शुक्रवार, ३० एप्रिल, २०१०

अपंग मानसिकता

आयुष्यात बरेचसे अनुभव येतात, पण एखाद्या वेळी हे अनुभव अगदी दोन टोकाचे असतात.
प्रवासातले असेच दोन वेगवेगळे प्रसंग आहेत.

प्रसंग पहिला: एक १६-१७ वर्षाचा युवक एकटाच बसमध्ये चढला, सीटवर बसला. कंडक्टरने टिकीट विचारल्यावर, १/४ टिकीट द्या म्हणाला. व तसे त्याने अपंग असल्याचे प्रमाणपत्र सादर केले. त्यानुसार त्याचे टिकीट ८ रुपये झाले, त्याने कंडक्टरला २० रुपयाची नोट दिली. कंडक्टरने टिकीट दिले व दुस-या प्रवाश्याकडे वळाला, त्यावर तो युवक एकदम ओरडला "ओ, १२ रुपये परत द्या" कंडक्टर आश्चर्यचकीत झाला, कारण त्याच्या प्रमाणपत्रावर अपंगाचा प्रकार हा "मतीमंद" होता. तो ठिकठाक दिसणारा युवक एकटाच प्रवास करीत होता, त्यातुन त्याने ज्या आवाजात उरलेले पैसे परत मागितले त्यावरुन तरी तो मतीमंद आहे हे वाटत नव्हते.

प्रसंग दुसरा: साधारण २०-२१ वर्षाचा एक युवक बस मध्ये चढला, तोही एकटाच होता त्याच्या पायाला पोलिऒ झाला होता तो कुबड्या घेऊन चालत होता. मात्र त्याने पुर्ण टिकीट घेतले, कंडक्टरने त्याला सरकार ने दिलेल्या सवलतीबद्दल सांगितले त्यावर तो म्हणाला, "सर, मी अपंग आहे व सरकारची ही सवलत मला त्याची जाणीव करुन देते, पदोपदी मी एक अपंग आहे ही भावना माझ्या मनात आणुन देते. ही सवलत माझा आत्मविश्वास कमी करते. म्हणुन मला ही सवलतच नको आहे."

या दोन्ही प्रसंगावरुन दिसुन येते अपंग मानसिकता, पहिल्या प्रसंगातुन जनतेची तर दुस-या मधुन सरकारची...

शनिवार, २४ एप्रिल, २०१०

जाहिरात कालच्या आणि आजच्या...

"पॉमेलिव्ह का जवाब नही" म्हणणारा कपिल देव आजही मला आठवतो. कदाचित टिव्हीवर पाहिलेली ( व अजुनही आठवणारी) ही पहिली जाहिरात असेल.

जाहिरात हे असे एक माध्यम आहे की ज्याच्या साह्याने कंपनी आपले उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहचवु शकते. आठवते का "हमारा बजाज" ही जाहिरात, या जाहिरातीने संपुर्ण भारतीयांची मने जिंकली, नुसतेच मनेच नाही तर लोकांनीही स्कुटर खरेदीही केले. त्यात माझे वडील ही शामील होते. आमच्या घरीही स्कुटर आले ते हि जाहिरात पाहुनच.ही माझी एखाद्या उत्पादनाची सर्वात जास्त आवडलेली जाहिरात आहे.
त्यानंतरची आवडती जाहिरात आहे "टाटा सुमो किंग साईज" या उत्पादनाची.आता काळ बदलला व जाहिरातीची पद्धतही बदलत गेली. जाहिराती गमतीशीर ही झाल्या आहेत, चिप्सच्या जाहिरातीमध्ये युवती एका युवकाला फ्लाईंग किस देतांना पाहुन माझा पाच वर्षाचा भाचा मला म्हणाला " बघ मामा, तीच्या प मुळे आग लागते"

फेवीकॉल, कॅडबरी चॉकलेट यांच्यासारख्या दर्जेदार जाहिरात आजकाल कमी बनतात, काही जाहिराती उत्पादन विकण्यापेक्षा ती फक्त (कु)प्रसिद्ध करण्यासाठी बनविण्यात येतात की काय असे वाटते. कारण उत्पादन विकणे या संकल्पनेपासुन त्या दुर जातात.

एक युवक मोटारसायकल जमीनीवर न चालवता उडवुन ईच्छीत स्थळी पोहचतो हे पटायला जरा कठीण जाते. अशा जाहिरातीवर बंदी आणावी.

तरी तुम्ही माझा हा ब्लॉग वाचुन माझ्या ब्लॉगची ही जाहिरात करावी ही अपेक्षा आहे.

बुधवार, १४ एप्रिल, २०१०

जाऊ तिथे खाऊ

"चवीने खाणार त्याला देव देणार..." अशी म्हण आहे, व तसा अनुभवही मला चांगला आला आहे.
गेल्या ८-९ वर्षात मी जवळपास अर्धा महाराष्‍ट्र फिरलो, विविध गावं, शहरं व महानगरांतुन भरपुर पदार्थांची चव चाखली.
त्यापैकी काही ठिकाणांबद्दल मी आज लिहित आहे.

१) जालना: बटाटावडा व पारा
या छोट्या शहरात माझं बालपण गेले.
येथे जुना जालना भागात शनी मंदिर चौकात "हॉटेल लक्ष्मीकांत" आहे.
यांची खासीयत म्हणजे बटाटावडा व त्यावर तर्री (म्हणजे तिखट रस्सा) खातांना घाम निघतो.
येथेच मिळतो पारा (म्हणजे आटवलेले दुध) हा पिण्यासाठी रात्री उशिरा जा १० नंतर.

२) औरंगाबाद: दाबेली, ज्युस व पानं
येथील समर्थनगरमध्ये सावरकर चौकात मिळते दाबेली, येथुन जवळच आहे पैठणगेटला "लकी ज्युस सेंटर". येथे मिळतात नानाविध प्रकारांचे ज्युस. तरुणाईसाठी हा स्पॉट खास आहे. येथे थोडी प्रायवसीही मिळते.
जर तुम्हाला पानं खायचा शौक असेल तर नक्की जा उस्मानपुरा भागात असलेल्या "तारा पानं सेंटरला". अगदी ५ रुपयापासुन ते ५००० पर्यंत येथे पानं मिळते असे सांगतात, खुप गर्दी असते येथे.

३) नाशिक: मिसळपाव
येथील कॉलेज रोडला आहे "हॉटेल तुषार", नक्की जा आणि खा मिसळपाव.
खुप खुप गर्दी असते अगदी लोकं रांगेत उभी मी देखील पाहिली आहेत. रविवारी तर बुकींगही करावे लागते.

४) लासलगावं: भेळभत्ता
गावं तस छोटं आहे मात्र हे प्रसिद्ध आहे कांद्यासाठी. तसाच प्रसिद्ध आहे "लालाचा भेळभत्ता" कोणालाही विचारा दुकानात नेऊन सोडेल.
५ रुपयात भरपुर भेळभत्ता मिळतो.

५) सांगली: पुरीभाजी
पोस्ट ऑफीस चौकात आहे "हॉटेल विहार" येथील पुरीभाजी अप्रतीम आहे. एका प्लेटमध्येच पोट भरते. फक्त १२ रुपये

६) कोल्हापूर: मिसळपाव व चहा
फडतरे मिसळ बद्दल काही सांगायची गरजच नाही एक नंबर...
दुसरे म्हणजे चहा बस स्टॅंड समोर महालक्षी चेंबर्स मधील चहा, २००५ मध्ये १ रुपयात मिळायचा
खुप खुप गर्दी, नंबर, रांग येथे हे सर्व पहायला मिळायची.

(ता.क.: वरील दर काही वर्षापुर्वीचे आहेत)
वरील पैकी कोणत्याही ठिकाणी गेलो की मला काहीच सुचत नाही फक्त "जाऊ तिथे खाऊ"
ही व अशी बरीच ठिकाणं आहेत, मला जी आठवतात व आवडतात ती मी लिहित आहे.
आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

बुधवार, ७ एप्रिल, २०१०

कॉफी विथ निलेश...


शिर्षक वाचुन तुम्हाला वाटेल की एखाद्या मुलाखतीबद्दल लिहित आहे मात्र हा किस्सा तर आमच्या फसगतीचा आहे.

पाच वर्षापुर्वीची घटना आहे. मी बर्‍याच दिवसानंतर औरंगाबादला गेलो होतो. जुन्या काही मित्रांना फोन केले मी आलो आहे हे सांगण्यासाठी.

काही वेळातच निलेश कुलकर्णी माझ्या घरी येउन पोहचला. साहेबांकडे नविन बाईक होती, त्यावर शहरभर फिरलो (शहराचं निसर्ग सौंदर्य दिवसंदिवस वाढतेय हे जाणवलं) शेवटी आम्ही गाठलं निराला बाजार...

दुपारची वेळ होती आम्ही दोघे चहा प्रिय मात्र साहेब हिंदीत म्हणाले "आज कॉफी पिते है!" मी ही ठीक आहे म्हणालो. आम्ही एका प्रसिध्द कॉफीच्या दुकानात (मुबंई/पुणे येथे जुने मात्र औरंगाबादला नविन सुरु झालेले) गेलो.
वेटर आला, दोन कॉफीची ऑर्डर दिली. त्यामध्ये त्या वेटरने बदल सुचवले आम्ही ही होकार दिला.

वेटर लगेचच कॉफी घेउन आला, आम्ही कॉफी प्यालो. पाठोपाठ तो बील ही घेउन आला.
आणि धक्काच बसला! रुपये १३८ फक्त...

आम्ही ऎकमेकांकडे पाहिले, काहीही न बोलता बील भरले.
बाहेर पडता पडता निलॆश म्हणाला, "यार एवढ्यामधे तर तिघांचे जेवण झाले असते"

मी चमकुन विचारले, "कोण तिघं?"

तो म्हणाला, "तु, मी आणि तो वेटर..."

शुक्रवार, २ एप्रिल, २०१०

रेडिओ, मैत्री आणि एक आठवण...

माझी एक सवय आहे, नविन ओळखीचे रुपांतर जेव्हा मैत्रीमध्ये होउ लागते.
त्या व्यक्तिला मी एक प्रश्न विचारतो.
"तुझा आवडता चित्रपट कोणता?"

दोन वर्षापुर्वीची गोष्ट आहे, कल्याण ते सी.एस.टी प्रवासात हाच प्रश्न मी अनिकेत जोशी यास विचारला.
त्याने उत्तर दिलं १) अर्जुन (सनी देओल) २) हिरो (जॅकी श्रॉफ)

सी.एस.टी ला पोहचलो, अनिकेत म्हणाला जरा एफ.एम तरी लाव...

मी मोबाईलवर एफ.एम ट्युन केले चॅनल लागलं रेडिओ सिटी ९१.१, तर गाणं सुरु होतं
दुनिया माने बुरा तो गोली मारो (अर्जुन), अनिकेत जाम खुश झाला.
प्रवासातला प्रश्न आठवला. बोलता बोलता गाणंही संपल.

आश्चर्य तर पुढे घडलं या गाण्यानतंर लगेचच गाणं लागले ते म्हणजे,
डिंग डॉंग ओ बेबी सिंग अ सॉंग (हिरो)

आमचा आनंद गगनात मावेना, हा दिवस आम्ही आयुष्यात कधीही विसरणार नाही...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...