शुक्रवार, २५ जून, २०१०

साहेब आहेत, घेऊन जा

मी नाशिकला असतांनाची गोष्ट आहे. भल्या पहाटे घरातुन बाहेर पडलो.
चालत चालत त्रिमुर्ती चौकात आलो तर सुर्यदेव हळुहळु आपल्या बेडरुम मधुन बाहेर येत होते.
थोडस उजाडलं आणि मी शेअर रिक्षा मिळते का हे बघायला लागलो.
काही वेळातच एक रिक्षा आली.
रिक्षावाले: येणार का C.B.S.?
मी हो म्हणालो आणि रिक्षात बसलो, मी एकटाच होतो.
रिक्षावाले थोडे वैतागलेलेच होते कारण बोहोणीची वेळ होती आणि सीटही मिळत नव्हतं.
बराच वेळ सीट मिळत नाही असे लक्षात आल्यावर रिक्षावाले मला एकट्यालाच घेउन निघाले.

थोड्या वेळातच एरिगेशन ऑफीसच्या जवळ आमची रिक्षा पोहोचली.
एक माणुस उभा दिसला, रिक्षावालेनी थांबुन त्याला विचारले पण तो काहीच बोलला नाही.
तो इसम थोडा बाजुला सरकला आणि रस्ता लगत झोपलेल्या एका मोकाट कुत्र्याजवळ गेला.
आता त्याने त्या कुत्र्याचे दोन्ही कान पकडुन ओढायला सुरुवात केली.
आमच्या कानाला असह्य अशा आवाजात कुत्रं केकाटत होतं तरी तो इसम थांबला नाही.
तो रिक्षाजवळ आल्यावर कळाले की तो मद्यधुंद अवस्थेत आहे, आता त्याने ते कुत्रं उचलुन रिक्षात आणुन टाकलं.
आम्ही दोघे आवाक झालो आम्हाला समजेणा की हा काय प्रकार आहे.
रिक्षावाले काही म्हणायच्या आधीच तो इसम म्हणाला "हे आमचे साहेब आहेत, घेऊन जा ह्याला आणि नेऊन सोडा कुठेतरी"

आता रिक्षावाले खुपच चिडले (मला खुप हसु येत होतं पण मी मोह आवरला) आणि त्याला न भुतो ना भविष्य अशा शिव्या दिल्या आणि कुत्र्याला बाहेर काढुन रिक्षा सुरु केली.
मला म्हणाले, "दादा, मी अजुन चहा पिला नाही, आणि हा XXXX सकाळी सकाळी ढोसुन आलाय काय करायचं सांगा अशा लोकांचे?"

सकाळ एवढी धमाकेदार झाली होती त्यामुळे संपुर्ण दिवस हसण्यातच गेला...

गुरुवार, २४ जून, २०१०

अभिनंदन टीम ईंडिया...१५ वर्षानंतर भारताने आशिया चषक जिंकला.
भारताने या स्पर्धेत चांगले प्रदर्शन केले व विजयश्री मिळवली.
बांग्लादेश विरुद्ध सहज, पाकिस्तान विरुद्ध अतिशय चिकाटीने मिळालेल्या विजयानंतर श्रीलंकेसोबतची साखळी सामना भारत दुय्यम संघ घेऊन

खेळला. हा सामना पराभुत झाल्यानंतर या सामन्यातील चुका अंतिम सामन्यात केल्या नाही.

दिनेश कार्तीक, विराट कोहली ने फलंदाजी तर आशिष नेहरा, जहीर खान ने उत्तम गोलंदाजी केली.

अभिनंदन टीम ईंडिया या विजयासाठी.

बुधवार, २३ जून, २०१०

माझ्या ब्लॉगला बक्षीस

एक आनंदाची बातमी आपल्या सर्वांसोबत शेअर करायची आहे.

नेहमीप्रमाणे मी ऑफीस जातांना प्रवासात रेडिओ ऎकत होतो.
सकाळच्या कार्यक्रमात निवेदिका आदितीने आपल्या आयुष्यातील "एक हृदयस्पर्शी घटना" सांगा हे निवेदन केले.
एरवी मी रेडिओ, टिव्हीवरील कार्यक्रमात कधीही फोन, SMS करीत नसतो मात्र आज का कोणास ठाऊक करावासा वाटला. मी लगेचच फोन लावला, आणि विशेष म्हणजे फोन लागला ही...

मी माझ्या ब्लॉगवरील "रेडिओ, मैत्री आणि एक आठवण..." ही घटना सांगीतली.
त्यासाठी रेडिओ मिरची 98.3 तर्फे मला दोघांसाठी "बरिस्ता लवासा" चे कुपन मिळाले.

धन्यवाद आदिती आणि रेडिओ मिरची

सोमवार, २१ जून, २०१०

गरज आणि व्यसन

मी १३-१४ वर्षाचा होतो त्यावेळेसची घटना आहे. आमच्या घरी संपुर्ण वर्षाचे धान्य खरेदीसाठी मी वडिलांसोबत आडत बाजारात गेलो होतो. दोन तीन तास उन्हात फिरुन आमची खरेदी संपली, त्यानंतर वडीलांनी ती सर्व धान्याची पोती घरपोच देण्यासाठी एक “हमाल” शोधला.
३५ ते ४० वयाचा एक माणुस पुढे आला, त्याला कामाची गरज होती, तो घामाने डबडबला होता. तो अशिक्षीत असावा कारण त्याने पत्ता लिहिण्यास दुस-या व्यक्तीची मदत घेतली. त्याने असतील तसे कपडे घातले होते, पायात साधी स्लीपर आणि जवळ एक कळकट्ट रुमाल होता, जो त्याने डोक्याला बांधला होता. तो हे सर्व सामान (५-६ पोती) ६० रुपयात घरी घेउन येण्यास तयार झाला.
तो माझ्या वडिलांना म्हणाला, “साहेब, २० रुपये आधी द्या, बाकीचे ४० रुपये घरी आल्यावर द्या”
वडिलांनी त्याला २० रुपये दिले व म्हणाले “पिऊन येऊ नकोस”
तो हसत हसत गेला आणि १० मिनिटाने परत आला, मात्र तो खुप दारु प्यालाले होता. वडिलांनी त्याला सामानची आठवण करुन दिली व आम्ही आमच्या स्कुटरवर घरी आलो.
घरी आल्यावर मी वडीलांना विचारले “बाबा, तो हमाल दारु प्याला होता, तरी तुम्ही त्याला सामान आणण्यास का सांगीतले?”
बाबा म्हणाले, “अरे बाळा, त्याचे ते कामच आहे, ही ५०-१०० किलोची पोती उचलणे हे खुप अंगमहेनतीचे काम आहे, अशा कामाचा शरीरावर खुप ताण पडतो. दारु पिल्याने त्याचा हा ताण कमी होतो व रात्री त्याचे अंग ही दुखत नाही”
थोड्याच वेळात तो हमाल हातगाडी ढकलत ढकलत घरी पोहोचला. सर्व पोती त्याने उचलुन आमच्या घरात पहिल्या मजल्यावर आणुन टाकली, व प्यायला तांब्याभर पाणी मागीतले. वडिलांनी त्याला बाकीचे ४० रुपयाऎवजी ५० रुपये दिले. तो खुप खुश झाला व त्याने अत्यंत आनंदात नमस्कार केला व तो निघुन गेला.
साधारण १५ वर्षापुर्वीची घटना असेल ही. आज मी एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला आहे. परिस्थीती खुप बदलली मात्र काही अनुभव असे आले की हा “हमाल” मला आठवला.
माझे काही सहकर्मचारी जे स्व:ताला प्रोफेशनल म्हणवतात, उच्चशिक्षीत आहेत, १२-१४ तास एसी मध्ये बसतात, ब्रॅंडेड कपडे शुज घालतात. महागडे मोबाईल वापरतात, यांना गलेलठ्ठ पॅकेजेस आहेत व शारीरिक ताण काहीच नाही तरी दररोज दारु पितात (सॉरी, ड्रिंक्स घेतात).
त्यापैकी एकाला मी विचारले की “तु ड्रिंक्स का घेतो?”
तो म्हणाला, “खुप मानसीक ताण असतो येथे काम करणे म्हणजे”
त्यावर मी म्हणालो, “मग तुझ्या उच्चशिक्षणाचा काय फायदा? तु एवढा ताण ही सहन करु शकत नाही”
तो गप्प झाला.
विचार केल्यावर जाणवलं की तो हमाल किती चांगला होता, जो आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी पोते उचलण्याचे काम करत होता. भले तो दारु पिला तरी त्याची ती गरज होती व्यसन नाही.

रविवार, २० जून, २०१०

मराठी ब्लॉगर्स @ औरंगाबाद कम्युनिटी

प्रिय मित्रांनो,
जर आपण औरंगाबादचे असाल आणि आपल्याला जर मराठीमध्ये ब्लॉग लिहायला किंवा वाचायला आवडत असेलअशा व्यक्तींसाठी मी एक ऑर्कुटवर कम्युनिटी सुरु करीत आहे.
कृपया ह्या कम्युनिटीमध्ये सहभागी व्हा.
ही विनंती.

सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...