रविवार, ३० मार्च, २००८

मला सर्वात जास्त आवडलेली कविता...घर असेल तुझ नी त्याच,
वाट मात्र माझी असेल,
किनारा असेल तुझा नी त्याचा,
उंच लाट मात्र माझी असेल,
सर्व प्यादे मरून ही,
वजीर जर माझा उरणार असेल,
शह असेल तुम्हा दोघांची मात मात्र माझी असेल...

शनिवार, २९ मार्च, २००८

बालपण कुठे हरवलं...


रविवारी सकाळी जरा उशीरा उठलो व चहा घेण्यासाठी बाहेर पडलो सोबत वाचायला म्हणुन पेपर घेतला, आतलं पान उघडल्यावर एक जाहिरात दिसली "होटल महारष्ट्र रत्न" लगेचच मित्रांना फ़ोन केला, आणि दुपारच्या जेवणाचा बेत पक्का केला.
घरी परत आलो, आवरलं पुन्हा पेपर मध्ये डोकं घातले थोड्या वेळातच मित्र आले व मी स्व. आई-बाबा च्या फोटोला नमस्कार केला व बाहेर पडलो. हे नवीन होटल घराजवळ होतं, गप्पा मारत मारत चालतांना वेळ कधी गेला समजलेच नाही. आम्ही आत गेलो टेबल वर बसलो आणि ठरविले की छान पैकी महाराष्ट्रियन थाळीच मागवु. जेवण आले आणि पानावर लक्ष्य गेले तर पाहिले की ताटात एकसे एक पदार्थ आहेत, पुरण पोळी, साजुक तुप, दही भात, कढ़ी व पापड़ जेवण खूपच छान होत.
नकळत हे जेवण मला भुतकाळात घेउन गेल, घरी येउन विचारात पडलो "हे सर्व आपण जे आज होटल मध्ये जाऊंन विकत घेउन खातो तेच घरी आई किती छान बनवत होती आणि त्याची चव काही औरच होती" आणि मग एक एक गोष्टी आठवु लागल्या.
होटल मध्ये भातावरच तुप होतं ते विकतचे असणार तेच तुप आई घरी कढवुन तयार करायची, त्यातून तयार होणारी "बेरी" या साठी आम्हा भावंडामध्ये भांडण होत असे मात्र आई त्यामध्ये गुळ घालुन त्याचे समान वाटे करून आम्हा भावंडात वाटायची. दही भात तर माझा जीव की प्राण, त्यामुळे नियमीत दही बनवायची. मात्र ह्या दह्यासाठी लागणारे दुध मला आणायचे असल्यास मला जाम कंटाळा येत असे.
पापड पाहुन तर मला आठवण झाली ती आईने तासं तास उन्हात बसुन बनविलेल्या पापडांची, ज्या दिवशी आई पापड बनविणार तो दिवस म्हणजे एक सॊहळाच असायचा आम्हा भावंडासाठी, आई ने सर्व साहित्य गोळा करुन आम्हाला जास्तीचे लाटणे, पोळपाट व एक मोठे प्लास्टीक शेजारपाजारातुन आणण्याच्या मोहीमेवर पाठविलेले असायचे. प्लास्टीक मिळाल्यानंतर ते व गच्ची धुणं हेही आमचच काम असायचे. ते प्लास्टीक गच्चीत अंथरुण त्याची राखणदारी करणे ही आमची जबाबदारी असायची.
आईला बरेचसे पापड येत असत, त्यातले मला तीनच आठवतात,

१) उडदाचे पापड

२) बटाट्याचे [अंगठ्याचे] पापड

३) साबुदाण्याचे पळी पापड
उडदाचे पापड आई लाटुन करायची, ती लाटुन झाली की ती भर उन्हात वाळत घालायची ड्युटी आम्हा भावंडाची असायची. बटाट्याचे [अंगठ्याचे] पापड म्हणजे काही औरच मजा असायची, यासाठी मोठे व लहान असे दोन्ही प्लास्टीक लागायचे, या बटाट्याची मिश्रणाची गोळी लहान प्लास्टीकमध्ये ठेउन अंगठ्याने लाटुन गोल करावे लागते. नंतर हा तयार पापड अलगद उचलुन मोठ्या प्लास्टीकवर वाळत टाकायचे.तिसरा प्रकार होता तो साबुदाण्याचे पळी पापड यात पातळ साबुदाण्याचे मिश्रण पळी ऒतुन गोल आकार द्यावा लागायचा. पापड कोणताही असो मला त्याचे मिश्रण आणि अर्धवट वाळलेले पापड खायला खुपच आवडायचे.
मात्र आता हे काहीच नाही पहायला मिळत, सर्वकाही बाजारात विकत मिळतं पण त्या पदार्थाला आई हाताची चव कधीही येणार नाही. या जुन्या आठवणीत रविवार कसा गेला समजला नाही. खरचं ते बालपण कुठे हरवलं...

साधी राहणी उच्च विचारसरणी

परिचय :
माझं संपूर्ण नाव: नागेश विनोदराव देशपांडे
शहर: मुंबई
मुळगाव : जालना/औरंगाबाद
वय: २७
व्यवसाय: नोकरी (टेस्ट इंजिनीयर)
मला माझा स्वत:चा ब्लॉग असावा अशी इच्छा होती ती मी आज या ब्लॉग द्वारे पूर्ण करत आहे मग म्हंटले स्वतः बद्दल का नको लिहायला, मला अलंकारिक लिहिता येत नाही जे काही लिहिणार कृपया समजून घ्या.
तुम्हाला माझ्याबद्दल एक गोष्ट सर्वात पहिली सांगतो ती म्हणजे मी खुप बोलतो गप्पा मारणे हा माझा छंद आहे आणि हा छंद पूर्ण करण्यासाठी लोक लागतात, आहेत न मग...खुप मित्र मैत्रीनी आहेत. माझे मित्र हेच माझे विश्व आहे मी खरा खुलतो तो मित्रांमध्ये... माझं मन रमत ते मित्रामधे... मी असं मानतो की "प्रत्येकाची आपली एक स्वतंत्र विचार सरणी असते व आपल्या विचाराना जो मान देतो तोच आपला खरा मित्र..."माझं शिक्षण जालना या छोट्या शहरात झालं बी काँम नंतर २००१ मधे मी हे शहर सोडले व औरंगाबाद मधे नोकरी सुरु केली मला सुरुवाती पासूनच Computer Software मधे करिअर करायचे होते मात्र एक Computer Accountant च्या नोकरी वर समाधान करावं लागले। तेव्हापासून आजपर्यंत च्या प्रवासाबद्दल नंतर कधी सांगेन

माझे छंद:
मला नविन व्यक्तीला भेटायला आवडते, तसेच नवीन ठिकाणी जाणे, प्रवास करणे, थोड़े वाचन...मात्र सर्वात मोठा छंद (अहो वेड म्हणा) तो म्हणजे क्रिकेट व गाणं (घाबरू नका गात बीत नाही, फ़क्त ऐकतो, पण Please लगेचच गायला सुरुवात करू नका) पुस्तकातील इतिहास कधी जमला नाही मात्र क्रिकेटच्या इतिहासात मी पक्का आहे. सचिन, अनिल कुंबळे हे माझे आवडते खेळाडू, तर गाणी ऐकायला आवडतात ती मंहमद रफी, सोनू निगम व सुखविंदर सिंह गायिका अनुराधा पोंडवाल ह्यांची. आणखी एक आवड आहे ती म्हणजे फोटोग्राफीची
कदाचित याहून अधिक मी माझ्या विषयी सांगू शकत नाही, मग तुम्हीच विचारा काय विचारायचे आहे ते, मी आपल्या सुचनांवर अवश्य विचार करेल.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...