाळा फक्त चौथीपर्यंत. तेव्हा मी साधारण ५-६ वर्षाचा असेल. नंतर मात्र गावं बदलल, वीज आली, शाळा आली, नळ आले आणि एस. टी. च्या फे-याही वाढल्या.

दरवर्षी उन्हाळ्यात मामाकडे गेलं की खुप मजा यायची कारण आम्ही १०-१५ भावंड असायचो. शेतात जाणे, गडी लोकांवर नजर ठेवणे, बैलांना चारा-पाणी देणे आणि संध्याकाळी टोपलंभर शेणं घेऊन घरी येणे हीच आमची दिनचर्या असायची.

माझ्या आजीला गावात खुप मान होता त्यामुळे गावात कुठेही लग्न असले की, ती व्यक्ती आजीला निमंत्रण द्यायला स्वत: यायची. ह्या लग्नांची मजा काही औरच असायची. अगदी आठवडाभर हा समारंभ चालायचा. गावात पिठाची गिरणी नव्हती तालुक्याला जावं लागायचं ते सर्वांना परवडत नसे म्हणुन लग्नघरातील पुरुष ५ ते १० किलो गहु अथवा ज्वारी गावातील काही घरात एक आठवडा अगोदरच पोहोचवायचे. मग त्या घरातील बायकां ते धान्य दळुन ठेवायच्या. लग्नघरातील पुरुष ते पीठ गोळा करुन घरी घेऊन यायचे.

गावातील जवळपास सगळेच लोकं यात शामील व्हायचे, जसे मंडप टाकणे, पत्रिका (छापल्या असतील तर) वाटणे, ग्रामपंचायतीच्या फलकावर विवाह सोहळ्याबद्दल लिहीणे आणि गावात दवंडी देणे.

खरी गंमत तर लग्नाच्या दिवशी असायची, सकाळी लग्नघरातील स्त्रीयां व एक पुरुष प्रत्येक घरी जाणार निमंत्रणासोबत थोडं पीठ व गोडतेल देणार. मग त्या घरातील स्त्रीयां यापासुन पोळ्या वा भाक-या बनवुन लग्न घरी घेऊन जाणार. लग्न दुपारी घरासमोर टाकलेल्या मांडवातच लागायचं व तिथेच बाकीचा स्वयंपाक व्हायचां, म्हणजे वरण, बुंदी आणि लुंजी (उकडलेल्या कैरीचे चार काप करुन त्याचे आंबट गोड पातळ लोणचं). त्यावेळच्या त्या पोळ्या किंवा भाक-या खुप मोठ्या असायच्या, म्हणजे आजच्या १= त्यावेळची १/४.

जेवणाची पंगत घरासमोरच्या गल्लीत किंवा रस्तावर चटई टाकुन बसायची, त्यासाठी ती जागा सकाळीच झाडुन व सारवुन घेतलेली असायची. या पंगतीला जायचे म्हणजे ताट, वाटी व पेला आप-आपल्या घरुन घेऊन जावी लागत असे. आम्हाला मात्र पत्रावळ मिळायची.

मग यायची आहेराची वेळ, हा आमच्यासाठी आनंद सोहळा असायचा. कारण आलेल्या प्रत्येक आहेराची रितसर नोंद केली जायची आणि आहेर देणा-याच्या समक्षच त्याची अनाउंसमेंट लाउड स्पीकर वर केली जायची. आहेर काहीही असो म्हणजे अगदी ५ रुपयापासुन ते हंडा, साडी, टॉवेल टोपी या सर्वांची अनाउंसमेंट केली जायची. आम्हाला खुप खुप मज्जा वाटायची.

अंधार पडायला सुरुवात झाली की मग व-हाड मिळेल त्या वाहनाने (टेंपो, बैलगाडी) परत जायचं. अगदी आठवडाभर चालु असलेला हा समारंभ कोणत्याही रुसव्या फुगव्याशिवाय पार पडायचा.

शुक्रवार, १६ जुलै, २०१०

सिंहगड

पुण्यात येऊन आता जवळपास तीन महिने झाले. मात्र सगळे दिवस घर शोधणे, शिफ्टिंग, घर लावणे यातच गेले. याकाळात वीकएंडला देखील कामच करावे लागले. पुण्यात आल्यापासून कोठेच फिरायला गेलो नाही ही तक्रार यायच्या आत काहीतरी प्लॅनींग करावे असा विचार केला आणि या रविवारी सकाळीच बायकोला म्हणालो, "चल आवर, आज फिरायला जाउ"

ठिकाण ठरले "सिंहगड" सकाळी ७.०० वाजता घरातून बाहेर पडलो, मनपाची बस मिळाली, कुंभारवाड्यात उतरुन चालत चालत शनिवारवाडा येथे पोहोचलो. पहिल्यांदाच जात असल्याने सर्वकाही विचारुन आणि माहिती घेत घेत प्रवास सुरु होता.

पुण्यात पावसाचे वातावरण नव्हते मात्र सिंहगड पायथा जसा जसा जवळ येत होता ढग दिसायला लागले. वातावरणात गारवा जाणवत होता. सिंहगड पायथ्याला पोहोचलो. वर गडावर चालत जायला किती वेळ लागतो हे माहीत नव्हते म्हणुन टॅक्सीने जायचे ठरविले. वर गडावर पोहचलो तेव्हा सकाळचे ९.३० झाले होते पण सकाळचे सहा साडे सहा झाले आहेत असे वाटत होते.

पाऊस नव्हता तरी वातावरणात खुपच गारवा होता व रात्री झालेल्या पावसामुळे सर्वत्र चिखल झाला होता. वाहनतळावर उतरलो तेव्हा बरीच गर्दी होती बरेचसे लोक अगोदर आपल्या वैयक्तिक वाहनाने पोहचले होते. सायकल, दुचाकी व चारचाकी वाहनांची गर्दी झाली होती.

आता खुप भुक लागली होती मग ताव मारला तो गरमागरम "कांदा भजी व चहा" यावर.

गरमागरम भजी समोर तयार करुन देण्यात आली. इतर अनेक दुकाने होती प्रत्येकाकडे तोंडाला पाणी सुटेल असे एकसे एक पदार्थ होते.हळुहळु निसर्गाचा आस्वाद घेत घेत आम्ही वरती जायला सुरुवात केली. गणेश टाके, दारुची कोठार, घोड्याची पागा, लोकमान्य टिळकांचे घर, विंड पॉईंट, दूरदर्शन मनोरा,  देव टाके, असे सगळे ठिकाणं पाहिली.

पण सर्वात जास्त पाहायची इच्छा असलेले ठिकाण बाकी होते ते म्हणजे "शूरवीर तानाजी मालुसरे" यांचा पुतळा व तानाजी मालुसरे कडा. अंगावर काटा आला तो कडा पाहुन. व जाणीव झाली की तानाजी मालुसरे बद्दल आपण जे काही वाचले, पाहिले ते काहीच नाही ते याहून अधीक खुप खुप शूरवीर होते.
तेथून पुढे निघालो तर दोन लहान मुली एका डबक्यात खेळतांना दिसल्या 


आणि कवी सौमित्रचे हे शब्द आठवले "पाऊस पडून गेल्यावर मन थेंबांचे गारांचे आईस चकवुनी आलेल्या त्या डबक्यातील पोरांचे..." वाटले आपणही त्या डबक्यात उड्या माराव्यात पण खुप भुक लागली होती.

जवळच एका झोपडी मधील हॉटेलात जेवण तयार होते. मी गरमागरम पिठलं भाकरी व बायको ने वांग्याचं भरीत व भाकरी घेतली. सोबतीला मडक्यातील दही होतंच.पोटभर खाल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरु करावा असे ठरवले आणि पावसाला सुरुवात झाली. तेव्हा दुपारचे ३.०० वाजले होते. गर्दी ही खुप झाली होती. ट्राफिक जॅम झाले होते. गाड्यांची सुमारे ४ ते ५ किलोमिटर लांब रांग लागली होती. पायथ्याजवळ पोहोचता पोहोचता ५.०० वाजले होते. तरी दिवस खुप खुप मजेत गेला इतका मजेत की कधीही विसरता येणार नाही असा...

पाटी

आज एक ईमेल आला आणि डोक्याची पार चाळणी झाली.

कमाल आहे ह्या फोटोची व त्याहुन ही पाटी लिहणा-याची...
सौजन्य: आंतरजाल

गुरुवार, १५ जुलै, २०१०

एक दिवस नियमांचा

जर सकाळी उठल्या उठल्या "आजचा हा दिवस तुम्हा सर्वांना मी (देव) व सरकारने बनविलेले सर्व नियम पाळायला लागतील" अशी एखादी आकाशवाणी झाली तर काय गंमत येईल ना. माझा हा दिवस कसा असेल याचे एक चित्र तयार करायचा असा प्रयत्न केला.

मी सकाळीच लवकर उठून अगदी भल्या पहाटे अभ्यंग स्नान वगैरे करुन देवाची पुजा, काकड आरती केली नंतर सर्व मोठ्यांचे आशिर्वाद घेऊनच दिवसाची सुरुवात केली. बायको स्वयंपाक घरात गेली व मी दुध आणायला बाहेर पडलो तर बाहेर वेगळेच चित्र दिसले. आंगण स्वच्छ झाडलेले होते सुरेख रांगोळी काढलेली होती. नुसतेच आमचे आंगण नव्हे तर सर्व शेजार पाजरचे आंगण ही सजले होते. दुकानात गेलो तर दुकानदाराने "ग्राहक देवा समान" या भावाने माझे स्वागत केले.

एक दुधाची पिशवी घेतली तर त्याने मोजून १६ रु. ५० पैसेच घेतले. घरी परत आलो तर जवळपास सर्व स्वयंपाक तयार होता. बायकोने चहा केला व डबा तयार करुन माझी ऑफीसला जायची तयारी पुर्ण केली. चहा घेऊन ऑफीससाठी बाहेर पडलो व बस स्टॉप आलो तर सगळे लोक रांगेत बसची वाट पाहत होते. अगदी वेळेवर बस आली व तीही बरोबर स्टॉपवरच थांबली सगळे मागच्या दाराने आत शिरले व उतरणारे पुढच्या दाराने बाहेर पडले. ड्रायव्हर व कंडक्टर संपुर्ण गणवेशात होते व कंडक्टरने ही अगदी क्षमतेप्रमाणे प्रवासी आत घेतले व बस निघाली, सगळ्या लोकांनी स्व:ताहुन तिकीट काढले व सुट्टे पैशांसाठी हुज्जत घातली नाही. प्रत्येक थांब्यावर कंडक्टरने आवाज दिला, प्रवाश्यांना उरलेले पैसे उतरण्यापुर्वी परत दिले. ड्रायव्हर अगदी मर्यादीत वेगात बस चालवत होता.

मी माझ्या स्टॉपवर उतरलो. रस्त्यावर नेहमीप्रमाणे रहदारी होती मात्र अत्यंत शिस्तीत सुरु होती. वेगाची, लेनची शिस्त पाळत वाहने चालत होती. सिग्नल ही चालु होते, रस्ता ओलांडताना पादचारी झेब्रा-क्रॉसींगचाच वापर करीत होते. सिग्नल मोडणार नाही याची खरबदारी वाहनचालक घेत होते मात्र तरी सिग्नल चुकलेले वाहन चालक वाहतुक पोलीसांच्या एका ईशा-यानेच थांबवत होते व नियमाप्रमाणे दंड भरुन पुढील प्रवासाला सुरुवात करीत होते. पोलीसही वाहनचालकांना रितसर पावती देत होते.

ऑफीसमध्ये सगळे वेळेवर म्हणजे ९.०० हजर होते. पहाटेपासुनचे सर्वांचे अनुभव जवळपास सारखेच होते, थोडासाही वेळ वाया न जाउ देता सगळे कामाला लागले. सगळे १००% क्षमतेने आपले काम करीत होते. दुपारी मध्येच टेलीकॉलरचा फोन आला ती क्रेडीट कार्ड विकत होती. तिने सर्व खरी खरी माहीती दिली व तुम्ही कसे फसले जाऊ शकता याचीही स्पष्ट कल्पना दिली व घ्यायचे असल्यास कुठे संपर्क करायचा हे सांगीतले. संध्याकाळी दिवसभरात झालेल्या कामासंदर्भात मिटींगमध्ये सिनिअर मंडळीनी प्रोजेक्टचे खरेखुरे स्टेटस सांगीतले व त्यावरुन आपण कसे काम करतो याची खरी कल्पना सर्वांना आली. बरोबर ६.०० वाजता ऑफीस संपले व सगळे घरी परत निघाले.

सकाळ प्रमाणेच रस्त्यावर रहदारी होती मात्र अत्यंत शिस्तीने. परतीचा प्रवासही सकाळ प्रमाणेच झाला. घरी पोहचलो तेव्हा तिन्हीसांजेला बायकोने देवासमोर दिवा लावून शुभंकरोती म्हण्टले. वेळेवर जेवायला बसलो व जेवताना टिव्ही बंद होता.
मग झोपण्याची तयारी करीत असतांना दिवसभरात घडलेल्या इतर घटना कानावर पडल्या. त्या अशा

शीतपेय छापील किंमती मध्ये मिळाले.
न्यूज चॅनलवर कोणतीही ब्रेकींग न्यूज नव्हती, फक्त सामान्य बातम्या होत्या.
कुठेही पाण्याची पाईप लाईन फुटली नाही अथवा कोणीही फोडली नाही.
त्यामुळे नळाला पाणी वेळेवर, योग्य दाबाने आले.
विनाकारण विजप्रवाह खंडीत झाला नाही.
व सर्वात महत्वाचे म्हणजे
सर्व भ्रष्टाचारी नेत्यांनी राजीनामे दिले.
कसाब व गुरुला फाशी देण्याचे फर्मान निघाले.

असा होता माझा दिवस...

तुमचा दिवस कसा असेल?

मंगळवार, १३ जुलै, २०१०

धन्यवाद मित्रांनो...

आज सकाळीच लवकर उठलो, देवाच्या आणि (स्व.) आई-वडिलांच्या फोटोला नमस्कार करुन दिवसाची सुरुवात केली. शुभेच्छांचे फोन, समसची सुरुवात ६.०० वाजताच सुरुवात झाली. ९.३० ला ऑफीसला पोहचलो आणि ई-मेल ही भरपूर आले. गेल्या काही वर्षातील या दिवसाची आठवणी ताज्या केल्या तर आठवण आली आई-वडिलांची आणि शाळेतील, कॉलेजमधील मित्रांची...

दुपारी जेव्हा आंतरजाल चाळत असतांना सहजच लक्ष भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc.... ब्लॉगवर गेलं आणि २००२ चा ह्याच दिवसाच्या आठवणी ताज्या झाल्या.

 मी आणि राजेश
 मस्त केक...
 कापून घेतो, थांबा जरा
 अहो, केवढी घाई

मी उमेशला केक भरवतांना
 धन्यवाद उमेश
आज माझा वाढदिवस सचिन, विरेंद्र, राजेश, तुषार, मोहीत, उमेश, निलेश, राहुल आणि अंकीत यांनी तर जोशात साजरा केला.  खुप खुप धन्यवाद मित्रांनो, मला एवढे प्रेम दिल्याबद्दल.

सोमवार, ५ जुलै, २०१०

महागाई आणि बंद

काम चालू रस्ता बंद
लोडशेडींग आहे वीज बंद
पाईपलाईन फुटली पाणी बंद
महागाई वाढली भारत बंद

विरोधकांच्या कारभाराने
जीवन झाले संथ
नाही चिंता जनतेची सरकारला
याचीच आहे खंत

भली मोठी यादी देत
बायको म्हणाली "आणा आज राशन"
मी म्हणालो थांब जरा
बघू काय करतंय शासन

महागाई कमी झाली तर ठीक
नाहीतर कर्ज मिळतंय बघू
मगच आणू राशन...

ती म्हणाली, इथं पिकवायला नाही मिळत
खरेदीला कुठुन मिळणार
ही महागाई अशीच आपल्याला गिळणांर

जनतेचं ऎकणारं राहीलं नाही कोणी
नेते मंडळी खात आहे मढ्यावरच लोणी
यश अपयश बंदचे मोजण्यात ते आहेत व्यस्त
आपलं जगण्यापेक्षा मरणच आहे स्वस्त...

रविवार, ४ जुलै, २०१०

बालपणीचा पाऊस

पाऊस ही सर्वांना हवाहवासा वाटतो मात्र तो जास्त झाला की वैताग येतो
त्यामुळे मी आताशी पावसाची तुलना हलवाई तळत असलेल्या जिलबीशी करतो.
जिलबी तळतांना खुप खावीशी वाटते मात्र प्लेट मध्ये आली की, एखाद दुसरीच खाल्ली जाते.

लहानपणी पाऊस आला की मी धावत गच्चीवर जायचो, सर्व पन्हाळे बंद करुन गुपचुप परत घरात यायचो. मग आईची परवानगी घेऊन बाहेर भिजायला जायचो, पावसात खुप खेळायचो, नाचायचो. कोणाची तरी रद्दी वही, जुने वर्तमानपत्र घेऊन नाव बनवायचो ती वाहत्या पाण्यात किंवा नालीत सोडुन त्यांची नावेची स्पर्धा लावायचो. चिखलाचे गोळे करायचो, एरवी खेळतांना रागावणा-या काकुंच्या घरावर फेकायचो आणि पळुन जायचो. खुप खुप मस्ती करायचो..

(Photo taken from Internet and want to say thank you to respective owner)

मग पाऊस थांबला की सर्व मित्रांना घेऊन परत घरी यायचो, आता मोर्चा पुन्हा गच्चीवर जायचा. खुप मोठ्ठी गच्ची होती आमच्या घराची. जमा झालेल्या पाण्यात पुन्हा उड्या मारायचो, नाचायचो, साबणाचा फेस करुन फुगे उडवायचो (त्यामुळे नंतर मारही खायचो) आई खुप चिडली की मग हे पाणी घरातल्या बागेच्या बाजुचे पन्हाळ उघडुन बागेत सोडायचो आणि स्वच्छ अंघोळ करुन घरात यायचो.


क्रिकेट, विटी-दांडु, गोट्या हे एरवी खेळले जाणारे खेळ पावसाळ्यात बंद व्हायचे. फुटबॉल परवडत नसे म्हणुन तोही खेळ कधी खेळलो नाही. नेहमीच भिजायला मिळत असे नाही मग घरात बसुन टिव्ही, पत्ते, कॅरम इ. खेळायचो. पण पाऊस पडुन गेल्यावर जेव्हा सर्वत्र चिखल होत असे तेचा आम्ही एक खेळ खुप आवडीने खेळायचो तो म्हणजे "गज खुपसणे".

या मध्ये आम्ही मिळेल तितके गडी गोळा करायचो. एक अंदाजे ३० ते ४० सेंटीमिटरचा गजाचा तुकडा मिळवायचो मग आळी पाळी तो गज चिखलात खुपसत खुपसत चालत दुर दुर पर्यंत जायचो. ज्याचा गज खुपसल्यानंतर उभा नाही राहिला तो हरला. नंतर दुस-याची पाळी असे करत चालत राहायचो. मग ज्याचा गज सर्वात आधी पडला होता तो शेवटच्या ठिकाणाहुन लंगडी घालत परत यायचा असा हा खेळ असायचा. खुप धमाल असायची कारण चपला, कपडेच काय तर शरीरच पुर्ण चिखलाने माखलेल असायचं मग तसेच परततांना एखाद डबकं दिसलं की त्यामध्ये हात पाय धुवायचे आणि मग घरी परतायचं. घरी आई वाट पहातच असायची, ती रागावायची पण लाडही तितकेच करायची. चहा सोबत खायला गरमागरम कांदा भजी, भाजलेल्या शेंगा द्यायची.

मला आजही सगळं आठवतं...

लहानपणी नेहमी लवकर मोठं व्हावं असे वाटत असे. मी मोठा झालो की असं करेल तसं करेल असंही म्हणायचो. पण मोठं झाल्यावर कळलं की लवकर मोठं होण्याच्या नादात बालपण वाळू सारखं मुठीतून कधी निसटून गेलं हे समजलंच नाही.

आज बाहेर पडणारा पाऊस खिडकीत बसुन पाहिला तेव्हा पाच-सहा मुलं पावसात उत्साहात फुटबॉल खेळतांना दिसली, वाटल पटकन बाहेर जावं त्यांच्यात सामील व्हावं किंवा तसेच गडी गोळा करावे आणि एखादा गजाचा तुकडा घ्यावा व तो चिखलात खुपसत चालत चालत दुर जावं. पण नाही जमलं तसं करायला कारण मनाची कवाडं म्हणावी तशी नाही उघडता आली मला. मोठं असे एक अदृश्य असं कुलुप होतं त्याला...

शनिवार, ३ जुलै, २०१०

बाय बाय अर्जंटिना

आश्चर्य आहे, जर्मनी ४ X अर्जंटिना ०


कमाल आहे मॅरेडोना सारखा कोच, मेसी सारखा खेळाडु तरी ही परीस्थीती.

इग्लंड ४-१ ने हरले ही खुप सन्मानाची बाब म्हणावी इग्लंडसाठी

कारण त्यांचा एक गोल नाकारला आणि त्यांनी एक गोल केला.

पण तलवारीला धार लावत बसलेल्या अर्जंटिनाच्या ढाली तर प्लास्टीकच्या निघाल्या.

बचावफळी खुप म्हणजे खुपच कमकुवत निघाली.


परतीच्या प्रवासाच्या अर्जंटिनाला शुभेच्छा...

शुक्रवार, २ जुलै, २०१०

मी आणि कॉमन मॅन

मुंबई एक स्वप्नांच शहर, २००६ साली मी या शहरात प्रथम आलो. मुंबई शहराचे विश्चचं खुप वेगळ आहे, तेथील गर्दी, जीवनाचा वेग याचाशी कधीही जुळवता येणार नाही असे वाटत होते. पण "खुपच गर्दी आहे" असे म्हणता म्हणता कधी या गर्दीचा एक भाग होऊन गेलो हे समजलंच नाही.

माझं बालपण जालना सारख्या छोट्या शहरात गेलं. शिक्षण पुर्ण केल्यानंतर मुंबईला जाण्याचा कधी विचारही केला नव्हता. मात्र नशीब आपल्या मनासारखे वागत नाही, २००६ च्या अखेरीस मी या शहरात आलो. नोकरी शोधत असतांनाच या शहराचा एक एक पैलु पहावयास मिळाला. पहिला लोकलचा प्रवास मला आजही आठवतो.

स्लो लोकल ने सुरु झालेला प्रवास सेमीवरुन फास्ट कधी झाला हे समजलेच नाही.

मला सुरुवातीला सेमीफास्ट लोकल असतात हे माहीतच नव्हते, माहीती एवढीच की स्लो लोकल आणि फास्ट लोकल. कल्याणहुन स्लो लोकल समजुन मी एका लोकलमध्ये बसलो. मला घाटकोपरला जायचे होते. हे माहीत होते की फास्ट लोकल घाटकोपरला थांबते पण ठाण्याहुन पुढे जेव्हा लोकल थांबेना तेव्हा मी जरा गडबडलो, लगेचच मित्राला फोन केला. तो म्हणाला, "अरे तु सेमी फास्ट लोकल मध्ये चढलास, घाटकोपरला थांबेल उतर मी तुझी वाट बघतोय..."

मुंबईमध्ये राहुन सर्व अनुभव घेतले जे अस्सल मुंबईकराला नेहमीच येतात, जसे रेल्वे ट्रॅकवरुन चालत जाणे, मेगाब्लॉक मध्ये अडकणे, पावसाळ्यात लोकलच्या बंद डब्यात प्रवास करणे. धावती लोकल पकडणे, गर्दीमध्ये, दारात उभेराहुन प्रवास करणे. फास्ट लोकलची माहीती, कोणते स्टेशन कोणत्या दिशेने येते, ईस्ट-वेस्ट इत्यादी इ. बघता बघता मी मुंबईकर होऊन गेलो (पण पु. लं च्या मुंबईकराच्या फक्त १०%)

आज चार वर्ष मुंबईत राहल्या नंतर इतर शहरात मन रमत नाही, मुंबईत राहुन एक शिस्त लागली, कुठेही न लिहीलेले नियम (चांगले) पाळायची सवय लागली. मुंबईत सर्वांनाच घाई असते पण त्याचा त्रास दुस-याला होत नाही पण इतर शहरात फक्त आपल्याच घाई आहे असे विचार करणारेच खुप व त्याचा त्रास आपल्याला हे चित्र पहायला मिळते.
मुंबईत राहुन खुप प्रवास केला, खुप फिरलो मात्र कंटाळा कधीच आला नाही. गेट वे ऑफ ईंडिया, मरीन ड्राईव्ह, वरळी सी फेस सर्व पाहिले वरळी सी फेसला आर. के. लक्ष्मणच्या "कॉमन मॅन" सोबत फोटोही काढला.

मी आज मुंबईपासुन दुर जात आहे मात्र हा निरोप परत येण्यासाठी घेत आहे. आता यशाकडे प्रवास सुरु केला असला तरी कालचा हा (मी) कॉमन मॅन अजुनही एक कॉमन मॅनच राहिला आहे.

गुरुवार, १ जुलै, २०१०

ऎ चलनेवाले राह में

काही वर्षापुर्वी बजाज कॅलीबर या दुचाकीची एक जाहिरात टि.व्ही.वर प्रसारीत होत असे.
ही जाहिरात आजही मला संपुर्ण आठवते.

ऎ चलनेवाले राह में
रुकना ना हार के
है तेरे इंतजार में
साये बहार के

जब झुम के निकल पडे
मंझील के चाह में
फिर चाहे जितने मोड
मिले आज राह में
हर मोड हर दिशा
है अपनी निगाह में

चलते चलो यह राह
जहॉ तक चली चले
ऎ चलनेवाले राह में
रुकना ना हार के
Related Posts Plugin for WordPress, Blogger...